सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १४०१ ते १४२५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

1401-18
वांचूनि सागराच्या पोटीं । वडवानळु शरण आला किरीटी । जाळूनि ठाके तया गोठी । वाळूनि दे पां ॥1401॥
दुसराही शरण येण्याचा प्रकार आहे; समुद्राला वडवानल शरण येऊन त्याच्या
अंतरात राहिला खरा; पण तो तेथेही दाहरूपाने आहे; तशी शरणागति नको हो ! 1
1402-18
मजही शरण रिघिजे । आणि जीवत्वेंचि असिजे । धिग् बोली यिया न लजे । प्रज्ञा केवीं ॥1402॥
मलाही शरण आलेला आहे आणि पुन्हा आपल्याला जीवच समजतो; धिक्कार असो ह्या भाषेला ! असे म्हणतांना त्याची बुद्धि लाजत कशी नाहीं? 2
1403-18
अगा प्राकृताही राया । आंगीं पडे जें धनंजया । तें दासिरूंहि कीं तया । समान होय ॥1403॥
अरे, पृथ्वीवरील एखाद्या राजाने अगदीं सामान्य दासीचाही जर अंगिकार केला तरती राणीपद पावते. 3
1404-18
मा मी विश्वेश्वरु भेटे । आणि जीवग्रंथी न सुटे । हे बोल नको वोखटें । कानीं लाऊं ॥1404॥
तर मग विश्वाचा स्वामी जो मी, त्याची भेट होऊनहि पुन्हा जीवदशा तशीच कायम आहे, असे ओंगळ बोल नुसते ऐकण्यासही आमचे कान तयार नाहीत,4
1405-18
म्हणौनि मी होऊनि मातें । सेवणें आहे आयितें । तें करीं हातां येतें । ज्ञानें येणें ॥1405॥
म्हणून, मद्रूप झालास की माझी अनायासें (सहज) सेवा घडते; तें मद्रूप होणे साध; ती सिद्धि या मी सांगितलेल्या ज्ञानानं प्राप्त होते; 5

1406-18
मग ताकौनियां काढिलें । लोणी मागौतें ताकीं घातलें । परी न घेपेचि कांहीं केलें । तेणें जेवीं ॥1406॥
दधिमंथनाने ताकांतून लोणी निराळे केले, आणि मग ते पुन्हा ताकत टाकिलें तरी जसें कांहीं केल्या त्याच्याशी एकरूप होत नाही. 6
1407-18
तैसें अद्वयत्वें मज । शरण रिघालिया तुज । धर्माधर्म हे सहज । लागतील ना ॥1407॥
त्याप्रमाणे, शुद्ध अद्वयबोधाने मला शरण आलास (मद्रूप झालास) म्हणजे सहजच धर्माधर्माचा तुला स्पर्श होणार नाही. 1407
1408-18
लोह उभें खाय माती । तें परीसाचिये संगतीं । सोनें जालया पुढती । न शिविजे मळें ॥1408॥
लोखंड मातीत असले तर, ती त्याला खाऊन टाकते, पण तेच परिसाच्या स्पर्शाने सोनें झाल्यावर पुन्हां मातींत ठेवले तर तिचा त्याला यत्किंचींतही उपद्रव होत नाही. 8
1409-18
हें असो काष्ठापासोनि । मथूनि घेतलिया वन्ही । मग काष्ठेंही कोंडोनी । न ठके जैसा ॥1409॥
हे असू द्या; काष्ठांच्या घर्षणानें उत्पन्न केलेला अग्नी, मग जसा काष्ठांनीही झांकला जात नाही. 9
1410-18
अर्जुना काय दिनकरु । देखत आहे अंधारु । कीं प्रबोधीं होय गोचरु । स्वप्नभ्रमु । ॥1410॥
अर्जुना, सूर्याला कधीं अंधार भेटतो का? किंवा जागृतींत, स्वप्नांत कल्पिलेले व्यवहार आढळतात काय? 1410

1411-18
तैसें मजसी येकवटलेया । मी सर्वरूप वांचूनियां । आन कांहीं उरावया । कारण असे? ॥1411॥
त्याप्रमाणे मजपाशी ऐक्य पावल्यावर व मी सर्वत्र एकरूपाने भरलेला असल्याने म।झ्यावांचुन अन्य पदार्थ उरण्याचे कारणच काय? 11
1412-18
म्हणौनि तयाचें कांहीं । चिंतीं न आपुल्या ठायीं । तुझें पापपुण्य पाहीं । मीचि होईन ॥1412॥
म्हणून आपल्या ठिकाणच्या पापपुण्यांची कांहींही चिता करू नकोस. (ती जबाबदारी मी घेतो) कारण ती दोन्हीं मीच होईन. 12
1413-18
तेथ सर्वबंधलक्षणें । पापें उरावें दुजेपणें । तें माझ्या बोधीं वायाणें । होऊनि जाईल ॥1413॥
असे झाल्यावर, माझ्याहून वेगळेपणें उरणें हेंच जें पापाचे म्हणजे सर्व संसारबंधाच्या कारणाचे लक्षण, तेच माझ्या सर्वात्मैक्यज्ञानांत मिथ्या ठरून जाईल. 13
1414-18
जळीं पडिलिया लवणा । सर्वही जळ होईल विचक्षणा । तुज मी अनन्यशरणा । होईन तैसा ॥1414॥
जलांत पडलेल्या मिठाला जशी सर्वांगानें जलरूपता, त्याप्रमाणे, अर्जुना, माझ्या ठिकाणी अनन्यभावाने शरण आलेल्या तुला मद्रूपता येते येईल. 14
1415-18
येतुलेनि आपैसया । सुटलाचि आहसी धनंजया । घेईं मज प्रकाशोनियां । सोडवीन तूंतें ॥1415॥
असे झाले म्हणजे धनंजया, तू सहज मुक्त आहेसच; पण माझ्या यथार्थ स्वरूपाचा प्रकाश (बोध) अंत:करणवृत्तीवर रूढ करून घे, म्हणजे आपण मुक्त आहोंच अथवा मी तुला सोडविलें असा (औपचारिक) प्रयय तुला येईल. 15

1416-18
याकारणें पुढती । हे आधी न वाहे चित्तीं । मज एकासि ये सुमती । जाणोनि शरण ॥1416॥
यास्तव इतःपर ही मुक्तीची चिता मनांत वाहूं नको; अर्जुना, सर्वव्यापक एकच एक जो मी, त्या मला ओळखून (अर्थात् तत्त्वतः तद्रूप होऊन) शरण ये. (येथे गीताशास्त्र समाप्त झाले.) 16
1417-18
ऐसें सर्वरूपरूपसें । सर्वदृष्टिडोळसें । सर्वदेशनिवासें । बोलिलें श्रीकृष्णें ॥1417॥
सर्व, रूपवान् पदार्थ ज्याच्यामुळे रूपवान आहेत, दृष्टीचाही जो डोळा आहे सर्व, स्थानांचेही जो अधिष्ठान आहे तो श्रीकृष्ण परमात्मा असे म्हणाला. 17
1418-18
मग सांवळा सकंकणु । बाहु पसरोनि दक्षिणु । आलिंगिला स्वशरणु । भक्तराजु तो ॥1418॥
मग शामसुंदर भगवंतांनीं आपला दिले. कंकणयुक्त उजवा हात पुढे करून, आपल्या अनन्यशरण आलेल्या भक्तश्रेष्ठ अर्जुनाला आलिंगन दिले. 18
1419-18
न पवतां जयातें । काखे सूनि बुद्धीतें । बोंलणें मागौतें । वोसरलें ॥1419॥
ज्या वस्तू पर्यंत पोचणे अशक्य होऊन वाणी मनासहवर्तमान परत फिरली व मौनावली. 19
1420-18
ऐसें जें कांहीं येक । बोला बुद्धीसिही अटक । तें द्यावया मिष । खेवाचें केलें ॥1420॥
वाणीला व बुद्धीला अगम्य असें जें कांही एक वस्तु ते स्वभक्ताला अर्पण करण्याकरितां देवांनी आलिंगनाचे निमित्तकेले. 1420

1421-18
हृदया हृदय येक जाले । ये हृदयींचें ते हृदयीं घातलें । द्वैत न मोडितां केलें । आपणा{ऐ}सें अर्जुना ॥1421॥
हृदयाला हृदयभिडले, ह्या अंतःकरणांतील त्या अंतःकरणांत (मूळ ठिकाणचे नाहीसे न होता) साठविले, व औपाधिक द्वैतभंग न करितां अर्जुनाला स्वपदावर बसविलें; 21
1422-18
दीपें दीप लाविला । तैसा परीष्वंगु तो जाला । द्वैत न मोडितां केला । आपणपें पार्थुं ॥1422॥
एका दिव्याने दुसरा दिवा लावावा असाच जणू त्या आलिंगनाचा प्रकार घडला; देवभक्तादि द्वैताला धका न लावतां पार्थाला आत्मरूप केला. 22
1423-18
तेव्हां सुखाचा मग तया । पूरु आला जो धनंजया । तेथ वाडु तऱ्हीं बुडोनियां ॥ ठेला देवो ॥1423॥
वेळीं अर्जुनाला सुखाचे जे भरतें लोटलें त्यांत, देव एवढे मोठे खरे, पण तेही बुडालें ! 23
1424-18
सिंधु सिंधूतें पावों जाये । तें पावणें ठाके दुणा होये । वरी रिगे पुरवणिये । आकाशही ॥1424॥
समुद्राला समुद्र मिळू गेला तर मिळण्याची गोष्ट बाजूसच राहून जलसंचयच दुप्पट होतो व तेवढा आकाशांतील भाग आणखी व्यापावा लागतो. 24
1425-18
तैसें तयां दोघांचें मिळणें । दोघां नावरे जाणावें कवणें । किंबहुना श्रीनारायणें । विश्व कोंदलें ॥1425॥
अर्जुनाच्या व देवांच्या संगमाची तशी स्थिति होऊन त्यांचे प्रेम अनावरपणे वाढले, ते कोण जाणू शकणार? किंबहुना, नारायणस्वरूपाने (त्या ऐक्यानें) सर्वं विश्व कोंडून गेले. 25

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading