सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ९२६ ते ९५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

926-18
तेवीं स्वधर्मु सांकडु । देखोनि केला जरी कडु । तरी मोक्षसुरवाडु । अंतरला कीं ॥926॥
त्याप्रमाणे स्वधर्म आचरण्यास कठीण आहे असे म्हणून जर त्याचा त्याग केला तर तो मोक्षसुखाला अंतरलाचकी की? 926
927-18
आणि आपुली माये । कुब्ज जरी आहे । तरी जीये तें नोहे । स्नेह कुऱ्हें कीं ॥927॥
आणि आपली आई जरी कुरूप असली तरी ज्या तीच्या प्रेमामुळे आपण जगतो, ते तिचे प्रेम काही वाकडे नाही. 927
928-18
येरी जिया पराविया । रंभेहुनि बरविया । तिया काय कराविया । बाळकें तेणें? ॥928॥
एरव्ही दुसऱ्या स्त्रिया जरी रंभेहून सुस्वरूप असल्या तरी बालकाला त्या काय करावयाच्या आहेत? 928
929-18
अगा पाणियाहूनि बहुवें । तुपीं गुण कीर आहे । परी मीना काय होये । असणें तेथ ॥929॥
अरे, पाण्यापेक्षा तुपात पुष्कळ गुण आहेत, हे खरे; पण माशाला तुपात ठेवले असतो जगेल का? 929
930-18
पैं आघविया जगा जें विख । तें विख किडियाचें पीयूख । आणि जगा गूळ तें देख । मरण तया ॥930॥
हे पहा, जो बचनाग सर्व जगाला विष आहे, तोच त्यातील किड्याला अमृत आहे; आणि गुळ जो साऱ्या जगाला गोड आहे, तोच त्या किड्याला मृत्यु आहे! 930

931-18
म्हणौनि जे विहित जया जेणें । फिटे संसाराचें धरणें । क्रिया कठोर तऱ्ही तेणें । तेचि करावी ॥931॥
म्हणून ज्याला जे विहित कर्म सांगितले आहे की, ज्याच्या आचरणाने संसाराची बंधन तुटते, ते कितीही कष्टसाध्य असले तरी त्याने त्याचे आचरण करावे. 931
932-18
येरा पराचारा बरविया । ऐसें होईल टेंकलया । पायांचें चालणें डोइया । केलें जैसें ॥932॥
पण तोच दुसऱ्याचा धर्म उत्तम म्हणून जर त्याचे आचरण केले तर, पायाने चालण्याचे काम डोक्याने केल्याप्रमाणे होऊन उलट ते दु:खाला मात्र कारण होईल. 932
933-18
यालागीं कर्म आपुले । जें जातिस्वभावें असे आलें । तें करी तेणें जिंतिलें । कर्मबंधातें ॥933॥
याकरिता आपल्या जातीस्वभावानुसार आपल्या वाट्यास जे कर्म आलेले आहे, त्याचे जो आचरण करतो, त्याने कर्मबंधला जिंकले;(तो कर्मबंधापासून मुक्त झाला) 933
934-18
आणि स्वधर्मुचि पाळावा । परधर्मु तो गाळावा । हा नेमुही पांडवा । न कीजेचि पै गा? ॥934॥
आणि म्हणूनच अर्जुना, पर धर्माचा त्याग करून स्वधर्माचेच आचरण करण्याविषयी नियम नको का करावयाला? 934
935-18
तरी आत्मा दृष्ट नोहे । तंव कर्म करणें कां ठाये? । आणि करणें तेथ आहे । आयासु आधीं ॥935॥
तर आत्मा जोपर्यंत दृष्ट झाला नाही, तोपर्यंत कर्म करण्याचे राहील काय? नाही, ते अवश्य केलेच पाहिजे, आणि कर्म करावयाचे म्हटले म्हणजे प्रथम कष्ट आहेत. 935
सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् ।
सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः ॥18.48॥

936-18
म्हणौनि भलतिये कर्मीं । आयासु जऱ्ही उपक्रमीं । तरी काय स्वधर्मीं । दोषु । सांगें? ॥936॥
याचकरिता, कोणतेही कर्म केले तरी जर प्रारंभी आयास पडतात, तर स्वधर्माचे आचरण केले असता दोष का लागेल सांगा बरे? 936
937-18
आगा उजू वाटा चालावें । तऱ्ही पायचि शिणवावे । ना आडरानें धांवावें । तऱ्ही तेंचि ॥937॥
अरे, सरळ वाटेने चालावयाचे झाले, तरी पायालाच शीण द्यावयाचा, आणि आडरानात भटकावयाचे झाले, तरी तीच स्थिती! 937
अर्जुना, हे बघ, वाटेने जाताना पदरात शिळा किंवा शिदोरी(फराळाचे) ही दोन्ही जरी बांधली तरी ओझे सारखेच होते; परंतु हे विसाव्याचे(मुक्कामाचे) ठिकाणी सुखकर होईल, तेच घ्यावे.
938-18
पैं शिळा कां सिदोरिया । दाटणें एक धनंजया । परी जें वाहतां विसांवया । मिळिजे तें घेपे ॥938॥
बाकी धान्य आणि भुस कांडताना श्रम सारखेच पडतात; अथवा श्वानाचे मास खाण्याचे किंवा होमाकरिता मास शिजविण्याचे श्रम सारखेच आहेत,
939-18
येऱ्हवीं कणा आणि भूसा । कांडितांही सोसु सरिसा । जेंचि रंधन श्वान मांसा । तेंचि हवी ॥939॥
बाकी धान्य आणि भुस कांडताना श्रम सारखेच पडतात; अथवा श्वानाचे मास खाण्याचे किंवा होमाकरिता मास शिजविण्याचे श्रम सारखेच आहेत, 939
940-18
दधी जळाचिया घुसळणा । व्यापार सारिखेचि विचक्षणा । वाळुवे तिळा घाणा । गाळणें एक ॥940॥
हे विचक्षणा, दही किंवा पाणी यांच्या घुसळण्याचे श्रम सारखेच; अथवा वाळू किंवा तिळ घाण्यात गाळण्याचे श्रम सारखेच, 940

941-18
पैं नित्य होम देयावया । कां सैरा आगी सुवावया । फुंकितां धू धनंजया । साहणें तेंचि ॥941॥
हे बघ, अर्जुना, नित्य होम देण्याकरिता किंवा एरव्ही विस्तव पेटविण्याचे वेळी धुर हा दोघांसही सोसावा लागतोच; 941
942-18
परी धर्मपत्नी धांगडी । पोसितां जरी एकी वोढी । तरी कां अपरवडी । आणावी आंगा? ॥942॥
अथवा लग्नाची बायको किंवा एखादी ठेवलेली स्त्री या दोघींचेही पोषण करण्यास जर सारखाच खर्च लागतो, तर मग एखादी स्त्री जवळ ठेवून अपकीर्तीचा डाग का लावून घ्यावा?942
943-18
हां गा पाठीं लागला घाई । मरण न चुकेचि पाहीं । तरी समोरला काई । आगळें न कीजे? ॥943॥
अरे, पाठीकडच्या बाजूला घाव लागून जर मरण चुकत नाही, तर शत्रुसमोर युद्ध करून मेलो असतां मरणाहून अधिक वर्गाची प्राप्ति होणार नाही का? 43
944-18
कुलस्त्री दांड्याचे घाये । परघर रिगालीहि जरी साहे । तरी स्वपतीतें वायें । सांडिलें कीं । ॥944॥
कुलस्त्री दुसर्याच्या घरांत शिरूनहि जर तिला दांडक्याचा मार, सोसावा लागतो, तर तिने आपला पति व्यर्थ सोडला असें नाहीं का होत? 44
945-18
तैसें आवडतेंही करणें । न निपजे शिणल्याविणें । तरी विहित बा रे कोणें । बोलें भारी? ॥945॥
त्याप्रमाणे पाहिजे तें कर्म केले असतांहि जर दुःख सोसावें लागतं तर बापा, स्वधर्माचरण कठीण असे कोणत्या तोंडानें म्हणतां येईल? 45

946-18
वरी थोडेंचि अमृत घेतां । सर्वस्व वेंचो कां पंडुसुता । जेणें जोडे जीविता । अक्षयत्व ॥946॥
हे पंडुसुता, ज्या अमृतसेवनातें अमरत्व प्राप्त होते, त्याच्या अल्प प्राप्तीकरितां हि सर्वत्र कां खर्च करू नये? 46
947-18
येर काह्यां मोलें वेंचूनि । विष पियावे घेऊनि । आत्महत्येसि निमोनि । जाइजे जेणें ॥947॥
आणि ज्या विषाचे सेवन केले असतां सर्व सुखांचा नाश होऊन आत्महत्येचे पातकं लागतें, ते विकत घेऊन कां प्यावें? 47
948-18
तैसें जाचूनियां इंद्रियें । वेंचूनि आयुष्याचेनि दिये । सांचलें पापीं आन आहे । दुःखावाचूनि? ॥948॥
त्याप्रमाणे इंद्रियांना शीण देऊन आयुष्याचे दिवस खर्च करून पापाचा संचय केला असतां दुःखावाचुन दुसरें फल आहे काय? 48
949-18
म्हणौनि करावा स्वधर्मु । जो करितां हिरोनि घे श्रमु । उचित देईल परमु । पुरुषार्थराजु ॥949॥
म्हणून स्वधर्माचेंच आचरण करावे. तो आपल्या श्रमांचा परिहार करून, उचित अशा परमपुरुषार्थाची—सर्वश्रेष्ठ मोक्षाची प्राप्ति करून देईल49
950-18
याकारणें किरीटी । स्वधर्माचिये राहाटी । न विसंबिजे संकटीं । सिद्धमंत्र जैसा ॥950॥
या करितां, ज्याप्रमाणे संक्रटसमयीं सिद्धमंत्र विसरु नये, त्याप्रमाणे स्वधर्माचे आचरण सोडू नये. 950

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *