अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यंति तेऽव्याम् ।
संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते॥2.34॥
भावार्थ:- आणि सर्व लोक अनेक दिवस तुझी अपकीर्ती बोलत राहतील. सन्मान्य माणसाला अपकीर्ती मारणापेक्षाही अधिक दुःखकारक असते.
201-2
म्हणोनि स्वधर्म हा सांडसील । तरी पापा वरपडा होसील । आणि अपेश तें न वचेल । कल्पांतावरी ॥201॥
(एवढ्याच करीता अर्जुना आपला धर्म टाकू नको)
म्हणून स्वधर्मचा त्याग करशील, तर निश्चितच पापाला पात्र होशील,आणि कल्पांतपर्यंत (योगानुयुगे) अपकीर्तिचा डाग नाहिसा होणार नाही.
202-2
जाणतेनि तंवचि जियावे । जंव अपकीर्ति आंगा न पवे । आणि सांग पां केवी निगावें । एथोनियां ॥202॥
अपकीर्ति जोपर्यँत अंगाला स्पर्श करीत नाही, तोपर्यंतच शहाण्याने (व्यवहारी आणि सज्जनांनी) जगावे; असे असताना तू सांग, की युद्धातून कसे बरे निघून जावे??
203-2
तूं निर्मत्सरु सदयता । येथूनि निघसी कीर माघौता । परी ते गति समस्तां । न मनेल ययां ॥203॥
तू मत्सररहित (कौरवांनी दिलेला त्रास त्याबद्दल आलेला राग विसरून) दयायूक्त (आप्तजना बद्दल मायेमुळे निर्माण झालेले प्रेम) अंतःकरणाने रणागणातून परत फिरशील.पण (तू कशामुळे माघारी फिरत आहेस) ही भूमिका सर्वाना कळणार नाही.
204-2
हें चहूंकडून वेढितील । बाणवरी घेतील । तेथ पार्था न सुटिजेल । कृपाळुपणे ॥204॥
हे कौरव तुला चोहोबाजुंनी घेरतील व तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील. पार्था ! तुझा या दयाळूूपणामुळे तूझी सुटका होणार नाही.
205-2
ऐसेनिही प्राणसंकटे । जरी विपायें पां निघणें घटे । तरी तें जियालेंही वोखटें । मरणाहुनी ॥205॥
आणि जरी (मोठ्याकष्टाने) कदाचित तुझी या प्राणसंकटातून तूझी सुटका झाली, तरी ते तसे जगणे मरणापेक्षा वाईटच आहे.
भयाद् रणादुपरं मंस्यते त्वां महारथाः ।
येषां त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्॥2.35॥
भावार्थ :- हे सर्व महारथी, रणागणातून तू भयामुळे परत गेलास (पळून गेलास) असे मानतील. ज्यांना तुझ्याविषयी अभिमान वाटत होता, ते तुला तुच्छ मानतील.
206-2
तूं आणिकही एक न विचारिसी । एथ संभ्रमे झुंजो आलासी । आणि सकणवपणे निघालासी । मागुता जरी ॥206॥
तू आणखी एक गोष्टीचा विचार करत नाहीस; तू या ठिकाणी मोठय़ा उत्साहाने लढण्यासाठी (आत्मविश्वासाने) आलास.आणि जर दया उत्पन्न झाल्याने परत माघारी फिरलास;
207-2
तरी तुझें तें अर्जुना । या वैरियां दुर्जनां । कां प्रत्यया येईल मना । सांगे मज ॥207॥
तर हे अर्जुना ! हे तुझे दयाळूपण, या दुष्ट वैऱ्यांच्या (कौरवांच्या) मनाला समजेल काय (कौरवांना खरे वाटेल काय)?? सांग बरे मला.
अवाच्यवादांश्च बहून् वदिष्यंति तवाहिताः
। निंदंतस्तव सामर्थ्य ततो दुःखतरं नु किम्॥2.36॥
भावार्थ :- तुझे शत्रू तुला अनेक अपशब्द बोलतील. तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील. (सामर्थ्यवाण पुरुषाला निंदा ही मारणापेक्षा जास्त वाईट आहे.) याहून अधिक दुःख कोणते?
208-2
हे म्हणतील गेला रे गेला । अर्जुन आम्हां बिहाला । हा सांगें बोलु उरला । निका कायी ॥208॥
हे कौरव म्हणतील, “हा पळाला रे पळाला” ! अर्जुन आम्हाला भिऊन युद्ध सोडून पळून गेला”. असा दोष सदैव तुझ्यावर राहिला, तर ते चांगले आहे का? तूच सांग.
209-2
लोक सायासें करूनि बहुतें । कां वेंचिती आपुली जीवितें । परी वाढविती कीर्तीतें । धनुर्धरा ॥209॥
लोक अनेक प्रकारचे कष्ट करतात किंवा प्रसंगी आपला प्राणही गमावतात; पण, हे धनुर्धरा, आपली किर्ती वाढवितात.
210-2
ते तुज अनायसें । अनकळित जोडिली असे । हें अद्वितीय जैसें । गगन आहे ॥210॥
ती कीर्ती तुला (आपोआप) अनायासे लाभलेली आहे. आकाश हे ज्याप्रमाणे अद्वितीय आहे;
211-2
तैसी कीर्ती निःसीम । तुझां ठायीं निरुपम । तुझे गुण उत्तम । तिहीं लोकीं ॥211॥
त्याप्रमाणे अमर्याद व उपमारहित अशी तुझी किर्ती आहे. त्रैलोक्यात तुझ्या गुणांची प्रसिद्धी आहे.
212-2
दिगंतीचे भूपति । भाट होऊनि वाखाणिती । जे ऐकिलिया दचकती । कृतांतादिक ॥212॥
दाही दिशांचे राजे रजवाडे, भाट (स्तुतिपाठक) होऊन तुझ्या गुणांचे वर्णन गातात. ती ऐकून यमादिक देखिल दचकतात.
213-2
ऐसा महिमा घनवट । गंगा तैसी चोखट । जयां देखी जगीं सुभट । वांठ जाहली ॥213॥
अशी तुझी किर्ती असून, ती गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ व पवित्र आहे. आणि ती पाहून, ऐकून जगातील मी मी म्हणणारे योद्धां पण चकित होतात.त्यांना ज्ञानसंपादन करण्याची प्रेरणा मिळते. (मार्गदर्शन लाभते)
214-2
ते पौरुष तुझें अद्भुत । आइकोनियां हे समस्त । जाहले आथि विरक्त । जीवितेंसी ॥214॥
असा तूझा अपूर्व शौर्याचा महिमा ऐकून, हे सर्व कौरव आपल्या जीविताची आशा सोडली आहे.
215-2
जैसा सिंहाचिया हांका । युगांतु होय मदमुखा । तैसा कौरवां अशेखां । धाकु तुझा ॥215॥
ज्या प्रमाणे सिंहाची गर्जना ऐकून उन्मत्त हत्तीला ही प्रलयकाळच जवळ आला आहे,असे वाटते. त्याप्रमाणे या कौरवांना तूझा धाक बसला आहे.
216-2
जैसे पर्वत वज्रांते । ना तरी सर्प गरुडातें । तैसा अर्जुना हे तूंते । मानिती सदा ॥216॥
ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प गरूडाला (भीतीच्या भावना) समजतात, त्याप्रमाणे (अर्जुना)हे कौरव सैन्य तुला घाबरतात.
217-2
ते अगाधपण जाईल । मग हिणावो अंगा येईल । जरी मागुता निघसील । न झुंजतचि ॥217॥
(असे असून सुद्धा) जर तू युद्ध न करता माघारी फिरशील; तर ही तूझी (मिळवलेली, अनायासे प्राप्त झालेली) किर्ती नाहीशी होईल, आणि मग तूझ्या अंगी हीनत्व प्राप्त होईल.
218-2
आणि हे पळतां पळों नेदिती । धरूनि अवकळा करिती । न गणित कुटी बोलती । आइकतां तुज ॥218॥
बरे ! (विचार करून किंवा यांच्या प्रेमापोटी) पळून जाऊ लागलास, तरी हे कौरव तुला पळून जाऊ देणार नाहीत. तूला पकडून तुझी (कारण न जाणता) फजिती करतील आणि तूझ्यासमोर (तोंडावर) तूझी अमर्याद निंदा करतील.
219-2
मग ते वेळी हियें फुटावें । आंता लाठेपणे कां न झुंजावे । हें जिंतले तरी भोगावें । पृथ्वीतल॥219॥
ते (मर्मभेदक शब्द,) निंदेचे शब्द ऐकून, मग तुझे अंतःकरण विदीर्ण होईल. त्यापेक्षा आत्ताच शौर्याने का बरे लढत नाहीस? आणि जर तू यांना (कौरवांना) जिंकलेस, तर पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घेशील.
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्षसे महीम् ।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः॥2.37॥
भावार्थ :- हे कौंतेय !! जर या युद्धात मारला गेलास तर स्वर्गाला प्राप्त होशील; अथवा विजय प्राप्त झाला, तर पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून (हे अर्जुना) दृढ निश्चयाने युध्दासाठी उभा राहा.
220-2
ना तरी रणीं एथ । झुंजतां वेंचलें जीवित । तरी स्वर्गसुख अनकळित । पावसील ॥220॥
अथवा ह्या रणांगणावर युद्ध करताना तुझे प्राण खर्ची पडले; तर स्वर्गातील सुख तुला त्रासावाचून प्राप्त होईल.
221-2
म्हणोनि ये गोठी । विचारु न करीं किरिटी । आतां धनुष्य घेऊनि उठी । झुंजें वेगीं ॥221॥
म्हणून हे अर्जुना ! युद्ध करावे अथवा करू नये, या गोष्टीचा विचार करत बसू नकोस, तर ऊठ हातात धनुष्य घेऊन लवकर युद्धास सुरुवात कर.
222-2
देखें स्वधर्मु हा आचरतां । दोषु नासे असता । तुज भ्रांति हे कवण चित्ता । एथ पातकाची ॥222॥
असे पाहा की, या स्वधर्माचे आचरण केले असता सर्व पातके नष्ट होतात. असे असताना युद्धामुळे तुला पातक लागेल हा समज तूझ्या मनात कसा निर्माण झाला??
223-2
सांगे प्लवेंचि काय बुडिजे । कां मार्गीं जातां आडळिजे । परी विपायें चालो नेणिजे । तरी तेंही घडे ॥223॥
तुच सांग अर्जुना, नावेत बसून जाणारा कोणी बुडेल का? किंवा चांगल्या रस्त्यावरून चालताना ठेच लागेल का? पण, जर नीट चालता येत नसेल तर होईल ही तसे.
224-2
अमृतें तरीचि मरीजे । जरी विखेंसी सेवीजे । तैसा स्वधर्में दोषु पाविजे । हेतुकपणे ॥224॥
अमृतासमान असणाऱ्या गोष्टी विषासह सेवन केल्या, (दूध पिल्याने मृत्यू होणार नाही, पण दूधात विषाचे ही सेवन झाले तर मृत्यू येईल) तर मृत्यू प्राप्त होतो. त्याचप्रमाणे, स्वधर्माचे फलाच्या अपेक्षेने आचरण केल्याने दोष मात्र लागतील.
225-2
म्हणोनि तुज पार्था । हेतु सांडोनि सर्वथा । क्षात्रवृत्ती झुंजतां । पाप नाही ॥225॥
म्हणून हे अर्जुना ! सर्व प्रकारे फळाची आशा सोडून क्षत्रिय धर्माने युद्ध कर, म्हणजे तुला मुळीच पाप (पातकाचा लेशहि तुला) लागणार नाही.
सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि॥2.38॥
भावार्थ :- सुखदुःख, लाभ-हानी, जय-पराजय, याना समान मानून तू युद्धाला तयार हो, म्हणजे तुला पाप लागणार नाही.
