भगवद्गीता गीता व ज्ञानेश्वरी आरती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

भगवद्‍ गीता आरती – (हिंदी)

गायक : अनुराधा पौडवाल.

 जय भगवद् गीते, जय भगवद् गीते ॥
हरि-हिय-कमल-विहारिणि सुन्दर सुपुनीते ॥
॥जय॥

कर्म-सुमर्म-प्रकाशिनि कामासक्तिहरा ॥
तत्त्वज्ञान-विकाशिनि विद्या ब्रह्म परा
॥जय॥

निश्चल-भक्ति-विधायिनि निर्मल मलहारी ॥
शरण-सहस्य-प्रदायिनि सब विधि सुखकारी
॥जय॥

राग-द्वेष-विदारिणि कारिणि मोद सदा ॥
भव-भय-हारिणि तारिणि परमानन्दप्रदा
॥जय॥

आसुर-भाव-विनाशिनि नाशिनि तम रजनी ॥
दैवी सद् गुणदायिनि हरि-रसिका सजनी
॥जय॥

समता, त्याग सिखावनि, हरि-मुख की बानी ॥
सकल शास्त्र की स्वामिनी श्रुतियों की रानी
॥जय॥

दया-सुधा बरसावनि, मातु ! कृपा कीजै ॥
हरिपद-प्रेम दान कर अपनो कर लीजै
॥जय॥

गीतेची आरती (मराठी)

जय देवी जय देवी जय भगवद्गीते ॥
आरती ओंवाळूं तुज वेदमाते
॥ध्रु०॥

सुखकरणी दुखहरणी जननी वेदांची ॥
अगाध महिमा तूझ नेणें विरिंची ॥
ते तूं ब्रह्मीं तल्लीन होसी ठायींची ॥
अर्जुनाचे भावें प्रगटें मुखींची
॥जय देवी० ॥१॥

सात शतें श्लोक व्यासोक्ती-सार ॥
अष्टादश अध्याय इतुका विस्तार ॥
एक अर्ध पाद करितां उच्चार ॥
स्मरणमात्रें त्यांचा निरसे संसार
॥जय देवी० ॥२॥

काय तूझा पार वर्णूं मी दीन ॥
अनन्यभावें तुजला आलों मी शरण ॥
सनाथ करीं माये कृपा करून ॥
बाप रखुमादेवीवर दास मान
॥जय देवी० ॥३॥

श्रीसंत बहिणाबाईकृत ज्ञानेश्वरीची आरती

जय माय ज्ञानदेवी, शब्दरत्‍न जान्हवी ।
प्राशिता तोय तुझे, सुख होतसे जीवी ॥धृ.॥

अनर्घ्य साररत्‍ने, सिंधू मंथुनि गीता ।
काढीले भूषणासी, वैराग्य भाग्यवंता ॥१॥

अमृतसार ओवी, शुध्द सेविता जीवी ।
जीवचि ब्रह्म होती, अर्थ ऐकता तेही ॥२॥

नव्हती अक्षरे ही, निज निर्गुण भुजा ।
बहिणी क्षेम देती, अर्थ ऐकता ओजा ॥३॥

श्रीसंत तुकाराम महाराजांच्या सत्शिष्या श्री बहिणाबाईंनी ज्ञानेश्वरीवर ही जी आरती लिहिली आहे तीचा अर्थ अत्यंत प्रगाढ आहे, सूक्ष्म आहे. खरोखर, एखादी गोष्ट संपूर्णपणे उमगल्यानंतरच आपण अगदी मोजक्या शब्दात त्या गोष्टीचे यथार्थ वर्णन आपण करु शकतो. श्रीसंत बहिणाबाईंच्या वरील आरतीमध्ये ही गोष्ट प्रकर्षाने जाणविते. अत्यंत मार्मिक शब्दात बहिणाबाई म्हणत आहेत: `हे ज्ञानेश्वरी आई, तू शब्दांचे रुप घेतलेली गंगा आहेस. तुझ्या (अर्थरुपी) जलाचे प्राशन केल्यावर सर्व जीवांना सुख प्राप्त होत आहे. तुझ्या ओवींमध्ये भगवद्‍गीतेतील तत्वज्ञानाच्या सागराला (स्वतःच्या साधनेने) मंथुन काढलेली ही बोधसाराची रत्‍ने आहेत जी अंगात वैराग्य बाणलेल्या भाग्यवंतांना लेयावयास योग्य आहेत. ज्ञानेश्वरी ओवींमधील अमृतमय बोधाचे सेवन करणारा (म्हणजे आपल्या दररोजच्या जीवनात त्यानुसार वर्तन करणारा) जीव ब्रह्मरुप होतो. (इतकेच नव्हे) तर हा बोध मनापासून ऐकल्यानेही जीवाची भवसागरातून सुटका होते (म्हणजे ज्ञानेश्वरीवर असलेला संपूर्ण विश्वासही मुक्‍ती द्यायला पुरेसा आहे). (ह्या ज्ञानेश्वरीतील) अक्षरे म्हणजे प्रत्यक्ष श्री ज्ञानेश्वर महाराजांचे निर्गुण, अमूर्त बाहू आहेत आणि ज्ञानेश्वरीतील ओवींचा ओजस्वी अर्थ ऐकताना (त्या प्रक्रियेद्वारे) बहिणाबाईंना माऊलींनी कवटाळले आहे (याची जाणीव बहिणाबाईंना होत आहे).

वैराग्य बाणवा म्हणती संत । तेव्हा घाबरता का तुम्ही पंत? ।
वैराग्यात नाही सुखाचा अंत । होईल प्राप्त अमृत अनंत ॥

विवेक आणि वैराग्य हे परमार्थाच्या मार्गावर चालताना अत्यंत जरुरी असणारे अंगरक्षक आहेत! अध्यात्माच्या मार्गावर इतके धोके आहेत, इतके वाटमारे टपून बसलेले आहेत की यांच्या संरक्षणाशिवाय आपणास हा मार्ग चालता येईल असे वाटत नाही. काम, क्रोध, मत्सर इत्यादी षडरीपुंना ताब्यात आणायचे असेल तर विवेकाच्या तलवारीने आणि वैराग्याच्या अग्नीने त्यांना निपटणे हा एक रामबाण उपाय आहे. वैराग्य हा शब्द असा आहे की तो ऐकल्यावर सर्वसाधारण साधकाच्या मनात धडकीच भरते. अंगाला राख फासून जगभर उघडे फिरणाऱ्या संन्यासाची मूर्ती वैराग्य शब्दाने आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. परंतु वैराग्याचे हे एकच रुप आहे असे नाही. प्रत्येक माणसाच्या जीवनात वैराग्य वेगळे रुप घेऊन जन्माला येते आणि काही काळाने नष्ट होते. परत दुसरे रुप घेऊन अस्तित्वास येते आणि नाश पावते. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाच्या जीवनात वैराग्य शुभमंगल सावधान’ हे शब्द ऐकल्यावर बोहल्यावरुन पळून जायचे असे रुप घेते तर कुणाच्या जीवनातमी कशाला ही सर्व धडपड करीत आहे?’ ह्या प्रश्नात वैराग्य उद्भवते. हे वैराग्य मग अभिलाषा आणि नंतर परत वैराग्य अशा रुपातील चक्र प्रत्येक माणसाच्या जीवनात निरंतर चालू आहे. आणि स्वतःच्या जीवनात रहाटगाडग्याप्रमाणे चालू असलेल्या ह्या चक्राच्या सहाय्याने साधकाला अधिकाधिक उंच चढून भगवंताच्या जवळ जायचे असते. असे करण्यामधील मेख ही आहे की एकदा वैराग्य आलेल्या गोष्टीबद्दल परत प्रेमाचा उमाळा काढत न बसणे. तेव्हा आपल्या मनातील वैराग्य ह्या शब्दाबद्दलची भिती काढून टाका. कुठल्याही साच्यात न बसणारा हा शब्द आहे. त्या शब्दाला अंगाला राख फासून जगभर हिंडणाऱ्या, कुणाची वा कशाचीही पर्वा न करणाऱ्या विक्षिप्त माणसाच्या साच्यात घालू नका. तुमच्या जीवनात येणारे वैराग्य तुम्हाला सहन होईल इतकेच असेल. त्याची सुरुवात अगदी सकाळचा चहा वेळेवर मिळाला नाही तरी चालेल’ या अत्यंत क्षुल्लक रुपाने सुरु होणार असेल. परंतु माऊलींनी म्हटले आहेसद्‌बुध्दी ही थेकुटी म्हणो नये’! अगदी छोट्याशा ठिणगीतही वणवा लावण्याचे सामर्थ्य असते हे लक्षात ठेवा. सुरुवातीला क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींतील वैराग्य प्रचंड मोठे रुप केव्हा घेईल हे तुम्हाला कळणारदेखील नाही. तेव्हा आधी हे ध्यानात घ्या की वैराग्य तुमच्या जीवनात हळूहळू आणि तुम्हाला पचेल असेच येणार आहे. अचानक वैराग्य अंगात आले तर माझ्यावर अवलंबून असणाऱ्या जीवांचे काय होईल अशी व्यर्थ चिंता न करिता आलेल्या वैराग्याला सामोरे जा. आपोआप प्राप्त झालेल्या विरक्‍तीला टाळून परत व्यावहारिक जीवनात स्वतःला गुरफटवायचा आत्मविनाशी खेळ खेळणे थांबवा.

आता दुसरी भीती म्हणजे माझे आयुष्य वैराग्याच्या आगीने उजाड, वैराण होईल ही चिंता. आपण म्हणत असतो की ठीक आहे, आज मला जे सुख मिळत आहे ते शाश्वत नसले तरी थोडाकाळ का होईना ते माझ्या जीवनात आहे. परंतु एकदा वैराग्य अंगात भिनले की सध्याच्या सुखात मन रमणार नाही आणि दुसरे काही सुख मिळणार आहे असे वाटत नाही. मग कशाला उगाच आहे ते सुख सोडा?’ वरील आरतीतील पहिल्या चरणात बहिणाबाईंनी ह्या कल्पनेतील फोलपणा दाखवून दिला आहे.अनर्घ्य साररत्‍ने, सिंधू मंथुनि गीता, काढीले भूषणासी वैराग्य भाग्यवंता’. अहो, वैराग्य अंगात बाणलेल्या माणसाला संपूर्ण उघडे होऊन फिरायला लागेल याची इतकी काळजी भगवंतांना आहे की अशा माणसांना लेयावयाला त्यांनी अगोदरच जवाहिऱ्याचे दुकान उघडले आहे! त्या म्हणत आहेत की भगवंताला आपल्या भक्‍तांची जीवनात अपरिहार्यपणे येणाऱ्या अंगात वैराग्य आहे, व्यावहारिक जीवनातील रस गेला आहे पण परमेश्वराची प्राप्ती अजून झाली नाही’ अशा स्थितीची इतकी काळजी आहे की त्यावेळी आनंद प्राप्त करुन देण्याकरीता त्यांनी स्वतः अवतार घेऊन ज्ञानेश्वरी लिहिली आहे असे श्री बहिणाबाई म्हणत आहेत. श्रीसंत बहिणाबाईंचे विचार किती सुंदर आणि सूक्ष्म आहेत बघा. मगाशी आपण बघितले की आपल्या मनात वैराग्याबद्दलच्या भितीचे एक कारण म्हणजे हे सर्व करुन काय प्राप्त होणार आहे? हा भेडसावणारा प्रश्न. त्या प्रश्नाचे उत्तर आता आपणास मिळाले आहे. व्यावहारिक जीवनातील रस गेल्यावर काय मिळेल तर ज्ञानेश्वरीतील ओव्यांमधील अमृतरसाचे प्राशन. इतका सुंदर पर्याय उपलब्ध असताना का आपण मनोरंजन आणि देहसुख यांचा दहिभात, लोणचे या बेतावर समाधान मानावे याचा विचार करा! उगाच नाही वैराग्य बाणलेल्या मानवांनाभाग्यवंत’ या विशेषणाने गौरविले आहे.

वाचकहो, दररोज ज्ञानेश्वरी वाचायच्याआधी ही आरती म्हणा आणि माऊलींपाशी प्रार्थना करा की आमच्या अंगात वैराग्य येऊ दे आणि म्हणा की तुमच्या ओवींतील भावार्थ इतका खोल आहे, गूढ आहे की एका जन्मात त्याचे ज्ञान होणे अशक्य आहे. परंतु त्या अतिशय सुंदर, अनंत अशा भावार्थाचे निदान एक अंग तरी तुम्ही दाखवा. आम्ही त्यातच कृतार्थ होऊ.

॥ हरि ॐ ॥

भगवद्गीता संहिता व्हिडीओ

भगवद्गीता १८ अध्याय

अष्टवक्र गीता

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *