सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १००१ ते १०२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

1001-18
तैसा वैराग्यलाभु जाला । वरी सद्गुरुही भेटला । जीवीं अंकुरु फुटला । विवेकाचा ॥1001॥
त्याप्रमाणे वैराग्यहि प्राप्त झाले, त्यात सद्गुरुंचीही भेट झाली व ज्ञानप्राप्ति करून घेण्याचीही अंत:करणांत इच्छा झाली; 1
1002-18
तेणें ब्रह्म एक आथी । येर आघवीचि भ्रांती । हेही कीर प्रतीती । गाढ केली ॥1002॥
मग त्यांच्या उपदेशानं ब्रह्म एक सत्य आहे व त्यावाचून इतर सर्व प्रपंच भ्रांतिरूप आहे, हे ऐकून साधकाचाहि त्याप्रमाणे दृढनिश्चय झाला; 2
1003-18
परी तेंचि जें परब्रह्म । सर्वात्मक सर्वोत्तम । मोक्षाचेंही काम । सरे जेथ ॥1003॥
परंतु असें जें सर्वव्यापक व सर्वोत्तम परब्रह्म, ज्या ठिकणीं मोक्ष शब्दहि नाहीसा होतो; 3
1004-18
यया तिन्ही अवस्था पोटीं । जिरवी जें गा किरीटी । तया ज्ञानासिही मिठी । दे जे वस्तु ॥1004॥
अर्जुना, साध्य, साधक व साधन ही त्रिपुटी ज्या ज्ञानानें नाहींशी होते असें जें ज्ञान ते ज्या ब्रह्माच्या ठिकाणीं लय पावतें, 4
1005-18
ऐक्याचें एकपण सरे । जेथ आनंदकणुही विरे । कांहींचि नुरोनि उरे । जें कांहीं गा ॥1005॥
जेथे ऐक्याचा एकपणाहि उरत नाहीं व जेथे आनंदसुखाचा लेशहि उरत नाही व जेथे। कांहीं न उरवून जें उरतें, 5

1006-18
तियें ब्रह्मीं ऐक्यपणें । ब्रह्मचि होऊनि असणें । तें क्रमेंचि करूनि तेणें । पाविजे पैं ॥1006॥
असें जें ब्रह्म, त्याब्रम्हाच्या ठिकाणी ऐक्य पावून राहणे ते त्याला मंदाधिकत्वामुळे क्रमानेंच प्राप्त होते. 6
1007-18
भुकेलियापासीं । वोगरिलें षड्रसीं । तो तृप्ति प्रतिग्रासीं । लाहे जेवीं ॥1007॥
क्षुधितापुढे षड्रस अन्नाचे ताट वाहून ठेवलेले असले तरी तो एकदम तृप्त न होता प्रत्येक घासानें तृप्ति वाढत वाढतां शेवटल्या घासाला पूर्ण तृप्त होतो, 7
1008-18
तैसा वैराग्याचा वोलावा । विवेकाचा तो दिवा । आंबुथितां आत्मठेवा । काढीचि तो ॥1008॥
त्याप्रमाणे तो साधक वैराग्याच्या आश्रयाने व विवेकरूप दीपाच्या प्रकाशानें आमस्वरूपी ठेव्यास प्राप्त होतो. 8
1009-18
तरी भोगिजे आत्मऋद्धी । येवढी योग्यतेची सिद्धी । जयाच्या आंगीं निरवधी । लेणें जाली ॥1009॥
तर आमरूप ऐश्वर्य भोगण्याची ज्या साधकाच्या अंगीं खरोखर योग्यता प्राप्त झाली, 9
1010-18
तो जेणें क्रमें ब्रह्म । होणें करी गा सुगम । तया क्रमाचें आतां वर्म । आईक सांगों ॥1010॥

तो ज्या क्रमाने ब्रह्मप्राप्ति सुलभ करून घेतो, त्या क्रमाचे वर्म तुला सांगतों, ऐक. 10
बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च । शब्दादीन्विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च ॥18.51॥
1011-18
तरी गुरु दाविलिया वाटा । येऊन विवेकतीर्थतटा । धुऊनियां मळकटा । बुद्धीचा तेणें ॥1011॥
श्रीगुरुन दाखविलेल्या वाटेने विवेकतीर्थाच्या तीरावर येऊन बुद्धीचा मळ त्याने धुवून टाकतो. 11
1012-18
मग राहूनें उगळिली । प्रभा चंद्रें आलिंगिली । तैसी शुद्धत्वें जडली । आपणयां बुद्धि ॥1012॥
मग ज्याप्रमाणे राहूने ग्रासलेली चंद्राची प्रभा त्याने सोडल्यावर ती चंद्रास आलिंगन देते, त्याप्रमाणे बुद्धीचा शुद्धपणा जो नानाप्रकाच्या दुर्वासनांनीं भ्रष्ट झाला होता, तो शुद्ध होऊन ती आपल्या मूळच्या स्थितीस प्राप्त होते. 12
1013-18
सांडूनि कुळें दोन्ही । प्रियासी अनुसरे कामिनी । द्वंद्वत्यागें स्वचिंतनीं । पडली तैसी ॥1013॥
कुलस्त्री जशी दोन्ही कुळांचा अभिमान टाकून केवळ आपल्या प्रियपतीलाच अनुकूल असते, तशी बुद्धि ही द्वैतभावना सोडून आत्मचिंतनांतच रत होते.13
1014-18
आणि ज्ञान ऐसें जिव्हार । नेवों नेवों निरंतर । इंद्रियीं केले थोर । शब्दादिक जे ॥1014॥
ज्ञानासारखी जिव्हाळ्याची वस्तु निरंतर बाहेर विषयाकडे नेउन इंद्रियांनीं शब्दादि विषयांची थोरवी वाढविली आहे;14
1015-18
ते रश्मिजाळ काढलेया । मृगजळ जाय लया । तैसें वृत्तिरोधें तयां । पांचांही केलें ॥1015॥
पण सूर्याचे किरण नाहीतसे झाले म्हणजे मृगजळ जसे आपोआप नाहीसे होते, तसें धैर्याने इंद्रियांच्या वृत्तीचा निरोध केला असतां पांचहि विषय आपोआप नाहीं होतात.15

1016-18
नेणतां अधमाचिया अन्ना । खादलिया कीजे वमना । तैसीं वोकविली सवासना । इंद्रियें विषयीं ॥1016॥
भ्रष्टाचे अन्न न कळत खाल्यास तें जसे ओकून टाकावें, त्याप्रमाणे ज्याने वासनांसह विषय इंद्रियांकडून ओकविले,16
1017-18
मग प्रत्यगावृत्ती चोखटें । लाविलीं गंगेचेनि तटें । ऐसीं प्रायश्चित्तें धुवटें । केलीं येणें ॥1017॥
मग प्रत्यगाभ्याकडे त्यांना लावून आमरूप गंगेच्या तीरावर त्यांच्याकडून उत्तम प्रायश्चित्ते करविली 17
1018-18
पाठीं सात्विकें धीरें तेणें । शोधारलीं तियें करणें । मग मनेंसीं योगधारणें । मेळविलीं ॥1018॥
नंतर सात्विक धैर्याने ती सर्व इंद्रियें शुद्ध केली आणि मनाला योगाभ्यास करण्यास लावले. 18
1019-18
तेवींचि प्राचीनें इष्टानिष्टें । भोगेंसीं येउनी भेटे । तेथ देखिलियाही वोखटें । द्वेषु न करी ॥1019॥
त्याचप्रमाणे पूर्वकर्माच्या योगाने चांगले किंवा वाईट भोग प्राप्त झाले असतां त्यांतील वाईट भोगांविषयीं द्वेष करीत नाही;19
1020-18
ना गोमटेंचि विपायें । तें आणूनि पुढां सूये । तयालागीं न होये । साभिलाषु ॥1020॥
अथवा सहज चांगला भोग भोगण्याचा समय आला असतां त्याविषयी अभिलाष धरीत नाही. 1020

1021-18
यापरी इष्टानिष्टीं । रागद्वेष किरीटी । त्यजूनि गिरिकपाटीं । निकुंजीं वसे ॥1021॥
(विविक्तसेवी) – ह्याप्रमाणे अर्जुना, इष्टानिष्ट भोगां-विषयींचा रागद्वेष सोडून तो पर्वताच्या गुहेत अथवा निर्जन अशा एकांतस्थानीं वास करितो 21
विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्कायमानसः ।
ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः ॥18.52॥

1022-18
गजबजा सांडिलिया । वसवी वनस्थळिया । अंगाचियाचि मांदिया । एकलेया ॥1022॥
जेथे मुळीच गलबला नाही अशा निर्जन वनांत, केवळ स्वतःचे शरीर हाच एक सोबती असा तो रहातो. 22
1023-18
शमदमादिकीं खेळे । न बोलणेंचि चावळे । गुरुवाक्याचेनि मेळें । नेणे वेळु ॥1023॥
इंद्रियांचा शमदम करणे हीच त्याची क्रीडा; मौन धारण करून असणे हाच त्याचा वाग्व्यवहार; असे असून गुरुपदेश चितनांत वेळ कसा व केव्हां गेला हेंही त्यास समजत नाही. 23
1024-18
आणि आंगा बळ यावें । नातरी क्षुधा जावें । कां जिभीचे पुरवावे । मनोरथ ॥1024॥
(लघ्वाशी) शरीर बलिष्ठ व्हावें किंवा क्षुधा अल्पही राहू नये, किंवा जिभेचे लाड पुरवावे; 24
1025-18
भोजन करितांविखीं । ययां तिहींतें न लेखी । आहारीं मिती संतोषीं । माप न सूये ॥1025॥
ह्या तिन्ही गोष्टींकडे त्याचे लक्ष नसतें; संतोष रहावा (समाधानभंग होऊ नये) हेंच त्याचें आहाराचे प्रमाण; अमुक खावेच असे त्याचे माप नसतें. 25

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *