सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ६०१ ते ६२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

601-18
तैसीं फळें देखोनि पुढें । काम्यकर्में दुवाडें । करी परी तें थोकडें । केलेंही मानी ॥601॥
त्याप्रमाणे फलावर आशा ठेवून कठीण अशी काम्यकर्मे पुष्कळ करतो. परंतु ती थोडीच केली असे मानतो. 601
602-18
तेणें फळकामुकें । यथाविधी नेटकें । काम्य कीजे तितुकें । क्रियाजात ॥602॥
याप्रमाणे फळाची इच्छा धरून, काम्यकर्मे जितकी असतील, इतकी यथाविधि करतो 602
603-18
आणि तयाही केलियाचें । तोंडीं लावी दौंडीचें । कर्मी या नांवपाटाचें । वाणें सारी ॥603॥
आणि केलेल्या कर्माची आपल्या तोंडाने वाखाणणी करीतो व ‘ मी मोठा कर्मठ आहे ‘ या नावाची ख्याती चोहीकडे पसरवितो. 603
604-18
तैसा भरे कर्माहंकारु । मग पिता अथवा गुरु । ते न मनी काळज्वरु । औषध जैसें ॥604॥
त्या पुरुषांमध्ये असा कर्म अहंकार भरतो की, काळ ज्वर जसा कोणत्याच औषधाला जुमानीत नाही, तसा तो पिता आणि गुरू यांचीही पर्वा करीत नाही. 604
605-18
तैसेनि साहंकारें । फळाभिलाषियें नरें । कीजे गा आदरें । जें जें कांहीं ॥605॥
तशा कर्माभिमानी फळाभिलाशी पुरुषाकडून हे जे काही कर्म मोठ्या आदराने केले जाते, 605

606-18
परी तेंही करणें बहुवसा । वळघोनि करी सायासा । जीवनोपावो कां जैसा । कोल्हाटियांचा ॥606॥
ते ते पुष्कळ आयासानेही केलेले कर्म कोल्हाट्याच्या उपजीविकेसाठी केलेल्या कर्माप्रमाणे नुसते कष्टाला कारण होते. 606
607-18
एका कणालागीं.ण् उंदिरु । आसका उपसे डोंगरु । कां शेवाळोद्देशें दर्दुरु । समुद्रु डहुळी ॥607॥
एका कणाकरिता उंदीर जसा डोंगर पोखरतो, अथवा शेवाळाच्या प्राप्तीकरीता बेडूक समुद्र ढवळतो; 607
608-18
पैं भिकेपरतें न लाहे । तऱ्ही गारुडी सापु वाहे । काय कीजे शीणुचि होये । गोडु येकां ॥608॥
भिक्षे शिवाय दुसरी काही प्राप्ति न होता गारुडी जसे सापाचे ओझी वाहतो; काय करावे ! या लोकांना खटपटत प्रिय आहे. 608
609-18
हे असो परमाणूचेनि लाभें । पाताळ लंघिती वोळंबे । तैसें स्वर्गसुखलोभें । विचंबणें जें ॥609॥
हे असो; एका कणाच्या आशेकरिता वाळवी ही पाताळापर्यंत खोल खणते, त्याप्रमाणे स्वर्गसुखाच्या प्राप्तीकरीता जे श्रम करणे. 609
610-18
तें काम्य कर्म सक्लेश । जाणावें येथ राजस । आतां चिन्ह परिस । तामसाचें ॥610॥
तेच क्लेशयुक्त काम्यकर्म राजस आहे असे जाणावे. आता तामस कर्माचे लक्षण सांगतो, ते ऐक. 610
अनुबन्धं क्षयं हिंसामनपेक्ष्य च पौरुषम् ।
मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते ॥18.25॥

611-18
तरी तें गा तामस कर्म । जें निंदेचें काळें धाम । निषेधाचें जन्म । सांच जेणें ॥611॥
जे निंदेचे काळे(पापमय) घराच होय आणि ज्याच्या योगे निषेधाच्या जन्माचे सार्थक झाले आहे, ते तामस कर्म होय. 611
612-18
जें निपजविल्यापाठीं । कांहींच न दिसे दिठी । रेघ काढलिया पोटीं । तोयाचे जेवीं ॥612॥
जशी पाण्यावर काढलेली रेघ दुसऱ्याचक्षणी दिसत नाही, त्याप्रमाणे जे कर्म केल्यानंतर उत्तरक्षणी त्याचे काहीच स्वरूप दिसत नाही, 612
613-18
कां कांजी घुसळलिया । कां राखोंडी फुंकलिया । कांहीं न दिसे गाळिलिया । वाळुघाणा ॥613॥
किंवा ताकाची निवळ घुसळली असता जसे लोणी निघत नाही, किंवा सोनाराच्या घरातल्या राखेशिवाय इतर ठिकाणची राख फुंकत बसले असता जसे सोन्याचे कोण वगैरे काही सापडत नाहीत, अथवा वाळू घाण्यात घातली असता जसे तिजपासून तेल किंवा पेंड काहीच उत्पन्न होत नाही, 613
614-18
नाना उपणिलिया भूंस । कां विंधिलिया आकाश । नाना मांडिलिया पाश । वारयासी ॥614॥
अथवा भूस उपणपने किंवा आकाशांत बाण मारीत बसणे अथवा वाऱ्यास धरण्याकरिता फांस टाकणे, 614
615-18
हें आवघेंचि जैसें । वांझें होऊनि नासे । जें केलिया पाठीं तैसें । वायांचि जाय ॥615॥
या गोष्टी ज्याप्रमाणे करून निष्फळ आहेत, त्याप्रमाणे ज्या कर्माचे आचरण करूनही व्यर्थ होते; 615

616-18
येऱ्हवीं नरदेहाही येवढें । धन आटणीये पडे । जें कर्म निफजवितां मोडे । जगाचें सुख ॥616॥
एऱ्हवी नरदेह एवढेही अमूल्य धन खर्ची पडून जे कर्म होते, त्याच्या योगाने जगाला सुख न देता दुःख मात्र होते. 616
617-18
जैसा कमळवनीं फांसु । काढिलिया कांटसु । आपण झिजे नाशु । कमळां करी ॥617॥
ज्याप्रमाणे कमळे काढण्याकरिता त्यावर काट्यांचा फास टाकून ओढला असता आपल्यास श्रम होऊन कमळाचाहि नाश होतो; 617
618-18
कां आपण आंगें जळे । आणि नागवी जगाचे डोळे । पतंगु जैसा सळें । दीपाचेनि ॥618॥
किंवा पतंग ज्याप्रमाणे दिव्याचा हेवा करून त्यावर झडप घालतो आणि स्वतः नाश पाहून जगालाही अंधार करितो, 618
619-18
तैसें सर्वस्व वायां जावो । वरी देहाही होय घावो । परी पुढिलां अपावो । निफजविजे जेणें ॥619॥
त्याप्रमाणे आपले सर्वस्व वाया जाऊन देहाला श्रम जरी झाले, तरी दुसऱ्यास ज्या कर्मापासून अपाय होतो, 619
620-18
माशी आपणयातें गिळवी । परी पुढीला वांती शिणवी । तें कश्मळ आठवी । आचरण जें ॥620॥
माशी ही स्वतःला गीळविते, (पोटात जाऊन स्वतः मरते) पण दुसऱ्याला वांति करून शिणविते, तशा प्रकारचे जे आचरण ते सदोष आहे असे तू लक्षात ठेव. 620

621-18
तेंही करावयो दोषें । मज सामर्थ्य असे कीं नसे । हेंहीं पुढील तैसें । न पाहतां करी ॥621॥
बरे, तेही कर्म करण्याचे आपल्यात सामर्थ्य आहे किंवा नाही, यापुढील विचार तर करावा पण तसे काही न करता कर्म करू लागतो; 621
622-18
केवढा माझा उपावो । करितां कोण प्रस्तावो । केलियाही आवो । काय येथ ॥622॥
माझा केवढा प्रयत्न व त्याचा मी केवढा पसारा मांडला आहे, आणि तो केल्यापासून मला काय प्राप्ती होणार आहे, 622
623-18
इये जाणिवेची सोये । अविवेकाचेनि पायें । पुसोनियां होये । साटोप कर्मीं ॥623॥
या विचाराला अविवेकाच्या पायाखाली तुडवून टाकतो, आणि त्या कर्माबद्दल अभिमान बाळगतो; 623
624-18
आपला वसौटा जाळुनी । बिसाटे जैसा वन्ही । कां स्वमर्यादा गिळोनि । सिंधु उठी ॥624॥
अग्नि ज्या वेळूपासून उत्पन्न होतो, ती आपली रहाण्याची जागा (वेळूंचे बेट) जाळून पसरतो, अथवा आपली मर्यादा सोडून समुद्र वाढला, 624
625-18
मग नेणें बहु थोडें । न पाहे मागें पुढें । मार्गामार्ग येकवढें । करीत चाले ॥625॥
म्हणजे मग लहान किंवा मोठी वस्तू यांचा विचार न करिता व मागेपुढे न पाहता पवित्र व अपवित्र वस्तू एकत्र करून चालतो; 625

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *