201-3
पतंगा दीपीं आलिंगन । तेथ त्यासी अचूक मरण । तेवीं विषयाचरण । आत्मघाता ॥201॥
पतंगाने जर दिव्याला आलिंगन दिले, तर त्याचक्षणी त्याला अचूक मरण येते, त्याप्रमाणे विषयांचा उपभोग घेणे, हे माणसाच्या नाशाला कारणीभूत होते.
(विषयाला आलिंगन देणे, त्याचा उपभोग घेण्याचा विचार सुद्धा उत्पनं होणे)
सदृश्यं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि ।
प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति॥3.33॥
ज्ञानी आपल्या स्वभावाला अनुसरून वागत असतात. महाभूते देखील आपल्या स्वभावाला अनुसरून वागतात. मग या विषयात कोणाचा हट्ट काय करेल??
202-3
म्हणोनि इंद्रिये एकें । जाणतेनि पुरुखें । लाळावीं ना कौतुकें । आदिकरूनि ॥202॥
म्हणून जाणकार,कोणीहि शहाण्या मनुष्याने या इंद्रियांचे मौजेने देखील लाड करू नयेत.
203-3
हां गा सर्पेंसी खेळों येईल । कीं व्याघ्रसंसर्ग सिद्धी जाईल । सांगे हाळाहाळ जिरेल । सेविलिया ॥203॥
अरे, विषारी सर्पबरोबर कधी खेळता येईल काय? किंवा वाघाशी ठेवलेली संगत काधि निटपणे शेवटास जाईल काय?? तूच सांग आता. हलाहल विष प्राशन केले, तर ते पचेल काय??
204-3
देखें खेळतां अग्नि लागला । मग तो न सांवरे जैसा उधवला । तैसा इंद्रिया लळा दिधला । भला नोहे ॥204॥
सहज खेळता खेळता आग लागली आणि ती भडकली (ज्वाला भडकल्या) तर ती अटोपत नाही, (सावरता येत नाही), त्याप्रमाणे इंद्रियांना विषयांचा लळा जर लागला (त्यांचे लाड केले), तर त्याचा परिणाम कधीहि चांगला होत नाही.
205-3
एर्हवीं तरी अर्जुना । या शरीरा पराधीना । कां नाना भोगरचना । मेळवावी ॥205॥
हे अर्जुना ! एरव्ही सहज विचार करून पहिले, तर शरीर हे प्रकृतीच्या अधीन असलेले दिसून येते (परतंत्र असलेल्या शरीराकरिता). तर मग या शरीराकरिता नाना प्रकारचे भोग का म्हणून जमवावेत??
206-3
आपण सायासेंकरूनि बहुतें । सकळहि समृद्धिजातें । उदोअस्तु या देहातें । प्रतिपाळावे कां ॥206॥
आपण अतिशय कष्ट करून मिळवलेली सर्व संपत्ती, समृद्धी खर्च करून (उत्पत्ती व नाश) नाश पावणाऱ्या या शरीराचे पालन का बरे करावे??
207-3
सर्वस्वें शिणोनि एथें । अर्जवावीं संपत्तिजातें । तेणें स्वधर्मु सांडुनी देहातें । पोखावें काई ॥207॥
देहाला नाना प्रकारचे कष्ट देऊन, दमून – भागून संपत्ती मिळवावी आणि स्वधर्मचा त्याग करून, नाश पावणाऱ्या या देहाचे पोषण करीत राहावे, हे योग्य आहे काय??
208-3
मग हें तंव पांचमेळावा । शेखीं अनुसरेल पंचत्वा । ते वेळीं केला कें गिंवसावा । शीणु आपुला ॥208॥
हे शरीर पंचमहाभूते एकत्र येऊन तयार झाले आहे व ते शेवटी पंचमहाभूतातच विलीन होणार आहे. त्यावेळी आपण केलेले एव्हढे कष्ट कोठे बरे शोधून काढावेत??
209-3
म्हणूनि केवळ देहभरण । ते जाणें उघडी नागवण । यालागी एथ अंतःकरण । देयावें ना ॥209॥
म्हणून फक्त देहाचे पोषण करणे, हे उघड उघड आपले मोठे नुकसान आहे (हे शरीर नश्वर आहे हे जाणून सुद्धा), याकरिता (मनुष्याने) तू देहाच्या पोषणाकडेच अंतःकरणापासून लक्ष देऊ नकोस.
इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ ।
तयोर्न वशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपंथिनौ॥3.34॥
भावार्थ :- प्रत्येक इंद्रियांची अनुकूल-प्रतिकूल विषयाविषयी (आवड – नावड) राग – द्वेष ही ठरलेली आहेत. मनुष्याने त्या राग – द्वेषाच्या अधीन होऊ नये (ताब्यात जाऊ नये). कारण ते परमार्थाच्या मार्गात विघ्न आणणारे शत्रू आहेत.
210-3
एर्हवीं इंद्रियाचियां अर्था – । सारिखा विषयो पोखितां । संतोषु कीर चित्ता । आपजेल ॥210॥
एरव्ही, इद्रियांच्या इच्छेप्रमाणे सेवन केले (आचरण केले), तर मनाला संतोष प्राप्त होतो, हे खरे;
211-3
परी तो संवचोराचा संगु । जैसा नावेक स्वस्थु । जंव नगराचा प्रांतु । सांडिजेना ॥211॥
परंतु तो संतोष म्हणजे बाहेरून सभ्य दिसणाऱ्या चोराच्या संगतीप्रमाणे आहे; तो चोर गावाची सीमा पार करेपर्यंत गप्प असतो आणि वनात (एकटे आहोत असे समजता क्षणी) घात करून पैसे काडून घेतो.
212-3
बापा विषाची मधुरता । झणे आवडी उपजे चित्ता । परी तो परिणाम विचारितां । प्राणु हरी॥212॥
बाबारे ! विष वरून मधुर वाटेल, मनात ते प्राशन करण्याची इच्छा सुद्धा निर्माण होईल; परंतु त्याच्या परिणामाचा विचार केला तर ते प्राणघातक आहे.
213-3
देखें इंद्रियीं कामु असे । तो लावी सुखदुराशे । जैसा गळीं मीनु आमिषें । भुलविजे गा ॥213॥
पाहा, ज्याप्रमाणे गळाला लावलेले आमिष माशाला बरोबर भुलविते, त्याप्रमाणे इंद्रियांच्या ठिकाणी असणारी विषयांची तीव्र लालसा मनुष्यास खोट्या सुखाच्या आशेकडे प्रवृत्त करत असते.
214-3
परी तयामाजि गळु आहे । जो प्राणातें घेऊनि जाये । तो जैसा ठाउवा नोहे । झांकलेपणें॥214॥
परंतु त्या आमिषाखाली प्राण घेणारा गळ आहे, तो आपला नाश करेल, हे त्या माशाला (आमिषाने तो गळ झाकला गेल्यामुळे) ज्याप्रमाणे कळत नाही,
215-3
तैसें अभिलाषें येणें कीजेल । जरी विषयाची आशा कीजेल । तरी वरपडा होईजेल । क्रोधानळा ॥215॥
त्याप्रमाणे विषयांची लालसा निर्माण झाली, की मानवाची तशीच अवस्था होते. जर विषयांची तीव्र इच्छा धरली, तर मानवाला क्रोधरूपी अग्नीत पडावे लागते.
216-3
जैसा कवळोनियां पारधी । घातेचिये संधी । आणि मृगातें बुद्धीं । साधावया ॥216॥
ज्याप्रमाणे कुशाग्र बुद्धीचा पारधी हा हरिणाचा घात करण्यासाठी त्याला चारी बाजूने घेरून एके ठिकाणी बरोबर आणत असतो, (मराच्या कचाटीत)
217-3
एथ तैसीची परी आहे । म्हणूनि संगु हा तुज नोहे । पार्था दोन्ही कामक्रोध हे । घातुक जाणें ॥217॥
विषयांच्या सुखाचा देखील प्रकार असाच आहे. म्हणून तू विषयांची संगती करू नकोस. पार्था ! विषयांच्या मागे लागलास तर काम, क्रोध निर्माण होतात आणि हे दोन्ही (परमार्थाच्या मार्गात अडथळे निर्माण करणारे आहेत) घात करणारे आहेत.
218-3
म्हणऊनि हा आश्रयोचि न करावा । मनींही आठवो न धरावा । एकु निजवृत्तीचा वोलावा । नासों नेदीं ॥218॥
म्हणून विषय इच्छेला थाराच देऊ नये. त्यांची मनातही आठवण आणू नये. स्वधर्माची जाणीव कधीही नष्ट होऊ देऊ नकोस.
श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् ।
स्वधर्मे निधनम् श्रेयः परधर्मो भयावहः॥3.35॥
भावार्थ :- सुलभ पद्धतीने आचरिलेल्या परम धर्मापेक्षा, स्वधर्म दिसण्यास कमी प्रतीचा (आचरण्यास कठीण) असला, तरी स्वधर्मच कल्याणप्रद होय. परधर्म हा भीतीदायक आहे, स्वधर्मात मरण आले; तरी चांगले.
219-3
अगा स्वधर्मु हा आपुला । जरि कां कठिणु जाहला । तरी हाचि अनुष्ठिला । भला देखें ॥219॥
असे पाहा की, आपला स्वधर्म जरी आचरण्यास कठीण असला, तरी त्याचेच आचरण करणे चांगले होय.
220-3
येरू आचारु जो परावा । तो देखतां कीर बरवा । परि आचरतेनि आचरावा । आपुलाचि ॥220॥
दुसऱ्याचा धर्म जरी दिसावयास चांगला असला, तरी आचरण करणार्यांनी आपल्या विहित कर्माचेच आचरण करावे.
221-3
सांगे शूद्रघरीं आघवीं । पक्वाने आहाति बरवीं । तीं द्विजें केवीं सेवावीं । दुर्बळु जरी जाहला ॥221॥
(स्वधर्माचे आचरण करणारा) ब्रम्हज्ञान जाणणारा मनुष्य जरी गरीब असला, तरी त्याने दुसऱ्याच्या घरची पक्वान्ये कशी बरे सेवन करावीत.? सांग.
222-3
हें अनुचित कैसेनि कीजे । अप्राप्य केवीं इच्छिजे । अथवा इच्छिलेंही पाविजे । विचारीं पां ॥222॥
असे अनुचित कर्म कसे बरे करावे? जे ग्रहण करण्यास योग्य नाही, त्याची (त्या अन्नाची) इच्छा कशी करावी? अथवा इच्छा केलेला विषय प्राप्त जरी झाला, तरी त्याचे सेवन करावे का? याचा तू विचार कर.
223-3
तरी लोकांचीं धवळारें । देखोनियां मनोहरें । असतीं आपुलीं तणारें । मोडावीं केवीं ॥223॥
दुसऱ्याची पांढरीशुभ्र मनोहर घरे पाहून आपल्या असलेल्या गवताच्या झोपड्या कशा मोडून टाकाव्यात??
224-3
हें असो वनिता आपुली । कुरुप जरी जाहली । तरी भोगितां तेचि भली । जियापरी ॥224॥
हे असू दे. आपली धर्मपत्नी रूपाने जरी थोडी कमी असली तरी, ज्याप्रमाणे तिच्याबरोबर सुखाने संसार करावा हे चांगले;
225-3
तेवीं आवडे सांकडु । आचरता जरी दुवाडु । तरी स्वधर्मचि सुरवाडु । पारत्रिकीचा ॥225॥
त्याप्रमाणे आपला स्वधर्म करण्यास कठीण जरी असला, तसेच करताना कितीही आपत्ती आली, तरी आपला स्वधर्मच परलोकी सुख देणारा आहे.
