सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा ओवी १२६ ते १५० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

126-12
बुद्धीचिये पाठीं पोटीं । कर्माआदि कां शेवटीं । मातें बांधणें किरीटी । दुवाड जरी ॥126॥
बुद्धीच्या आत-बाहेर व कर्माच्या आदि किंवा अंती, मला बांधून ठेवणे, अर्जुना ! तुला कठीण वाटत असेल.
127-12
तरी हेंही असो । सांडीं माझा अतिसो परि संयतिसीं वसो । बुद्धि तुझी ॥127॥
पण ही परमेश्वराला कर्तृत्व समर्पण करण्याची प्रक्रिया राहू दे. कर्माच्या आदि-अंती माझी आठवण ठेवण्याचा ध्यासही सोड पण आपल्या बुद्धीने इंद्रियांचा व मनाचा निग्रह करून राहा- म्हणजे इंद्रिये व मन यांना स्वैर सोडून, त्यांच्या स्वाधीन बुद्धीला होऊ देऊ नकोस.
128-12
आणि जेणें जेणें वेळें । घडती कर्में सकळें । तयांचीं तियें फळें । त्यजितु जाय ॥128॥
आणि ज्या ज्या वेळी जे जे कर्म घडेल, त्यांचे मिळणारे फळ टाकीत जा. – म्हणजे त्याचे फळ मिळण्याची मुळीच इच्छा करू नकोस.
129-12
वृक्ष कां वेली । लोटती फळें आलीं । तैसीं सांडीं निपजलीं । कर्में सिद्धें॥129॥
ज्याप्रमाणे वृक्ष किंवा वेल, आलेल्या फळांचा उपयोग न करता तशीच राहू देऊन अखेर गळू देतात, त्याप्रमाणे फलाशा न धरता टाकून दे.
130-12
परि मातें मनीं धरावें । कां मजौद्देशें करावें । हें कांहीं नको आघवें । जाऊं दे शून्यीं ॥130॥
कर्म करताना माझे ध्यान ठेऊन किंवा माझ्या प्राप्तीच्या उद्देशाने कर्म केले पाहिजे असे काही मनात वागवू नकोस. ही कर्मे शून्यात जाऊ दे – म्हणजे निरालंब कर्मे कर.


131-12
खडकीं जैसें वर्षलें । कां आगीमाजीं पेरिलें । कर्म मानी देखिलें । स्वप्न जैसें ॥131॥
होणारे कर्म हे खडकावर झालेल्या वर्षावाप्रमाणे किंवा अग्नीत पेरलेल्या बीजाप्रमाणे अथवा स्वप्न पाहिल्याप्रमाणे समज.
132-12
अगा आत्मजेच्या विषीं । जीवु जैसा निरभिलाषी । तैसा कर्मीं अशेषीं । निष्कामु होईं ॥132॥
बा अर्जुना ! मनुष्य जसा आपल्या कन्येच्या ठिकाणी यत्किंचितही कामाभिलाष ठेवित नसतो, त्याप्रमाणे संपूर्ण कर्माचे ठिकाणी तू फलेच्छारहित हो.
133-12
वन्हीची ज्वाळा जैसी । वायां जाय आकाशीं । क्रिया जिरों दे तैसी । शून्यामाजी ॥133॥
ज्याप्रमाणे अग्नीची ज्वाळा व्यर्थच आकाशात जाते, त्याप्रमाणे तुझी संपूर्ण क्रिया शून्यात जाऊ दे. किंवा निरालंब होऊ दे.
134-12
अर्जुना हा फलत्यागु । आवडे कीर असलगु । परी योगामाजीं योगु । धुरेचा हा ॥134॥
अर्जुना ! हा फलत्याग अत्यंत सोपा दिसतो खरा, पण सर्व योगांमध्ये हा अग्रेसर योग आहे.
135-12
येणें फलत्यागें सांडे । तें तें कर्म न विरूढे । एकचि वेळे वेळुझाडें । वांझें जैसीं ॥135॥
ज्याप्रमाणे वेळूची झाडे एकदाच फळून वांझ होतात, त्याप्रमाणे या फलत्यागाने ज्या ज्या कर्माचा आपला संबंध तुटतो, ते ते कर्म पुढे फलद्रूप होत नाही.



136-12
तैसें येणेंचि शरीरें । शरीरा येणें सरे । किंबहुना येरझारे । चिरा पडे ॥136॥
त्याचप्रमाणे या प्राप्त शरीराबरोबर पुनः शरीराला येणे नाहीसे होते. किंबहुना जन्ममरणरूपी फेर्‍याच बंद पडतात.
137-12
पैं अभ्यासाचिया पाउटीं । ठाकिजे ज्ञान किरीटी । ज्ञानें येइजे भेटी । ध्यानाचिये ॥137॥
अर्जुना! अभ्यासाच्या पायरीने आत्मज्ञान प्राप्त करून, पुढे आत्मज्ञानाच्या द्वारा ध्यानाच्या भूमिकेची भेट घ्यावी.
138-12
मग ध्यानासि खेंव । देती आघवेचि भाव । तेव्हां कर्मजात सर्व । दूरी ठाके ॥138॥
याप्रमाणे भगवंताचे ध्यान चित्तात दृढ झाले असता, चित्ताचे व इंद्रियांचे सर्व व्यापार सहजच ध्यानात असलेल्या भगवंताला समर्पण होतात आणि जीवाचा संपूर्ण कर्माशी संबंध तुटतो.
139-12
कर्म जेथ दुरावे । तेथ फलत्यागु संभवे । त्यागास्तव आंगवे । शांति सगळी ॥139॥
कर्माचा निःशेष संबंध सुटला असताच कर्मफळ भोगण्याचा प्रसंग येत नाही, म्हणून कर्मफलत्याग होतो. अशा कर्मरूपत्यागानेच चित्त पूर्ण शांत होते.
140-12
म्हणौनि यावया शांति । हाचि अनुक्रमु सुभद्रापती । म्हणौनि अभ्यासुचि प्रस्तुतीं । करणें ए थ ॥140॥
म्हणून चित्ताला अशी निर्वासन स्थिती प्राप्त होण्याकरिता, हे अर्जुना ! आता सांगितलेला हाच क्रम इष्ट असून, येथे प्रथम अभ्यासच केला पाहिजे.
श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ञानाद् ध्यानं विशिष्यते ।
ध्यानात कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिनिरन्तरम् ॥12.12॥

अर्थ अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे, ध्यानापेक्षा कर्मफलत्याग श्रेष्ठ आहे आणि नंतर कर्मफलत्यागापेक्षाही शांती श्रेष्ठ आहे.॥12-12॥
(भक्तियोगातील क्रम = अभ्यास – ज्ञान – ध्यान – कर्मफलत्याग)


141-12
अभ्यासाहूनि गहन । पार्था मग ज्ञान । ज्ञानापासोनि ध्यान । विशेषिजे ॥141॥
हे अर्जुना! अभ्यासापासूनच दुर्गम असे आत्मज्ञान प्राप्त होते. मग त्या ज्ञानापासून विशेष अशा ध्यानाची प्राप्ती होते.
142-12
मग कर्मफलत्यागु । तो ध्यानापासोनि चांगु । त्यागाहूनि भोगु । शांतिसुखाचा ॥142॥
त्या ध्यानापासून उत्तम असा कर्मफलत्याग प्राप्त होऊन, त्या त्यागापासून परमेश्वराच्या शांतीसुखाचा किंवा निर्वासन अशा ब्रह्मसुखाचा लाभ होतो.
143-12
ऐसिया या वाटा । इहींचि पेणा सुभटा । शांतीचा माजिवटा । ठाकिला जेणें ॥143॥
हे उत्तम योद्ध्या अर्जुना ! अशा या ब्रह्मसुखाच्या प्राप्तीच्या निरनिराळ्या प्रक्रियामार्गाने व याच टप्प्याटप्प्याने जाऊन, ज्याने निर्वासन अशी पूर्णब्रह्मस्थिती प्राप्त करून घेतली.
अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च ।
निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी ॥12.13॥

अर्थ सर्व भूतांचे ठिकाणी द्वेषरहित (सर्व भूतांचे ठिकाणी) मैत्री असणारा, कृपायुक्त, मी माझेपणारहित सुख व दु:ख समान मानणारा क्षमाशील॥12-13॥
(भक्ताची लक्षणे)
144-12
जो सर्व भूतांच्या ठायीं । द्वेषांतें नेणेंचि कहीं । आपपरु नाहीं । चैतन्या जैसा ॥144॥
ज्याप्रमाणे सर्वव्यापी चैतन्याला आप-पर भाव मुळीच नाही, त्याप्रमाणे अद्वैतचैतन्यस्वरूप झाल्यामुळे ज्याला आप-पर भासतच नाही, म्हणून जो कोणत्याही प्राण्याच्या ठिकाणी द्वेष करीत नाही.
145-12
उत्तमातें धरिजे । अधमातें अव्हेरिजे । हें काहींचि नेणिजे । वसुधा जेवीं ॥145॥
उत्तम वस्तूंना धारण करावे व सर्व वाईट वस्तूंना दूर लोटावे असा भेदभाव करण्याचे, ज्याप्रमाणे पृथ्वी मनात आणीत नाही.


146-12
कां रायाचें देह चाळूं । रंकातें परौतें गाळूं । हें न म्ह्णेचि कृपाळू । प्राणु पैं गा ॥146॥
किंवा, बा अर्जुना ! राजाच्या देहाचे चलनवलन करीन आणि दारिद्र्याचा देह टाकून देईन, असे सर्वावर दया करणारा प्राण कधी म्हणत नाही.
147-12
गाईची तृषा हरूं । कां व्याघ्रा विष होऊनि मारूं । ऐसें नेणेंचि गा करूं । तोय जैसें ॥147॥
किंवा फक्त गाईचीच तहान भागवीन, पण व्याघ्राचा मात्र विष होऊन प्राण घेईन, असे पाणी कधी करू इच्छित नाही.
148-12
तैसी आघवियांचि भूतमात्रीं । एकपणें जया मैत्री । कृपेशीं धात्री । आपणचि जो ॥148॥
त्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी एकपणे-म्हणजे प्राणीमात्रांचे ठिकाणी मीच एक आहे या अद्वैत-जाणीवेने जो सर्वांशी मैत्री करतो- म्हणजे सर्वांच्या हिताची इच्छा ठेवतो- सर्व प्राणीमात्रावर केल्या जाणार्‍या कृपेची आपणच जो जन्मदात्री आई होतो,
149-12
आणि मी हे भाष नेणें । माझें काहींचि न म्हणे । सुख दुःख जाणणें । नाहीं जया ॥149॥
आणि हा देह म्हणजे मी, असा देहाहंकार ज्यांना कधी उठत नाही, म्हणून माझे काही आहे अशी ज्यांच्या चित्तात आसक्ती नसते व ज्यांना सुखदुःखाचा भोगही होत नाही,
150-12
तेवींचि क्षमेलागीं । पृथ्वीसि पवाडु आंगीं । संतोषा उत्संगीं । दिधलें घ र ॥150॥
त्याचप्रमाणे क्षमेच्या दृष्टीने ज्याच्या अंगी पृथ्वीचाच विस्तार झाला आहे आणि ज्याने आपल्या मांडीवर संतोषाला राहण्याला नेहमी जागा दिली.
सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः ॥12.14॥

अर्थ सर्वदा संतुष्ट, योगी, नियतचित्त, माझ्या ठिकाणी ज्याचे मन दृढ आहे असा, माझे ठिकाणी ज्याने मन व बुद्धी अर्पण केली आहेत असा जो माझा भक्त असतो, तो मला प्रिय आहे.॥12-14॥

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading