सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १०५१ ते १०७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

1051-18
जो न मोकली मारुनी । जीवों नेदी उपजवोनि । विचंबवी खोडां घालुनी । हाडांचिया ॥1051॥
जो अहंकार, मनुष्याला मारूनही टाकीत नाही किंवा सुखाने जगू ही देत नाही; तर, देहरूपी अस्थिपंजरांत जीवाला अडकवून त्याची कुचंबणा मात्र करितो. 51
1052-18
तयाचा देहदुर्ग हा थारा । मोडूनि घेतला तो वीरा । आणि बळ हा दुसरा । मारिला वैरी ॥1052॥
त्या अहंकाराचे वसतिस्थान जो देहरूप किल्ला तो हस्तगत करून घेतो, (देहबुद्धिबाधित करितो) व दुसरा वैरी जो (बल) त्याचाही नाश करतो. 52
1053-18
जो विषयाचेनि नांवें । चौगुणेंही वरी थांवे । जेणें मृतावस्था धांवे । सर्वत्र जगा ॥1053॥
जो बलरूप शत्रु, विषयाचे नुसतें नांव घेतांच चौपटीपेक्षां वाढतो, व ज्याच्या योगे सर्व जगाला मृतावस्था प्राप्त होते. 53
1054-18
तो विषय विषाचा अथावो । आघविया दोषांचा रावो । परी ध्यानखड्गाचा घावो । साहेल कैंचा? ॥1054॥
तो बलरूपी शत्रु विषयरूपी विषांचा डोह असून सर्व दोषांचा राजा आहे, तरीही ध्यानरूपी तलवारीचा वार सहन करण्याचे त्याला सामर्थ्य कोठलें असणार? 54
1055-18
आणि प्रिय विषयप्राप्ती । करी जया सुखाची व्यक्ती । तेचि घालूनि बुंथी । आंगीं जो वाजे ॥1055॥
आणि (दर्प) आवडीच्या विषयाची प्राप्ति झाली म्हणजे त्याला जे सुख होते, त्या सुखाचीच खोळ अंगावर घेऊन जो बढाई मारू लागतो. 55

1056-18
जो सन्मार्गा भुलवी । मग अधर्माच्या आडवीं । सूनि वाघां सांपडवी । नरकादिकां ॥1056॥
ज्याने सन्मार्गाचे आकलन होऊ शकत नाही व जो अधर्माच्या अरण्यांत नेऊन नरकरूपी व्याघ्रांच्या जबड्यांत अचुक नेऊन घालतो, 56
1057-18
तो विश्वासें मारितां रिपु । निवटूनि घातला दर्पु । आणि जयाचा अहा कंपु । तापसांसी ॥1057॥
असा विश्वास देऊन घात करणारा वैरी जो दर्प त्याचे निर्दालन केले; आणि (काम) ज्याचे नांव ऐकतांच तपस्व्यांनाही भीतीने कंप सुटतो. 57
1058-18
क्रोधा ऐसा महादोखु । जयाचा देखा परिपाकु । भरिजे तंव अधिकु । रिता होय जो ॥1058॥
व ज्या कामाचे पर्यवसान अखेर क्रोधासारख्या महादोषांत होते व ज्याचा स्वभाव असा आहे की त्याची जों जों पूर्ती करावी तों तो त्याची तृष्णा वाढतच जाते. 58
1059-18
तो कामु कोणेच ठायीं । नसे ऐसें केलें पाहीं । कीं तेंचि क्रोधाही । सहजें आलें ॥1059॥
अशा त्या कामाचे ज्याने समूळ निर्दालन केले आहे व ज्या कारणनाशामुळे त्याचे कार्य जो क्रोध त्याचीही सहज तीच गति झाली. 59
1060-18
मुळाचें तोडणें जैसें । होय कां शाखोद्देशें । कामु नाशलेनि नाशे । तैसा क्रोधु ॥1060॥
वृक्षाचं मूळ तोडण्यांत शाखांनी मरावे हा हेतु असतो. तसा कामाच्या नाशाने त्याच्या शाखेसारखा असलेला क्रोधही नाश पावतो. 1060

1061-18
म्हणौनि काम वैरी । जाला जेथ ठाणोरी । तेथ सरली वारी । क्रोधाचीही ॥1061॥
म्हणून जेथे काम ह्या शत्रूचा नाश होऊन गेला, तेथे क्रोधाची येरझार सहजच बंद पडणार. 61
1062-18
आणि समर्थु आपुला खोडा । शिसें वाहवी जैसा होडा । तैसा भुंजौनि जो गाढा । परीग्रहो ॥1062॥
(परिग्रह) आणि ज्याप्रमाणे खोड्याची शिक्षा ज्याला द्यावयाची असेल, त्याजकडूनच डोक्यावर तो खोडा अधिकारी निश्चयैकरून वाहवितात, त्याप्रमाणे जीवांना भोग देऊनच पुन्हा त्या भोगेच्छेच्या पायी त्यांना संकटांत टाकणारा असा परिग्रह हा गाढा शत्रु आहे. 62
1063-18
जो माथांचि पालाणवी । अंगा अवगुण घालवी । जीवें दांडी घेववी । ममत्वाची ॥1063॥
त्याप्रमाणे हा परिग्रह आपलें खोगीर जीवांच्या माथ्यावर ठेवून, त्याच्यांत अनेक अवगुण उत्पन्न करितो व त्यांना हातांत ममत्वाची काठी टेक्यासाठी घ्यावयास लावित. 63
1064-18
शिष्यशास्त्रादिविलासें । मठादिमुद्रेचेनि मिसें । घातले आहाती फांसे । निःसंगा जेणें ॥1064॥
हा शिष्य समुदाय माझा, हे ग्रंथ माझे, असा अभिनिवेशाचा खेळ खेळून, त्याचप्रमाणे, हा मठ माझा येथे योगाभ्यास होतो, वगैरे मिशानी हा परिग्रहशत्रु निःसंग अशा वैराग्यशील जीवांनाही फशी पाडतो. 64
1065-18
घरीं कुटुंबपणें सरे । तरी वनीं वन्य होऊनि अवतरे । नागवीयाही शरीरें । लागला आहे ॥1065॥
कुटुंबीयांच्या त्यागने तेथील परिग्रहादि व्यवहार संपला, तरी वनांत गेल्यावर वन्य पदार्था विषय ममत्व उत्पन्न करितो. अशाप्रकारेंत्याने अगद उघडचा नागड्या लोकांनाही सोडलें नाहीं. 65

1066-18
ऐसा दुर्जयो जो परीग्रहो । तयाचा फेडूनि ठावो । भवविजयाचा उत्साहो । भोगीतसे जो ॥1066॥
अस दुर्जय जो परिग्रह शत्रू त्याचा पार नायनाट करून ज्यानें संसार अजूवर विजय मिळविण्याचा उत्साह चित्तांत धरिला आहे. 66
1067-18
तेथ अमानित्वादि आघवे । ज्ञानगुणाचे जे मेळावे । ते कैवल्यदेशींचे आघवे । रावो जैसे आले ॥1067॥
अशा स्थितांत, त्याच्या भेटीला अमानित्वादि ज्ञानगुणांचे समुदाय हेच कोणी जणु मोक्षदेशाचे मांडलिक राजे त्याजपाशी येतात. 67
1068-18
तेव्हां सम्यक्‌ज्ञानाचिया । राणिवा उगाणूनि तया । परिवारु होऊनियां । राहत आंगें ॥1068॥
व त्या साधकाला यथार्थ ब्रह्मात्मैक्यज्ञान हेंच एक सार्वभौमराज्य अर्पण करून अमानित्वादि गुण आपण स्वतः त्याचे सेवक होऊन रहातात.68
1069-18
प्रवृत्तीचिये राजबिदीं । अवस्थाभेदप्रमदीं । कीजत आहे प्रतिपदीं । सुखाचें लोण ॥1069॥
तो साधक प्रवृत्तीच्या राजमार्गाने आक्रमण करीत असतां, जाग्रदादि तीन अवस्थारूपी प्रमदा (तरुण स्त्रिया) त्याजवरून पदोपदी सुखाचे निबलोण उतरून टाकितात. 69
1070-18
पुढां बोधाचिये कांबीवरी । विवेकु दृश्याची मांदी सारी । योगभूमिका आरती करी । येती जैसिया ॥1070॥
अशा त्या साधक सार्वभौमापुढे, विवेकरूप चोपदार हातांतील बोधरूप दंडानें दृश्याची गर्दी मोडीत चालतो. (दृश्याचा बाध करितो) व योगभूमिका जणू त्यास आरती घेऊनच सामोऱ्या येतात.1070

1071-18
तेथ ऋद्धिसिद्धींचीं अनेगें । वृंदें मिळती प्रसंगें । तिये पुष्पवर्षीं आंगें । नाहातसे तो ॥1071॥
त्याप्रसंगी, ऋद्धिसिद्धींचे अनेक समुदाय तेथे प्राप्त होतात व त्यांनी केलेल्या पुष्पवृष्टीने तो जणू कांहीं स्नानच करीत असतो. 71
1072-18
ऐसेनि ब्रह्मैक्यासारिखें । स्वराज्य येतां जवळिकें । झळंबित आहे हरिखें । तिन्ही लोक ॥1072॥
ह्याप्रमाणे, ब्रम्हैक्यज्ञानासारखा स्वराज्यप्राप्तीच योग जवळ येत असतां त्याचा हर्ष त्रिभुवनांत मावत नाही. 72
1073-18
तेव्हां वैरियां कां मैत्रियां । तयासि माझें म्हणावया । समानता धनंजया । उरेचिही ना ॥1073॥
तशा स्थितींत हा माझा शत्रु, हा माझा मित्र, किंवा दोघे सारखेच इतकें म्हणण्यापुरतेंही त्याच्यापुढे द्वैत उरत नाही. 73
1074-18
हें ना भलतेणें व्याजें । तो जयातें म्हणे माझें । तें नोडवेचि कां दुजें । अद्वितीय जाला ॥1074॥
इतकेच नव्हे तर, कोणत्याही निमित्ताने त्याने ज्याला “माझे “ असे म्हणावें, एवढे देखील द्वैतपणानें (सत्यत्वाने) त्याच्यापुढे उरत नाही. कारण, तो अद्वितीय ब्रह्मरूपच झालेला असतो.74
1075-18
पैं आपुलिया एकी सत्ता । सर्वही कवळूनिया पंडुसुता । कहीं न लगती ममता । धाडिली तेणें ॥1075॥
त्याच्या सर्वात्मभावापुढे विश्वाला पृथक् अशी सत्ताच उरत नसल्याने ममत्वाला कोठे अवसरच नसतो; मग ममता उरणारच कशी? 75

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *