सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४ था ओवी २०१ ते २२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

201-4
तैसे साच आणि लटिकें । विरुद्ध आणि निकें । संशयी तो नोळखे । हिताहित ॥201॥
त्याप्रमाणे खरे खोटे, अनुकूल आणि प्रतिकूल, हित आणि अहित हे काहींचं संशयी माणूस जाणत नाही.
202-4
हा रात्रिदिवसु पाहीं जैसा । जात्यंधा ठाउवा नाहीं । तैसे संशयीं असतां काहीं । मना न ये ॥202॥
जन्मापासून आंधळ्या असणाऱ्या व्यक्तीला ज्याप्रमाणे रात्र आणि दिवस कळत नाही, त्याप्रमाणे संशयात अडकलेल्या माणसाला काही पटत नाही.
203-4
म्हणऊनि संशयाहुनि थोर । आणिक नाही पाप घोर । हा विनाशाची वागुर । प्राणियासी॥203॥
म्हणून संशयासारखे दुसरे मोठे पाप नाही; कारण हा संशय प्राण्यांना सर्वनाशाचे जाळे आहे.
204-4
येणें कारणे तुवा त्यजावा । आधी हाचि एकु जिणावा । जो ज्ञानाचिया अभावा- । माजी असे ॥204॥
एवढ्याकरिता तू या संशयाचा त्याग कर. जेथे आत्मज्ञानाचा अभाव असतो, तेथेच हा संशय असतो. प्रारंभी त्याला जिंकावे.
205-4
जैं अज्ञानाचे गडद पडे । तैं हा बहुवस मनीं वाढे । म्हणोनि सर्वथा मागु मोडे । विश्वासाचा ॥205॥
जेंव्हा अज्ञानाचा गाढ अंधकार पसरलेला असतो, तेंव्हा हा संशय मनामध्ये वाढत जातो; म्हणून परमेश्वरावरील परम श्रद्धेचा मार्ग बंद पडतो.


206-4
हृदयी हाचि न समाये । बुद्धींते गिंवसूनि ठाये । तेथ संशयात्मक होये । लोकत्रय ॥206॥
हा फक्त हृदय व्यापून राहतो, असे नाही; तर तो बुद्धीलाही व्यापून टाकतो. त्यावेळी त्याला तिन्ही लोक संशयात्मक दिसू लागतात.
योगसंन्यस्तकर्माणि ज्ञानसंछिन्नसंशयम् ।
आत्मवंतं न कर्माणि निबध्नन्ति धनंजयः॥4.41॥

भावार्थ :- हे धनंजया ! ज्याने निष्काम कर्मयोगाने आपली सर्व कर्मे भगवंताला अर्पण केली आहेत, आत्मज्ञानाने ज्याचे सर्व संशय नाश पावले आहेत, अशा आत्मज्ञानी परमात्मपरायण पुरुषाला कर्मे बंधन करत नाहीत.
207-4
ऐसे जरी थोरावे । तरी उपायें एकें आंगवे । जरी हाती होय बरवें । ज्ञानखड्ग ॥207॥
संशय एवढा जरी वाढला गेला, तरी तो एका उपायाने जिंकला जातो. उत्तम प्रकारचे ज्ञानरूप खड्ग जर हाती असेल,
208-4
तरी तेणें ज्ञानशस्त्रें तिखटें । निखळु हा निवटे । मग निःशेष खता फिटे । मानसींचा॥208॥
तर त्या ज्ञानरूपी तीक्ष्ण शस्त्राने हा संपूर्ण (संशय) नाश पावतो. मग मनावरील सर्व मळ निःशेष नाहीसा होतो.(मग मनातील इतर दोषही नाहीसे होतात)
तस्मादज्ञानसंभूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः ।
छित्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत॥4.42॥

भावार्थ :- म्हणून हे भरतवर्षा अर्जुना ! अज्ञानापासून उत्पन्न झालेला हा हृदयातील संशय ज्ञानरूपी शस्त्राने नाहीसा करून ईश्वरार्पण भावनेने कर्म कर आणि युध्दासाठी उभा रहा.
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसंन्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः ॥4॥
209-4
याकारणे पार्था । उठीं वेगीं वरौता । नाशु करोनि हृदयस्था । संशयासी ॥209॥
एवढ्याकरिता अर्जुना अंतःकरणात असलेल्या सर्व संशयाचा नाश करून, तू लवकर युध्दासाठी ऊठ.
210-4
ऐसे सर्वज्ञानाचा बापु । जो कृष्ण ज्ञानदीपु । तो म्हणतसे सकृपु । ऐकें राया ॥210॥
संजय धृतराष्ट्रस म्हणाला, राजा ऐक, सर्वज्ञाचे जनक, जे ज्ञानदीप भगवान श्रीकृष्ण, अशा प्रकारे मोठ्या कृपेने अर्जुनास म्हणाले.


211-4
तंव या पूर्वापर बोलाचा । विचारुनि कुमरु पंडूचा । कैसा प्रश्नु हन अवसरींचा । करिता होईल ॥211॥
तेंव्हा भगवान श्रीकृष्णाच्या आताच्या व मागील बोललेल्या तत्त्वज्ञानाचा विचार करून अर्जुन हा समयोचित प्रश्न विचारील.
212-4
ते कथेची संगति । भावाची संपत्ति । रसाचि उन्नति । म्हणिपेल पुढां ॥212॥
ती एकसंध (संगतवार) कथा अनुभवाच्या संपत्तीने व रसाच्या उत्कर्षाने पुढे सांगण्यात येईल.
213-4
जयाचिया बरवेपणीं । कीजे आठां रसांची ओवाळणी । सज्जनाचिये आयणी । विसांवा जगी ॥213॥
ज्याच्या सात्विकपणावरून विविध प्रकारच्या आठही रसांची ओवाळणी करावी आणि जो या जगतामध्ये सज्जनांच्या बुद्धीचे विश्रांतीस्थान आहे.
214-4
तो शांतुचि अभिनवेल । ते परियेसा मऱ्हाठे बोल । जे समुद्राहूनि खोल । अर्थभरित ॥214॥
तो शांतीरस पुढील कथेमध्ये नाविन्यपूर्ण भावाने प्रकट होईल. जे अर्थपूर्ण व समुद्रपेक्षाही गंभीर आहे, असे मराठी बोल ऐका.
215-4
जैसें बिंब तरी बचकें एवढें । परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडें । शब्दाची व्याप्ती तेणें पाडें । अनुभवावी ॥215॥
जसे सूर्यबिंब आकाशात छोटे जरी दिसले, तरी त्याच्या प्रकाशाला त्रैलोक्यदेखील अपुरे पडते, त्याप्रमाणे मराठी शब्दांची व्याप्ती महान आहे, याचा अनुभव येईल.


216-4
ना तरी कामितयाचिया इच्छा । फळे कल्पवृक्षु जैसा । बोल व्यापकु होय तैसा । तरी अवधान द्यावे ॥216॥
किंवा कल्पवृक्ष जसा माणसाच्या मनातील इच्छा पूर्ण करतो, तसे हे बोल अंतिम सत्य जाणण्याची इच्छा पूर्ण करणारे आहेत. यासाठी या शब्दांकडे एकाग्रतेने लक्ष द्यावे.
217-4
हें असो काय म्हणावें । सर्वज्ञु जाणतीं स्वभावें । तरी निकें चित्त द्यावें । हें विनंती माझी ॥217॥
श्रोते हो ! यासंबंधी अधिक काय सांगावे? आपण सर्वज्ञ आहात; म्हणून एकाग्रतेने लक्ष द्यावे, ही माझी आज्ञा नसून विनंती आहे.
218-4
जेथ साहित्य आणि शांति । हे रेखा दिसे बोलती । जैसी लावण्यगुणकुळवती । आणि पतिव्रता॥218॥
जशी एखादी स्त्री लावण्य, गुण आणि कुळ यांनी संपन्न व पतिव्रता असावी, त्याप्रमाणे या बोलण्याचा पद्धतीमध्ये सर्व अलंकार व शांती भरलेली दिसेल.
219-4
आधींचि साखर आवडे । आणि तेचि जरी ओखदीं जोडे । तरी सेवावी ना कां कोडें । नावानावा ॥219॥
आधीच साखर आवडते आणि तीच जर औषधांच्या रूपाने मिळाली, तर ती आवडीने पुनः पुनः का सेवन करू नये?
220-4
सहजे मलयानिळु मंद सुगंधु । तया अमृताचा होय स्वादु । आणि तेथेंचि जोडे नादु । जरी दैवगत्या ॥220॥
मलय पर्वतावरील वारा सहजच मंद व सुगंधी असा वाहत असतो. त्याला जर अमृताची गोडी प्राप्त झाली आणि त्याठिकाणी जर सुमधुर स्वर दैवगतीने लाभला.


221-4
तरी स्पर्शें सर्वांग निववी । स्वादें जिव्हेतें नाचवी । तेवीचि कानाकरवीं । म्हणवी बापु माझा ॥221॥
तर तो वारा आपल्या शरीराला स्पर्शाने शांत करतो, गोडीने जिभेला संतोष लाभतो आणि सुमधुर स्वर श्रवण केल्यावर कानाकडून धन्य माझा बाप अशी वाहवा मिळवितो.
222-4
तैसे कथेचें इये ऐकणें । एक श्रवणासि होय पारणें । मग संसारदुःख मूळवणें । विकृतीविणें ॥222॥
त्याप्रमाणे या गीताकथेच्या श्रवणाने होणार आहे. एक तर कानाचे पारणे फिटेल आणि दुसरे म्हणजे अनायासे संसारातील दुःख पूर्णपणे नाहीसे होईल.
223-4
जरी मंत्रेचि वैरी मरे । तरी वायांचि कां बांधावीं कटारें । रोग जाये दुधें साखरे । तरी निंब कां पियावा ॥223॥
मंत्राने जर मृत्यू पावत असेल, तर कमरेला काट्यारी का बरे बांधाव्यात? दुधाने व साखरेने रोग नाहीसा होत असेल, तर कडूलिंबाच्या रस का बरे घ्यावा.??
224-4
तैसा मनाचा मारु न करितां । आणि इंद्रियां दुःख न देतां । एथ मोक्षु असे आयता । श्रवणाचिमाजी ॥224॥
त्याप्रमाणे मनाचा विरोध न करता, इंद्रियांना कोंडून दुःख न देता, केवळ एकाग्रतेने श्रवण केल्यामुळे आयताच मोक्ष प्राप्त होतो.
225-4
म्हणोनि आथिलिया आराणुका । गीतार्थु हा निका । ज्ञानदेवो म्हणे आइका । निवृत्तीदासु ॥225॥
म्हणून उत्कंठतेने मन एकाग्र करून अर्थ श्रवण करावा, असे निवृत्तींनाथांचे शिष्य श्रीज्ञानदेव म्हणतात.


॥ इति श्री ज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां – ज्ञानकर्मसंन्यासयोगोनाम्
चतुर्थोऽध्यायः॥4॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :- 42 ॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 225 ॥

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *