सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १७२६ ते १७५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

1726-18
समुद्रा जयाचें तोय । तोया जयाचें माधुर्य । माधुर्या सौंदर्य । जयाचेनि ॥1726॥
समुद्राला ज्याच्या सत्तेने पाणी आहे, पाण्याला ज्याच्यायोगें माधुर्य आहे व माधुर्याला ज्याच्यामुळे शोभा आहे; 26
1727-18
पवना जयाचें बळ । आकाश जेणें पघळ । ज्ञान जेणें उज्वळ । चक्रवर्ती ॥1727॥
वाऱ्याच्या अंगचे सामर्थ्य ज्याचे आहे, आकाश ज्याच्या सत्तेवर व्यापक आहे, ज्ञानालाही ज्याचा प्रकाश आहे व ज्याच्यामुळेच त्याला सर्वश्रेष्ठता आहे.27
1728-18
वेद जेणें सुभाष । सुख जेणें सोल्लास । हें असो रूपस । विश्व जेणें ॥1728॥
ज्याच्य सत्तेने वेद हितवचनी आहेत, सुखाला सुखपणा ज्याचा आहे, हें राहो ! ज्याच्यायोगें विश्वाला रूप आहे.28
1729-18
तो सर्वोपकारी समर्थु । सद्गुरु श्रीनिवृत्तिनाथु । राहाटत असे मजही आंतु । रिघोनियां ॥1729॥
त्या सर्वोपकारी श्रीगुरु निवृत्तिनाथांचा माझ्या अंतःकरणांत प्रवेश असून ते तेथे वास करीत आहेत. 29
1730-18
आतां आयती गीता जगीं । मी सांगें मऱ्हाठिया भंगीं । येथ कें विस्मयालागीं । ठावो आहे ॥1730॥
तेव्हां, जगांत पूर्वीच आयती प्रसिद्ध असलेली गीता मी मराठी भाषेत सांगितली, तर त्यांत आश्चर्य वाटण्या सारखे काय आहे? 1730

1731-18
श्रीगुरुचेनि नांवें माती । डोंगरीं जयापासीं होती । तेणें कोळियें त्रिजगतीं । येकवद केली ॥1731॥
ज्याचे श्रीगुरु म्हणजे केवळ डोंगरच्या मातीची मूर्ति, त्या एकलव्य कोळ्यानेही त्या अचेतन गुरूपासून धनुविद्य प्राप्त करून घेऊन त्रैलोक्यांत सर्व मान्यता मिळविली. 31
1732-18
चंदनें वेधलीं झाडें । जालीं चंदनाचेनि पाडें । वसिष्ठें मांनिली कीं भांडे । भानूसीं शाटी ॥1732॥
चंदनाच्या भोवतालचे वृक्ष चंदनासारखे सुगधित झाले व वसिष्ठ मुनींची छाटीही तेजाने सूर्याची बरोबरी करू शकली. 32
1733-18
मा मी तव चित्ताथिला । आणि श्रीगुरु ऐसा दादुला । जो दिठीवेनि आपुला । बैसवी पदीं ॥1733॥
मग मी तर सचेतन मनुष्य आणि केवळ कृपादृष्टीने शिष्याला निजपदप्राप्ति करून देणारे असे श्रीसद्गुरू माझे स्वामी.? 33
1734-18
आधींचि देखणी दिठी । वरी सूर्य पुरवी पाठी । तैं न दिसे ऐसी गोठी । केंही आहे? ॥1734॥
आधींच निर्दोष नेत्र, त्यांत सूर्याची मदत, मग दिसणार नाही अशी गोष्ट कोठे होईल काय. 34
1735-18
म्हणौनि माझें नित्य नवे । श्वासोश्वासही प्रबंध होआवे । श्रीगुरुकृपा काय नोहे । ज्ञानदेवो म्हणे ॥1735॥
म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझे नित्य व नवे वाहणारे श्वासोच्छ्वासही गीता प्रबंध होऊ शकतील; कारण, श्रीगुरुकृपेमें जगांत काय होणार नाहीं? 35

1736-18
याकारणें मियां । श्रीगीतार्थु मऱ्हाठिया । केला लोकां यया । दिठीचा विषो ॥1736॥
याकरितां मी मराठींत श्रीगीतार्थ केला; तो असा की, सर्व लोकांना तो विषय सहज ग्रहण व्हावा. 36
1737-18
परी मऱ्हाठे बोलरंगें । कवळितां पैं गीतांगें । तैं गातयाचेनि पांगें । येकाढतां नोहे ॥1737॥
परंतु, माझ्या मराठी शृंगाराच्या भाषेने कोणी गीतार्थाचे आकलन करू गेला, तरी मूळगीतेच्या वक्त्याच्या अभावीं त्यांत एकदेशित्व अथवा अपूर्णता मुळींच रहाणार नाही. 37
1738-18
म्हणौनि गीता गावों म्हणे । तें गाणिवें होती लेणें । ना मोकळे तरी उणें । गीताही आणित ॥1738॥
म्हणून कोणी गीतेचा वक्ता असेल, तर माझा मराठी अर्थ त्याच्या वक्तृवाला अलंकारच होईल; किंवा कोणी सुटा मराठी अर्थ (माझा) सांगितला तरीही मुळावरून सांगितल्या जाणान्या अर्थाला तो उणेपणा आणील? (म्हणजे सरस ठरेल) 38
1739-18
सुंदर आंगीं लेणें न सूये । तैं तो मोकळा शृंगारु होये । ना लेइलें तरी आहे । तैसें कें उचित? ॥1739॥
सुंदर अंगावर अलंकार घातला नाही तरी, तो आपल्या सुटधा स्थितींतही श्रृंगार रूपाने असतोच, अथवा सुंदर शरीरावर तो घातला तर त्याच्यासारखी योग्य गोष्ट आणखी कोणती? 39
1740-18
कां मोतियांची जैसी जाती । सोनयाही मान देती । नातरी मानविती । अंगेंचि सडीं ॥1740॥
किंवा मोती ही जातच अशी आहे की ती सुवर्णापाशी सहकार करून त्यालाही शोभा देतात, किंवा सुटी असली तरी आपल्या अंगानेंच शोभतात. 1740

1741-18
नाना गुंफिलीं कां मोकळीं । उणीं न होती परीमळीं । वसंतागमींचीं वाटोळीं । मोगरीं जैसीं ॥1741॥
अथवा वसंत ऋतूच्या आरंभींची वाटोळी मोगऱ्याची फुलें, हारात असोत की सुटी असोत, त्यांच्या सुगंधांत फरक पडत नाही. 41
1742-18
तैसा गाणिवेतें मिरवी । गीतेवीणही रंगु दावीं । तो लाभाचा प्रबंधु ओंवी । केला मियां ॥1742॥
त्याप्रमाणे, गीतेवरील वक्तृत्वाला शोभा देणारा, स्वतंत्रपणेंही रंग भरविणारा, असा माझ्या अवडीचा हा ओवीबद्ध प्रबंध मी रचिला आहें (असें महाराज म्हणतात). 42
1743-18
तेणें आबालसुबोधें । ओवीयेचेनि प्रबंधें । ब्रह्मरससुस्वादें । अक्षरें गुंथिलीं ॥1743॥
त्या प्रबंधांत अबालवृद्धांस समजण्या सारख्या ओव्यांनी ब्रह्मरसाचा आस्वाद घेतां यावा, अशा प्रकारें अक्षररचना केली आहे.43
1744-18
आतां चंदनाच्या तरुवरीं । परीमळालागीं फुलवरीं । पारुखणें जियापरी । लागेना कीं ॥1744॥
चंदनतरूपाशी गेल्यावर त्याला फुले येईपर्यंत सुगंधासाठी जशी वाट पहाणे पडत नाही.44
1745-18
तैसा प्रबंधु हा श्रवणीं । लागतखेंवो समाधि आणी । ऐकिलियाही वाखाणी । काय व्यसन न लवी? ॥1745॥
त्याप्रमाणे ह्या प्रबंधाचे नुसतें श्रवण घडताच जर समाधि लागते, तर, त्याचे व्याख्यानपूर्वक श्रवण झाल्यावर तो काय व्यसन लाविल्यावांचून राहील 45

1746-18
पाठ करितां व्याजें । पांडित्यें येती वेषजे । तैं अमृतातें नेणिजे । फावलिया ॥1746॥
पठणाच्या निमित्ताने आवृत्ति सुरू केली, तरी प्रसादाने आपोआप पांडित्य (अर्थविषयक) स्फुरतें व मग त्या गोडीपुढे अमृताचा लाभही तुच्छ वाटतो. 46
1747-18
तैसेंनि आइतेपणें । कवित्व जालें हें उपेणें । मनन निदिध्यास श्रवणें । जिंतिलें आतां ॥1747॥
तसें हें आयतें प्राप्त झालेले (अमृताहून गोड) असें कवित्व विश्रांतिस्थान होऊन, त्याच्या श्रवणानेंच मनन व निदिध्यासन ह्यांची आवश्यकता उरली नाही. 47
1748-18
हे स्वानंदभोगाची सेल । भलतयसीचि देईल । सर्वेंद्रियां पोषवील । श्रवणाकरवीं ॥1748॥

हे श्रवण वाटेल त्या मनुष्यालाही आत्मानंदाचा शेलका भोग घडवील व त्याच्या सर्वेन्द्रियांना टवटवी देईल.48
1749-18
चंद्रातें आंगवणें । भोगूनि चकोर शाहाणे । परी फावे जैसें चांदिणें । भलतयाही ॥1749॥
आपल्या आगच्या सामर्थ्याने चकोरांना चंद्रकिरणांच्या ठिकाणच अमृताचा भोग घडो; पण जगांतील कोणालाही चांदण्याचा भोग घडतोच. 49
1750-18
तैसें अध्यात्मशास्त्रीं यिये । अंतरंगचि अधिकारिये । परी लोकु वाक्चातुर्यें । होईल सुखिया ॥1750॥
त्याप्रमाणे ह्या अध्यात्मशास्त्रांत अंतमखवृत्तीचे पुरुषच अधिकारी आहेत हे खरे असले तरी, ईतर लोक केवल माझ्या ग्रंथरचनेच्या चातुर्यानेही (मोहकपणाने) आनंदित होतील.1750

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *