सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा ओवी ५१ ते ७५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

51-7
ऐसा नियतु कां कंदर्पु । जो भूतां यां बीजरूपु । तो मी म्हणे बापु । योगियांचा ॥51॥
योग्यांचे जनक श्रीकृष्ण म्हणतात :- अशा नियमाने राहाणारा व प्राणिमात्रास बीजभूत असा काम, तो मी आहे.
52-7
हें एकैक किती सांगावें । आतां वस्तुजातचि आघवें । मजपासूनि जाणावें । विकरलें असे ॥52॥
हे एकेक तुला कोठवर सांगावे! तर वस्तुमात्र म्हणून जे काही आहे, ते सर्व माझ्यापासून विस्तार पावले आहे असे समज.
ये चैव सात्त्विका भावा । राजसास्तामसाश्च ये ।
मत्त एवेतितान्विद्धि न त्वहं तेषु ते मयि॥7.12॥

53-7
जे सात्त्विक हन भाव । कां रजतमादि सर्व । ते ममरूपसंभव । वोळख तूं॥53॥
जे सात्विक किंवा रजतमादि भाव आहेत, ते सर्व माझ्या रूपापासुनच उत्पन्न झाले आहेत हे ओळखुन ठेव.
54-7
हे जाले तरी माझांठायीं । परी ययांमाजीं मी नाही । जैसी स्वप्नींचां डोहीं । जागृती न बुडे॥54॥
ते जरी माझ्यापासून झाले आहेत, तरी मी त्यांच्यात नाही.ज्याप्रमाणे स्वप्नीच्या डोहांत जागृती बुडत नाही;
55-7
नातरी रसाचीचि सुघट । जैसी बीजकणिका तरी घनवट । परी तियेस्तव होय काष्ठ । अंकुरद्वारें॥55॥
किंवा ज्याप्रमाणे बी (दाणा) रसाने पुर्ण भरलेलें असते; परंतु त्याचेपासुन अंकुर फुटून लांकूड बनल्यावर,


56-7
मग तया काष्ठाचां ठायीं । सांग पां बीजपण असे काई । तैसा मी विकारीं नाहीं । जरी विकारला दिसें॥56॥
मग त्या लांकडाचे ठिकाणी बिज असते का सांग बरे? त्याचप्रमाणे सात्विकादि सर्व भाव जरी माझ्याचपासून उत्पन्न झाले आहेत, तरी त्यामध्ये मी नाही.
57-7
पैं गगनीं उपजे आभाळ । परी तेथ गगन नाहीं केवळ । अथवा आभाळीं होय सलिल । तेथ अभ्र नाहीं॥57॥
खरोखर, आकाशांत जे ढग उत्पन्न होतात, त्यांत शुद्ध आकाश नसते; किंवा ढगांत जे पाणी असते, त्या पाण्यांत ढग नसतात;
58-7
मग तया उदकाचेनि आवेशें । प्रगटलें तेज जें लखलखीत दिसे । तिये विजूमाजीं असे । सलिल कायी ॥58 ॥
नंतर त्या पाण्याच्या घर्षणाने उत्पन्न होणारे तेज (वीज) जे चकचकीत दिसते, त्या वीजेमध्ये पाणी असते काय?
59-7
सांगें अग्नीस्तव धूम होये । तिये धूमीं काय अग्नी आहे । तैसा विकारू हा मी नोहें । जरीं विकारला असें ॥59 ॥
अग्नीपासुन जो धुर उत्पन्न होतो, त्या धुरांत अग्नी आहे का सांग बरे? त्याचप्रमाणे, हे भाव जरी माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत, तरी ते म्हणजे मी नव्हे.
त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभि: सर्वमिदं जगत् ।
मोहितं नाभिजानाति मामेभ्य: परमव्ययम् ॥7.13॥

60-7
परी उदकीं जाली बाबुळी । ते उदकातें जैसी झांकोळी । कां वायांचि आभाळीं । आकाश लोपे ॥60॥
तथापि, पाण्यापासूनच उत्पन्न झालेले गोंडाळ पाण्याला झांकून टाकते, किंवा ढगाच्या योगानें आकाश व्यर्थ लोपले जाते;


61-7
हां गा स्वप्न हे लटिकें म्हणों ये । परी निद्रावशें बाणलें होये । तंव आठव काय देत आहे । आपणपेयां ॥61॥
असे पहा की, स्वप्न हे खोटे आहे, परंतु निद्रेच्या योगानें ते खरे भासते, त्या वेळेस ते आपली आपल्याला आठवण होऊं देते का?
62-7
हें असो डोळ्यांचें । डोळांचि पडळ रचे । तेणें देखणेंपण डोळ्यांचें । न गिळिजे कायि ॥62॥
अथवा डोळ्यांतील पाण्याने उत्पन्न झालेला वडस दृष्टि बंद करीत नाही का?
63-7
तैसी हे माझीच बिंबली । त्रिगुणात्मक साउली । कीं मजचि आड वोडवली । जवनिका जैसी ॥63॥
त्याचप्रमाणे, माझ्याच ठिकाणी प्रतिबिंबित झालेली सत्व, रज व तम या गुणांनी युक्त अशी माझी सावली (माया) पडद्याप्रमाणे माझ्याच स्वरूपाच्या आड येते.
64-7
म्हणऊनि भूतें मातें नेणती । माझींच परी मी नव्हती । जैसीं जळींची जळीं न विरती । मुक्ताफळें ॥64॥
म्हणून प्राणी मला जाणत नाहीत, आणि माझ्याचपासून उत्पन्न झालेले असुन ते मद्रूप होत नाहीत. ज्याप्रमाणे पाण्यापासूनच उत्पन्न झालेली मोत्ये पाण्यांत मिसळत नाहीत;
65-7
पैं पृथ्वीयेचा घटु कीजे । सवेंचि पृथ्वीसि मिळे जरी मिळविजे । ए-हवीं तोचि अग्निसंगें सिजे । तरी वेगळा होय ॥65॥
अथवा मातीचा घट करुन तो (कच्चेपणी) तसाच मातीस मिळविला असता मिळतो, परंतु तोच विस्तवांत भाजल्यावर निराळा बनतो,


66-7
तैसें भूतजात सर्व । हे माझेचि कीर अवयव । परी मायायोगें जीव- । दशे आले ॥66॥
त्याचप्रमाणे, सर्व भूतजात हे माझेच अवयव आहेत; परंतु मायेच्या योगानें जीवपणाला पावले,
67-7
म्हणोनि माझेचि मी नव्हती । माझेचि मज नोळखती । अहंममताभ्रांतीं । विषयांध झाले ॥67॥
म्हणून माझ्यापासून उत्पन्न झाले असुन मद्रूप होत नाहीत, माझेच असुन मला ओळखीत नाहीत, व ” मी ” आणि ” माझे ” या भ्रांतीने विषयांध झालेले आहेत.
दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया ।
मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥7.14॥
न मां दुष्कृतिनो मूढा: प्रपद्यन्ते नराधमा: ।
माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिता: ॥7.15॥

68-7
आतां महदादि हे माझी माया । उतरोनियां धनंजया । मी होइजे हें आया । कैसेनि ये ॥68॥
तेव्हा आता; धनंजया, ही महत्तत्वादि माझी माया तरुन मद्रूप व्हावे, ह्या गोष्टीचा अनुभव कसा यावा
69-7
जिये ब्रह्माचळाचां आधाडां । पहिलिया संकल्पजळाचा उभाडा । सवेंचि महाभूतांचा बुडबडा । साना आला ॥69॥
कारण) जी मायानदी निर्गुण ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यांत असतांनाच प्रथम तिच्या ठिकाणी संकल्परूप जलाचा उगम होऊन पंचमहाभूतांचा लहानसा बुडबुडा आला
70-7
जे सृष्टीविस्ताराचेनि वोघें । चढत काळकलनेचेनि वेगें । प्रवृत्ति निवृत्तीचीं तुंगें । तटें सांडी ॥70॥
जी सृष्टीच्या विस्ताररूपी ओघाने व कालगतीच्या वेगाने कर्म व मोक्ष यांचे उंच काठ ओलांडुन पुढे चालली आहे;


71-7
जे गुणघनाचेनि वृष्टिभरें । भरली मोहाचेनि महापुरें । घेऊनि जात नगरें । यमनियमांची ॥71॥
जी सत्त्वादि-गुणरूपी मेघांच्या वृष्टिने भरुन भ्रांतिरूप महापुराने यमनियमरूपी शहरे वाहून नेत आहे.
72-7
जे द्वेषाचां आवर्तीं दाटत । मत्सराचे वळसे पडत । माजीं प्रमदादि तळपत । महामीन ॥72॥
जिच्यांत द्वेषरूपी भोवरें असुन जी मत्सररूप वळणाने वहात आहे; जिच्यांत उन्मत्तपणा इत्यादि मोठाले मासे तळपत आहेत;
73-7
जेथ प्रपंचाचीं वळणें । कर्माकर्मांचीं बोभाणें । वरी तरताती वोसाणें । सुखदु:खांचीं ॥73॥
जिच्यांत प्रपंचरूपी भेदांची वळणे असुन कर्माकर्माच्या पुरामध्ये सुखदुःखरुपी केरकचरा तरंगत येऊन कडेला लागत आहे;
74-7
रतीचिया बेटा । आदळती कामाचिया लाटा । जेथ जीवफेन संघाटा । सैंघ दिसे ॥74॥
जीमधील विषयसुखरुपी बेटावर कामरुपी लाटा आदळून त्या ठिकाणी जीवसमुदायरुपी फेंस पुष्कळ दिसत आहे;
75-7
अहंकाराचिया चळिया । वरी मदत्रयाचिया उकळिया । जेथ विषयोर्मींचिया आकळिया । उल्लाळे घेती ॥75॥
अहंकार रुपी ओघाने व विद्या, धन आणि सामर्थ्य या तीन मदांच्या उकळ्यांनी ज्या ठिकाणी विषयतरंगांच्या लाटा उसळत आहेत,

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading