51-2
हें जाणोनि पार्थु बिहाला । मग पुनरपि बोलों लागला । म्हणे देवो कां चित्त या बोलां । देतीचिना ॥51॥
(आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत), हे लक्षात आल्यावर अर्जुन मनात गोंधळला (,घाबरला). मग पुनः बोलू लागला. तो म्हणाला, देवा ! माझ्या या बोलण्याकडे आपण का लक्ष देत नाही??
न चैतद् विद्मः करतन् नो गरीयो यद् वा जयेम यदि वा नो जयेयुः ।
यानेव हत्वा न जिजीविषामस्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः॥2.6॥
भावार्थ :- आम्हाला या युद्धात जय मिळेल, अथवा ते आम्हाला जिंकतील? या दोन्हीमध्ये कोणती गोष्ट श्रेयस्कर आहे, हे आम्हाला समजत नाही.ज्यांना मारून जगण्याची आमची इच्छा नाही, तेच कौरव युद्धाला सज्ज होऊन आमच्या समोर उभे आहेत. ॥6॥
52-2
येर्हवीं माझां चित्तीं जें होते । तें मी विचारूनि बोलिलों एथें । परि निकें काय यापरौते । तें तुम्ही जाणा ॥52॥
अजून जे जे काहीं विचार माझ्या मनात होते ते मी आपणा समोर स्पष्ट करून बोललो, परंतु याच्यापेक्षा काय चांगले आहे, ते तुम्हांसच ठाऊक !!
53-2
पै विरु जयांसी ऐकिजे । आणि या बोलाचि प्राणु सांडिजे । ते एथ संग्रामव्याजें । उभे आहाती ॥53॥
ज्यांच्याशी (आप्तजांना उद्देशुन) वैर करण्याची गोष्ट ऐकूनच (ऐकल्याबरोबर) आम्ही प्राण त्याग करावा, तेच या रणांगणावर युद्ध करण्यासाठी आमच्यासमोर उभे आहेत.
54-2
आतां ऐसेयांतें वधावे । कीं अव्हेरुनिया निघावें । या दोहोंमाजी काइ करावे । तें नेणों आम्ही ॥54॥
(समोर उभे असलेल्या) अशांचा वध करावा, कि युद्ध सोडून निघून जावे?;या दोहोमध्ये चांगली गोष्ट कोणती, ते आम्हाला मुळीच समजत नही.
कार्पण्यदोषोपहत्स्वभावः
पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः ।
यत् श्रेयः स्यान् निश्चितं ब्रूहि तन् मे
शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्॥2.7॥
भावार्थ :- कारुण्याने व्याप्त दोषाने माझे हे मन धर्म-अधर्म काहीं जाणेना, चित्त मोहित झालेला मी आपणास विचारीत आहे की,जे निःसंशय श्रेयस्कर असेल ते मला सांग. मी तुझा शिष्य आहे. तुला शरण आलेल्या मला आपण उपदेश करा. ॥7॥
55-2
आम्हां काय उचित । तें पाहतां न स्फुरे एथ । जे मोहें येणें चित्त । व्याकुळ माझे ॥55॥
आम्हाला काय उचित आहे आणि काय करणे अनुचित आहे, हे विचार करून पाहिले तरी स्फुरत (सुचत,समजत) नाही. कारण या मोहाने माझे चित्त व्याकूळ झाले आहे.
56-2
तिमिराविरुद्ध जैसें । दृष्टीचे तेज भ्रंशे । मग पांसीच असतां न दिसे । वस्तुजात ॥56॥
जसे अंधाराने डोळ्याचे तेज संपले. (दिसेनासे झाले)की दृष्टीचे तेज लोप पावते, आणिे मग जवळची वस्तूही दिसत नाही.
57-2
देवा मज तैसे जाहले । जें मन भ्रांती ग्रासिलें । आतां काय हित आपुलें । तेंही नेणे ॥57॥
हे देवा !, तशी माझी अवस्था झाली आहे.माझे मन भ्रांतीने (मोहाने) ग्रासले आहे, त्यामुळे माझे हित कशात आहे ते ही समजेनासे झाले आहे.
58-2
तरी श्रीकृष्णा तुवां जाणावें । निकें तें आम्हां सांगावें । जे सखा सर्वस्व आघवें । आम्हांसी तूं ॥58॥
म्हणून हे श्रीकृष्णा ! आमचे कल्याण कशात आहे, हे आपण विचार करून पहावे, आणि योग्य मार्ग सुचवावा. कारण आमचा सखा, मित्र आमचे सर्वकाही तूच आहेस.
59-2
तूं गुरु बंधु पिता । तूं आमची इष्ट देवता । तूंचि सदा रक्षिता । आपदीं आमुतें ॥59॥
तूच आमचा गुरू, बंधू, पिता आहेस. तूच आमची (कुलदैवत) इष्टदेवता आहेस.आणि नेहमीच संकट समयी आमचे रक्षण करणारा ही तूच आहेस.
60-2
जैसा शिष्यांते गुरु । सर्वथा नेणे अव्हेरु । कीं सरितांते सागरु । त्यजी केवीं ॥60॥
ज्याप्रमाणे गुरू शिष्याला कधिही अव्हेर (दूर) करत नाही, किंवा समुद्र कधी नद्यांचा (त्याग) अव्हेर करत नाही, त्याप्रमाणे तुही आम्हाला अव्हेरु शकत नाहीस.
61-2
नातरी अपत्यातें माये । सांडुनि जरी जाये । तरी ते कैसेनिं जिये । ऐकें कृष्णा ॥61॥
देवा ऐका ! जर आई आपल्या लहान बाळाला सोडून निघून गेली, तर ते लहान बाळ (आई विना) कसे जगू शकेल.?
62-2
तैसा सर्वांपरी आम्हांसी । देवा तूंचि एक आहासी । आणि बोलिलें जरी न मानिसी । मागील माझें ॥62॥
त्याप्रमाणे देवा, सर्व दृष्टींनी विचार केला, तर तूच आम्हला एक आधार आहेस, आत्ता पर्यंतचे माझे बोलणे जर तुम्हाला पटत नसेल,
63-2
तरी उचित काय आम्हां । जे व्यभिचरेना धर्मा । तें झडकरी पुरुषोत्तमा । सांगें आतां ॥63॥
तर हे पुरूषोत्तमा ! जी गोष्ट आम्हाला करण्यासाठी उचित आहे, व ती धर्मविरूद्ध पण नाही तर ती (गोष्ट) ताबडतोब सांगा पाहू.
न हि प्रपश्यामि ममापुनुद्याद् यच्छोकमुछोषणमिन्द्रियाणाम् ।
अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्॥2.8॥
भावार्थ :- भूलोकवरील निष्कटंक (काटे नसलेला) व समृद्ध असे राज्य आणि देवांचे आधिपत्य (इंद्रलोक) ही मिळाले. तरीहि माझ्या इंद्रियांचे शोषण करून टाकणारा माझा शोक दूर होईल,असे मला दिसत नाही.
64-2
हें सकळ कुळ देखोनि । जो शोकु उपजलासे मनीं । तो तुझिया वाक्यावांचुनि । न जाय आणिकें ॥64॥
हे सर्व गोत्रज पाहून माझ्या मनात जो शोक उत्पन्न झाला आहे तो मात्र आपल्या उपदेशाशिवाय दूर होणार नाही.
65-2
एथ पृथ्वीतळ आपु होईल । हें महेंद्रपदही पाविजेल । परि मोह हा न फिटेल । मानसींचा ॥65॥
या वेळी पृथ्वीचे संपूर्ण राज्य जरी मला मिळाले किंबहुना, इंद्रपद जरी मिळाले तरी, माझ्या मनात जो मोह उत्पन्न झाला आहे, तो दूर होणार नाही.
66-2
जैसीं बीजें सर्वथा आहाळलीं । तरी सुक्षेत्री जर्ही पेरिलीं । तरी न विरुढती सिंचलीं । आवडे तैसीं ॥66॥
जसे पूर्ण भाजलेले (करपलेले) बी चांगल्या सुपिक जमिनीत जरी पेरले आणि त्यास योग्य प्रमाणात पाणी घातले, तरी ते उगवत नाही.
67-2
ना तरी आयुष्य पुरलें आहे । तरी औषधें काही नोहे । एथ एकचि उपेगा जाये । परमामृत ॥67॥
जिथे सर्व आयुष्यच सरलेले(मृत्यू पूर्वीची शेवटची वेळ) असेल, त्यावेळी कोणत्याही औषधाचा काहीच उपयोग होत नाही, तेथे फक्त परमामृतच (भगवंताची प्रार्थना,श्रद्धा करणे) उपयोगी पडेल,.
68-2
तैसे राज्यभोगसमृद्धि । उज्जीवन नोहे जीवबुद्धि । एथ जिव्हाळा कृपानिधि । कारुण्य तुझें ॥68॥
अगदी तसेच, माझ्या मोहित झालेल्या या बुध्दीला(स्वतःला उद्देशून)सर्व राज्यभोग, समृद्धी याचा मूळीच उपयोग होणार नाही. हे कृपानिधे ! (कृपा करणारा), तुझ्या कृपेचा जिव्हाळाच मला उपयोगी पडेल.
69-2
ऐसें अर्जुन तेथ बोलिला । जंव क्षण एक भ्रांति सांडिला । मग पुनरपि व्यापिला । उर्मीं तेणें ॥69॥
जेंव्हा क्षणभर अर्जुनाची भ्रांती (माया) दूर झाली, तेव्हा अर्जुन असे बोलला; परंतु पून्हा त्याला मायेच्या लहरींने व्यापले.
70-2
कीं मज पाहता उर्मी नोहे । हें अनारिसें गमत आहे । तो ग्रासिला महामोहें । काळसर्पें ॥70॥
(अर्जूनाची रणांगणावर झालेली स्तिथीवर श्रीज्ञानेश्वर माऊली म्हणतात की), ही मोहाची लहर नसून महामोहरूपी (अविद्या रूपी मोहानेच) काळसर्पानेच अर्जूनास ग्रासलेले (दंश केलेला) असावे.
71-2
सवर्म हृदयकल्हारीं । तेथ कारुण्यवेळेचां भरीं । लागला म्हणोनि लहरी । भांजेचि ना ॥71॥
अतिशय कोमल मर्माचे स्थान जे हृदयरुपी कमळाचे ठिकाणी आणि करुण्यरूपी संध्याकाळी (ऐन दुपारी) (म्हणजे ह्रदयात कारूण्य भाव उत्पन्न झाला) अशी संधी साधून त्या महामोहरूपी काळसर्पाने त्याला दंश केला.त्यामूळे (भ्रमरूपी, मोहरुपी, किंवा निर्माण झालेले अज्ञान) या लहरी उतरत नव्हते.
72-2
हें जाणोनि ऐसी प्रौढी । जो दृष्टीसवें विष फेडी । तो धावया श्रीहरी गारुडी । पातला कीं ॥72॥
अशा (सर्पदंश झाल्यामुळे) त्या विषाची तिव्रता जाणून, ज्याच्या कृपादृष्टीने या (मोहरूपी सर्पाच्या) विषाची तिव्रता नष्ट (दूर) करतो,तो श्रीहरि रूपी गारूडी अर्जूनाच्या हाकेसरसा त्याच्या रक्षणासाठी धावून आला.
73-2
तैसिया पंडुकुमरा व्याकुळा । मिरवतसे श्रीकृष्ण जवळा । तो कृपावशें अवलीळा । रक्षील आतां ॥73॥
तशा त्या शोकाने, मोहाने व्याकुळ झालेल्या अर्जुनाजवळ भगवान श्रीकृष्ण (गारुडी श्रीहरि)शोभत होता. आपल्या कृपादृष्टीने (आपला प्रिय मित्राचे) सहजच रक्षण करील.
74-2
म्हणोनि तो पार्थु । मोहफणिग्रस्तु । म्यां म्हणितला हा हेतु । जाणोनियां ॥74॥
(कृष्ण भगवान अर्जुनाचे रक्षण करणारच) हे कारण जाणूनच अर्जुनाला मोहरुपी सर्पाने दंश केला. असे मी येथे कथन केले.
75-2
मग देखा तेथ फाल्गुनु । घेतला असे भ्रांती कवळूनु । जैसा घनपडळीं भानु । आच्छादिजे ॥75॥
जसे सूर्य ढगांनी आच्छादिला जातो; त्याप्रमाणेच त्या प्रसंगी अर्जून मोहाने (गोंधळून जाणे,अज्ञान)आच्छादिला गेला होता असे समजा..