सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी १५१ ते १७५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, , , , ,

151-6
म्हणे जें जें हा अधिष्ठील । तें आरंभींच यया फळेल । म्हणौनि सांगितला न वचेल । अभ्यासु वायां ॥151॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हा अर्जुन ज्या ज्या साधनांचे आचरण करेल, ते ते साधन त्याला प्रारंभी फळ देईल; म्हणून याला सांगितलेला अभ्यास वाया जाणार नाही.
152-6
ऐसें विवरोनियां श्रीहरी । म्हणितलें तिये अवसरीं । अर्जुना हा अवधारीं । पंथराजु ॥152॥
असा विचार करून त्या वेळी भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना ! तुला आता योगमार्ग सांगणार आहे. तो सर्व मार्गांचा राजमार्ग आहे, त्याचे तू श्रवण कर.
153-6
तेथ प्रवृत्तितरुच्या बुडीं । दिसती निवृत्तिफळाचिया कोडी । जिये मार्गीचा कापडी । महेशु आझुनि ॥153॥
या मार्गामध्ये प्रवृत्तीरूप झाडाच्या बुडलाच निवृत्तीरूप कोट्यवधी मोक्षफळे दृष्टीस पडतात. या मार्गाचे भगवान श्रीशंकर आजही यात्रेकरू आहेत.
154-6
पैं योगवृंदे वहिलीं । आडवीं आकाशीं निघालीं । कीं तेथ अनुभवाच्या पाउलीं । धोरणु पडिला ॥154॥
योगीजन प्रारंभी हृदय – आकाशात आडव्या मार्गाने वाटचाल करू लागले. नंतर अनुभवाच्या आधारे त्यांना परब्रम्हप्राप्तीचा मार्ग सुलभ झाला.
155-6
तिहीं आत्मबोधाचेनि उजुकारें । धांव घेतली एकसरें । कीं येर सकळ मार्ग निदसुरे । सांडुनियां ॥155॥
तेंव्हा इतर सर्व अज्ञानरुप मार्गाचा त्याग करून योगी पुरुषांनी आत्मबोधाच्या सरळ मार्गाने धाव घेतली.


156-6
पाठीं महर्षी येणें आले । साधकांचे सिध्द जाहाले । आत्मविद थोरावले । येणेंचि पंथें ॥156॥
नंतर त्यांच्या मार्गाने महर्षी आले आणि साधकांचे सिद्ध झाले. आत्मज्ञानीसुद्धा याच मार्गाने महान झाले.
157-6
हा मार्गु जैं देखिजे । तैं तहान भूक विसरिजे । रात्रिदिवसु नेणिजे । वाटे इये ॥157॥
या मार्गाने वाटचाल करताना अनुभव येऊ लागला की, तहान भूक यांची आठवणही होत नाही. या वाटेने चालताना रात्र कळत नाही, दिवस कळत नाही.
158-6
चालतां पाऊल जेथ पडे । तेथ अपवर्गाची खाणी उघडे । आव्हांटलिया तरी जोडे । स्वर्गसुख ॥158॥
या मार्गाने चालताना जेथे पाऊल पडेल, तेथे मोक्षाची खाणच उघडते. कदाचित आडमार्गाने जरी पाऊल पडले, तरी स्वर्गसुख लाभते.
159-6
निगिजे पूर्वींलिया मोहरा । कीं येइजे पश्चिमेचिया घरा । निश्चळपणें धनुर्धरा । चालणें येथिंचें ॥159॥
पूर्व दिशेच्या मार्गाने चालावे आणि पश्चिम दिशेच्या घरात यावे, असे आहे.हे धनुर्धर ! मन स्थिर ठेवणे, हेच या मार्गाचे चालणे आहे.
160-6
येणें मार्गें जया ठाया जाइजे । तो गांवो आपणचि होइजे । हें सांगो काय सहजें । जाणसी तूं ॥160॥
या मार्गाने ज्या ठिकाणी जावयाचे, तो इश्वररूपी गाव आपणच होतो, हे काय सांगावे? पुढे तुला ते सहजच कळेल.


161-6
तेथ म्हणितलें देवा । तरी तेंचि मग केव्हां । कां आर्तीसमुद्रौनि न काढावा । बुडतु जी मी ॥161॥
तेंव्हा अर्जुन म्हणाला, हे देवा ! असे जर आहे, तर तू योगमार्ग केंव्हा सांगणार?? मी उत्सुकतेचा सागरात बुडत असताना तुम्ही मला बाहेर काढू नये काय??
162-6
तवं श्रीकृष्ण म्हणती ऐसें । हें उत्संखळ बोलणें कायसें । आम्हीं सांगतसों आपैसें । वरि पुशिले तुवां ॥162॥
तेंव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, असे उतावीळपणाचे बोलणे कशासाठी?? आम्ही आपणहुन सांगत आहोत, त्याशिवाय तुही विचारले आहेस.
शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः ।
नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम्॥6.11॥

भावार्थ :- शुद्धस्थानी, अति उंच नाही, अति सखल नाही असे, दर्भावर मृगदिकांचे चर्म व त्यांवर वस्त्र ठेवलेले, असे आपले स्थिर आसन स्थापन करून,
163-6
तरी विशेषे आतांचि बोलिजेल । परि तें अनुभवें उपेगा जाईल । म्हणौनि तैसें एक लागेल । स्थान पहावें ॥163॥
तरी आत्ताच तुला सविस्तर सांगण्यात येईल, प्रत्येक्ष साधना करून अनुभव घेतला, तर उपयोगी होईल. यासाठी साधनेला योग्य असे स्थान पाहणे आवश्यक आहे.
164-6
जेथ आराणुकेचेनि कोडें । बैसलिया उठों नावडे । वैराग्यासी दुणीव चढे । देखलिया जें ॥164॥
ज्या पवित्र स्थानावर सुख – शांती मिळविण्यासाठी बसल्यानंतर तेथून उठावेसे वाटू नये आणि ते स्थान पाहताक्षणी वैराग्य दुप्पट वाढावे.
165-6
जो संती वसविला ठावो । संतोषासि सावावो । मना होय उत्सावो । धैर्याचा ॥165॥
जेथे संतांनी वास्तव्य केले आहे, जेथे संतोष वाढण्यास मदत होते, जेथे मनाला धैर्याचा उत्साह प्राप्त होतो,


166-6
अभ्यासुचि आपणयातें करी । हृदयातें अनुभव वरि । ऐसी रम्यपणाची थोरी । अखंड जेथ ॥166॥
जेथील पवित्र वातावरण आपणाकडून साधना करून घेते, अनुभव हृदयाला माळ घालतो, अशी रम्यपणाची थोरवी ज्या ठिकाणी अखंड आहे.
167-6
जया आड जातां पार्था । तपश्चर्या मनोरथा । पाखांडियाही आस्था । समूळ होय ॥167॥
हे अर्जुना ! ज्या स्थानाजवळ सहज जरी गेला असता, नास्तिकालादेखील तपश्चर्या करावी, अशी मनापासून आस्था वाटते.
168-6
स्वभावें वाटे येतां । जरी वरपडा जाहला अवचितां । तरी सकामुही परि माघौता । निघों विसरे ॥168॥
सहज वाटेने येत असता जर कोणी अकस्मात त्याठिकाणी (रमणीय ठिकाणी) आला व तो जरी विषयासक्त असला, तरीहि तो परत फिरण्याचे विसरतो.
169-6
ऐसेनि न राहतयातें राहावी । भ्रमतयातें बैसवी । थापटुनि चेववी । विरक्तीतें ॥169॥
असे पवित्र रमणीय स्थान न राहणाऱ्यास देखील राहावयास लावते, भटकंती करणाऱ्यास एके ठिकाणी बसवते आणि वैराग्याला थापटी मारून जागृत करते.
170-6
हें राज्य वर सांडिजे । मग निवांता एथेंचि असिजे । ऐसे शृंगारियांहि उपजे । देखतखेंवो ॥170॥
हे पवित्र रमणीय स्थान पाहिल्यावर आपल्या राज्याचा त्याग करावा, येथे निवांत राहावे, असे श्रुंगारप्रिय विलासी राजालादेखील वाटावे.


171-6
जें येणें मानें बरवंट । आणि तैसेच अतिचोखट । जेथ अधिष्ठान प्रगट । डोळां दिसे ॥171॥
जे स्थान इतके सुंदर आणि तसेच अतिशय पवित्र असून जेथे डोळ्याला ब्रम्ह स्पष्ट दिसते;
172-6
आणिकही एक पहावें । साधकीं वसतें होआवें । आणि जनाचेनि पायरवें । रुळेचिना ॥172॥
या स्थानाचे आणखी एक लक्षण पाहावे. त्या स्थानी साधकाने साधना केलेली असावी. फक्त प्रपंचात रममाण झालेल्या लोकांची येथे ये-जा नसावी.
173-6
जेथ अमृताचेनि पाडें । मुळेहीसकट गोडें । जोडती दाटें झाडें । सदा फळतीं ॥173॥
या स्थानात अमृतासमान मुळासह गोड असणारी फळे देणारी दाट झाडे पसरलेली आहेत.
174-6
पाउला पाउला उदकें । वर्षाकाळेंही अतिचोखें । निर्झरें का विशेखें । सुलभें जेथ ॥174॥
या स्थानात पावला-पावलावर जल आहे. ते पावसाळ्यात देखील शुद्ध असते, असे शुद्ध पाण्याचे झरे, विशेष करून पाणी काढण्यास सुलभ असावेत.
175-6
हा आतपुही अळुमाळु । जाणिजे तरी शीतळु । पवन अति निश्चळु । मंद झुळके ॥175॥
जेथे सूर्याचे उनदेखील शीतल, सौम्य असावे, कदाचित स्वच्छ ऊन पडले, तरी त्यापासून ताप होऊ नये. वारादेखील शांत असून मंद झुळका असाव्यात.

, , , , ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading