सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १ ओवी २६ ते ५०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

26-1
कां तीर्थें जियें त्रिभुवनीं । तियें घडती समुद्रावगाहनीं । ना तरी अमृतरसास्वादनीं । रस सकळ ॥1.26॥
एका समुद्र स्नानामुळे त्रैलोक्यांत जेवढी तीर्थे आहेत, त्या सर्वांचे स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते; किंवा एका अमृत रसाच्या सेवनाने जगातील सर्व रस सेवन केल्या प्रमाणे होते. ॥1-26॥
27-1
तैसा पुढतपुढती तोचि । मियां अभिवंदिला श्रीगुरुचि । जो अभिलषित मनोरुचि । पुरविता तो ॥1.27॥
तसे एका सद्गुरूंना वंदन केले असता, सर्वांना वंदन केल्याचे पुण्य प्राप्त होते; म्हणून मी वारंवार सद्गुरूंना वंदन करतो, जे सद्गुरु मनातील सर्व सदिच्छा पूर्ण करतात. ॥1-27॥
28-1
आतां अवधारा कथा गहन । जे सकळां कौतुकां जन्मस्थान । कीं अभिनव उद्यान । विवेकतरूचें ॥1.28॥
आता सखोल विचारांची कथा श्रवण करा. ही कथा सर्वांच्या मनात कौतुक उत्पन्न करणारी आहे अथवा विवेकरूपी वृक्षाचे नाविन्यपूर्ण उद्यान आहे. ॥1-28॥
29-1
ना तरी सर्व सुखाचि आदि । जे प्रमेयमहानिधि । नाना नवरससुधाब्धि । परिपुर्ण हे ॥1.29॥
ही महाभारतातील गीता रुपी कथा सर्व मूळ कारण आहे. हे सर्व प्रमुख सिद्धांताचे भांडार आहे किंवा नवरसांनी परिपूर्ण भरलेला अमृताचा सागर आहे. ॥1-29॥
30-1
कीं परमधाम प्रकट । सर्व विद्यांचे मूळपीठ । शास्त्रजाता वसौट । अशेषांचें ॥1.30॥
किंवा महाभारताच्या रुपाने मोक्षच प्रगटलेला आहे. हे सर्व विद्यांचे मूळपीठ आहे. जगातील सर्व ज्ञानाचे आश्रयस्थान आहे. ॥1-30॥

31-1
ना तरी सकळ धर्मांचें माहेर । सज्जनांचे जिव्हार । लावण्यरत्‍नभांडार । शारदेचें ॥1.31॥
महाभारत हे सर्व धर्माचे माहेर आहे, सज्जनांच्या जिव्हाळ्याचा, आनंदाचा विषय आहे; आणि सरस्वतीच्या सौंदर्यरूपी रत्नांचे भांडार आहे. ॥1-31॥
32-1
नाना कथारूपें भारती । प्रकटली असे त्रिजगतीं । आविष्करोनि महामतीं । व्यासाचिये ॥1.32॥
सरस्वती महर्षी व्यासांच्या विशाल बुद्धीत प्रगट होऊन विविध कथेच्या त्रैलोक्यात प्रसारित झाली.॥
33-1
म्हणौनि हा काव्यांरावो । ग्रंथ गुरुवतीचा ठावो । एथूनि रसां झाला आवो । रसाळपणाचा ॥1.33॥
हा महाभारत ग्रंथ सर्व काव्यग्रंथाचा राजा आहे. या ग्रंथाच्या ठिकाणी महानतेची परिसीमा झाली आहे. या ग्रंथा पासून काव्यातील रसांना रसाळपणाचा डौल आला आहे. ॥1-33॥
34-1
तेवींचि आइका आणिक एक । एथूनि शब्दश्री सच्छास्त्रिक । आणि महाबोधीं कोंवळीक । दुणावली ॥1.34॥
तसेच, या ग्रंथाचे आणखी महत्व श्रवण करा. महाभारतापासून शब्दरूप संपत्तीला शास्त्रीयता प्राप्त झाली आणि ब्रम्हज्ञानाच्या ठिकाणी कोवळिकता अधिकच वाढली. ॥1-34
35-1
एथ चातुर्य शहाणें झालें । प्रमेय रुचीस आलें । आणि सौभाग्य पोखलें । सुखाचें एथ ॥1.35॥
या महाभारतात चातुर्य शहाणे झाले, सिद्धांताना अमृतमय गोडी प्राप्त झाली आणि सुखाचे ऐश्वर्य अधिकच पुष्ट झाले. ॥1-35

36-1
माधुर्यीं मधुरता । श्रुंगारीं सुरेखता । रूढपण उचितां । दिसे भलें ॥1.36॥
माधुर्याला मधुरता, शृंगाराला सुरेखपणा आणि योग्य वस्तुंना श्रेष्ठपणा येऊन त्या सर्व उत्तम रीतीने शोभून दिसू लागल्या. ॥1-36
37-1
एथ कळाविदपण कळा । पुण्यासि प्रतापु आगळा । म्हणौनि जनमेजयाचे अवलीळा । दोष हरले ॥1.37॥
यातील कथेपासून कलांना विशेष कौशल्य प्राप्त झाले. पुण्याचा प्रताप वाढू लागला. महाभारताच्या श्रावणाने जनमेजयाचे ब्रम्हहत्येचे दोष नाहीसे झाले. ॥1-37
38-1
आणि पाहतां नावेक । रंगीं सुरंगतेची आगळीक । गुणां सगुणपणाचें बिक । बहुवस एथ ॥1.38॥
सुक्षमबुद्धीने महाभारताचे निरीक्षण केले असता असे दिसून येते की, विविध कलांतील गुण त्याने वाढले. या कथेमुळे सद्गुणांचें सामर्थ्य प्रगट झाले. ॥
39-1
भानुचेनि तेजें धवळलें । जैसे त्रैलोक्य दिसे उजळिलें । तैसें व्यासमति कवळिलें । मिरवे विश्व ॥1.39॥
सूर्याच्या तेजाने त्रैलोक्य जसे उजळून निघते, त्या प्रमाणे महर्षी व्यासांच्या विशाल बुद्धीतून निर्माण झालेल्या या कथेमुळे सर्व जगावर ज्ञानाचा प्रकाश पसरला आणि ते शोभून दिसू लागले. ॥
40-1
कां सुक्षेत्रीं बीज घातलें । तें आपुलियापरी विस्तारलें । तैसें भारतीं सुरवाडलें । अर्थजात ॥1.40॥
उत्तम जमिनीत बी पेरले असता जसा त्याचा सहज विस्तार होत जातो, त्या प्रमाणे महाभारतात सर्व विषय शोभायमान झाले आहेत. ॥1-40

41-1
ना तरी नगरांतरीं वसिजे । तरी नागराचि होईजे । तैसें व्यासोक्तितेजें । धवळत सकळ ॥1.41॥
ज्याप्रमाणेनगरात राहिल्यावर मानवास शहाणपण प्राप्त होते, त्या प्रमाणे व्यासांच्या सात्विक वाणीच्या तेजामुळे सर्व जग ज्ञानसंपन्न झाले. ॥1-41
42-1
कीं प्रथम वयसाकाळीं । लावण्याची नव्हाळी । प्रगटे जैसी आगळी । अंगनाअंगीं ॥1.42॥
तारुण्यात पदार्पण केल्यानंतर मुलीच्या अंगी सौंदर्याचा नवा बहर आलेला असतो आणि तो स्पष्टपणे दिसू लागतो. ॥1-42
43-1
ना तरी उद्यानीं माधवी घडे । तेथ वनशोभेची खाणी उघडे । आदिलापासौनि अपाडें । जियापरी ॥1.43॥
वसंत ऋतूचे आगमन झाले, की बागेतील वनशोभा पूर्वी पेक्षा अधिकच बहरून येते; जणू काही सौंदर्याची खाणच उघडते. ॥1-43

44-1
नानाघनीभूत सुवर्ण । जैसें न्याहाळितां साधारण । मग अलंकारीं बरवेपण । निवाडु दावी ॥1.44॥
लगडीच्या रुपात सोने पाहीले, तर त्याचे सौंदर्य सर्वसाधारण वाटते; परंतु त्या सोन्याच्या विविध कलाकुसरीचे दागिने बनविले, तर त्या सोन्याचे सौंदर्य विशेष रुपाने खुलून दिसते. ॥1-44
45-1
तैसें व्यासोक्ति अळंकारिलें । आवडे तें बरवेपण पातलें । तें जाणोनि काय आश्रयिलें । इतिहासीं ॥1.45॥
महर्षी व्यासांच्या तेजस्वी बुद्धीतून प्रगटलेल्या विषयामध्ये सत्य, शिव आणि सुंदरतेचे दर्शन होते, हे पाहून जगातील अनेक इतिहासकारांनी महाभारताचा आश्रय केला आहे. ॥1-45

46-1
नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं । सानीव धरूनि आंगीं । पुराणें आख्यानरूपें जगीं । भारता आलीं ॥1.46॥
आपणास मोठी प्रतिष्ठा लाभावी म्हणून स्वतःच्या अंगी नम्रता धरून सर्व पुराणे आख्यानरुपाने महाभारतात येऊन जगामध्ये प्रसिद्ध पावली. ॥1-46
47-1
म्हणौनि महाभारतीं नाहीं । तें नोहेचि लोकीं तिहीं । येणें कारणें म्हणिपे पाहीं । व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥1.47॥
म्हणूनच महाभारतामध्ये जे नाही, ते तिन्ही लोकांमध्ये नाही. महर्षी व्यासांच्या नंतर त्रैलोक्यात जे भाष्यकार झाले, त्यांनी महाभारतातील सिद्धांताचा अभ्यास केला. ‘व्यासोंच्छिष्ट जगतत्रय’ असे म्हणतात. ॥1-47
48-1
ऐसी जगीं सुरस कथा । जें जन्मभूमि परमार्था । मुनि सांगे नृपनाथा । जनमेजया ॥1.48॥
अशी ही जगात सुरस म्हणून प्रसिद्ध असलेली आणि परमार्थाची जन्मभूमी असलेली महाभारताची कथा आहे. ही कथा जनमेजय राजाला वैंशपायन ऋषींनी सांगितली. ॥1-48
49-1
जें अद्वितीय उत्तम । पवित्रैक निरुपम । परम मंगलधाम । अवधारिजो ॥1.49॥
श्रोते हो ! ही कथा एकाग्रतेने श्रवण करा. हे महाभारत अद्वितीय,उत्तम,अतिपवित्र निरुपम आणि सर्व मांगल्याचे परम स्थान आहे. ॥1-49
50-1
आतां भारती कमळपरागु । गीताख्यु प्रसंगु । जो संवादला श्रीरंगु । अर्जुनेंसीं ॥1.50॥
महाभारत हे जणू काही कमळ असून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनास सुखसंवादाच्या रुपाने सांगितलेली गीता जणू काही त्यातील सुगंधी पराग आहे. ॥1-50

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *