सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ७७६ ते ८०० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

776-18
तेवीं जालेनि सुखलेशें । जीवु भाविलिया अभ्यासें । जीवपणाचें नासे । दुःख जेथें ॥776॥
त्याप्रमाणे सुखाचा यत्किंचित लाभ झाला असता तोचा अभ्यास पुढे वाढवून जीवदशेचे दुःख जेथे नाहीसे होते; 776
777-18
तें येथ आत्मसुख । जालें असे त्रिगुणात्मक । तेंही सांगों एकैक । रूप आतां ॥777॥
ते आत्मसुखहि गुणांच्या योगाने तीन प्रकारचे झाले आहे, त्या एकेकाची लक्षणे तुला सांगतो. 777
यत्तदग्रे विषमिव परिणामेऽमृतोपमम् ।
तत्सुखं सात्त्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम् ॥18.37॥

778-18
आतां चंदनाचें बूड । सर्पी जैसें दुवाड । कां निधानाचें तोंड । विवसिया जेवीं ॥778॥
आता चंदनाचे बुड सर्पामुळे जसे भयंकर झालेले दिसते अथवा द्रव्याच्या ठेव्यावर जसा ब्रह्मराक्षसादिकांचा प्रतिबंध असतो; 778
779-18
अगा स्वर्गींचें गोमटें । आडव यागसंकटें । कां बाळपण दासटें । त्रासकाळें ॥779॥
अरे, स्वर्गीचे उत्तम भोग मिळविण्यास प्रथम जसे यज्ञाचे महत्त्व कट महत्संकट आहे, किंवा बालदशेमध्ये मुलांचा सर्वस्वी त्रास सहन करावा लागतो 779
780-18
हें असो दीपाचिये सिद्धी । अवघड धू आधीं । नातरी तो औषधीं । जिभेचा ठावो ॥780॥
हे राहो, पण दिवा लावणे झाल्यास प्रथम विस्तव पेटविण्यास जसा धुराचा त्रास सोसावा लागतो, किंवा औषधाचा कडवटपणा जिभेस सोसावा लागतो, 780

781-18
तयापरी पांडवा । जया सुखाचा रिगावा । विषम तेथ मेळावा । यमदमांचा ॥781॥
त्याप्रमाणे अर्जुना, आत्मसुखाची प्राप्ती करून घेण्याकरिता यमदामादिक साधनांचे दुःख सोसावे लागते. 781
782-18
देत सर्वस्नेहा मिठी । आगीं ऐसें वैराग्य उठी । स्वर्ग संसारा कांटी । काढितचि ॥782॥
देहादिकांवरील प्रीतीचा त्रास करणारे असे अग्नीप्रमाणे तीव्र वैराग्य जेव्हा उत्पन्न होईल, तेव्हा ते स्वर्ग व संसार यांचे कुंपण उपटून टाकते. 782
783-18
विवेकश्रवणें खरपुसें । जेथ व्रताचरणें कर्कशें । करितां जाती भोकसे । बुद्ध्यादिकांचे ॥783॥
तीव्र अशा ज्ञानाचे श्रवण व कठोर व्रताचरण करताना जिथे बुद्धी इत्यादिकांचे वाभाडे निघतात; 783
784-18
सुषुम्नेचेनि तोंडें । गिळिजे प्राणापानाचे लोंढे । बोहणियेसीचि येवढें । भारी जेथ ॥784॥
सुषुम्ना नाडीच्या तोंडाने प्राण व अपान या वायूचा रोध करावा लागतो. याप्रमाणे सुरवातीस देते महत्कष्ट आहेत; 784
785-18
जें सारसांही विघडतां । होय वोहाहूनि वस्त काढितां । ना भणंगु दवडितां । भाणयावरुनी ॥785॥
चक्रवाक पक्षांच्या जोड्याची ताटातूट केली असता अथवा गाईला पान्हा फुटल्यावर कासेंपासून वासरास माघारी ओढले असता, किंवा क्षुधितांस (भुकेलेला) पानावरून उठवून लावले असता; 785

786-18
पैं मायेपुढौनि बाळक । काळें नेतां एकुलतें एक । होय कां उदक । तुटतां मीना ॥786॥
अथवा आई पुढून एकुलते एक लेकरू काळाने ओढून नेले असता किंवा माशास पाण्यातून काढिले असतात जसे दुःख होते, 786
787-18
तैसें विषयांचें घर । इंद्रियां सांडितां थोर । युगांतु होय तें वीर । विराग साहाती ॥787॥
तसे विषयांचे घर सोडते वेळेस इंद्रियांना युगांत ओढवल्याप्रमाणे दुःख होते; परंतु वैराग्यसंपन्न शूर तेही दुःख सहन करतात. 787
788-18
ऐसा जया सुखाचा आरंभु । दावी काठिण्याचा क्षोभु । मग क्षीराब्धी लाभु । अमृताचा जैसा ॥788॥
असा ज्या सुखाचा आरंभ कष्टमय आहे, तो जो सहन करील, त्याला जसा क्षिराब्धीचे मंथन करतेवेळेस ज्यांनी दुःख सहन केले त्यांना अमृताचा लाभ झाला तसा परमसुखाचा लाभ होतो. 788
789-18
पहिलया वैराग्यगरळा । धैर्यशंभु वोडवी गळा । तरी ज्ञानामृतें सोहळा । पाहे जेथें ॥789॥
प्रथम वैराग्यरूप गरळ ज्यांत निघेल ते प्राशन करण्यास सात्विकधैर्यरुपी शंभू जेव्हा आ करील, तेव्हा परिणामी ज्ञानरूप अमृताचा सोहळा भोगावयास सांपडतो. 789
790-18
पैं कोलिताही कोपे ऐसें । द्राक्षांचें हिरवेपण असे । तें परीपाकीं कां जैसें । माधुर्य आते ॥790॥
हे पहा द्राक्षांचा आंबटपणा कच्चेपणी कोलीतासही मागतो सारतो, परंतु तीच पिकल्यावर मधुर लागतात. 790

791-18
तें वैराग्यादिक तैसें । पिकलिया आत्मप्रकाशें । मग वैराग्येंसींही नाशे । अविद्याजात ॥791॥
वैराग्य आत्मप्राशनाने पूर्णतेस आल्यावर मग तेथे वैराग्यादीक सर्व दुःखांचा नाश होतो. 791
792-18
तेव्हां सागरीं गंगा जैसी । आत्मीं मीनल्या बुद्धि तैसी । अद्वयानंदाची आपैसी । खाणी उघडे ॥792॥
समुद्राला गंगा मिळाल्यावर जशी सुस्वरूप व होते, बुद्धी आत्म्याचे ठिकाणी मिळाली असता तिला अद्वयानंदरुपी सुखाची खाण उघडते. 792
793-18
ऐसें स्वानुभवविश्रामें । वैराग्यमूळ जें परिणमे । तें सात्विक येणें नामें । बोलिजे सुख ॥793॥
याप्रमाणे ज्या सुखास वैराग्य हे मूळ असून आत्मानंदप्राप्ती हा ज्याचा परिणाम होय, त्या सुखाला सात्विक सुख असे म्हणतात. 793
विषयेन्द्रियसंयोगाद्यत्तदग्रेऽमृतोपमम्
परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम् ॥18.38॥
794-18
आणि विषयेंद्रियां । मेळु होतां धनंजया । जें सुख जाय थडिया । सांडूनि दोन्ही ॥794॥
आणि अर्जुना, विषय व इंद्रिये यांचा संबंध झाला म्हणजे दुथडी भरून जो सुखाचा पूर येतो; 794
795-18
अधिकारिया रिगतां गांवो । होय जैसा उत्साहो । कां रिणावरी विवाहो । विस्तारिला ॥795॥
अधिकारी आपल्या अधिकाराच्या गावी गेला असता जसा उत्सव होतो; किंवा ऋण काढून लग्नाचा जसा समारंभ करावा; 795

796-18
नाना रोगिया जिभेपासीं । केळें गोड साखरेसीं । कां बचनागाची जैसी । मधुरता पहिली ॥796॥
अथवा रोग्याला साखर, केळी ही कुपथ्य असूनही जशी गोड लागतात; किंवा बचनाग खाते वेळेस जसा गोड लागतो; 796
797-18
पहिलें संवचोराचें मैत्र । हाटभेटीचें कलत्र । कां लाघवियाचे विचित्र । विनोद ते ॥797॥
संवचोराची मैत्री जशी प्रथम गोड असते किंवा बाजारातील स्त्रियांचे(वेश्यांकांचे) आचरण प्रथम सुखकर वाटते; किंवा नटाचे आविर्भाव जसे आल्हादकारक वाटतात. 797
798-18
तैसें विषयेंद्रियदोखीं । जें सुख जीवातें पोखी । मग उपडिला खडकीं । हंसु जैसा ॥798॥
तसे विषय व इंद्रिये यांच्या संबंधाने जीवाला जे सुख होते, ते परिणामी दुःखदायक असते. खडकावर साचलेल्या पाण्यात शुक्रादि चांदण्यांचे प्रतिबिंब पडलेले पाहून ती रत्ने आहेत. अशा भ्रमाने हंसाने त्यावर उडी घातली असता, रत्न प्राप्ति न होता तसा तो प्राणास मुकतो, 798
799-18
तैसी जोडी आघवी आटे । जीविताचा ठाय फिटे । सुकृताचियाही सुटे । धनाची गांठी ॥799॥
तशी ज्यायोगे सुकृत्याने मिळवलेल्या सुखाची जोड नाहीशी होते; आणि विषय सुख मिळण्याकरिता संपादिलेल्या सर्व पुण्य रुपी धनाचाहि नाश होतो; 799
800-18
आणिक भोगिलें जें कांहीं । तें स्वप्न तैसें होय नाहीं । मग हानीच्याचि घाईं । लोळावें उरे ॥800॥
आणि भोगलेले जे विषय तेही स्वप्नाप्रमाणे नाहीतसे होतात. मग दुःखाच्या राशीत लोळणे; हीच त्याच्या वाट्यास राहते. 800

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading