सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा ओवी २६ ते ५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

26-3
तरी आपुलेया सवेसा । कां न मगावासी परेशा । देवा सुकाळु हा मानसा । पाहला असे ॥26॥
तर मग हे परमेश्वरा ! माझ्या इच्छेप्रमाणे मी का बरे तुझ्याकडे (हट्ट धरू नये) मागू नये? देवा, माझ्या मनांतील हेतू (इच्छा) पूर्ण सफल होण्याची ही वेळ आली आहे.(तो दिवस प्रकाशीत झाला आहे)
27-3
देखें सकळार्तीचें जियालें । आजि पुण्य यशासि आलें । हे मनोरथ जहाले । विजयी माझे ॥27॥
पाहा, माझ्या सर्व मनोकामना परिपूर्ण झाल्या. आज माझे पूर्व पुण्य यशस्वी झाले माझ्या मनातील हेतू आज तडीस गेले.
28-3
जी जी परममंगळधामा । देवदेवोत्तमा । तूं स्वाधीन आजि आम्हां । म्हणऊनियां ॥28॥
कारण, अहो महाराज, सर्वोकृष्ट मंगलाचे स्थान आणि सर्व देवांत श्रेष्ठ असलेल्या देवा, तू आमच्या ताब्यात (सोबत आहेस) आला आहेस, म्हणून.
29-3
जैसां मातेचां ठायीं । अपत्या अनवसरु नाहीं । स्तन्यालागूनि पाहीं । जियापरी ॥29॥
पाहा, जसें लहान मुलाला स्तनपान करण्यास आईसाठी कोणतीच वेळ ही अवेळ नसते,
30-3
तैसें देवा तूंते । पुसिजतसें आवडे तें । आपुलेनि आर्तें । कृपानिधि ॥30॥
त्याप्रमाणे हे कृपानिधी देवा, मी माझ्या (मनातील निर्माण झालेला भ्रम दूर करण्यासाठी) इच्छेप्रमाणे वाटेल ते तुला विचारणार आहे.


31-3
तरी पारत्रिकीं हित । आणि आचरितां तरी उचित । ते सांगें एक निश्चित । पार्थु म्हणे॥31॥
तर मग परलोकात कल्याणकारक आणि इहलोकामध्ये आचरण करण्यास उचित असे जे एक निश्चित स्वरूपाचे आहे, ते मला सांगावे, असे अर्जुन म्हणाला.
32-3
श्रीभगवानुवाच:
लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयाऽनघ ।
ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां॥3.3॥

भावार्थ :- श्रीकृष्ण म्हणाले, हे निष्पाप अर्जुना ! या लोकांत पूर्वी मी दोन प्रकारचे मार्ग सांगितले आहेत.पहिला मार्ग :- ज्ञानयोगाच्या आधारे आत्मज्ञानी सांख्याचा. दुसरा मार्ग :- निरपेक्ष कार्मयोगाच्या आधारे कर्म करण्याचा. (सिद्धी व असिद्धी विषयी समबुद्धी ठेवण्याचा)
या बोला अच्युतु । म्हणतसे विस्मितु । अर्जुना हा ध्वनितु । अभिप्रावो ॥32॥
अर्जुनाचे बोलणे ऐकून भगवान श्रीकृष्ण आश्चर्याने म्हणाले, हे अर्जुना ! आम्ही तुला थोडक्यात मतलब सांगितला.(माझ्या बोलण्याचा अभिप्राय कांही प्रमाणात गूढ आहे.)
33-3
जे बुद्धियोगु सांगतां । सांख्यमतसंस्था । प्रकटिली स्वभावता । प्रसंगे आम्हीं ॥33॥
कारण की, निष्काम कर्मयोग सांगत असताना प्रसंगाने सहजच आम्ही (ज्ञानमार्गाची व्यवस्था) सांख्याना मान्य अशा योगाची निष्ठा सांगितली.
34-3
तो उद्देशु तूं नेणसी । म्हणोनि क्षोभलासि वायांचि । तरी आता जाण म्यांचि । उक्त दोन्ही ॥34॥
तो उद्देश तू जाणला नाहीस; म्हणून तुला व्यर्थ राग आला आहे. तर आता ध्यानांत ठेव की हे दोनही मार्ग (ज्ञानयोग आणि कर्मयोग) मीच सांगितले आहेत.
35-3
अवधारीं वीरश्रेष्ठा । यें लोकीं या दोन्ही निष्ठा । मजचिपासूनि प्रगटा । अनादिसिद्धा ॥35॥
हे विरश्रेष्ठा अर्जुना ऐक ! हे दोन्ही मार्ग अनादि काळापासून आहेत, आणि (हे मार्ग)माझ्यापासून प्रकट झालेल्या आहेत.(या लोकी व्यक्त झाल्या आहेत हे जाण)


36-3
एकु ज्ञानयोगु म्हणिजे । जो सांख्यीं अनुष्ठीजे । जेथ ओळखीसवें पाविजे । तद्रूपता ॥36॥
या पैकी एकाला ज्ञानयोग म्हणतात, त्याचे आचरण ज्ञानी लोक करतात. त्यामुळे आत्मतत्वाची जाणीव होऊन तद्रुपता प्राप्त होते.
37-3
एक कर्मयोगु जाण । जेथ साधकजन निपुण । होवूनिया निर्वाण । पावती वेळे ॥37॥
(आणि) दुसरा मार्ग म्हणजे कर्मयोग होय. कर्ममार्गाचे लोक समत्वभाव ठेवण्याविषयी निष्णात असतात आणि कांही काळाने त्यांना मोक्ष प्राप्त होतो.
38-3
हे मार्गु तरी दोनी । परि एकवटती निदानीं । जैसे सिद्धसाध्यभोजनीं । तृप्ति एकी॥38॥
असे हे दोन मार्ग असले, तरी ते एकाच चैतन्याच्या ठिकाणी (परंतु शेवटी एकाच ठिकाणी) एकरूप होतात. ज्याप्रमाणे तयार असलेल्या व तयार करावयाच्या अशा दोन्ही जेवणात सारखीच तृप्ती असते.
39-3
कां पूर्वापर सरिता । भिन्ना दिसती पाहतां । मग सिंधूमिळणीं ऐक्यता । पावती शेखीं ॥39॥
किंवा पूर्वेकडून व पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्या पाहिल्या तर वाहताना वेगळ्या दिसतात, मग समुद्रात मिळाल्या असता शेवटी एकच होतात;
40-3
तैसीं दोनी ये मतें । सूचिती एका कारणातें । परी उपास्ति ते योग्यते – । आधीन असे ॥40॥
त्याप्रमाणे ज्ञानयोग आणि कर्मयोग हे जरी दोन मार्ग असले, तरी ते एकाच साध्याला सुचवितात. परंतु त्याचे आचरण करणे, करणाऱ्याच्या योग्यतेवर अवलंबून आहे.


41-3
देखें उत्प्लवनासरिसा । पक्षी फळासि झोंबे जैसा । सांगें नरु केवीं तैसा । पावे वेगां ॥41॥
असे पाहा की, ज्याप्रमाणे पक्षी उड्डाणाबरोबर फळाला बिलगतो त्याप्रमाणे मनुष्याला त्या वेगाने ते फळ कसे प्राप्त करून घेता येईल? सांग बरें.
42-3
तो हळूहळू ढाळेंढाळें । केतुकेनि एके वेळे । मार्गाचेनि बळें । निश्चित ठाकी ॥42॥
तो मनुष्य एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर हळूहळू जात असतो आणि कांही वेळाने त्या मार्गाच्या आधाराने त्या फळापर्यंत निश्चित पोहोचतो.
43-3
तैसें देख पां विहंगममतें । अधिष्ठूनि ज्ञानातें । सांख्य सद्य मोक्षातें । आकळिती ॥43॥
पाहा. (वरील दृष्टांतातील पक्षाप्रमाणे) त्याचप्रमाणे ज्ञानमार्गाचे जे वाटचाल करतात, ते ज्ञानी विहंगम मार्गाने तत्काळ मोक्षाची प्राप्ती करून घेतात.
44-3
येर योगिये कर्माधारें । विहितेंचि निजाचारें । पूर्णता अवसरें । पावतें होती ॥44॥
दुसरे जे कर्मयोगी आहेत, ते कार्मयोगाच्या आधारे शास्त्राप्रमाणे आपला आचारच करून, कांही काळाने मोक्षाला प्राप्त होतात.
45-3
न कर्मणामनारभान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते ।
न च संन्यसनादेव सिद्धिं समाधिगच्छति॥3.4॥

भावार्थ :- मनुष्य कर्म न करण्याने निष्कर्मतेला प्राप्त होत नाही. तसेच, प्राप्त कर्माच्या त्यागाने परमेश्वर- साक्षात्काररूप सिद्धी प्राप्त करू शकत नाही.
वांचोनि कर्मारंभ उचित । न करितांचि सिद्धवत । कर्महीना निश्चित । होईजेना ॥45॥
कर्माचा आरंभ केल्याशिवाय, योग्य असे कर्म न करता कर्महीन पुरुषाला सिद्ध पुरुषांप्रमाणे निष्कर्म नक्कीच होता येणार नाही.


46-3
कां प्राप्तकर्म सांडिजे । येतुलेनि नैष्कर्म्या होईजे । हें अर्जुना वायां बोलिजे । मूर्खपणें ॥46॥
अर्जुना ! (अधिकारानुसार आपल्या भागाला आलेले) विहित कर्म टाकून द्यावे व एवढ्यानेच निष्कर्म व्हावे, हे बोलणे व्यर्थ व मूर्खपणाचे आहे.
47-3
सांगें पैलतीरा जावें । ऐसें व्यसन कां जेथ पावे । तेथ नावेतें त्यजावें । घडे केवीं ॥47॥
पूर्ण भरलेल्या नदीच्या पलीकडच्या किनाऱ्यावर कसे जावे, असे संकट जेंव्हा निर्माण होते, तेथे नावेचा त्याग करून कसे चालेल? सांग बरें.
48-3
ना तरी तृप्ति इच्छिजे । तरी कैसेनि पाकु न कीजे । कीं सिद्धुही न सेविजे । केवीं सांगें ॥48॥
अथवा, जर भोजनापासून तृप्तीची इच्छा आहे तर स्वयंपाक न करून कसे चालेल? किंवा तयार असलेला स्वयंपाक न सेवन करता कसे चालेल? सांग बरे.
49-3
जंव निरार्तता नाहीं । तंव व्यापारु असे पाहीं । मग संतुष्टीचां ठायीं । कुंठे सहजें ॥49॥
जोपर्यंत निरिच्छ अवस्था प्राप्त होत नाही, तोपर्यंत कर्म केले पाहिजे.असें समज. एकदा का आत्मसंतुष्ठ अवस्था प्राप्त झाली, की कर्म सहजच थांबले जाते.
50-3
म्हणोनि आइकें पार्था । जया नैष्कर्म्यपदीं आस्था । तया उचित कर्म सर्वथा । त्याज्य नोहे ॥50॥
म्हणून हे अर्जुना ! ऐक. ज्याला नैष्कर्म्य स्थितीची तीव्र अशी इच्छा आहे, त्याने आपली आपली उचित विहित कर्माचा त्याग करणे योग्य होणार नाही.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *