सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा ओवी २७६ ते ३०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

276-2
म्हणोनि बुद्धियोगु सधरु । तेथ अर्जुना होई स्थिरु । मनिं करी अव्हेरु । फळहेतूचा ॥276॥
म्हणून हे अर्जुन ! बुद्धीयोगच श्रेष्ठ आहे, म्हणुन फलेच्छा न धरता या योगाचे ठिकाणी तू निश्चल हो. (स्थिर हो.) आपले मन स्थिर कर.
277-2
जे बुद्धियोगा योजिले । तेचि पारंगत जाहले । इहीं उभय संबंधी सांडिले । पापपुण्यीं ॥277॥
ज्यांची बुद्धीयोगाकडे प्रवृत्ती झाली, तेच (संसार रुपी)भवांतून पार पडले.आणि तेच पाप व पूण्य या दोन्हीच्या बंधनातून सुटले.
कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः ।
जन्मबंधविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम्॥2.51॥
भावार्थ :- बुद्धियोगाचा अवलंब करणारे ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फलाचा त्याग करतात. म्हणून ते ते जन्म- मृत्यू च्या बंधनातून मुक्त होऊन व परमपदाला प्राप्त होतात.
278-2
ते कर्मी तरी वर्तती । परी कर्मफळा नातळती । आणि यातायाति लोपती । अर्जुना तयां ॥278॥
अर्जूना, त्यांनी कर्म जरी केली, तरी त्यांच्या मनात कर्माच्या फलाची इच्छा धरीत नाहीत. त्यामुळे त्यांची जन्ममरणाच्या फेर्‍यातुन नेहमीचीच सुटका होते.
279-2
मग निरामयभरित । पावती पद अच्युत । ते बुद्धियोगयुक्त । धनुर्धरा ॥279॥
हे धनुर्धरा ! मग हे बुद्धीयोगी लोक सर्वोपद्रव रहित, ब्रम्हानंद भरित, अढळ, अविनाशी, अशा परमात्म-स्वरूपाला प्राप्त होतात.
यदा ते मोहकलिलं बुद्धुर्व्यतितरिष्यति ।
तदा गंतासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च॥2.52॥
भावार्थ :- जेंव्हा तुझी बुद्धी मोहरूपी पातकांतून पूर्णपणे तरुन जाईल, त्यावेळी तू जे ऐकलेले आहेस आणि जे तुला ऐकावयाचे आहे, त्याबद्दल तू सहज विरक्त होशील.
280-2
तूं ऐसा तैं होसी । जैं मोहातें या सांडिसी । आणि वैराग्य मानसीं । संचरेल ॥280॥
अर्जुना, ज्या वेळी (तू स्वजनांचा) मोहाचा त्याग करशील, त्या वेळी (तुझ्या मनात) आपोआपच वैराग्य (उत्पन्न) संचार होईल आणि तू मुक्त होशील. (मगच तू बुद्धीयोगयुक्त स्थितीत प्राप्त होशील.)


281-2
मग निष्कळंक गहन । उपजेल आत्मज्ञान । तेणे निचाडें होईल मन । अपैसें तुझे ॥281॥
त्यामुळे तुला निर्दोष आणि गहन असे आत्मज्ञान (तुझ्या ठिकाणी) उत्पन्न होईल व तुझे अंतःकरण सर्वप्रकारे सहजच निरिच्छ होईल. (कोणतीच इच्छा नसलेले)
282-2
तेथ आणिक कांही जाणावे । कां मागिलातें स्मरावें । हें अर्जुनां आघवें । पारुषेल ॥282॥
अर्जूना ! अशी तुझ्या मनाची स्तिथी झाल्यावर आणखी काही मिळवावे, कांही जाणावे किंवा मागे जाणलेल्या गोष्टीचे स्मरण करावे, या सर्वच (क्रिया) गोष्टी थांबतात.
श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला ।
समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि॥2.53॥
भावार्थ :- वेदांतील विविध कर्मफलाच्या श्रवणाने विचलित झालेली तुझी बुद्धी परमात्म्याचे स्वरूपी ज्या वेळी स्थिर होईल, त्या वेळी तुला समत्वरूप प्राप्त होईल.
283-2
इंद्रियांचिया संगती । जिये पसरु असे मती । ते स्थिर होईल मागुती । आत्मस्वरूपीं ॥283॥
इंद्रियांच्या संगतीने जी बुद्धी विषयाकडे पसरलेली असते., ती बुद्धी आत्मस्वरूपाला प्राप्त झाली, की सहजपणे स्थिर होते.
284-2
समाधिसुखीं केवळ । जैं बुद्धि होईल निश्चळ । तैं पावसी तूं सकळ । योगस्थिति ॥284॥
समाधीसुखात(शुद्ध आत्मसुखाचे) ठिकाणी जेव्हा तुझी बुद्धी स्थिर होईल, तेंव्हा तुला योगस्थिती (निष्काम कर्मयोग) प्राप्त होईल.
अर्जुन उवाच:
स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव ।
स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत ब्रजेत किम्॥2.54॥
भावार्थ :- अर्जुन म्हणाला, हे केशवा ! अखंड समाधीत राहणाऱ्या मनुष्याची लक्षणे कोणती आहेत? तो स्थिरबुद्धी असणारा मनुष्य काय बोलतो? कसा असतो? आणि कर्म कसे करतो?
285-2
तेथ अर्जुन म्हणे देवा । हाचि अभिप्रावो आघवा । मी पुसेन आतां सांगावा । कृपानिधि ॥285॥
त्यावेळी अर्जुन म्हणाला, हे देवा ! हाच सर्व अभिप्राय मी आता विचारतो; हे करूणासागरा, आपण तो स्पष्टपणे सांगावा.


286-2
मग अच्युत म्हणे सुखें । जें किरीटी तुज निकें । तें पूस पां उन्मेखें । मनाचेनि ॥286॥
त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले, “अर्जुना ! जे तुला विचारायचे आहे, ते समाधानी मनाने विचारावे. “
287-2
या बोला पार्थें । म्हणितलें सांग पां श्रीकृष्णातें । काय म्हणिपे स्थितप्रज्ञातें । वोळखों केवीं ॥287॥
हे ऐकून अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, देवा ! स्थितप्रज्ञ (ज्याची बुद्धी स्थिर आहे तो) कोणाला म्हणावे.व त्यास ओळखावे कसे? हे उघड करून सांगा बरे !
288-2
आणि स्थिरबुद्धि जो म्हणिजे । तो कैसां चिन्हीं जाणिजे । जो समाधिसुख भुंजिजे । अखंडित ॥288॥
ज्याची बुद्धी परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर झाली आहे. (ज्याला स्थिरबुद्धी म्हणतात), व जो नेहमी समाधीसुखात रममाण झाला आहे, (असतो) त्याला कोणत्या लक्षणानी ओळखावे.
289-2
तो कवणे स्थिती असे । कैसेनि रूपी विलसे । देवा सांगावें हें ऐसें । लक्ष्मीपती ॥289॥
हे लक्ष्मीपती देवा ! तो कोणत्या स्थितीत असतो? व कोणत्या प्रकारे आचरण करत असतो? हे कृपा करून मला सांगावे.
290-2
तव परब्रह्मअवतरणु । जो षड्गुणाधिकरणु । तो काय तेथ नारायणु । बोलतु असे ॥290॥
तेव्हा षड्गुण एश्वर्य संपन्न 【यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, आणि ऎश्वर्य 】 या सहा गुणांचा (अधिष्ठान व परब्रम्ह) आश्रयस्थान असा जो भगवान श्रीकृष्ण बोलू लागले. (ते ऐकावे)
श्रीभगवानुवाच:
प्रजहाति यदा कामान् सर्वान्पार्थ मनोगतान् ।
आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते॥2.55॥
भावार्थ :- श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना जेंव्हा मनामध्ये असलेल्या सर्व इच्छा सर्वथा टाकून देतो व स्वतः आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संतुष्ट होतो, तेंव्हा त्या पुरुषाला स्थितप्रज्ञ म्हणतात.


291-2
म्हणे अर्जुना परियेसीं । हा अभिलाषु प्रौढ मानसीं । तो अंतराय स्वसुखेसीं । करीत असे ॥291॥
श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना ! ऐक, मनामध्ये जी उत्कट विषयासक्ती असते, तीच आत्मनंदानुभवाला प्रतिबंध (विघ्ने)निर्माण करते.
292-2
जो सर्वदा नित्यतृप्तु । अंतःकरणभरितु । परि विषयामाजि पतितु । जेणें संगे कीजे ॥292॥
जो सर्वदा सुखतृप्त असतो, ज्याचे अंतःकरण आत्मज्ञानाने नित्य आनंदाने परिपूर्ण भरलेले असते; परंतु अशा जिवात्म्याचेही ज्याच्या (कामाच्या) संगतीने पुरूष विषयासक्त होऊन पतन होते.
293-2
तो कामु सर्वथा जाये । जयाचे आत्मतोषीं मन राहें । तोचि स्थितप्रज्ञु होये । पुरुष जाणे ॥293॥
ज्याचा मनातुन कामेच्छा पूर्णपणे निघून जाते, ज्याचे मन आत्मसंतोषात रममाण असते, तोच पुरूष स्थितप्रज्ञ, स्थिरबुद्धि होय असे जाण.
दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।
वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनीरुच्यते॥2.56॥
भावार्थ :- दुःखे आली असता ज्याचे मन उद्विग्न होत नाही, सुखे आली असता जो त्याच्या विषयी निरिच्छ असतो. ज्याच्या अंथकरणातून काम, भय आणि क्रोध गेलेली असतात, असा जो मुनी, त्याला स्थितप्रज्ञ म्हणावे.
294-2
नाना दुःखी प्राप्तीं । जयासी उद्वेगु नाहीं चित्तीं । आणि सुखाचिया आर्ती । अडपैजेना ॥294॥
नाना प्रकारची दुःखे प्राप्त झाली तरी ज्याच्या मनात उद्वेग्न उत्पन्न होत नाही, आणि जो सुखाच्या इच्छेमध्ये अडकला जात नाही,
295-2
अर्जुना तयाचां ठायीं । कामक्रोधु सहजें नाहीं । आणि भयातें नेणें कहीं । परिपूर्ण तो ॥295॥
अर्जुना, त्या सत्पुरूषाचे अंतःकरणात काम क्रोध सहजच नाहिसे झालेले असतात, तो सर्वकाळी भयमुक्त असतो. विश्वचैतन्याशी एकरूप झाल्यामुळे तो परिपूर्ण असतो.


296-2
ऐसा जो निरवधि । तो जाण पां स्थिरबुद्धि । जो निरसूनि उपाधि । भेदरहितु ॥296॥
असा जो अमर्याद आणि सर्व प्रकारच्या उपधींचा त्याग करून भेदराहित झालेला असतो, तो स्थिरबुद्धी होय, असे समज.
यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् ।
नाभिननंदंति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता॥2.57॥
भावार्थ :- ज्याची कोठेही आसक्ती नसते, शुभ किंवा अशुभ प्राप्त झाले असता ज्याला आनंद किंवा विषाद होत नाही, त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे.
297-2
जो सर्वत्रा सदा सरिसा । परिपूर्ण चंद्रु कां जैसा । अधमोत्तम प्रकाशा – । माजीं न म्हणे ॥297॥
(स्थिरबुद्धी पुरूष लक्षणे) पौर्णिमेचा चंद्र जसा आपला प्रकाश देताना चांगला अथवा वाईट असा भेदभाव करत नाही. त्याप्रमाणे जो सदा सर्वत्र सारखा समबुद्धीने (प्रेमाचा वर्षाव करीत) वागत असतो.
298-2
ऐसी अनवच्छिन्न समता । भूतामत्रीं सदयता । आणि पालटु नाहीं चित्ता । कवणे वेळे॥298॥
अशी ज्याची सर्व भूतमात्राविषयी अखंड समता आणि दयाळू भाव असतो.त्याच्या शुद्ध चित्ताची स्थिती कधीही बदलत नाही.
299-2
गोमटें कांही पावे । तेणे संतोषें तेणें नाभिभवे । जो ओखटेनि नागवे । विषादासी ॥299॥
काही चांगले प्राप्त झाले तरी त्यापासून होणाऱ्या संतोषाचा पगडा ज्याच्या मनावर बसत नाही व वाईट गोष्टी प्राप्त झाल्यामुळे तो खिन्नतेच्या तावडीत सापडत नाही. (प्रतिकूल विषयाच्या प्राप्ती नंतरही दुःखाच्या तावडीत सापडत नाही)
300-2
ऐसा हरिखशोकरहितु । जो आत्मबोधभरितु । तो पां जाण प्रज्ञायुक्तु । धनुर्धरा ॥300॥
याप्रमाणे जो हर्षशोक रहित असतो व नेहमी आत्मानुभिती संपन्न असतो.तोच स्थिरबुद्धी होय, असे अर्जुना जाण.
यदा संहरते चायं कूर्मोऽङगानीव सर्वशः ।
इंद्रियाणींद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥2.58॥
भावार्थ :- ज्याप्रमाणे कासव आपले अवयव सर्व बाजुंनी आपल्या इच्छेप्रमाणे आत ओढुन घेतो, त्याप्रमाणे (तो) पुरुष जेंव्हा आपली इंद्रिये, इंद्रियांच्या विषयापासून आवरून धरतो, तेंव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली, असे समजावे.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *