सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ५ वा ओवी ५१ ते ७५ पहा.

, ,

51-5
देखे बुध्दीची भाष नेणिजे । मनाचा अंकुर नुदैजे । ऐसा व्यापारु तो बोलिजे । शारीरु गा ॥51॥
ज्याची बुद्धी हे चांगले, हे वाईट हि द्वैतभावना जाणत नाही, जेथे मनाला अंकुर उत्पन्न होत नाही, असे द्वैतभावणारहित व इच्छारहित कर्माला कायिक व्यवहार म्हणतात.
52-5
हेंच मराठे परियेशीं । तरी बाळकाची चेष्टा जैशी । योगिये कर्मे करिती तैशीं । केवळा तनू ॥52॥
हेच उदाहरण देऊन मराठी भाषेतून सांगत आहे. लहान बाळ हे ज्याप्रमाणे द्वैतभावणारहित व इच्छा रहित कर्म करते, त्याप्रमाणे योगी शरीराने कर्म करीत असतात.
53-5
मग पांचभौतिक संचलें । जेव्हां शरीर असे निदेलें । तेथ मनचि राहाटें एकलें । स्वप्नीं जेवीं ॥53॥
पंच महाभूतांनी बनलेले हे शरीर ज्यावेळी झोपी गेलेले असते, त्या वेळी एकटे मनच स्वप्नात भटकत असते.
54-5
नवल ऐकें धनुर्धरा । कैसा वासनेचा संसारा । देहा होऊं नेदी उजगरा । परि सुखदुःखें भोगी ॥54॥
हे धनुर्धरा ! एक आश्चर्य पाहा. जागृत अवस्थेत या वासनेचा केवढा विस्तार आहे ! ही वासना देहाला जागे होऊ देत नाही; परंतु सुख दुःखाचा भोग भोगावयास लावते.
55-5
इंद्रियांचां गांवीं नेणिजे । ऐसा व्यापारु जो निपजे । तो केवळु गा म्हणिजे । मानसाचा ॥55॥
इंद्रियांना ज्याची माहितीदेखील नसते, असे जे कर्म निर्माण होते, त्यास मानसिक कर्म म्हणतात.


56-5
योगिये तोही करिती । परि कर्में तेणें न बंधिजती । जे सांडिली आहे संगती । अंहभावाची ॥56॥
अंतःकरणाने योगी असणारे मानस कर्म करतात; परंतु ते कर्मानी बध्द होत नाहीत. कारण त्यांनी अहंकाराची संगती सोडून दिलेली असते.
57-5
आतां जाहालिया भ्रमहत । जैसें पिशाचाचें चित्त । मग इंद्रियांचे चेष्टित । विकळु दिसे ॥57॥
एखाद्या मनुष्याचे चित्त भ्रमिष्ट झालेले असते किंवा पिशाच्याची बाधा झाल्यावर जसे चित्त असते, तसे त्याचे सर्व व्यवहार विसंगत दिसतात.
58-5
स्वरूप तरी देखे । आळविलें आइके । शब्दु बोले मुखें । परि ज्ञान नाही ॥58॥
त्यास समोरचे रूप दिसत असते, कोणी हाक मारली तर ऐकूदेखील येते, तो स्वतः बोलतही असतो; परंतु या सर्व कर्माची त्याला जाणीव नसते.
59-5
हें असो काजेंविण । जें जें काही कारण । तें केवळ कर्म जाण । इंद्रियांचे ॥59॥
असो, त्यातील सूत्र असे आहे की, प्रयोजनावाचून जे जे काही केवळ विषयांशी संयोग पावून कर्म घडते, ते केवळ इंद्रियांचे कर्म जाणावे.असे तू समज.
60-5
मग सर्वत्र जें जाणतें । ते बुद्धीचें कर्म निरूतें । वोळख अर्जुनातें । म्हणे हरि ॥60॥
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, सर्व विषयांचे जे ज्ञान होते, ते केवळ बुद्धीचे कर्म आहे, असे तू जाण.


61-5
ते बुद्धी धुरे करुनी । कर्म करिती चित्त देऊनी । परि ते नैष्कम्यापासुनी । मुक्त दिसती ॥61॥
जे कर्मयोगी बुद्धीला पुढे करून चित्त देऊन कर्म करतात, नैष्कम्यर्य अवस्थेला गेलेल्या मुक्त पुरुषांपेक्षाही अधिक मुक्त दिसतात.
62-5
जें बुद्धीचिये ठावूनि देही । तयां अंहकाराची सेचि नाहीं । म्हणोनि कर्म करितां पाही । चोखाळले ॥62॥
कारण त्यांच्यामध्ये बुद्धिपासून देहापर्यंत कोठेही मीपणाच्या अहंकाराचे स्मरण नसते. म्हणून कर्म करीत असताही ते शुद्ध असतात.
63-5
अगा करितेनवीण कर्म । तेंचि तें नैष्कर्म्य । हें जाणती सुवर्म । गुरुगम्य जें ॥63॥
अर्जुना ! कर्तेपणाचा अभिमान त्यागून जे कर्म केले जाते, तेच खरे नैशकर्म्य होय. हे सतगुरुकडून कळणारे खरे वर्म हे ज्ञानी पुरुष जाणत असतात.
64-5
आतां शांतरसाचें भरितें । सांडीत आहे पात्रातें । जें बोलणें बोलापरौतें । बोलवलें ॥64॥
आता या शांतरसाचे बोलणे आपल्या पात्राची मर्यादा सोडून उचंबळून येत आहे; कारण शांत रसाने बोलण्याच्या पलीकडे असलेले विचार माझ्याकडून बोलले जात आहेत.
65-5
एथ इंद्रियांचा पांगु । जया फिटला आहे चांगु । तयासीचि आथी लागु । परिसावया ॥65॥
ज्याचा इंद्रियासंबंधीचा पराधीनपणा उत्तमप्रकारे नाहीसा झाला आहे, त्यालाच हे अनुभवाचे विचार ऐकण्याचा अधिकार आहे.


66-5
हा असो अतिप्रसंगु । न संडी पां कथालागु । होईल श्लोकसंगति भंगु । म्हणोनियां ॥66॥
श्रोते म्हणाले, आता हे विषयांतर पुरे करा. कथेचा मूळ संबध सोडू नका; कारण श्रोत्यांच्या संगतीचा भंग होऊन जाईल.
67-5
जें मना आकळितां कुवाडें । घाघुसितां बुद्धी नातुडे । तें दैवाचेनि सुरवाडें । सांगवलें तुज ॥67॥
जे मनाला आकलन करण्यास अत्यन्त कठीण आहे, बुद्धीने कितीही विचार केला, तरी सापडत नाही, ते तुला भाग्याच्या अनुकूलतेमुळे सांगता आले.
68-5
जें शब्दातीत स्वभावें । तें बोलींचि जरी फावे । तरी आणिकें काय करावें । सांगे कथा ॥68॥
जे स्वभावतःच शब्दांच्या पलीकडे आहे, ते शब्दामध्ये जर सापडले, तर इतर आणखीन काय पाहिजे? या करिता तुम्ही प्रस्तुत कथा सांगावी.
69-5
हा आर्तिविशेषु श्रोतयांचा । जाणोनि दास निवृतीचा । म्हणे संवादु दोघांचा । परिसोनि परिसा ॥69॥
ही श्रोत्यांची उत्कट अशी इच्छा जाणून निवृत्तींनाथांचे दास श्रीज्ञानेश्वर माऊली म्हणाले, तुम्ही एवढा वेळ भगवान श्रीकृष्ण व अर्जुनाचा सुखसंवाद ऐकलं आहे, पुढे तोच ऐका.
70-5
मग कृष्ण म्हणे पार्थातें । आतां प्राप्ताचें चिन्ह पुरतें । सांगेन तुज निरुतें । चित्त देई ॥70॥
मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, कृतार्थ अवस्था प्राप्त झालेल्या पुरुषाचे लक्षण सांगतो, तरी एकाग्र चित्ताने ऐकावे.
युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोप्ति नैष्ठीकीम् ।
अयुक्तः कामकारेण फले सक्तो निवध्यते ॥5.12॥
भावार्थ :- निष्काम कर्मयोगी माणूस कर्मफल ईश्वराला अर्पण करून अखंड शांती अनुभवतो (प्राप्त करतो) आणि सकामी पुरुष मात्र फलाच्या ठिकाणी आसक्त होऊन वासनेने बांधला जातो.


71-5
तरी आत्मयोगें आथिला । जो कर्मफळाशीं विटला । तो घर रिघोनि वरिला । शांति जगीं ॥71॥
तरी या जगात जो आत्मज्ञानाने जो संपन्न झाला आहे, ज्याला कर्मफलाचा वीट आला आहे, त्याच्या घरात येऊन शांती त्याला वरते.
72-5
येरु कर्मबधें किरीटी । अभिलाषाचिया गांठीं । कळासला खुंटी । फळभोगाचां ॥72॥
यापेक्षा दुसरा जो कर्मे करणारा आहे, तो इच्छेच्या दाव्याने फळाच्या खुंटयाला बांधला कर्मबंधाने बांधला जातो.
सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी ।
नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन् न कारयन् ॥5.13॥
भावार्थ :- ज्याची इंद्रिय आणि मन वश झालेली आहेत, असा देहधारी आत्मज्ञानी पुरुष नऊ दारे असलेल्या या शरीरात संपूर्ण कर्मचा विवेकी मनाने त्याग करून, निःसंदेह बनून, न करता किंवा करविता सत-चित्-आनंदरूप परमेश्वराशी एकरूप होऊन राहतो.
73-5
जैसा फळाचिया हांवे । तैसें कर्म करि आघवें । मग न कीजेचि येणें भावें । उपेक्षी जो ॥73॥
फलाच्या इच्छेप्रमाणे कर्माचे आचरण करणाऱ्याप्रमाणे तोही सर्व कर्मे करतो; परंतु त्या कर्माचा मी कर्ता नाही, हे जाणून तो त्याकर्माची उपेक्षा करतो.
74-5
तो जयाकडे वास पाहे । तेउती सुखाची सृष्टी होये । तो म्हणे तेथ राहे । महाबोधु ॥74॥
तो ज्या मार्गाकडे बघेल, तेथे सृष्टीतील सत्य-शिव-सुंदरतेचे त्याला दर्शन होऊ लागते. तो म्हणेल, तेथे ब्रम्हज्ञान प्रकट होत असते.
75-5
नवद्वारें देहीं । तो असतुचि परि नाहीं । करितुचि न करी कांही । फलत्यागी ॥75॥
तो नवद्वारांच्या देहात राहूनदेखील त्याचे देहाशी तादात्म्य नसते. तो सर्व कर्मे करतो; परंतु त्याला फलाची इच्छा नसल्यामुळे तो काहीच करत नाही.
न कर्तृत्वत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः ।
न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते॥5.14॥
भावार्थ :- परमात्मा भूतमात्रांचे कर्तेपण निर्माण करत नाही, तो कर्मही उत्पन्न करत नाही व त्यांचा कर्मफलाशी संयोगही उत्पन्न करत नाही. तो स्वरूपतः काहीच करत नसला, तरी त्याचा स्वभाव म्हणजे उपाधीभूत असलेली प्रकृतीच सर्व कार्य करत असते.

, ,

Leave a Reply