1101-18
मग तेंही अव्यक्त । बोध वाढतां झिजत । पुरलां बोधीं समस्त । बुडोनि जाय ॥1101॥
मग ते आज्ञानही जशी जशी बोधाची स्पष्टता व दृढत होईल तसे क्षीण होत जाऊन अखेर पूर्णबोधकाळीं नाहीसे होते.1
1102-18
जैसी भोजनाच्या व्यापारीं । क्षुधा जिरत जाय अवधारीं । मग तृप्तीच्या अवसरीं । नाहींच होय ॥1102॥
भोजन करू लागले असतां, प्रत्येक ग्रासाबरोबर क्षुधा जशी हरत जाते व अखेर तृप्ति झाल्यावर नाहीशीच होते 2
1103-18
नाना चालीचिया वाढी । वाट होत जाय थोडी । मग पातला ठायीं बुडी । देऊनि निमे ॥1103॥
किंवा, आपण जितकी मजल चालावी तितकी वाट कमी कमी होऊन अखेर प्राप्तस्थानावर जशी मुळींच खुंटते. 3
1104-18
कां जागृति जंव जंव उद्दीपे । तंव तंव निद्रा हारपे । मग जागीनलिया स्वरूपें । नाहींच होय ॥1104॥
किंवा जसा जसा जागा होत जाईल, तसे तसें निद्रेचे आवरण कमी होते व पूर्ण जागृति आल्यावर ती निद्रा मुळींच जाते. 4
1105-18
हें ना आपुलें पूर्णत्व भेटें । जेथ चंद्रासीं वाढी खुंटे । तेथ शुक्लपक्षु आटे । निःशेषु जैसा ॥1105॥
हे दृष्टांत राहूद्या; पौणिमेला चंद्र पूर्णकलायुक्त झाला म्हणजे त्याची वाढ संपते व तेथे शुक्लपक्षही जसा निःशेष संपतो. 5
1106-18
तैसा बोध्यजात गिळितु । बोधु बोधें ये मज आंतु । मिसळला तेथ साद्यंतु । अबोधु गेला ॥1106॥
त्याप्रमाणे, सकलदश्याचा (सकलदृश्याचा) ग्रास करणारे ज्ञान, पुढील अज्ञानकार्यं दृश्य नाहीसे झाल्यामुळे जेव्हां, ज्ञानस्वरूप जो मी, त्या मजशी ऐक्य पावत तेव्हां अबोध किंवा अज्ञान समूळ नाहीसे होते. 6
1107-18
तेव्हां कल्पांताचिये वेळे । नदी सिंधूचें पेंडवळें । मोडूनि भरलें जळें । आब्रह्म जैसें ॥1107॥
कल्पांतकाळच्या जलमय स्थितींत, समुद्र, नदी, नाले वगैरे भेद जसा समूळ नाहीसा होऊन आब्रह्मस्तंबपर्यंत जसे जल मात्र असतें. 7
1108-18
नाना गेलिया घट मठ । आकाश ठाके एकवट । कां जळोनि काष्ठें काष्ठ । वन्हीचि होय ॥1108॥
किंवा घटमठादि उपाधींच नाश झाल्यावर जसे आकाश एकरूपच असतें, अथवा काष्ठे जाळून टाकून अग्नि जसा स्वस्वरूपांत लीन होतो. 8
1109-18
नातरी लेणियांचे ठसे । आटोनि गेलिया मुसे । नामरूप भेदें जैसें । सांडिजे सोनें ॥1109॥
किंवा अलंकार मुशीत आटल्यावर त्यांचे नामरूपादि भेद सोन्याला सोडून जातात (व आपण सुवर्णरूपाने उरतात.) 9
1110-18
हेंही असो चेइलया । तें स्वप्न नाहीं जालया । मग आपणचि आपणयां । उरिजे जैसें ॥1110॥
हेंही असो. मनुष्य जागा होऊन पडलेले स्वप्न नाहीसे झाल्यावर जसा केवळ आपण एकटाच असतो. 1110
1111-18
तैसी मी एकवांचूनि कांहीं । तया तयाहीसकट नाहीं । हे चौथी भक्ति पाहीं । माझी तो लाहे ॥1111॥
याप्रमाणे तू व मी विवर्जित असा जो मी शुद्ध परमात्मा त्यावाचून, आपणासकट अन्यत् कांहीही नाही अशी शास्त्रकारानीं वर्णिलेली चौथी भक्ति (सर्वं खल्विदं ब्रह्म) त्याला प्राप्त होते. 11
1112-18
येर आर्तु जिज्ञासु अर्थार्थी । हे भजती जिये पंथीं । ते तिन्ही पावोनी चौथी । म्हणिपत आहे ॥1112॥
एऱ्हवी ह्या परमात्मैक्यज्ञानाला आम्ही ‘चौथी भक्ति ‘ असे जे औपचारिकरीत्या म्हटले आहे, ते आर्त, जिज्ञासु व द्रव्यादि प्राप्त्यर्थं जगांत चालू असलेल्या तीन भक्तींच्या अपेक्षेनेच होय. 12
1113-18
येऱ्हवीं तिजी ना चौथी । हे पहिली ना सरती । पैं माझिये सहजस्थिती । भक्ति नाम ॥1113॥
वस्तुतः ह्या स्थितीला (भक्तीला) तिसरी, चौथी, पहिली किवा अखेरची असा क्रम लावणे शक्य नसून माझी जी सहजस्वरूपस्थिति तिलाच भक्ति असा आम्हीं उपचार केला आहे. 13
1114-18
जें नेणणें माझें प्रकाशूनि । अन्यथात्वें मातें दाऊनि । सर्वही सर्वीं भजौनि । बुझावीतसे जे ॥1114॥
प्रथम मजविषयक अज्ञानालाही जें प्रकाशित करून नंतर माझे अयथार्थ (विपरीत) दर्शन करवून, आपापल्या कल्पनेप्रमाणे सर्वांकडून माझी भक्ति करवून जें सर्वांची समजूत पाडते. 14
1115-18
जो जेथ जैसें पाहों बैसे । तया तेथ तैसेंचि असे । हें उजियेडें कां दिसे । अखंडें जेणें ॥1115॥
मग मत्स्वरूपविषयक अज्ञानकालीं जो पुरूष मला जेथे जसा पाहील, तसा (त्याच्या कल्पनेप्रमाणे) मी तेथे अनिर्वचनीय स्वरूपाने असतो; (दिसतो) पण ह्या सर्व व्यवहाराला मूल आधार माझे जे अखंड रूप तेच होय. 15
1116-18
स्वप्नाचें दिसणें न दिसणें । जैसें आपलेनि असलेपणें । विश्वाचें आहे नाहीं जेणें । प्रकाशें तैसें ॥1116॥
स्वप्न दिसो अगर न दिसो; ते पडलें अगर पडलें नाहीं असे म्हणण्याच्या दोन्हीं व्यवहारांना जसे आपलें अस्तित्व अबाधित मानावें लागते, तसा विश्वाचा उदय व अस्त हे दोन्ही ज्याने प्रकाशित होतात. 16
1117-18
ऐसा हा सहज माझा । प्रकाशु जो कपिध्वजा । तो भक्ति या वोजा । बोलिजे गा ॥1117॥
अर्जुना, असा जो माझा सहजस्वरूप प्रकाश तो बाणणें ही खरी भक्ति होय. 17
1118-18
म्हणौनि आर्ताच्या ठायीं । हे आर्ति होऊनि पाहीं । अपेक्षणीय जें कांहीं । तें मीचि केला ॥1118॥
म्हणून आर्त भक्तांच्या उत्कटभक्तीचा जो इच्छित विषय तोही मीच असतों अथवा बनतों. 18
1119-18
जिज्ञासुपुढां वीरेशा । हेचि होऊनि जिज्ञासा । मी कां जिज्ञास्यु ऐसा । दाखविला ॥1119॥
त्याच प्रमाणे अर्जुन, जिज्ञासूची भक्ति जिज्ञासारूपाने मलाच जिज्ञास्य (जाणण्याचा विषय) करिते. 19
1120-18
हेंचि होऊनि अर्थना । मीचि माझ्या अर्थीं अर्जुना । करूनि अर्थाभिधाना । आणी मातें ॥1120॥
द्रव्यार्थी जनांची भक्तीही मलाच प्राप्तव्यविषय करून मजविषयींचीच याचना करिते. 1120
1121-18
एवं घेऊनि अज्ञानातें । माझी भक्ति जे हे वर्ते । ते दावी मज द्रष्टयातें । दृश्य करूनि ॥1121॥
याप्रमाणे अज्ञानावस्थीत केली जाणारी जी ही माझी भक्ति, ती दृङ्मात्र (ज्ञानस्वरूप) जो मी, त्या मला ज्ञेयत्वाला आणिते.21
1122-18
येथें मुखचि दिसे मुखें । या बोला कांहीं न चुके । तरी दुजेपण हें लटिकें । आरिसा करी ॥1122॥
मुखालाच मुखाचे दर्शन होते असे म्हणण्यांत कांहीही चूक नाही; पण (ही अशक्य गोष्ट) आरशानें मुखावर आणिलेल्या लटक्या दुजेपणामुळे संभवते. 22
1123-18
दिठी चंद्रचि घे साचें । परी येतुलें हें तिमिराचें । जे एकचि असे तयाचे । दोनी दावी ॥1123॥
चंद्र हाच दृष्टीचा खरा विषय असतो, पण तो एक असतां दोन आहेत असे जे वाटते तो तिच्यांतील ‘ तिमिर’ दोषाचा प्रभाव होय. 23
1124-18
तैसा सर्वत्र मीचि मियां । घेपतसें भक्ति इया । परी दृश्यत्व हें वायां । अज्ञानवशें ॥1124॥
त्याप्रमाणे ह्या तिन्ही भक्तिद्वारां (वस्तुतः) मीच माझी प्राप्ति करून घेत असतों; परंतु, अज्ञान उपाधीमुळे मजवर लटका प्राप्यप्रापकभाव आला आहे. 24
1125-18
तें अज्ञान आतां फिटलें । माझें दृष्टृत्व मज भेटलें । निजबिंबीं एकवटलें । प्रतिबिंब जैसें ॥1125॥
अर्जुना, चौथा भक्त (माझा आत्मा) जो तू, त्या तुझ्या दर्शनाने, सर्व अज्ञानाची वार्ता संपून, प्रतिबिंबाने आपल्या बिंबापाशीं जसें ऐक्य पावावें (अथवा एकरूपते असावें) त्याप्रमाणे, माझे द्रष्टस्वरूप मला आज भेटलें 25
Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण