176-3
जैसी बहुरूपियाची रावो राणी । स्त्रीपुरुषभावो नाही मनीं । परी लोकसंपादणी । तैशीच करिती ॥176॥
बहुरुप्याने जरी राजा-राणीची सोंगे घेतली, तरीपण त्याच्या मनात स्त्री आणि पुरुष हा भाव मुळीच नसतो. लोकांची समजूत मात्र ते तसेच असल्याची होते. त्याप्रमाणे लोक कल्याणासाठी निष्काम पुरुष जरी कर्म करीत असला, तरी त्याला कर्माचे कोणतेही बंधन लागत नाही.
प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः ।
अहंकारविमूढात्मा कर्ताहं इति मन्यते॥3.27॥
भावार्थ :- सर्व कर्मे प्रकृतीच्या (सात्विक, राजस, तामस) गुणांकडून केली जातात; परंतु अहंकाराने ज्याचे मन (अंतःकरण) अज्ञानी झाले असा पुरुष या कर्माचा “मीच कर्ता” असे मानतो.
177-3
देखें पुढिलाचें वोझें । जरी आपुला माथां घेईजे । तरी सांगे कां न दाटिजे । धनुर्धरा ॥177॥
हे धनुर्धरा ! असे पाहा की, दुसऱ्याचे ओझे आपण आपल्या डोक्यावर घेतले, तर आपण त्या भाराने दडपले जाणार नाही का? तूच सांग.
178-3
तैसी शुभाशुभें कर्में । जिये निफजति प्रकृतिधर्में । तियें मूर्ख मतिभ्रमें । मी कर्ता म्हणे ॥178॥
त्याचप्रमाणें प्रकृतीच्या गुणाने जी बरी-वाईट कर्मे निर्माण होतात, ती अज्ञानी मनुष्य, बुद्धीभ्रंशामुळे, “मी करतो” असे म्हणत असतो.
179-3
ऐसा अहंकाराधिरूढ । एकदेशी मूढ । तया हा परमार्थ गूढ । प्रगटावा ना ॥179॥
अशा अहंकाराच्या घोडयावर आरूढ झालेल्या आणि स्वतःला मर्यादित समजणारा जो अज्ञानी आहे, त्याच्या बुद्धीला हे गूढ तत्वज्ञान सांगू नये.
180-3
हें असो प्रस्तुत । सांगिजेल तुज हित । तें अर्जुना देऊनि चित्त । अवधारी पां ॥180॥
अर्जुना ! सध्या हा विषय इथेच राहू दे. आता तुला मी हिताची गोष्ट सांगणार आहे. तरी चित्त एकाग्र करून त्याचे श्रवण कर.
तत्ववित् तु महाबाहो गुणकर्मविभागयोः ।
गुणाः गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते॥3.28॥
भावार्थ :- परंतु हे महाबाहो अर्जुना ! गुणविभाग व कर्मविभाग यांचे तत्व रहस्य जाणणारा (गुण व तत्व हे विभाग आपल्याहून भिन्न आहेत, असे जाणणारा) आत्मज्ञानी पुरुष सर्व गुण (इंद्रिय) गुंणाच्या (विषयांच्या) ठिकाणी प्रवृत्त होतात, असे समजून आसक्त होत नाही.
181-3
जे तत्वज्ञियांचां ठायीं । तो प्रकृतिभावो नाहीं । जेथ कर्मजात पाहीं । निपजत असे ॥181॥
ज्या प्रकृतीच्या गुणांपासून ही सर्व कर्मे निर्माण होतात, तो प्रकृतीचा विकार आत्मज्ञानी पुरुष्याच्या ठिकाणी असत नाही.
182-3
ते देहाभिमानु सांडुनी । गुणकर्में वोलांडुनी । साक्षिभूत होऊनी । वर्तती देहीं ॥182॥
तो आत्मज्ञानी देहाचा अभिमान टाकून, गुण व गुणांपासून उत्पन्न होणारी कर्मे यांना ओलांडून देहाच्या ठिकाणी साक्षीत्वाने राहतात.
183-3
म्हणूनि शरीरी जरी होती । तरी कर्मबंधा नाकळती । जैसा कां भूतचेष्टा गभस्ती । घेपवेना ॥183॥
सूर्य ज्याप्रमाणे प्राणीमत्र्यांच्या बऱ्या-वाईट व्यवहाराने लिप्त होऊन जात नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञानी पुरुषाने देह धारण केला असला, तरी तो देहकर्मानी बध्द होत नाही.
प्रकृतेर्गुणसंमूढाः सज्जन्ते गुणकर्मसु ।
तानकृत्स्नविदो मन्दान् कृत्स्नविन् न विचालयेत् ॥3.29॥
भावार्थ :- प्रकृतीच्या गुणांनी मोहित झालेला पुरुष गुण व कर्म यांत आसक्त होत असतात. अशा अज्ञानी लोकांचा आत्मज्ञानी पुरुषाने बुद्धिभेद करू नये.
184-3
एथ कर्मी तोच लिंपे । जो गुणसंभ्रमें घेपे । प्रकृतिचेनि आटोपें । वर्ततु असे॥184॥
या जगामध्ये जो प्रकृतीच्या तावडीत सापडून गुणांना वश होऊन वागत असतो, तो कर्मात बध्द होतो.
185-3
इंद्रियें गुणाधारें । राहाटती निजव्यापारें । तें परकर्म बलात्कारें । आपादी जो ॥185॥
गुंणाच्या योगाने इंद्रिय आपआपली कर्मे करतात. त्यागुणांनी (सात्विक, तामस, राजस) केलेल्या कर्माचा कर्तेपणा जो बळेच आपल्याकडे घेतो, कर्मामध्ये बध्द होऊन राहतो.
मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याद्यात्मचेतसा ।
निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगत्ज्वरः॥3.30॥
भावार्थ :- चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी ठेऊन सर्व कर्मे मला समर्पण करून आशारहित, ममतारहित होऊन आणि शोकरहित होऊन युद्ध कर.
186-3
परी उचिते कर्में आघवीं । तुवा आचरोनि मज अर्पावीं । परी चित्तवृत्ती न्यासावी । आत्मरूपीं ॥186॥
सर्व विहित कर्म उत्तम प्रकारे करून ती मला अर्पण कर; परंतु चित्तवृत्ती मात्र सदैव आत्मस्वरूपी स्थिर कर.
187-3
हें कर्म मी कर्ता । कां आचरेन या अर्था । ऐसा अभिमानु झणें चित्ता । रिगो देसी ॥187॥
‘मी या कर्माचा कर्ता आहे’ अमुक एक कारणसाठी (फळासाठी) मी हे कर्म करीत आहे, असा अभिमान कदाचित तुझ्या मनात येईल, तर तू येऊ देऊ नकोस.
188-3
तुवां शरीरपरा नोहावें । कामनाजात सांडावें । मग अवसरोचित भोगावे । भोग सकळ ॥188॥
तू शरीराच्या स्वाधीन राहू नकोस. सर्व इच्छांचा त्याग कर आणि योग्य वेळी सर्व भोगांचा उपभोग घे.
189-3
आतां कोदंड घेऊनि हातीं । आरूढ पां इये रथीं । देईं आलिंगन वीरवृत्ती । समाधानें ॥189॥
आता तू आपल्या हातात धनुष्य घे रथावर आरूढ हो आणि समाधानाने विरवृत्तीचा स्वीकार कर.
190-3
जगीं कीर्ती रूढवीं स्वधर्माचा मानु वाढवीं । मग भारापासोनि सोडवी । मेदिनी हे ॥190॥
या जगामध्ये तू आपली कीर्ती रूढ कर, स्वधर्मचा मान वाढव; आणि या पृथ्वीला दुष्टांचा भारापासून तू सोडव.
191-3
आतां पार्था निःशंकु होई । या संग्रामा चित्त देईं । एथ हें वांचूनि कांही । बोलों नये ॥191॥
हे अर्जुना ! आता तू सर्व प्रकारचे संशय टाकून या युद्धाकडे लक्ष दे. या प्रसंगी युद्धाशिवाय दुसरी गोष्ट बोलू नकोस.
ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवः ।
श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ॥3.31॥
भावार्थ :- जे श्रद्धावान व मत्स्यरहित होऊन माझ्या या मताप्रमाणे आचरण करतील, ते देखील सर्व कर्मापासून मुक्त होतील.
192-3
हें अनुपरोध मत माझें । जिहीं परमादरे स्वीकारिजे । श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे । धनुर्धरा ॥192॥
हे धनुर्धरा ! या माझ्या निश्चित स्वरूपाच्या मताचा जे आदराने स्वीकार करतात आणि विश्वासपूर्वक त्याप्रमाणे वागतात,
193-2
तेही सकळ कर्मी वर्ततु । जाण पां कर्मरहितु । म्हणोनि हें निश्चितु । करणीय गा ॥193॥
ते सर्व कर्म करीत असले तरी, ते कर्मराहित असतात असे तू जाण. म्हणून माझे हे मत दृढ निश्चयाने आचरण करण्यास योग्य आहे.
ये त्वेतत्दभ्यसूयंतो नानुतिष्ठन्ति मे मतम् ।
सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टानचेतसः॥3.32॥
भावार्थ :- पण जे मत्सरी लोक माझे हे मत अनुसरत नाहीत, ते सर्व प्रकारच्या ज्ञानाविषयी मूढ, अविवेकी आणि भ्रष्ट आहेत, असे जाणावे. त्यांचे पतन होते.
194-3
नातरी प्रकृतिमंतु होऊनी । इंद्रियां लळा देऊनी । जे हें माझे मत अव्हेरुनी । ओसंडिती ॥194॥
जी लोक प्रकृतीच्या अधीन होऊन व इंद्रियांचे लाड पुरवून माझ्या या मताचा तिरस्कार करून त्याग करतात, (ते टाकून देतात),
195-3
जे सामान्यत्वें लेखिती । अवज्ञा करूनि देखिती । कां हा अर्थवादु म्हणती । वाचाळपणें ॥195॥
जे माझ्या मताला सामान्य समजतात, त्याचाकडे अनादर भावाने पाहतात किंवा जे वाचाळपणाने याला सामान्य वाणी म्हणतात,
196-3
ते मोहमदिरा भ्रमले । विषयविखें घारले । अज्ञानपंकी बुडाले । निभ्रांत मानीं ॥196॥
ते लोक मोहरूपी अमली पदार्थाचे सेवन करून भूललेले व विष्यरूपी विषाने व्यापलेले आहेत आणि अज्ञानरूपी चिखलामध्ये फसलेले आहेत, असे निःसंशय समज.
197-3
देखें शवाचां हातीं दिधलें । जैसे कां रत्न वायां गेलें । नातरी जात्यंधा पाहलें । प्रमाण नोहे ॥197॥
प्रेताच्या हातात दिलेले रत्न ज्याप्रमाणे वाया जाते अथवा जो जन्मापासून आंधळा आहे, त्याने पाहिलेले प्रमाण मानले जात नाही.
198-3
कां चंद्राचा उदयो जैसा । उपयोगा नवचे वायसा । मूर्खा विवेकु हा तैसा । रुचेल ना ॥198॥
किंवा चंद्राचा उदय कावळ्याच्या उपयोगी पडत नाही, त्याप्रमाणे अज्ञानी लोकांना हा विचार रुचनार नाही.
199-3
तैसे ते पार्था । जे विमुख या परमार्था । तयांसी संभाषण सर्वथा । करावे ना ॥199॥
हे पार्था ! जे लोक परमार्थाच्या विरुद्ध आहेत, त्यांच्याशी आत्मज्ञानासंबंधी कांही बोलू नये.
200-3
म्हणोनि ते न मानिती । आणि निंदाही करूं लागती । सांगे पतंग काय साहती । प्रकाशातें ॥200॥
ज्याप्रमाणे पतंग कीटक दिव्याच्या प्रकाशाला सहन करू शकत नाही, त्याप्रमाणे हे लोक या उपदेशाला तर मानीत नाहीतच आणि उलट, त्याची निंदादेखील करू लागतात.
