726-18
तैसें धर्मजात तितुकें । जिये बुद्धीसी पातकें । साच तें लटिकें । ऐसेंचि बुझे ॥726॥
तसे, शास्त्रांत सांगितलेल्या सर्व मार्गांचे आचरण करणे हे ज्या बुद्धीला घातक वाटते व खऱ्या गोष्टी खोट्या भासतात; 726
727-18
ते आघवेचि अर्थ । करूनि घाली अनर्थ । गुण ते ते व्यवस्थित । दोषचि मानी ॥727॥
जी शास्त्रांचा खरा अर्थ टाकून उलट अर्थ करिते व जे गुण म्हणून आहेत, त्या सर्वांस दोष मानते; 727
728-18
किंबहुना श्रुतिजातें । अधिष्ठूनि केलें सरतें । तेतुलेंही उपरतें । जाणे जे बुद्धी ॥728॥
किंबहुना श्रुतीस मान्य असलेल्या ज्या गोष्टी त्याही सर्व बुद्धीला विपरीत भासतात; 728
729-18
ते कोणातेंही न पुसतां । तामसी जाणावी पंडुसुता । रात्री काय धर्मार्था । साच करावी । ॥729॥
त्या बुद्धीला अर्जुना, कोणालाही न विचारता, बेलाशक तामसी म्हणावे. हे पहा, दानधर्माला रात्र उचित आहे काय? 729
730-18
एवं बुद्धीचे भेद । तिन्ही तुज विशद । सांगितले स्वबोध- । कुमुदचंद्रा ॥730॥
याप्रमाणे आत्मज्ञानरुप कमळाला विकसित करणाऱ्या चंद्रा अर्जुना, तुला बुद्धीचे तीन भेद स्पष्ट करून सांगितले. 730
731-18
आतां ययाचि बुद्धिवृत्ती । निष्टंकिला कर्मजातीं । खांदु मांडिजे धृती । त्रिविधा तया ॥731॥
आता, याच बुद्धीला कर्म करण्याविषयी जेव्हा निश्चय होतो, तेव्हा तिला धृती अशी संज्ञा प्राप्त होते व तिचे तीन प्रकार आहेत. 731
732-18
तिये धृतीचेही विभाग । तिन्ही यथालिंग । सांगिजती चांग । अवधान देईं ॥732॥
त्या धृतीच्याही तीन प्रकारांची लक्षणे स्पष्टपणे सांगतो तिकडे लक्ष दे. 732
धृत्या यया धारयते मनःप्राणेन्द्रियक्रियाः ।
योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्त्विकी ॥18.33॥
733-18
तरी उदेलिया दिनकरु । चोरीसिं थोके अंधारु । कां राजाज्ञा अव्यवहारु । कुंठवी जेवीं ॥733॥
सूर्योदय होताच जसा चौर्यकर्मासह अंधकार नाहीसा होतो, किंवा राजाज्ञा झाली असता कुव्यवहार बंद पडतो, 733
734-18
नाना पवनाचा साटु । वाजीनलिया नीटु । आंगेंसीं बोभाटु । सांडिती मेघ ॥734॥
किंवा वारा एकसारखा सपाट्याने वाहू लागला म्हणजे मेघ हे आपल्या गर्जनासह नाहीतसे होतात, 734
735-18
कां अगस्तीचेनि दर्शनें । सिंधु घेऊनि ठाती मौनें । चंद्रोदयीं कमळवनें । मिठी देती ॥735॥
अथवा अगस्ती ऋषीं च्या दर्शनाने समुद्राच्या गर्जना बंद पडतात, किंवा चंद्रोदय झाल्यावर सूर्य विकासिनी कमळे आपोआप मिटतात; 735
736-18
हें असो पावो उचलिला । मदमुख न ठेविती खालां । गर्जोनि पुढां जाला । सिंहु जरी ॥736॥
फार काय सांगावे? गर्जना करून सिंह पुढे आला मदोन्मत्त हत्तीलादेखील उचललेला पायाखाली ठेवण्याचे सुचत नाही, 736
737-18
तैसा जो धीरु । उठलिया अंतरु । मनादिकें व्यापारु । सांडिती उभीं ॥737॥
तसे सात्विक धैर्य उत्पन्न झाले असता मन prअnअv, प्राण व इंद्रिये यांचे व्यापार जागच्याजागी बंद पडतात, 737
738-18
इंद्रियां विषयांचिया गांठी । अपैसया सुटती किरीटी । मन मायेच्या पोटीं । रिगती दाही ॥738॥
अर्जुना, इंद्रिये व विषय यांचा स्नेह आपोआप सुटतो आणि ती घाबरून आपली आई जे मन त्याच्या पोटात शिरतात. 738
739-18
अधोर्ध्व गूढें काढी । प्राण नवांची पेंडी । बांधोनि घाली उडी । मध्यमेमाजीं ॥739॥
प्राणाचे जी 9 प्रकारचे भेद आहेत, ते सर्व मोडून व एकत्र करून त्यात सुषुम्ना नाडीच्या कोठडीत अडकवून टाकिते; 739
740-18
संकल्पविकल्पांचें लुगडे । सांडूनि मन उघडें । बुद्धि मागिलेकडे । उगीचि बैसे ॥740॥
मनाचे संकल्प-विकल्प रुपी वस्त्र फेडून मन उघडे करिते आणि मग बुद्धी मनाच्या मागे स्वस्त बसते, 740
741-18
ऐसी धैर्यराजें जेणें । मन प्राण करणें । स्वचेष्टांचीं संभाषणें । सांडविजती ॥741॥
याप्रमाणें जो धैर्यराज, मन, प्राण व इंद्रिये यांच्या स्वकीय चेष्ठांची भाषणे बंद पाडितो; 741
742-18
मग आघवींचि सडीं । ध्यानाच्या आंतुल्या मढीं । कोंडिजती निरवडी । योगाचिये ॥742॥
मग सर्वांचा घेऊन त्यास व्यानाच्या आतल्या कोठडीत युक्तीने कोंडून टाकतो; 742
743-18
परी परमात्मया चक्रवर्ती । उगाणिती जंव हातीं । तंव लांचु न घेतां धृती । धरिजती जिया ॥743॥
परंतु चक्रवर्ती जो परमात्मा, त्याच्या ताब्यात त्यात देईपर्यंत त्याजपासून लांच न घेता त्यांना जो धैर्यराज सोडीत नाही. 743
744-18
ते गा धृती येथें । सात्विक हें निरुतें । आईक अर्जुनातें । श्रीकांतु म्हणे ॥744॥
लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात; असे जे धैर्य, ते केवळ सात्विक धैर्य होय, असे समज. 744
यया तु धर्मकामार्थान्धृत्या धारयतेऽर्जुन ।
प्रसण्गेन फलाकाण्क्षी धृतिः सा पार्थ राजसी ॥18.34॥
745-18
आणि होऊनियां शरीरी । स्वर्गसंसाराच्या दोहीं घरीं । नांदे जो पोटभरी । त्रिवर्गोपायें ॥745॥
आणि शरीर हेच माझे स्वरूप असे मानून जो स्वर्ग व संसार या दोहोत धर्म, अर्थ व काम या तीन उपायांनी आनंदाने वास करतो; 745
746-18
तो मनोरथांच्या सागरीं । धर्मार्थकामांच्या तारुवावरी । जेणें धैर्यबळें करी । क्रिया-वणिज ॥746॥
तो मनोरथ सागरात धर्मार्थकामरूपी नौकेवर ज्या धैर्यबळाने कर्माचा व्यापार करीत, 746
747-18
जें कर्म भांडवला सूये । तयाची चौगुणी येती पाहे । येवढें सायास साहे । जया धृती ॥747॥
जे कर्मरुपी भांडवल घातले असता त्याचा चौपट फायदा येतो असे मानून ज्या धैर्याने सहास कर्म करतो, 747
748-18
ते गा धृती राजस । पार्था येथ परीयेस । आतां आइक तामस । तिसरी जे कां ॥748॥
त्या धैर्यास अर्जुना, राजस धैर्य असे म्हणतात. ता तिसर्या तामस धैर्याची लक्षणे सांगतो ती ऐक. 748
यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च ।
न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी ॥18.35॥
749-18
तरी सर्वाधमें गुणें । जयाचें कां रूपा येणें । कोळसा काळेपणें । घडला जैसा ॥749॥
जसा कोळसा हा काळेपणाने घडलेला असतो, त्याप्रमाणे त्याचे स्वरूप सर्व अधम गुणांनी भरलेले असते अधर्म. 749
750-18
अहो प्राकृत आणि हीनु । तयाही कीं गुणत्वाचा मानु । तरी न म्हणिजे पुण्यजनु । राक्षसु काई? ॥750॥
अहो, प्राकृत (जड) आणि हीन असा असूनही त्याला गुण हे मोठे नाव देण्याचे प्रयोजन काय? 750
Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण
[…] […]
[…] […]