सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १५५१ ते १५७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

1551-18
तैसा ब्रह्म मी हें विसरे । तेथ जगचि ब्रह्मत्वें भरे । हेंही सांडी तरी विरे । ब्रह्मपणही ॥1551॥
त्याप्रमाणे, प्रथम असलेली “मी ब्रह्म ही वृत्ति सुटून जो जगाकडे पहातो तेव्हां, त्याला तेंही ब्रह्मरूप दिसावें व त्या वृत्तीच्या लयाने ब्रह्मपणाही स्वरूपांत विरावा. 51
1552-18
ऐसा मोडतु मांडतु ब्रह्में । तो दुःखें देहाचिये सीमे । मी अर्जुन येणें नामें । उभा ठेला ॥1552॥
असा त्याचा ब्रह्मस्थितीशी, कधी आपलेपणे तर कधीं जगद्रूपाने आनंदविलास सुरू असतां (देवांच्या ह्या प्रश्नानें) मी अर्जुन अशा प्रकारें देहबुद्धीवर येतांना त्याला कष्ट झाले.52
1553-18
मग कांपतां करतळीं । दडपूनि रोमावळी । पुलिका स्वेदजळीं । जिरऊनियां ॥1553॥
व मग कंप पावणाऱ्या करतलाने अंगावरील रोमांच बसवून व घामबिंदु जिरवून 53
1554-18
प्राणक्षोभें डोलतया । आंगा आंगचि टेंकया । सूनि स्तंभु चाळया । भुलौनियां ॥1554॥
व कष्टामुळे होणाऱ्या दीर्घ श्वासोच्छवासान डोलणारे शरीर त्याच्याच आंतील आधारानें सांवरून हालचाल बंद होत्साता स्तब्ध उभा राहिला.54
1555-18
नेत्रयुगुळाचेनि वोतें । आनंदामृताचें भरितें । वोसंडत तें मागुतें । काढूनियां ॥1555॥
दोन्ही नेत्रांच्या कडांनीं वाहणारे आनंदाश्रूचें भरतें पुसून टाकुन 55

1556-18
विविधा औत्सुक्यांची दाटी । चीप दाटत होती कंठीं । ते करूनियां पैठी । हृदयामाजीं ॥1556॥
नाना प्रकारची चित्ताची उत्सुकता कंठ भरून आणित होती; पण तिला आंतल्याआंत जिरवून 56
1557-18
वाचेचें वितुळणें । सांवरूनि प्राणें । अक्रमाचें श्वसणें । ठेऊनि ठायीं ॥1557॥
अव्यवस्थितपणे व होणारे श्वासाचे व्यापार व विस्कळित झालेली वाचा ह्यांना त्याने नित्याच्या स्थितीवर आणिलें. 57
अर्जुन उवाच ।
नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत ।
स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव ॥18.73॥

1558-18
मग अर्जुन म्हणे काय देवो । पुसताति आवडे मोहो । तरी तो सकुटुंब गेला जी ठावो । घेऊनि आपला ॥1558॥
आणि अर्जुन म्हणाला, देवा, माझा मोह आहे की गेला असे मला विचारले ना? तर त्याने माझ्या चित्तांतील आपलें बिऱ्हाड सकुटुंब (कारणाज्ञानासह) हालविलें आहे.58
1559-18
पासीं येऊनि दिनकरें । डोळ्यातें अंधारें । पुसिजे हें कायि सरे । कोणे गांवीं? ॥1559॥
सूर्याने डोळयाच्या जवळ येऊन अंधार भासतो काय? असा प्रश्न करावा असे कोठेतरी झाले आहे काय? 59
1560-18
तैसा तूं श्रीकृष्णराया । आमुचिया डोळयां । गोचर हेंचि कायिसया । न पुरे तंव ॥1560॥
त्याप्रमाणे, हे श्रीकृष्णराया, आमच्या नेत्रांना तुझे प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर, त्याने कोणती गोष्ट होऊ शकणार नाहीं? 1560

1561-18
वरी लोभें मायेपासूनी । तें सांगसी तोंड भरूनी । जें कायिसेनिही करूनी । जाणूं नये ॥1561॥
त्यांतही मातेपेक्षाही अधिक प्रेमाने (कळवळ्यानें) जें कोणाच्याही मुखांतून श्रवण होणे शक्य नाहीं असें ज्ञान तोंड भरून (विस्तरशः) आम्हांस सांगितल्यावर (मग हा प्रश्न?) 61
1562-18
आतां मोह असे कीं नाहीं । हें ऐसें जी पुससी काई । कृतकृत्य जाहलों पाहीं । तुझेपणें ॥1562॥
आतां, मोह आहे की नष्ट झाला असे जे आपण विचारले, त्याचे उत्तर इतकंच कीं, देवा, त्वद्रूप झाल्यामुळे (अद्वैतस्थितीमुळे) मी आतां कृत्य कृत्य झालों. (मला आतां कांहींहीं कर्तव्य म्हणून उरलें नाहीं) 62
1563-18
गुंतलों होतों अर्जुनगुणें । तो मुक्त जालों तुझेपणें । आतां पुसणें सांगणें । दोन्ही नाहीं ॥1563॥
‘मी अर्जुन’ अशी भेदबुद्धि होती तोंवर बद्ध होतों खराच; पण त्या माझे तुझ्या स्वरूपाशी तात्त्विक ऐक्य झाल्यावर मी केव्हांही मुक्त होतों व आहेंहीं; असा निश्चय झाला, त्यामुळे आतां तुम्ही विचारणे व मी सांगणे या दोन्ही गोष्टी उरल्या नाहीत. 63
1564-18
मी तुझेनि प्रसादें । लाधलेनि आत्मबोधें । मोहाचे तया कांदे । नेदीच उरों ॥1564॥
तुझ्या कृपाप्रसादानें अभिव्यक्त झालेल्या आत्मबोधाने माझ्या चित्तांत तो मोह अगर त्याचे मूळ कांहीही उरू दिलें नाहीं. 64
1565-18
आतां करणें कां न करणें । हें जेणें उठी दुजेपणें । तें तूं वांचूनि नेणें । सर्वत्र गा ॥1565॥
आतां, ” करू कीं नको करू” हा विचार ज्या द्वैतभावावर नांदतो तो द्वैतभावच तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणीं लीन झाल्यामुळे तुझ्यावांचून मला सर्वत्र कांहींही दिसत नाही. 65

1566-18
ये विषयीं माझ्या ठायीं । संदेहाचे नुरेचि कांहीं । त्रिशुद्धि कर्म जेथ नाहीं । तें मी जालों ॥1566॥
ह्याविषयी माझ्या अंतःकरणांत तिळमात्र संदेह नाही; कारण जेथे कर्माचा कालत्रयी संबंध होणे शक्य नाही अशी “नैष्कम्यं” स्थिति। (ब्रह्मास्थिति ) मी लाधलों आहें.66
1567-18
तुझेनि मज मी पावोनी । कर्तव्य गेलें निपटूनी । परी आज्ञा तुझी वांचोनि । आन नाहीं प्रभो ॥1567॥
देवा, आपल्या कृपेने मला माझ्या यथार्थस्वरूपाचे दर्शन होऊन, आतां माझे म्हणून वाटणारे सर्व कर्तव्य निपटून नाहीसे झाले आहे; उरलेच असेल तर, देवा, आपली आज्ञा प्रमाण’ ह्यावांचून अन्य कांहीही नाहीं. 67
1568-18
कां जें दृश्य दृश्यातें नाशी । जें दुजें द्वैतातें ग्रासी । जें एक परी सर्वदेशीं । वसवी सदा ॥1568॥
कारण ज्या दृश्याच्या (तुझ्या व्यक्त मूर्तीच्या) दर्शनाने आपल्यासह दृश्यमात्र लयास जातं, तसेच ज्याचे दर्शन द्वैताची वार्ता उरू देत नाही, व जें व्यक्त एक असे असले तरी सर्वव्यापक आहे. 68
1569-18
जयाचेनि संबंधें बंधु फिटे । जयाचिया आशा आस तुटे । जें भेटलया सर्व भेटे । आपणपांचि ॥1569॥
ज्याच्या समागमानें बंधापासून मुक्त होतो व ज्याच्या प्राप्तीने अन्य कशाचीही आशा उरत नाही,69
1570-18
तें तूं गुरुलिंग जी माझें । जें येकलेपणींचें विरजें । जयालागीं वोलांडिजे । अद्वैतबोधु ॥1570॥
असें जें देवा, तुम्ही माझे गुरु-स्थान (पद) की ज्याच्या सहाय्याने माझे अद्वितीय एकपण प्रकट झाले, व म्हणूनच ज्याच्याविषयींच्या आदराने तो अद्वैतबोधही बाजूस सारून ज्याच्या दर्शनाची इच्छा होते 1570

1571-18
आपणचि होऊनि ब्रह्म । सारिजे कृत्याकृत्यांचें काम । मग कीजे का निःसीम । सेवा जयाची ॥1571॥
व ज्याच्या कृपेने आपलें असलेले ब्रह्मत्व आपल्यास पटून कृत्याकृत्यांचे सर्व ओझे ( विधिकिर्करत्व) नाहीसे होते व ह्या खऱ्या कृतज्ञतेचे चिन्ह म्हणजे अशा गुरुमाउलीची निःसीम सेवा करणे एवढे एकच कर्तव्य भक्ताला उरतें. 71
1572-18
गंगा सिंधू सेवूं गेली । पावतांचि समुद्र जाली । तेवीं भक्तां सेल दिधली । निजपदाची ॥1572॥
गंगा, सागराच्या भेटीस गेली कीं तेणें सागररूपच होते, त्याप्रमाणे तुम्ही आपल्या भक्ताल निजपदाची जोड करून देतां. 72
1573-18
तो तूं माझा जी निरुपचारु । श्रीकृष्णा सेव्य सद्गुरु । मा ब्रह्मतेचा उपकारु । हाचि मानीं ॥1573॥
देवा, तुम्ही माझे ब्रह्मत्व मला दिले ह्याबद्दल उतराई होणे म्हणजे माझ्या स्वाधीन असणारी एकच गोष्ट आहे की, मी अशा माझ्या सद्गुरूची अकृत्रिमपणें आजन्म सेवा करावी. 73
1574-18
जें मज तुम्हां आड । होतें भेदाचें कवाड । तें फेडोनि केलें गोड । सेवासुख ॥1574॥
जो तुमच्या व माझ्यामध्ये भेदाचा प्रतिबंध होता त्याचा परिहार केल्याने आतां हें सेवासुख निरुपम होय. 74
1575-18
तरी आतां तुझी आज्ञा । सकळ देवाधिदेवराज्ञा । करीन देईं अनुज्ञा । भलतियेविषयीं ॥1575॥
तरी हे सकल देवाधिदेवराया, तू आतां वाटेल ती आज्ञा कर, तें करीनच. 75

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *