सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी ४५१ ते ४७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , ,

451-6
जे विवेकग्रामींचां मुळीं । बैसले आहाति नित्य फळीं । तया योगियांचिया कुळीं । जन्म पावे ॥451॥
आणि जे विचार वृक्षाच्या मुळापाशी बसून ब्रह्मरूप नित्य फळांचे सेवन करतात, अशा योग्यांच्या कुलांत तो (योगभ्रष्ट)पुरुष जन्म घेतो.
452-6
मोटकी देहाकृती उमटे । आणि निजज्ञानाची पाहांट फुटे । सूर्यापुढें प्रगटे । प्रकाशु जैसा ॥452॥
जन्म घेतल्यावर लहान वयांतच त्याच्या ठिकाणी आत्मज्ञानाचा उजेड पडतो; व ज्याप्रमाणे सुर्य उगवण्याच्या अगोदर चहुंकडे प्रभा फांकते,
453-6
तैसी दशेची वाट न पहातां । वयसेचिया गांवा न येतां । बाळपणींच सर्वज्ञता । वरी तयातें॥453॥
त्याचप्रमाणे, पौढ वयाची वाट न पाहतां ज्ञान हे त्याला बालपणीच वरते.
454-6
तिये सिद्धप्रज्ञेचेनि लाभें । मनचि सारस्वतें दुभे । मग सकळ शास्त्रे स्वयंभें । निघती मुखें ॥454॥
पूर्वजन्मी सिद्ध झालेल्या बुद्धीच्या योगाने सर्व विद्या त्याला प्राप्त होतात व त्याच्या मुखातुन सर्व शास्त्रे स्वयमेव निघूं लागतात.
455-6
ऐसें जे जन्म । जयालागीं देव सकाम । स्वर्गीं ठेले जप होम । करिती सदा॥455॥
असे जे उत्तम कुली जन्म, ते प्राप्त होण्याकरिंता स्वर्गवासी देव देखील मनांत हेतु धरुन नेहमी जप, होम करीत असतात.

456-6
अमरीं भाट होईजे । मग मृत्युलोकातें वानिजे । ऐसें जन्म पार्था गा जे । तें तो पावे॥456॥
पार्था देवांनी स्तुतिपाठक होऊन मृत्युलोकाचे वर्णन करावे असे जे उत्तम कुली जन्म, ते तो योगभ्रष्ट पुरुष पावतो.
पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः ।
जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मातिवर्तते॥6.44॥

457-6
आणि मागील जे सद्बुद्धि । जेथ जीवित्वा जाहाली होती अवधि । मग तेचि पुढती निरवधि । नवी लाहे॥457॥
आणि ज्या पूर्वजन्मांत आयुष्याचा शेवट झाला होता, त्या वेळची सद्बुद्धि त्याला पुन्हा प्राप्त होते.
458-6
तेथ सदैवा आणि पायाळा । वरि दिव्यांजन होय डोळां । मग देखे जैसीं अवलीळा । पाताळधनें ॥458॥
त्या समयी, दैववान, पायाळू आणखी वर डोळ्यांत दिव्यांजन घातलेल्या पुरुषास जसे भुमीतील धन सहज दृष्टीस पडते,
459-6
तैसें दुर्भेद जे अभिप्राय । कां गुरुगम्य हन ठाय । तेथ सौरसेंवीण जाय । बुद्धी तयाची ॥459॥
त्याप्रमाणे, गुरूमुखाशिवाय न कळणाऱ्या कठिण अशा अभिप्रायांच्या ठिकाणी त्याची बुद्धि अनायासे जाऊन पोहोचते.
460-6
बळियें इंद्रियें येती मना । मन एकवटे पवना । पवन सहजें गगना । मिळोंचि लागे ॥460॥
इंद्रिये ही आपण होऊन मनाच्या आधीन होतात, मन प्राणवायुंत ऐक्य पावते व तो प्राणवायु चिदाकाशांत मिळतो.

461-6
ऐसें नेणों काय आपैसें । तयातेंचि कीजे अभ्यासें । समाधी घर पुसे । मानसाचें ॥461॥
आणखी काय गोष्टी असतील त्या असोत, परंतु योगाभ्यासही त्याला आपोआप प्राप्त होतो, आणि समाधिही त्याच्या मनाचे घर विचारीत येते.
462-6
जाणिजे योगपीठीचा भैरवु । काय आरंभरंभेचा गौरवु । की वैराग्यसिद्धीचा अनुभवु । रुपा आला ॥462॥
असे वाटते की, हा पुरुष योगस्थानाचा शंकर किंवा योग्याच्या आरंभीचे वैभवच अथवा वैराग्यरूप सिद्धीचा मुर्तिमंत अनुभवच आहे
463-6
हा संसारु उमाणितें माप । का अष्टांगसामग्रीचें द्वीप । जैसे परिमळेंचि धरिजे रुप । चंदनाचें ॥463॥
हे संसार मोजण्याचे मापच, अथवा अष्टांगयोगसाहित्याचे बेटच होय. सुगंधानेंच ज्याप्रमाणे चंदनाचे रुप धारण करावे,
464-6
तैसा संतोषाचा काय घडिला । कीं सिद्धिभांडारीहूनि काढिला । दिसे तेणें मानें रुढला । साधकदशे ॥464॥
त्याचप्रमाणे,साधकदशेतच हा इतका धैर्ययुक्त झालेला असतो की, संतोषाचा पुतळा बनविल्यासारखा किंवा सिद्धीच्या भांडारांतून काढल्यासारखा दिसतो.
प्रयत्नाद् यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः ।
अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम् ॥6.45॥

465-6
जे वर्षशतांचिया कोडी । जन्मसहस्त्रांचिया आडी । लंघितां पातला थडी । आत्मसिद्धीची ॥465॥
कारण कोट्यवधि वर्षांनी हजारो जन्मांचा प्रतिबंध दूर करुन तो आत्मसिद्धीच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचलेला असतो.

466-6
म्हणोनि साधनजात आघवें । अनुसरे तया स्वभावें । मग आयतिये बैसे राणिवे । विवेकाचिये ॥466॥
म्हणून सर्व साधनें त्याला स्वभावतःच प्राप्त होतात; आणि मग सहजच तो विचारांच्या गादीवर बसतो.
467-6
पाठीं विचारितया वेगां । तो विवेकुही ठाके मागां । मग अविचारणीय तें आंगा । घडोनि जाय ॥467॥
नंतर, विचार करण्यामध्ये प्रबल असा विवेकही मागे राहतो, आणि अविचारणीय असे जे ब्रह्म, ते तो स्वतःच होतो.
468-6
तेथ मनाचें मेहुडें विरे । पवनाचे पवनपण सरे । आपणपां आपण मुरे । आकाशही ॥468॥
त्या ठिकाणी मनाचे ढग नाहींतसे होतात, प्राणवायूचे हालणे बंद होते व तो आपल्या ठिकाणींच चिदाकाशांत लीन होऊन,
469-6
प्रणवाचा माथा बुडे । येतुलेनि अनिर्वाच्य सुख जोडे । म्हणोनि आधींचि बोलु बहुडे । तयालागीं ॥469॥
ॐकाराच्या अर्धबिंदूत निमग्न होतो. अशा रीतीचे त्याला अवर्णनीय सुख प्राप्त होते, म्हणून त्या ठिकाणी बोलनेच बंद होते.
470-6
ऐसी ब्रह्माची स्थिती । जे सकळां गतींसी गती । तया अमूर्ताची मूर्ती । होऊनि ठाके ॥470॥
मग सगळ्या गतींना गति देणारी जी ब्रह्मस्थिती, त्या निराकार स्थितीचे रूपच तो बनून राहतो.

471-6
तेणें बहुतीं जन्मीं मागिलीं । विक्षेपांची पाणिवळें झाडिलीं । म्हणोनि उपजतखेंवो बुडाली । लग्नघटिका ॥471॥
त्याने मागल्या अनेक जन्मांत, विक्षेप हाच कोणी पाण्यावरील मळ, तो झाडून टाकलेला असतो, म्हणून त्याची लग्नघटिका त्याचा जन्म होतांच बुडते
472-6
आणि तद्रूपतेसीं लग्न । लागोनि ठेलें अभिन्न । जैसे लोपलें अभ्र गगन । होऊनि ठाके॥472॥
आणि तद्रूपतेशी शुभ लग्न होऊन तो अभिन्नत्व पावतो. अभ्रे नाहींतशीं झाली म्हणजे ती ज्याप्रमाणे आकाशरूपच होऊन राहतात,
473-6
तैसें विश्व जेथ होये । मागौतें जेथ लया जाये । तें विद्यमानेंचि देहें । जाहला तो गा ॥473॥
त्याप्रमाणे (विक्षेपादि विघ्ने नाहींतशीं झाली म्हणजे,) ज्यापासून विश्वाची उत्पत्ति होते, व ज्या ठिकाणी ते पुनः लय पावते, ते ब्रह्म, तो या विद्यमान देहांत असतांनाच बनतो.
तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः ।
कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भवार्जुन ॥ 6.46 ॥
474-6
जया लाभाचिया आशा । करुनि धैर्यबाहूंचा भंरवसा । घालीत षट्कर्माचा धारसा । कर्मनिष्ठ ॥474॥
ज्या लाभाच्या आशेने कर्मनिष्ठ पुरुष आपल्या धैर्यरूप बाहुबलाच्या भरंवशावर कर्ममार्गाच्या प्रवाहांत उडी घालतात
475-6
कां जिये एकी वस्तुलांगी । बाणोनि ज्ञानाची व्रजांगी । झुंजत प्रपंचेंशीं समरंगीं । ज्ञानिये गा॥475॥
किंवा ज्या एका वस्तुसाठी ज्ञानी पुरुष हे ज्ञानरुप कवच धारण करुन समरांगणांत प्रपंचशत्रुशी झगडतात,

, , , , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *