धर्मशास्त्र मासिकपाळी का पाळावी ? विटाळ म्हणजे काय ?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

धर्मशास्त्र

मासिकपाळी का पाळावी ?
विटाळ म्हणजे काय ?

नोपगच्छेत्प्रमत्तोsपि स्त्रियमार्तवदर्शने ।
समानशयनेचैव नशयीत तयासह ।। ४-४०
रजसाभिप्लुतां नारीं नरस्य ह्युपगच्छतः ।
प्रज्ञातेजोबलं चक्षुरायुश्चैव प्रहीयते ।। ४-४१
तां विवर्जयतस्तस्य रजसा समभिप्लुतां ।
प्रज्ञातेजोबलं चक्षुरायुश्चैव प्रवर्धते ।। ४-४२

मासिकधर्म असताना स्त्रीजवळ जाऊ नये. तिच्या सह शयन करू नये. जो कोणी मनुष्य रजस्वला स्त्रीच्या जवळ जातो त्याची बुद्धि, तेज, बल, दृष्टी आणि आयुष्य कमीकमी होते. रजः स्राव होणाऱ्या स्त्रीपासून रजोदर्शन काळात जो दूर राहतो त्याची बुद्धि, तेज, बल, दृष्टी आणि आयुष्य वृद्धिंगत होते.
स्त्रियांच्या रजोदर्शनाचा ज्ञात असलेला प्राचीन उल्लेख म्हणजे कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेतील (२-५-१-१) आहे. त्याखेरीज श्रीमद्भागवत पुराणात (स्कंध ६-अध्याय ९ वा), स्कंदपुराण (माहेश्वर/केदार खंड अध्याय १६ वा ) तसेच मन्वादि स्मृतिकारांनी व चरक, वाग्भट (अष्टांगहृदय शारीरस्थान अ. १-श्लोक २३ ते २७) आदि आयुर्वेदाचार्यांनी सुद्धा रजोदर्शनाचा विचार केला आहे. महाभारतातील सभापर्वात वस्त्रहरणाचे वेळी द्रौपदी रजस्वला असल्याचे व म्हणून सभेत नेणे उचित नसल्याचे तिने स्वतःच सांगितले आहे. ( महाभारत सभापर्व .अ.६७-श्लोक ३२ गीताप्रेस प्रत)


धर्मकृत्याचे अगोदर योग्यवेळी यजमान व यजमानपत्नी तसेच धर्मकृत्याचे वेळी उपस्थित यजमानकुटुंबातील सदस्यांची शारीरिक व मानसिक शुचिर्भूततेची खात्री करणे व ती असल्यासच धर्मकृत्ये करणे (नसल्यास स्वधर्मशास्त्रोक्त अन्य पर्यायांचा वापर करणे ) अशा विचारांचे आपण पुरोहित अनुकरण करीत असल्यामुळे आधुनिक वैद्यकशास्त्रातील काही विचार सनातन धर्मशास्त्रास अनुकूल कसे आहेत ? , काही विचारात भेद का आहे ? व पर्यायाने सनातन धर्मशास्त्रात सुद्धा आधुनिक वैद्यकशास्त्रातील विचारच पण धर्माच्या अंगांनी कसे सांगितले आहेत हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. लोकांना आवडेल ते सांगण्यापेक्षा आवश्यक ते सांगणेच आमचा धर्म असल्याने आम्हाला ते केले पाहिजे.


धर्मशास्त्रात लिहिलेल्या संज्ञा शब्दार्थानुसारच समजल्यामुळे बरेच अनर्थ रूढ झाले, काही गैरसमज पसरले तर काही संकल्पना कालबाह्य समजल्या जाऊ लागल्या. ‘रजोदर्शन’ संकल्पनेचे वास्तवही तसेच आहे. ‘ प्रथमेहनि चांडाली द्वितीये ब्रह्मघातिनी । तृतीये रजकी प्रोक्ता चतुर्थेहनि शुद्ध्यति ।।’ या पाराशरस्मृतीतल्या (७-२०) श्लोकातील चांडाली, ब्रह्मघातिनी व रजकी पदाचे अनर्थ घेतल्याने स्मृतिकार स्त्रीद्वेष्टे होते असाच प्रचार करण्यात आला. वास्तविक ‘चडि उद्वेगे’ या धातूपासून चंड, चंडी,चीड,चाड असे शब्द सिद्ध होतात. रजोदर्शनाच्या पहिल्या दिवशी चिडचिड होणे आधुनिक वैद्यकशास्त्रास सुद्धा मान्य आहे. अशी चीड येणारी म्हणून ‘चांडाली’ या अर्थानी कधी विचारच केला गेला नाही. ब्रह्म शब्द ‘बृंह वृद्धौ’ धातूपासून सिद्ध होतो.

वृद्धिसूचक बीजनिर्मिती होऊन गर्भधारणा न होणे हा अप्रत्यक्ष ब्रह्मघातच आहे. अशा स्वरुपात असणारी ती ‘ब्रह्मघातिनी’ असा आशय आहे. हे न समजल्यामुळे मोठाच अनर्थ उद्भवला आहे. रजकी शब्दाचा प्रचलित अर्थ आहे धोबीण. अर्थात स्वच्छ करणारी अशा अर्थानेच तो वापरला आहे. त्यांना अन्य ज्ञातीचा स्त्रीसूचक शब्दही वापरता आला असता, पण धोबीण शब्दच का वापरला ? शरीर हे वस्त्राप्रमाणे असल्याचे गीताशास्त्र सांगते आहे. (‘वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृण्हाति नरोपराणि । तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ।। २-२२) आधुनिक वैद्यकानुसार रजोदर्शन काळात स्त्रीच्या गर्भाशयातील अंतःस्थ त्वचा गर्भधारणा न झाल्यास शरीराच्या बाहेर फेकून दिली जाते. वस्त्रास चिकटलेला अनावश्यक व त्रासदायक ठरू शकणारा घटक स्वच्छ, शुद्ध करण्याचे काम जसे धोबीण करीत असते तसेच काम तेवढ्यापुरते रजोदृष्ट स्त्री करीत असल्यामुळे तिला रजोदृष्ट स्त्रीची उपमा दिली आहे . हा गूढार्थ लक्ष्यात घेतल्यास गैरसमज नाहीसे होऊ शकतात.


जसे मलमूत्रविसर्जन करणाऱ्यास तेवढ्यापुरते स्पर्शास, अन्नसंस्कारास, यज्ञास निषिद्ध समजले जाते पण त्या अवस्थेतून शास्त्रानुसार शुद्ध झाल्यावर पुन्हा स्पर्शास, अन्नसंस्कारास,यज्ञास पूर्ववत अधिकार प्राप्त होतो हे सुद्धा वास्तव आहे. रजःस्राव हा सुद्धा एक मलच आहे पण तो केवळ स्त्रियांकडूनच होत असतो म्हणून तो स्त्रीशरीरविशेष आहे. मलास विरोध केल्याने तो मल शरीराच्या नियमाने पुनः रक्तात जातो व व असह्य वेदना निर्माण करतो. वेग आला की शांतपणे त्याला त्याच्या मार्गाने निघून जाण्यास मदत केली पाहिजे. ‘रसादेव स्त्रियाः रक्तं रज संज्ञं प्रवर्तते । एतत्प्रकृत अपानस्य कार्यम् ।।’ या ‘मल’ उपमेतील एक न्यून,त्रुटी अथवा मर्यादा लक्ष्यात घेतली पाहिजे ती म्हणजे मलमूत्रविसर्जन केवळ स्त्रियांकडून होत नाही तर पुरुषांकडूनही होते.

ते जन्मापासून मृत्यूपर्यंत चालू असते. परंतु, मलमूत्रविसर्जन प्रक्रिया करणाऱ्यास विशिष्ट स्थानी जाऊनच ती प्रक्रिया करावी लागते. सर्वांसमक्ष ती करता येत नाही. मलमूत्रविसर्जन प्रक्रिया विशिष्ट ठिकाणी करणेच योग्य तर रजोदृष्ट स्त्रीनेही घरातील सदस्यांपासून वेगळ्या, एकांत जागी बसणे अयोग्य कसे ? खात पीत असताना मलमूत्रविसर्जन केले जात नाही तसेच नेहमीचे श्रमाचे काम करतानाही मलमूत्रविसर्जन केले जात नाही. सहकाऱ्यांशी गप्पा मारत, कार्यालयातील ज्येष्ठांबरोबर चर्चा करताना मलमूत्रविसर्जन केले जात नाही व अशा प्रकारचे नियम आधुनिक वैद्यक तसेच नीतिशास्त्रासही मान्य असताना रजोदर्शनाचे काळात पूर्वोक्त व देवपूजेसारखी पवित्र कृत्ये करणे अशास्त्रीय नाही हे म्हणणे आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार तरी योग्य कसे ठरेल ? अर्थात ते अयोग्यच समजणे इष्ट. हे सत्य समजल्यावर अशा स्त्रीस केवळ रजोदर्शनाच्या कारणाने घृणास्पद वागणूक देणे अयोग्य आहे हे सुलभतेने समजू शकते. हे समजाविणे आधुनिक वैद्यांचे (डॉक्टर्सचे) जसे कर्तव्य आहे तसेच कर्मकांडाशी संबंधित आम्हा पुरोहितांचे सुद्धा आहे.


रजोदृष्ट स्त्रीच्या सहवासाचा, सावलीचा पशू,पक्षी,वनस्पती यांचेवर काय परिणाम होतो हे सुद्धा अभ्यासले पाहिजे. शेतकी अथवा वनस्पतीशास्त्राचे तज्ज्ञ, माळी, शेतकरी हे “ वाईट परिणाम होतो ” असे म्हणतात. रजोदर्शनकाळात स्त्रीने केलेला स्वयंपाक कुत्रे देखिल खात नाहीत असे म्हणतात. तिच्या ऑरा (शरीराभोवती असणाऱ्या वलया)मध्ये सुद्धा दोष जाणवतात. अमेरिकेतील डॉ. जॉन्सन यांनी मासिक पाळीत गुलाबांच्या फुलांना स्पर्श केल्यामुळे ती कोमेजल्याचे मान्य केले होते. पशुवैद्यकानुसार स्त्रीपशूंना सुद्धा असे रजोदर्शन असते का ? असल्यास त्या काळातील गायी,म्हशींचे दुधात काही वेगळे घटक आढळतात का ? असे संशोधन प्रसिद्ध केल्यास तुलनात्मक अभ्यासाने विचार केला जाऊ शकतो. नदीला सुद्धा रजोदोष सांगितला आहे. कर्क व सिंह या संक्रांतीमध्ये सर्व नद्या रजस्वला होतात. (निर्णयसिंधू मराठी भाषांतर – कृष्णशास्त्री नवरे पृष्ठ ११० ) याचाही विचार भूगर्भशास्त्रज्ञ व जलतज्ज्ञ करतील का ?


पाश्चात्य संशोधकांमध्ये नारीशास्त्रज्ञ वेल्डे, ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ प्रो.शिक यांनी या विषयावर बरेच संशोधन केले आहे. प्रो.शिक सांगतात, “ विटाळशीच्या हातातील फुलांवर नारंगी रेषा येतात. २४ तासानंतर पाकळ्या झाडून जातात. विटाळाच्या पहिल्या दिवशी परिणाम प्रखर असतो. पुढे कमी होत जातो. चौथ्या दिवशी अजिबात नसतो. विटाळात मेनो-टॉक्सीन हे विष असते. हे जे विष आहे ते विटाळशीच्या काखेतील घामात, कानाच्या लोंबत्या भागातील रक्तातील द्रव्यात (सिरम) लालधातुकणात (R.B.C.) आढळते, ते मेनो-टॉक्सीन विष प्रयोगशाळेतल्या रबरी हातमोजातूनहि ग्रासते.” शिक यांच्या प्रयोगाचे व प्रतिपादनाचे समर्थन मॅश, लुबीन, लामार्ड अशा शास्त्रज्ञांनी केले आहे. वेडले या लेखकाचे ‘आदर्श वैवाहिक जीवन’ , एलीसचे ‘कायमानसाचा अभ्यास’ , प्लॉस व वाल्डेर्स यांचे ‘ नारी’ ही (इंग्रजी) पुस्तके जिज्ञासूंनी अवश्य वाचावीत. वेडले लिहितो, “ विटाळशी स्त्री विलक्षण क्षुब्ध असते. तिच्या रक्तप्रवाहात Auto Intoxication (self poisoning of the system) असते. या संदर्भात शास्त्रज्ञ गोंधळलेले आहेत. अजून त्यांना हे तंत्र काही उलगडलेले नाही.”


लॉरेट या नारीशास्त्रज्ञाने “ मासिक विटाळाच्या काळात स्त्रियांच्या अंगांगातून वीजप्रवाह सुरु झाल्यासारखे वाटून अंगाला कपडे चिकटतात, तंतुवादिनी स्त्रीची बोटे तंतुंवरून सारखी निसटतात, काच आपोआप फुटते, घड्याळ बंद पडते ” अशी निरीक्षणे नोंदविली आहेत. एलीस हा शास्त्रज्ञ म्हणतो, “ पुष्पिणी (विटाळशी) स्त्रिया दूषित असतात. त्या कोणत्या तरी दुष्ट शक्तींनी भारलेल्या असतात. पिशाच्चादि योनीतले जीव त्या देहात प्रविष्ट होतात.” विटाळशीचे रक्त सुद्धा दूषित असते. त्याचा उपयोग अभिचार कर्माकरिता केला जातो. एलिक म्हणतो, “ साखरेच्या कारखान्यात विटाळशी स्त्रियांना बंदी आहे कारण, साखर काळी पडते, अफू अति कडू होते, उग्र होते. एडनर म्हणतो, “ मासिक पाळी म्हणजे स्त्रीशरीर धुवून टाकून सगळे विषमय पदार्थ बाहेर फेकण्याचा निसर्ग.” O. W. Smith हा शास्त्रज्ञ सांगतो, “ इस्ट्रीन व इस्ट्राडिऑल यांचे oxidative decomposition विघटन होते. त्यापासून दूषित विषारी रक्त बनते. या विटाळाच्या दूषित द्रव्यांचा मेंदूवर जबर परिणाम होतो. याला मेनोटॉक्सीन असे म्हणतात. अशा विटाळशी स्त्रीचे बाह्य वस्तूंपासून रक्षण अटळ ठरते.”

कुत्रा हा तीव्र संवेदनेचा व अत्यंत कामलंपट प्राणी आहे. वेल्डे सांगतो, “ कुत्र्याची तीक्ष्ण नजर विटाळशी स्त्रीला भयभीत करते. विटाळाच्या काळात स्त्रीच्या ठिकाणी कामवासना जबर असते.” (हे पाश्चात्य संशोधकांचे संदर्भ परमपूज्य गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी, श्रीरामपूर, अहमदनगर यांच्या वाङ्गमयातून घेतले आहेत.) पिशाच्चादि वर्णने जरी अतिशयोक्ति वाटली तरी तद्वत् आचरण असा तिथे अर्थ केल्यास आशय लक्ष्यात येऊ शकतो. पाश्चात्यांना ही संकल्पना त्या मानाने नवीन असल्याने हे संशोधन गेल्या शतकाच्या उत्तरार्धानंतर सुरु झाले त्यांचे निष्कर्ष, प्रगति होण्यास अजून काही काळ जावा लागेल. त्यानी सांगितले की मग आपल्या देशातले लोक आमच्याकडे हे अगोदरच सांगितलेले आहे असे म्हणू लागतील.असे संदर्भ अनेक सांगता येतील पण आचरण करायचे नसेल तर काय उपयोग ?
विदर्भातील देवपूर गावी एक हायस्कूल शिक्षिका होत्या (नाव मुद्दामून सांगत नाही) विटाळाच्या चार दिवसात त्या रजा घ्यायच्या. तेजस्विनी होत्या. पण कालांतराने शाळेच्या बदललेल्या कमिटीने ह्या कारणाकरिता रजा नामंजूर केली. बाईंनी तडजोड केली नाही. राजीनामा दिला. घरी शिकवण्या सुरु केल्या. काहीही अडले नाही. आजही सर्व गावात त्यांना मान मिळतो.


आपला मोबाईल हँडसेट अथवा संगणक यामधील घातक घटक म्हणजे व्हायरस इ. वेळच्या वेळी काढले नाही तर मोबाईल अथवा संगणक मंदगतीने कार्य करायला लागून कालांतराने अकार्यक्षम ठरतो. हे टाळण्याकरिता जसे आपण फॉरमॅट/क्लीन करत असतो. दुचाकी अथवा चारचाकी ठराविक कालानंतर सर्विसिंग करून घेतो व ते करत असताना त्या उपकरणाचा अन्यत्र वापर करत नाही. त्या वेळी आपण जरी त्या गोष्टी वापरत नसलो तरी त्यांना हीन, तुच्छ, कमी समजत नाही तर शुद्धिप्रक्रियेचाच तो एक भाग समजतो. निर्जीव गोष्टींना एवढे समजून घेणारे आपण एका सजीव स्त्रीला समजू शकलो नाही व रजोदर्शनासारख्या कारणांमुळे तिला हीन, कमी लेखू लागलो तर आपल्यासारखे मूर्ख आपणच ठरू. मनूजींनी 5-108 मध्ये मलाची शुद्धि माती आणि जलानी, वेगामुळे नदीची, मासिक धर्मामुळे स्त्रीच्या चित्ताची व संन्यासामुळे द्विजोत्तम म्हणजे ब्राह्मण शुद्ध होतो असे सांगितले आहे.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

स्त्री एक अगम्य शक्ती

आरोग्य

अशोक काका कुलकर्णी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *