सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी २६ ते ५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

26-6
ऐसें हळुवारपण जरी येईल । तरीच हें उपेगा जाइल । एरव्हीं आघवी गोठी होईल । मुकिया बहिरयाची ॥26॥
असे जर ब्रम्हस्वरूपाशी एकरूप होता येईल, तरच मी सांगितलेल्या निरुपणाचा उपयोग होईल; नाहीतर मुक्याने सांगावे आणि बहिऱ्याने ऐकावे, अशी अवस्था होईल.
27-6
परी तें असो आतां आघवें । नलगे श्रोतयांते कडसावें । जे एथ अधिकारिये स्वभावें । निष्कामकामु ॥27॥
परंतु आता हे सर्व असु दे. श्रोत्यांना सावध करण्याची आवश्यकता नाही. कारण या ठिकाणी निष्काम भावनेने परब्रह्मची इच्छा करणारे अधिकारसंपन्न श्रोते आहेत,
28-6
जिहीं आत्मबोधाचिया आवडी । केली स्वर्गसंसाराचि कुरोंडी । ते वांचुनी एथींची गोडी । नेणती आणिक ॥28॥
ज्यांनी आत्मज्ञानाच्या आवडीने, संसार व स्वर्ग यांच्या प्राप्तीची ओवाळणी केली आहे, अशा विरक्त मानवाशिवाय इतर लोक या अध्यात्मातील अमृतमधुर गोडी समजू शकणार नाहीत.
29-6
जैसा वायसीं चंद्र नोळखिजे । तैसा ग्रंथु हा प्राकृतीं नेणिजे । आणि तो हिमांशुचि जेवि खाजें । चकोराचें ॥29॥
ज्याप्रमाणे कावळ्यांना चंद्रांतून प्रगटणाऱ्या आनंददायी किरणांची ओळख नसते, त्याप्रमाणे विषयामध्ये आसक्त लोकांस हे प्रतिपादन समजणार नाही; आणि शीतल किरणांचा चंद्र हाच ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे चकोराचे खाद्य आहे,
30-6
तैसा सज्ञानासी तरी हा ठावो । अज्ञानासी आन गांवो । म्हणौनि बोलावया विषय पहाहो । विशेषें नाहीं ॥30॥
त्याप्रमाणे जे अध्यात्मज्ञानी / आत्मज्ञानी आहेत, त्यांना हा ग्रन्थ म्हणजे विश्रांतीचे स्थान आहे आणि जे बाह्य विषयांतच रमणारे अज्ञानी आहेत, त्यांना हा ग्रंथ परक्या गावाप्रमाणे आहे, म्हणून याविषयी विशेष बोलण्याचे कारण नाही.


31-6
परी अनुवादलो मी प्रसंगे । तें सज्जनी उपसाहावें लागे । आतां सांगेन काय श्रीरंगे । निरोपिलें जें ॥31॥
प्रसंगाने मी जे बोललो, त्याबद्दल सज्जनांनी मला क्षमा करावी, आता भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे सांगितले, ते मी सांगेन.
32-6
ते बुध्दीही आकळितां सांकडें । म्हणऊनि बोलीं विपायें सांपडे । परि निवृत्तिकृपादीपउजियेडें । देखेन मी ॥32॥
ते परब्रम्ह बुद्धीला आकलन करण्यास कठीण आहे, परंतु शब्दांत अधिकारसंपन्न पुरुषास सापडेल. परंतु मी सद्गुरू श्रीनिवृत्तीनाथांच्या कृपाप्रकाशात परब्रम्ह प्रत्यक्ष पाहीन आणि सर्वाना सांगेन.
33-6
जें दिठीही न पविजे । तें दिठीविण देखिजे । जरी अतींद्रिय लाहिजे । ज्ञानबळ ॥33॥
जर अतींद्रिय ज्ञानाचे बळ प्राप्त झाले, तर जे दृष्टीला दिसत नाही, ते दृष्टीशिवाय स्पष्टपणे पाहता येते.
34-6
ना तरी जें धातुवादाही न जोडे । तें लोहींचि पंधरें सापडे । जरी दैवयोगें चढे । परिसु हातां ॥34॥
जर दैवयोगाने हातात परीस आला, तर किमयागारास जे न मिळणारे, ते सोने लोखंडात सापडते.
35-6
तैसी सद्गुरुकृपा होये । तरी करितां काय आपु नोहे । म्हणौनि तें अपार मातें आहे । ज्ञानदेवो म्हणे ॥35॥
त्याप्रमाणे जर सद्गुरूंची कृपा होईल, तर प्रयत्न केला असता कोणती गोष्ट प्राप्त होणार नाही?? ज्ञानदेव म्हणतात, माझ्यावर ती कृपा अपार / अलोट आहे.


36-6
तेणें कारणें मी बोलेन । बोली अरुपाचे रुप दावीन । अतींद्रिय परि भोगवीन । इंद्रियांकरवीं ॥36॥
त्या सद्गुरुंच्या कृपाप्रसादाने मी बोलू शकेन. ब्रम्ह हे अरुप असले, तरी मी त्याचे स्वरूप दाखवीण. ते अतेंद्रिय खरे; परंतु ते इंद्रियकडुन भोगवीन.
37-6
आइका यश श्री औदार्य । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य । हे साही गुणवर्य । वसती जेथ ॥37॥
हे पाहा, यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, आणि ऐश्वर्य हे सहा गुण ज्याच्या ठिकाणी वास करतात;
38-6
म्हणोनि तो भगवंतु । जो निःसंगाचा सांगातु । तो म्हणे पार्था दत्तचित्तु । होई आतां ॥38॥
म्हणून त्या श्रीकृष्णाला भगवान असे म्हणतात. जो सर्वसंग परित्याग करणाऱ्यांच्या सोबती आहे, तो अर्जुनाला म्हणाला, आता माझ्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष दे.
श्रीभगवानुवाचः अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः ।
स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः॥6.1॥

भावार्थ :- भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जो कर्माच्या फलाची इच्छा न करता विहित कर्म करतो, तो संन्यासी व योगी आहे. केवळ अग्निहोत्राचा त्याग करणारा अथवा निष्क्रिय मनुष्य संन्यासी अथवा योगी नाही.
39-6
आइकें योगी आणि संन्यासी जनीं । हे एकचि सिनानें झणीं मानी । एऱ्हवी विचारिजती जंव दोन्ही । तंव एकचि ते ॥39॥
हे अर्जुना ! ऎक. या जगात निष्काम कर्मयोगी आणि संन्यासी हे दोन्ही एकच आहेत. ते वेगळे आहेत, असे तू मानू नकोस. सूक्ष्म विचार करून पहिले, तर दोन्ही एकच आहेत.
40-6
सांडिजे दुजया नामाचा आभासु । तरी योगी तोचि संन्यासु । पहातां ब्रह्मीं नाही अवकाशु । दोहींमाजीं ॥40॥
संन्यास आणि योग या दोन नावांचा भ्रम टाकून दिला, तर योग संन्यास व संन्यास तोच योग होय. तत्वतः जाणले, तर ब्रम्हस्वरूपाच्या ठिकाणी या दोघांत भेदाला अवकाश / अंतर नाही.

41-6
जैसें नामाचेनि अनारिसपणें । एका पुरुषाते बोलावणें । कां दोहीं मार्गीं जाणें । एकचि ठाया ॥41॥
ज्याप्रमाणे (अण्णा, काका, बाबा किंवा दादा) एकाच पुरुषास वेगवेगळ्या नावानी हाक मारतात, किंवा कांही ठिकाणी दोन मार्ग असतात; पण दोन्ही मार्गानी एकाच स्थानास आपण पोहचतो,
42-6
नातरी एकचि उदक सहजें । परी सिनानां घटीं भरिजें । तैसें भिन्नत्व जाणिजे । योगसंन्यासांचें ॥42॥
किंवा स्वभावतः सर्व पाणी एकच असते; परंतु निरनिराळ्या घागरीत भरले की ते वेगवेगळे दिसते, त्याप्रमाणे साधनमार्गाच्या भेदामुळे योग व संन्यास यांचा वेगळेपणा दिसण्यापूरता आहे.
43-6
आइकें सकळ संमते जगीं । अर्जुना गा तोचि योगी । जो कर्में करुनि रागी । नोहेचि फळीं ॥43॥
हे अर्जुना ! ऎक. जो सत्कर्माचें आचरण करून त्याच्या फलाविषयी आसक्त होत नाही, तोच या जगी योगी होय. हे सर्व संत – म्हणतांना मान्य आहे.
44-6
जैसी मही हे उद्भिजें । जनी अहंबुध्दीवीण सहजें । आणि तेथींची तियें बीजें । अपेक्षीना ॥44॥
ज्याप्रमाणे पृथ्वी सहजपणे अनेक वृक्ष वेलींना जन्म देते; पण तिला कोणत्याही प्रकारच्या कर्तृत्वाचा अभिमान नसतो, तसेच वृक्षाला लागलेल्या फळांची ती अपेक्षा करत नाही,
45-6
तैसा अन्वयाचेनि आधारें । जातीचेनि अनुकारें । जें जेणें अवसरें । करणें पावे ॥45॥
त्याप्रमाणे आत्मबोधाच्या आधाराने आणि पूर्वजन्मातील कर्मप्रमाणे ज्या काळी जे विहित कर्म म्हणून प्राप्त झाले आहे,


46-6
तें तैसेंचि उचित करी । परी साटोपु नोहे शरीरीं । आणि बुध्दीही करोनि फळवेरीं । जायेचिना ॥46॥
ते सर्व कर्म यथाविधी करून आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार निर्माण होऊ देत नाही आणि बुद्धीला फळाच्या अपेक्षेकडे जाऊ देत नाही,
47-6
ऐसा तोचि संन्यासी । पार्था गा परियेसीं । तोचि भरंवसेनिसीं । योगीश्वरु ॥47॥
हे अर्जुना ! ऎक. असा जो पुरुष, तोच संन्यासी आणि निःसंशय योगीराज आहे असे समज.
48-6
वांचूनि उचित कर्म प्रासंगिक । तयातें म्हणे हे सांडीन बध्दक । तरी टांकोटांकी आणिक । मांडिचि तो ॥48॥
याशिवाय जो कोणी प्रसंगाने प्राप्त जे विहित कर्म, त्याला बंधनकारक म्हणतो, तो पहिले कर्म त्यागताच दुसऱ्या कोणत्या तरी कर्माचा आरंभ करत असतो.
(दुसरे कर्म करण्याचे आरंभीतो)
49-6
जैसा क्षाळुनियां लेपु एकु । सवेंचि लाविजे आणिकु । तैसेनि आग्रहाचा पाइकु । विचंबे वायां ॥49॥
जसे अंगाला लावलेला एक लेप धुऊन ताबडतोब दुसरा लेप लावावा, त्याप्रमाणे जो आग्रही असतो, तो व्यर्थच विवंचना करत बसतो.(कष्टात पडतो)
50-6
गृहस्थाश्रमाचें वोझें । कपाळी आधींच आहे सहजें । की तेंचि संन्याससवा ठेविजे । सरिसें पुढती ॥50॥
आधीच डोक्यावर गृहस्थाश्रमाचे ओझे आहेच, ते टाकण्याकरिता संन्यास घेतला, तर त्याचबरोबर पुनः संन्यास – आश्रमातील कर्माचे ओझे डोक्यावर घेतो;

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *