126-5
म्हणोनि अविद्याजात नाथिलें । तें तिहींचि साच दाविलें । जिहीं सुखबुद्धी घेतलें । विषयदुःख ॥126॥
म्हणून ज्यांनी, विषयापासून होणारे दुःखच सुख मानले / स्वीकारले. त्यांनीच मिथ्या असलेले सर्व अज्ञान, ते खरे आहे, असे दाखविले.
127-5
या कारणें गा सुभटा । हा विचारितां विषय वोखटा । तूं झणें कहीं या वाटा । विसरोनि जाशी ॥127॥
अर्जुना, यामुळेच विचार करून पहिले, तर ते विषय वाईट आहेत. तू कधी चुकून त्यामार्गाला जाशील तर जाऊ नकोस.
128-5
पै यातें विरक्त पुरुष । त्यजिती कां जैसें विष । निराशा तयां दुःख । दाविलें नावडे ॥128॥
जे विरक्त पुरुष आहेत, ते या विषयांस, जसे कांही विषच आहे, असे समजून त्याचा त्याग करतात.
कारण ते निरिच्छ असल्यामुळे विषयांनी दाखविलेले दुःखरुपी सुख त्यांस आवडत नाही.
शक्नोतीहैव यः सोढुं प्राक् शरीरविमोक्षणात् ।
कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः सुखी नरः॥5.23॥
भावार्थ :- इहलोकी, मरणाच्या आगोदर काम व क्रोध यांच्या वेगाला सहन / जिंकतो करू शकतो, तो पुरुष योगी व तोच सुखी आहे.
129-5
ज्ञानियांच्या हन ठायीं । याची मातुही कीर नाहीं । देहीं देहभावो जिहीं । स्ववश केले ॥129॥
आत्मज्ञानी पुरुषाच्या अंतःकरणात, दुःखरूप विषयांची गोष्टसुद्धा नसते; कारण त्यांनी देहात असतानाच काम-क्रोधादी वृत्ती स्वाधीन केलेल्या असतात.
130-5
जयांतें बाह्याची भाष । नेणिजेचि निःशेष । अंतरीं सुख । एक आथी ॥130॥
जे बाह्य विषयांच्या उपभोगाची भाषा मुळीच जाणत नाहीत, त्यांच्या हृदयात ब्रम्हसुखच नांदत असते.
131-5
परि तें वेगळेपणें भोगिजे । जैसे पक्षिये फळ चुंबिजे । तैसें नव्हे तेथ विसरिजे । भोगितेपणही॥131॥
ब्रम्हसुखाचा अनुभव वेगळ्या पद्धतीने घ्यावा लागतो. पक्षी ज्याप्रमाणे फळाला झोंबतो, तेंव्हा भोक्ता, भोग्य आणि भोग त्रिपुटी असते; पण तशी त्रिपुटी ब्रम्हानंदात नाही. कारण त्या अवस्थेमध्ये भोकतेपणही विसरावा लागतो.
132-5
भोगीं अवस्था एक उठी । ते अंहकाराचा अचळु लोटी । मग सुखेंसि आंठी । गाढेपणें ॥132॥
त्या भोगांमध्ये वृत्तीची एक अशी अवस्था निर्माण होते की, ती अहंकाराचे वस्त्र दूर सारते आणि मग तो जीव ब्रम्हसुखाचा दृढ आलिंगन देतो.
133-5
तिये आलिंगनमेळीं । होय आपेंआप कवळी । तेथ जळ जैसें जळी । वेगळें न दिसे ॥133॥
जसे पाण्यात पाणी टाकले असता ते वेगळे दिसत नाही, तसे त्या अलिंगणात, मिळणात आपलीच आपल्या स्वरूपाशी मिठी पडलेली असते.
134-5
कां आकाशीं वायु हारपे । तेथ दोन्ही हे भाष लोपे । तैसे सुखचि उरे स्वरुपें । सुरतीं तिये ॥134॥
अथवा आकाशात वायूचा लय झाल्यानंतर आकाश व वायू हे दोन आहेत, ही भेदाची भाषा संपून जाते, त्याप्रमाणे ऐक्य अवस्था आणि ब्रम्हसुख ही भेदाची भाषा संपून फक्त आनंदच स्वरूपाने शिल्लक राहतो.
135-5
ऐसी द्वैताची भाष जाय । मग म्हणों जरी एकचि होय । तरी तेथ साक्षी कवणु आहे । जाणतें जे ॥135॥
अशी द्वैताची गोष्टच गेली, म्हणजे ऐक्य होते. असे जर म्हणावे, तर तसे ऐक्य जाणून, “ऐक्य आहे” असे म्हणणारा तेथे साक्षी तरी कोण आहे??
(म्हणजे एकत्वाला जाणणारा दुसरा साक्षी तरी कोण आहे? दोन गोष्टी एकच झाल्यावर कोण उरणार??)
योऽन्तःसुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः ।
स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति॥5.24॥
भावार्थ :- जो पुरुष निश्चयाने अंतरात्म्यातच सुखी आहे, जो आत्म्याचे ठिकाणीच रममाण झालेला आहे, तसेच ज्याला आत्म्यातच ज्ञान प्रकाश लाभला आहे, तो सच्चीदानंदस्वरूप परब्राम्हशी ऐक्य पावलेला योगी मोक्षरूप शांतीला प्राप्त होतो.
लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषाः ।
छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः॥5.25॥
भावार्थ :- ज्याची सर्व पापे नाहीशी झाली आहेत, ज्ञानाने ज्याचे सर्व संशय नष्ट झाले आहेत, सर्व भूतमात्र्यांचे कल्याण करण्यात जे रत झाले आहेत आणि भगवंताच्या ध्यानात ज्याचे चित्त एकाग्र झाले आहे, असे ब्रम्हवत्ते पुरुष ब्रम्हस्वरूप शांतीला प्राप्त होतात.
136-5
म्हणोनि असो हें आघवें । एथ न बोलणें काय बोलावें । ते खुणाचि पावेल स्वभावें । आत्माराम ॥136॥
म्हणून हे सर्व बोलणे असू द्या. जो प्रत्येक्ष अनुभवाचा विषय आहे, त्याबद्दल शब्दांनी काय बरे बोलावे? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जे ऐक्य पावलेले ब्राम्हनिष्ठ पुरुष आहेत, ते या सूक्ष्म विचारतील खरे वर्म सहज जणतील.
137-5
जे ऐसेनि सुखें मातले । आपणपांचि आपण गुंतले । ते मी जाणे निखळ वोतले । साम्यरसाचे ॥137॥
जे अशा सुखाने परिपूर्ण संपन्न झाले आहेत, जे आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी रममाण झाले आहेत, ते पूर्णपणे साम्यरसाचे ओतलेले पुतळे आहेत, असे मी समजतो.
138-5
ते आनंदाचे अनुकार । सुखाचे अंकुर । कीं महाबोधें विहार । केले जैसे ॥138॥
ते ब्राम्हनिष्ठ पुरुष आनंदाचे प्रतिबिंब आहेत, सुखाचे अंकुर आहेत किंवा त्यांच्या रूपाने महाबोधाने जणू क्रीडा केलेली आहे.
139-5
ते विवेकाचें गांव । की परब्रह्मीचे स्वभाव । नातरी अळंकारले अवयव । ब्रह्मविद्येचे ॥139॥
ते विवेकाचे संपूर्ण गाव आहे, आणि प्ररब्रह्मच्या ठिकाणचे स्वभाव अथवा ब्रम्हविद्येचे सुशोभित केलेले अवयव आहेत.
140-5
ते सत्त्वाचे सात्त्विक । की चैतन्याचे आंगिक । हें बहु असो एकैक । वानिसी काई ॥140॥
ते शुद्धत्वाचे (सत्वगुणातला मूर्तिमंत सात्विक पणा आहेत. ते चैत्यन्याच्या शरीराची बांधेसुद ठेवणं आहेत. यावर सद्गुरू निवृत्तीनाथ म्हणाले, हे बोलण्याचा विस्तार असू दे. ब्राम्हनिष्ठ पुरुषांची एक – एक लक्षणे किती म्हणून वर्णन करणार आहेस?
141-5
तूं संतस्तवनी रतसी । तरी कथेची से न करिसी । कीं निराळी बोल देखसी । सनागर ॥141॥
पाहा निवृत्तीनाथ पुढे काय म्हणत आहेत.
ज्ञानदेवा तू जेंव्हा संतांची स्तुती करण्यामध्ये रंगून जातोस, त्यावेळी तुला मूळ कथेची आठवण राहत नाही; कारण तू निराकार स्वरूपासंबधी प्रेमळ आणि रसाळ भाषा बोलत राहतोस.(आणि तेही चांगले बोल तू बोलतोस)
142-5
परि तो रसातिशयो मुकुळीं । मग ग्रंथार्थदीपु उजळीं । करी साधुहृदयराउळीं । मंगळ उखा ॥142॥
परंतु आता हा रसाचा विस्तार आवरता घे; आणि ग्रँथाचा अर्थरूपी दिवा प्रज्वलीत कर व सज्जनांच्या अंतःकरणरूपी मंदिरात मंगलकारक दिवसाचा प्रातःकाल कर.
143-5
ऐसा श्रीगुरुचा उवायिला । निवृत्तिदासासी पातला । मग तो म्हणे कृष्ण बोलिला । तेंचि आइका ॥143॥
हे सद्गुरू निवृत्तींनाथांचे विचार ज्ञानेश्वरांनी मानले. मग ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, ते भगवान श्रीकृष्ण काय म्हणाले, ते आता ऐका.
144-5
अर्जुना अंनत सुखाच्या डोहीं । एकसरा तळुचि घेतला जिहीं । मग स्थिराऊनी तेही । तेंचि जाहले ॥144॥
अर्जुना ! अनंत सुखाच्या डोहात उडी मारून एकदम तळ गाठला, ते तेथेच स्थिर होऊन आत्मस्वरूप बनले.
145-5
अथवा आत्मप्रकाशें चोखें । जो आपणपेंचि विश्व देखे । तो देहेंचि परब्रह्म सुखें । मानूं येईल ॥145॥
हृदयामध्ये शुद्ध आत्मप्रकाश पसरला, की संपूर्ण विश्व आपलेच स्वरूप आहे, असे जो पाहत असतो, तो मनुष्य देहासह परब्रम्ह झाला, असे सहज मानता येईल.
146-5
जें साचोकारें परम । ना तें अक्षर निःसीम । जिये गांवींचे निष्काम । अधिकारिये ॥146॥
जे खरोखरच परममश्रेष्ठ अथवा अविनाशी व अमर्याद असे ब्रम्हसुख, त्याचे अधिकार निरिच्छ होतात,
147-5
जे महर्षीं वाढले । विरक्तां भागा फिटलें । जे निःसंशया पिकलें । निरंतर ॥147॥
जे थोर ऋषिकरिता काढून ठेवले आहे किंवा विरक्तांच्या वाट्याला आले व सदैव संशयरहित पुरुषास सर्व काळ टिकले आहे.
कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् ।
अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम्॥5.26॥
भावार्थ :- जे काम- क्रोधानीं रहित आहेत, ज्यांनी चित् स्वाधीन केले आहे, ज्यांनी परमात्म्याला जाणले आहे, असे योगी पुरुष देह असतानाही जीवमुक्त असतात आणि देह ठेवल्यानंतरही परब्राम्हशी एकरूप असतात.
148-5
जिहीं विषयांपासोनि हिरतलें । चित्त आपुलें आपण जिंतिले । ते निश्चित जेथ सुतले । चेतीचिना ॥148॥
ज्याने आपले चित्त विषयापासून हिराहून घेतले आहे आणि आपल्या स्वाधीन करून ठेवले आहे, असे पुरुष निश्चयाने त्या स्वरूपात लीन झाले असता पुनः पूर्ववृत्तीवर येत नाहीत.
149-5
तें परब्रह्म निर्वाण । जें आत्मविदांचें कारण । तेचि ते पुरुष जाण । पंडुकुमरा ॥149॥
हे पांडुकुमरा ! आत्मज्ञानाचे फल असे ते मोक्षरूप परब्रम्ह आहे. आत्मज्ञानी पुरुष ते परब्रम्हच होतात, असे तू जाण.
150-5
ते ऐसे कैसेनि जाहले । जे देहींचि ब्रह्मत्वा आले । हें ही पुससी तरी भलें । संक्षेपे सांगो ॥150॥
हे पुरुष देह असताना ब्रहत्वास कशाने पावेल, हे जर विचारत असशील, तर उत्तमच आहे. तुला ती साधने संक्षेपाने सांगतो.
स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रवोः ।
प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ॥5.27॥
यतेद्नियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः ।
विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः॥5.28॥
भावार्थ :- बाह्य शब्दादी विषयांना दूर करून व नेत्रांची दृष्टी दोन्ही भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून नाकातून वाहणाऱ्या प्राण व अपान वायुना सम करून ज्याने इंद्रिये, मन यांना जिंकले आहे व ज्याच्या इच्छा, भय आणि क्रोध नष्ट झालेले आहेत, तो मोक्षपरायन मुनी सदा मुक्तच आहे.27॥28॥
