सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १५२६ ते १५५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

1526-18
तेणें ज्ञानानळीं प्रदीप्तीं । मूळ अविद्येचिया आहुती । तोषविला होय सुमती । परमात्मा मी ॥1526॥
तो, प्रदीप्त ज्ञानाग्नीमध्ये मूल अविद्येची आहुती देऊन मला परमात्म्याला संतुष्ट करितो. 26
1527-18
घेऊनि गीतार्थ उगाणा । ज्ञानिये जें विचक्षणा । ठाकती तें गाणावाणा । गीतेचा तो लाहे ॥1527॥
गीतार्थाचा ठाव घेऊन” बुद्धिमान ज्ञानी लोकांना जी फलप्राप्ति होते, तीच गीतेचे गायन पठण करणारांनाही शेवट होते 27
1528-18
गीता पाठकासि असे । फळ अर्थज्ञाचि सरिसें । गीता माउलियेसि नसे । जाणें तान्हें ॥1528॥
म्हणून अर्थज्ञाला जे फल तेच फल पाठकालाही अखेर आहे; गीता सर्वांची माउली असल्यामुळे तिच्यापाशीं तान्हा व मोठा असा भेद नाही. 28
श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः ।
सोऽपि मुक्तः शुभा.ण्ल्लोकान्प्राप्नुयात्पुण्यकर्मणाम् ॥18.71॥

1529-18
आणि सर्वमार्गीं निंदा । सांडूनि आस्था पैं शुद्धा । गीताश्रवणीं श्रद्धा । उभारी जो ॥1529॥
आणि सर्व प्रकारची निंदा सोडून जो शुद्ध आदराने गीताश्रवणाच्या ठिकाणी श्रद्धा ठेवील. 29
1530-18
तयाच्या श्रवणपुटीं । गीतेचीं अक्षरें जंव पैठीं । होतीना तंव उठाउठीं । पळेचि पाप ॥1530॥
त्याच्या कानांत गीतेची अक्षरें प्रवेश करितात न करितात तोंच पाप तेथून पाय काढतें ! 1530

1531-18
अटवियेमाजीं जैसा । वन्हि रिघतां सहसा । लंघिती का दिशा । वनौकें तियें ॥1531॥
अरण्याला वणवा लागला असतां वनांतील प्राणी जसे दाही दिशांकडे पळून जातात. 31
1532-18
कां उदयाचळकुळीं । झळकतां अंशुमाळी । तिमिरें अंतराळीं । हारपती ॥1532॥
किंवा उदयगिरीवर सूर्य येतांच अंधकार जसा आकाशांतच नाहीसा होतो 32
1533-18
तैसा कानाच्या महाद्वारीं । गीता गजर जेथ करी । तेथ सृष्टीचिये आदिवरी । जायचि पाप ॥1533॥
याप्रमाणे ज्याच्या कर्णरूपी महाद्वारांत गीतेचा घोष चालू आहे, त्याची पूर्वीचीं सर्वं पापें नष्ट होतात. 33
1534-18
ऐसी जन्मवेली धुवट । होय पुण्यरूप चोखट । याहीवरी अचाट । लाहे फळ ॥1534॥
याप्रमाणे त्याचे सर्व कुल पावन होऊन तो शुद्ध पुण्यमूर्ती होतो; व याहीपेक्षां त्याला अलौकिक फल मिळतें. 34
1535-18
जें इये गीतेचीं अक्षरें । जेतुलीं कां कर्णद्वारें । रिघती तेतुले होती पुरे । अश्वमेध कीं ॥1535॥
गीतेची जितके अक्षरें त्याच्या श्रवणांत प्रवेश करतील तितक्या अश्वमेधांचे पुण्य त्याला जोडते.35

1536-18
म्हणौनि श्रवणें पापें जाती । आणि धर्म धरी उन्नती । तेणें स्वर्गराज संपत्ती । लाहेचि शेखीं ॥1536॥
गीता श्रवणातें पापे नष्ट होतात; धर्माची वृद्धि होते व त्यायोगे अखेर स्वर्गाचे राज्य त्याला प्राप्त होते 36
1537-18
तो पैं मज यावयालागीं । पहिलें पेणें करी स्वर्गीं । मग आवडे तंव भोगी । पाठीं मजचि मिळे ॥1537॥
मज कडे यावयास निघालेला तो पुरुष, पहिला मुक्काम स्वर्गात करून तेथील सुख इच्छला येईल तोपर्यंत भोगून अखेर माझी प्राप्ति त्याला होते. 37
1538-18
ऐसी गीता धनंजया । ऐकतया आणि पढतया । फळे महानंदें मियां । बहु काय बोलों ॥1538॥
अर्जुना, श्रवण करणाराला व पठण करणाराला गीता ह्याप्रमाणे फलदात्री होते; महानंद रूप जो मी, त्याने तुला आणखी काय सांगावें? 38
1539-18
याकारणें हें असो । परी जयालागीं शास्त्रातिसो । केला तें तंव तुज पुसों । काज तुझें ॥1539॥
यास्तव ह्या गोष्टी असोत; पण ज्या कार्यासाठी एवढा शास्त्रीय ऊहापोह केला त्याने तुझी समजूत कितपत झाली आहे हे,तुला प्रथम विचारतों. 39
कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा ।
कच्चिदज्ञानसम्मोहः प्रनष्टस्ते धनञ्जय ॥18.72॥

1540-18
तरी सांग पां पांडवा । हा शास्त्रसिद्धांतु आघवा । तुज एकचित्तें फावा । गेला आहे? ॥1540॥
तरी, अर्जुना, हा सर्व शास्त्रसिद्धांत तुला विचारपूर्वक पटला आहे ना? 1540

1541-18
आम्हीं जैसें जया रीतीं । उगाणिलें कानांच्या हातीं । येरीं तैसेंचि तुझ्या चित्तीं । पेठें केलें कीं? ॥1541॥
तुला आम्हीं जे श्रवण करविलें तें तसेच्या तसेच तुझ्या कर्णांनी तुझ्या अंतःकरणापर्यंत पोचविले ना? 41
1542-18
अथवा माझारीं । गेलें सांडीविखुरी । किंवा उपेक्षेवरी । वाळूनि सांडिलें । ॥1542॥
किंवा मध्येच कांही मजकूर सांडलोटीवर गेला, किंवा उपेक्षाबुद्धीने त्यांनी गाळून टाकिला? 42
1543-18
जैसें आम्हीं सांगितलें । तैसेंचि हृदयीं फावलें । तरी सांग पां वहिलें । पुसेन तें मी ॥1543॥
कर्णांनी, जसे आम्ही सांगितले तसेच्या तसें जर हे श्रवण अंतःकरणापर्यंत पोंचविलें असेल तर मी तुला विचारतो त्याचे उत्तर दे पाहू. 43
1544-18
तरी स्वाज्ञानजनितें । मागिलें मोहें तूतें । भुलविलें तो येथें । असे कीं नाहीं? ॥1544॥
तरी स्वस्वरूपाच्या अज्ञानानें उत्पन्न झालेल्या ज्या मोहानें तुला भ्रमांत पाडलें तो मोह आतां शिल्लक आहे की नाहीं? 44
1545-18
हें बहु पुसों काई । सांगें तूं आपल्या ठायीं । कर्माकर्म कांहीं । देखतासी? ॥1545॥
इतकें तरी कशाला विचारु? तू आपल्याला कर्ता समजतोस की अकर्ता ते सांग पाहू? 45

1546-18
पार्थु स्वानंदैकरसें । विरेल ऐसा भेददशे । आणिला येणें मिषें । प्रश्नाचेनि ॥1546॥
अर्जुन, स्वात्मानंदात विसरून जाण्याचा संभव होता, ह्या प्रश्नाच्या मिषानें देवांनी त्यास पुन्हा देहभानावर आणिलें 46
1547-18
पूर्णब्रह्म जाला पार्थु । तरी पुढील साधावया कार्यार्थु । मर्यादा श्रीकृष्णनाथु । उल्लंघों नेदी ॥1547॥
आतांच जरी हा पूर्ण ब्रह्म झाला, तरी आपला पुढील कार्यभाग साधण्यासाठी देवांनी त्याच्या (आभासिक भेददशेची मर्यादा त्याला उल्लंघू दिली नाही. (समाधींतून माघे ओढले.) 47
1548-18
येऱ्हवीं आपुलें करणें । सर्वज्ञ काय तो नेणें? । परी केलें पुसणें । याचि लागीं ॥1548॥
एऱ्हवी आपल्या उपदेशाचा पार्थावर काय परिणाम झाला हें सर्वज्ञ भगवंतांना काय माहीत नव्हतें? पण, म्हणूनच त्यांनी मुद्दाम असा प्रश्न केला. 48
1549-18
एवं करोनियां प्रश्न । नसतेंचि अर्जुनपण । आणूनियां जालें पूर्णपण । तें बोलवी स्वयें ॥1549॥
असा प्रश्न करून, बाधित झालेल्या अगर विरत चाललेल्या अर्जुनपणावर त्याला पुन्हा आणून, त्याला बाणलेले पूर्णपण (ब्रह्मत्व) त्याजकडून पुन्हा वदविलें. 49
1550-18
मग क्षीराब्धीतें सांडितु । गगनीं पुंजु मंडितु । निवडे जैसा न निवडितु । पूर्णचंद्रु ॥1550॥
मग क्षीरसागरापासून निघालेला पूर्णचंद्र आकाशांत तेजोगोल म्हणून, वस्तुतः क्षीरसागराच्या संपत्तीपैकीच तो एक भाग असूनही (वेगळा नसूनही) वेगळेपणानें शोभतो. 1550

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *