कालभैरवाष्टक-मराठी अर्थासहित

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

देवराज्य सेव्यमान पावनाघ्रिपंकजम्।
व्यालयज्ञ सूत्रमिंदू शेखरं कृपाकरम्।
नारदादि योगिवृंद वंदितं दिगंबरम्।
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे ।।१।।

कालभैरवाष्टक स्तोत्राचा मराठी अर्थ:
ज्यांच्या पवित्र चरण कमलांची देवराज इंद्र नेहमी पूजा करतात, ज्यांनी शिरोभूषण म्हणून चंद्राला धारण केले आहे, सर्प ज्यांनी यज्ञोपवित्र म्हणून धारण केला आहे, जे दिगंबर आहेत व नारद आणि इतर योगिजन ज्यांची पूजा करतात अशा काशी नगरी मध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो. ।।१।।

भानुकोटिभास्वरं भवाब्दितारकं परं।
नीलकण्ठमीप्सिथार्थ दायकं त्रिलोचनम।
कालकाल मम्बुजाक्ष मक्षशूलमक्षरं।
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।२।।

जे कोटी सूर्यांप्रमाणे तेजस्वी व दीप्तिमान आहेत, संसाररूपी सागरातून तारणारे, श्रेष्ठ, निळा कंठ असलेले, इच्छित वस्तू देणारे, तीन डोळ्यांचे, कमळासारखे डोळे असणारे आणि अक्षमाला व त्रिशूल धारण करणारे अशा काशी नगरी मध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो. ।।२।।

शूलटंक पाशदण्ड पाणिमादिकारणं।
श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम।
भीमविक्रम प्रभुं विचित्र तांडवप्रियं।
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।३।।

ज्यांचे शरीर श्यामवर्ण आहे, ज्यांनी हातात शूल, टंक, पाश आणि दंड घेतलेला आहे, जे आदिदेव, अविनाशी आणि आदिकारण आहेत, जे त्रिविध तापांपासून मुक्त आहेत, ज्यांचा पराक्रम महान आहे, जे सर्वसमर्थ आहेत, आणि ज्यांना तांडव नृत्य आवडते अशा काशी नगरी मध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो. ।।३।।

भुक्तिमुक्ति दायकं प्रशस्तलोकविग्रहं।
भक्तवस्तलं स्थितं समस्तलोकविग्रहं।
विनिकण्वन्मनोज्ञ् हेम् किंकिणीलस्तकटिं।
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।४।।

जे स्वरूप सुंदर व प्रशंसनीय आहेत, सर्वसंसार म्हणजे ज्यांचे शरीर आहे, ज्यांच्या कमरेला सुंदर रुणझूण आवाज करणारी सोन्याची साखळी आहे, जे भक्तांचे आवडते शिवस्वरूप आहेत, जे भुक्ति व मुक्ती देणारे आहेत अशा काशी नगरी मध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो. ।।४।।

धर्मसेतू पालकं अधर्ममार्ग् नाशकम्।
कर्मपाशमोचकम् सुशर्मदारकम् विभुम्।
स्वर्णवर्ण शेष् पाश शोभितांगमण्डलं।
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।५।।

जे धर्माचे पालक व अधर्माचा नाश करणारे आहेत, जे कर्मपशापासून सोडवणारे आहेत, जे मोठे कल्याण करणारे व सर्वव्यापक आहेत, ज्यांचे सर्व शरीर सोनेरी रंग असणाऱ्या शेषनागाने सुशोभित आहे अशा काशी नगरी मध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो. ।।५।।

रत्नपादुकाप्रभाभिराम पाद युग्मकम्।
नित्यमद्वितीयमिष्ट दैवतं निरंजनम्।
मृत्युदर्प नाशनं करालदंष्ट्र मोक्षणम्।
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।६।।

ज्यांच्या पायांमध्ये रत्नजडीत पादुका आहेत, जे निर्मळ, अविनाशी, अद्वितीय आणि सगळ्यांची इष्ट देवता आहेत, जे यमाचा अभिमान नष्ट करणारे व मृत्यूच्या दाढांतून वाचवणारे व मोक्ष देणारे आहेत अशा काशी नगरी मध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो. ।।६।।

अट्टहास भिन्नपद्म जाण्ड् कोश संततिं।
दृष्टिपात नष्टपाप जालमुग्र शासनं।
अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्धरं।
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।७।।

ज्यांच्या अट्टाहासाने ब्रह्मांडाचा समूह विदीर्ण होतो, ज्यांच्या कृपापूर्ण दृष्टिकटाक्षाने पापांचे डोंगर नष्ट होतात, ज्यांचे शासन कठोर आहे, जे आठ प्रकारची सिद्धी देणारे आहेत, ज्यांनी कपालमाला धारण केली आहे अशा काशी नगरी मध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो. ।।७।।

भूतसंघनायकं विशालकिर्तीदायकं।
काशिवास लोकपुण्यपापशोधकं विभुम्।
नितिमार्गकोविदम् पुरातनम् जगत्पतिं।
काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।८।।

जे सर्व प्राणिमात्रांचे नायक आहेत, जे आपल्या भक्तांना विशाल कीर्ती देणारे आहेत, जे काशीमध्ये राहणाऱ्या सर्वांच्या पाप-पुण्यांचा न्याय करणारे आणि सर्व व्यापक आहेत, जे नीतिमार्ग अनुसरणारे फार प्राचीन आहेत, जे संसाराचे स्वामी आहेत अशा काशी नगरी मध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो. ।।८।।

कालभैरवाष्टकम् पठन्ति ये मनोहरं।
ज्ञानमुक्ति साधनम् विचित्रपुण्यवर्धनम्।
शोक मोह दैन्य लोभ कोपतापनाशनम्।
ते प्रयान्ति कालभैरवांघ्रिसन्निधिम् धृवम् ।।९।।

ज्ञान आणि मुक्ती देणाऱ्या, भक्तांच्या पुण्याची वाढ करणाऱ्या, शोक, मोह, दीनता, लोभ आणि त्रिविध ताप नष्ट करणाऱ्या या मनोहर कालभैरवाष्टकाचे पठण करणारा निश्चितच अंती कालभैरवाच्या चरणकमलांजवळ वास करतो. ।।९।।

इति श्रीमत् शंकराचार्यविरचितं कालभैरवाष्टकम् संपूर्णम्।

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *