सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४ था ओवी २६ ते ५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

26-4
कैसा नेणों मोहो वाढीनला । तेणें बहुतेक काळु व्यर्थ गेला । म्हणोनि योगु हा लोपला । लोकीं इये ॥26॥
असा हा अज्ञानाचा मोह कसा वाढला,हे कांही कळत नाही. त्यामुळे बहुतेक काळ हा योगपरंपरेपासून व्यर्थ गेला, म्हणून या लोकी हा निष्काम कर्मयोग लुप्त झाला.
स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः ।
भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्॥4.3॥

भावार्थ :- तू माझा भक्त व सखा आहेस, म्हणून तोच पुरातन योग, मी तुला सांगितला आहे. कारण हे सर्व रहस्यातील उत्तम रहस्य आहे.
27-4
तोचि हा आजि आतां । तुजप्रती कुंतीसुता । सांगितला आम्हीं तत्वता । भ्रांति न करीं ॥27॥
हे कुंतीसुता ! तोच (श्रेष्ठ ज्ञानरहस्यरूप असा) योग आम्ही तुला यथार्थ पणाने कथन केला आहे. याविषयी मनात कोणत्याही प्रकारची (संशय,) भ्रांती बाळगू नकोस.
28-4
हें जीवींचे निज गुज । परी केवीं राखों तुज । जे पढियेसी तूं मज । म्हणऊनियां ॥28॥
हा योग म्हणजे माझ्या हृदयातील विशेष गुह्य आहे. पण तुझ्यापासून हा योग कसा बरें चोरून ठेऊ? कारण तू तर माझा अगदी लाडका आहेस.
29-4
म्हणून मी तुला तो सांगितला आहे. तूं प्रेमाचा पुतळा । भक्तीचा जिव्हाळा । मैत्रियेची चित्कळा । धनुर्धरा ॥29॥
हे अर्जुना ! तू जणू कांही प्रेमाचा पुतळा आहेस, भक्तीचा जिव्हाळा आहेस; जिवलग मित्रत्वरुपी चैतन्याचा अंश आहेत.(सख्याची जीवनकला आहेत).
30-4
तूं अनुसंगाचा ठावो । आतां तुज काय वंचूं जावों । जरी संग्रामारूढ आहों । जाहलों आम्ही ॥30॥
जरी आम्ही युद्धाला सज्ज झालो आहोत, तरी हे अर्जुना ! तुझा आणि माझा अगदी जवळचा संबंध आहे. त्यामुळे तुझ्यापासून कांही लपवून ठेवता येईल काय?


31-4
तरी नावेक हें सहावें । गाजाबज्यही न धरावें । परी तुझें अज्ञानत्व हरावें । लागे आधीं ॥31॥
तरी काही काळ हा युद्धाचा प्रसंग बाजूला ठेव. आमचे प्रथम कर्तव्य म्हणजे तुझे अज्ञान घालवून टाकले पाहिजे.
अर्जुन उवाच:
अपरं भवतो जन्मं परं जन्म विवस्वतः ।
कथमेतद् विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति॥4.4॥

भावार्थ :- अर्जुन म्हणाला, हे देवा ! आपला जन्म हा अलीकडचा, आणि सूर्याचा जन्म आपल्या फार पूर्वीचा आहे.असे असताना तू सुरुवातीला हा योग त्याला सांगितलास, हे मी कसे बरे जाणावे??
32-4
तंव अर्जुन म्हणे हरी । माय आपुलेयाचा स्नेहो करी । एथ विस्मो काय अवधारीं । कृपानिधी ॥32॥
तेंव्हा अर्जुन म्हणाला, हे कृपानिधी श्रीहरी ! आई आपल्या मुलावर प्रेम करते, यात नवल (आश्चर्य) ते काय?
33-4
तूं संसारश्रांतांची साऊली । अनाथ जीवांची माऊली । आमुतें कीर प्रसवली । तुझीच कृपा ॥33॥
आणि तू तर संसारतापाने दमलेल्या जीवांची सावली आहेस, अनाथ जीवांची आई आहेस आणि खरोखर तुझ्या कृपेच्या वर्षावानेच (तुझ्या कृपेमुळेच) जन्म झाला आहे.
34-4
देवा पांगुळ एकादें विईजे । तरी जन्मोनि जोजारू साहिजे । हें बोलों काय तुझें । तुजचि पुढां ॥34॥
हे देवा ! आईच्या पोटी एखाद्या पांगळ्या मुलाचा जन्म झाला, तर त्याच्या जन्मापासून आईला त्रास सोसावा लागतो. हे सर्व आपण जाणता, तर मग ह्या सर्व गोष्टी तुझ्यासमोर काय बोलाव्या??
35-4
आतां पुसेन जें मी कांही । तेथ निकें चित्त देईं । तेवींचि देवें कोपावें ना कांही । बोला एका ॥35॥
देवा ! आता तुला मी जे विचारणार आहे, त्याच्याकडे उत्तम प्रकारे लक्ष दे. माझ्या या प्रश्नांचा (बोलण्याचा) मुळीच राग धरू नकोस.ही विनंती.


36-4
तरी मागील जे वार्ता । तुवां सांगितली होती अनंता । ते नावेक मज चित्ता । मानेचिना ॥36॥
हे अनंता ! पूर्वीची गोष्ट म्हणून जी तू मला सांगितलीस, ती क्षणभर माझ्या मनाला पटतच नाही.
37-4
जे तो विवस्वतु म्हणजे कायी । ऐसें हें वडिलां ठाऊवें नाहीं । तरी तुवांचि केवीं पाहीं । उपदेशिला ॥37॥
पाहा, विवस्वानं म्हणजे कोण, याची आपल्या वाडवडिलांनासुद्धा ठाऊक नाही, तर पाहा तू त्याला उपदेश केलास, हे कसे बरे शक्य आहे.??
38-4
तो तरी आइकिजे बहुतां काळांचा । आणि तूं तंव कृष्ण सांपेचा । म्हणोनि गा इये मातुचा । विसंवादु ॥38॥
तो सूर्य तर फार प्राचीन काळातला आहे, असे आम्ही ऐकतो; आणि तू श्रीकृष्ण तर आजच्या काळाचा (अलीकडच्या काळात जन्माला आला आहात.). म्हणून तुझ्या बोलण्यामध्ये विसंगती दिसत आहे.
39-4
तेवींचि देवा चरित्र तुझें । आपण कांही काय जाणिजे । हें लटिके केवीं म्हणिजे । एकिहेळां ॥39॥
हे देवा ! तुझे चरित्र आम्हास काही कळत नाही. तर मग आपण जे बोलता, ते एकदम खोटे आहे, असे तरी कसे म्हणावे.??
40-4
परी हेचि मातु आघवी । मी परियेसें तैशी सांगावी । जे तुवांचि तया रवीं केवीं । उपदेशु केला ॥40॥
तेंव्हा प्राचीन काळी सूर्याला तू जो उपदेश केलास, तीच सगळी गोष्ट मला उत्तम प्रकारे समजू शकेल, अशा पद्धतीने सांगावी.
श्री भगवानुवाच:
बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन ।
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप॥4.5॥

भावार्थ :- श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना ! माझे व तुझे पुष्कळ जन्म होऊन गेले आहेत. त्या सर्वांना मी जाणतो. हे अर्जुना, तू मात्र ते जाणत नाहीस.


41-4
तंव कृष्ण म्हणे पंडुसुता । तो विवस्वतु जैं होता । तैं आम्ही नसों ऐसी चित्ता । भ्रांति जरी तुज ॥41॥
त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना ! जेंव्हा तो विवस्वानं होता, त्याकाळी आम्ही नव्हतो, अशी जर तुझ्या मनामध्ये भ्रांती निर्माण झाली असेल,
42-4
तरी तूं गा हें नेणसी । पैं जन्में आम्हां तुम्हांसी । बहुतें गेलीं परी तियें न स्मरसी । आपली तूं ॥42॥
तर तुला हे माहित नाही की, माझे आणि तुझे आजपर्यंत पुष्कळ जन्म झाले आहेत; परंतु तुला आपल्या गतजन्माचे स्मरण नाही.


43-4
मी जेणें जेणें अवसरें । जें जें होऊनि अवतरें । ते समस्तही स्मरें । धनुर्धरा ॥43॥
हे धनुर्धरा ! ज्या ज्या वेळी जे जे रूप घेऊन मी अवतरलो, त्या सर्व अवतारांचे मला स्मरण आहे.
अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतामामिश्वरोऽपि सन् ।
प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया॥4.6॥

भावार्थ :- मी अविनाशीस्वरूप अजन्मा असूनदेखील, सर्व भूतमात्रांचा ईश्वर असूनसुद्धा आपल्या प्रकृतीला वश करून मी योगमायेने प्रकट होत असतो.
44-4
म्हणोनि आघवें । मज मागील आठवें । मी अजुही परि संभवे । प्रकृतिसंगे ॥44॥
म्हणून मला मागील सर्व गोष्टींचे स्मरण होते. मी जन्मरहित आहे, तरीपण मायेच्या योगाने मी अवतार धारण करत असतो.
45-4
माझें अव्ययत्व तरी न नसे । परी होणें जाणें एक दिसे । ते प्रतिबिंबे मायावशें । माझांचि ठायीं ॥45॥
माझा अविनाशपणा कधीही नाहीसे होत नाही; परंतु अवतार घेणे व संपविणे, हा जो प्रकार दिसतो, तो माझ्या शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी मायेमुळे भासमान होतो.


46-4
माझी स्वतंत्रता तरी न मोडे । परी कर्माधीनु ऐसा आवडे । तेंही भ्रांतिबुद्धि तरी घडे । एर्‍हवीं नाहीं ॥46॥
माझे स्वातंत्र्य तर कधीही नष्ट होत नाही. मी कर्माच्या अधीन आहे, असे जे दिसते, ते भ्रांतीमुळे (आज्ञान) दिसते; परंतु खरोखर तसे नाही.
47-4
कीं एकचि दिसे दुसरें । तें दर्पणाचेनि आधारें । एर्‍हवीं काय वस्तुविचारें । दुजें आहे ॥47॥
जसे आरशामूळे एकाच वस्तूची दोन रूपे दिसतात; एरवी वस्तुस्थितीचा सूक्ष्म विचार केला, तर दुसरी वस्तू आहे काय??
48-4
तैसा अमूर्तचि मी किरीटी । परी प्रकृति जैं अधिष्ठीं । तैं साकारपणे नटें नटीं । कार्यालागीं ॥48॥
हे अर्जुना ! तसा मी निराकारच आहे. परंतु ज्यावेळी मी प्रकृतीचा (मायेचा) आश्रय घेतो, त्यावेळी कांही विशेष कार्यासाठी (धर्मकार्याकरिता) मी सगुण रूपाच्या वेषाने नटतो.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥4.7॥

भावार्थ :- हे भरतवंशी अर्जुना ! जेंव्हा जेंव्हा धर्माची ग्लानी होते, आणि अधर्म बळावू लागतो (वाढतो) तेंव्हा मी स्वतःला जन्मास घालतो.(मी अवतार घेतो)
49-4
जें धर्मजात आघवें । युगायुगीं म्यां रक्षावें । ऐसा ओघु हा स्वभावें । आद्य असे ॥49॥
कारण की, धर्माच्या संपूर्ण स्वरूपाचे (हा जो धर्मचा विचार आहे) प्रत्येक युगात मी रक्षण करावे, असा हा क्रम (प्रवाह) स्वभावतः अगदी मुळापासून (जगाच्या आरंभापासून) चालत आलेला आहे.
50-4

म्हणोनि अजत्व परतें ठेवी । मी अव्यक्तपणही नाठवीं । जें वेळीं धर्मातें अभिभवी । अधर्मु हा ॥50॥
म्हणून ज्या ज्या वेळी अधर्म हा धर्माचा ऱ्हास (पराभव) करू लागतो, त्या वेळी मी माझा जन्मरहितपणा बाजूला ठेवतो आणि माझ्या अव्यक्तपणाची आठवणही न ठेवता मी अवतार धारण करतो.
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥4.8॥

भावार्थ :- सज्जनांच्या रक्षणाकरिता, दुर्जनांच्या नाशाकरिता व धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी युगा-युगात प्रकट होत असतो.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *