सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ९०१ ते ९२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

901-18
जें सकळ भाग्याची सीमा । मोक्षलाभाची जें प्रमा । नाना कर्ममार्गश्रमा । शेवटु जेथ ॥901॥
जे वैराग्य सकळ भाग्याची सीमा होय व मोक्षलाभाचा निश्चय अथवा कर्ममार्गाचे श्रमपरिहार होण्याचे स्थान होय; 901
902-18
मोक्षफळें दिधली वोल । जें सुकृततरूचें फूल । तयें वैराग्यीं ठेवी पाऊल । भंवरु जैसा ॥902॥
ज्याला मोक्षफल जामीन झालेले आहे किंवा जे सत्कर्म रूप वृक्षांचे फुलच होय, त्या वैराग्याचे ठिकाणी साधक पुरुष भ्रमराप्रमाणे पाऊल ठेवतो. 902
903-18
पाहीं आत्मज्ञानसुदिनाचा । वाधावा सांगतया अरुणाचा । उदयो त्या वैराग्याचा । ठावो पावे ॥903॥
हे पहा सूर्योदयाची वार्ता सांगणारा जसा अरुणोदय आहे, त्याप्रमाणे या आत्मज्ञान रूप सुदिनाचा उदय सुचविणारे हे वैराग्य आहे. 903
904-18
किंबहुना आत्मज्ञान । जेणें हाता ये निधान । तें वैराग्य दिव्यांजन । जीवें ले तो ॥904॥
किंबहुना आत्मज्ञान रूप जे निधान ते ज्या वैराग्यरूप दिव्य अंजनाने हातात येते, ते जो जीवेभावे करून बुद्धी रूप डोळ्यात घालतो 904
905-18
ऐसी मोक्षाची योग्यता । सिद्धी जाय तया पंडुसुता । अनुसरोनि विहिता । कर्मा यया ॥905॥
अर्जुना, अशाप्रकारे विहित कर्माला अनुसरून आचरण केले असता, त्याला मोक्षप्राप्तीची योग्यता प्राप्त होते. 905

906-18
हें विहित कर्म पांडवा । आपुला अनन्य वोलावा । आणि हेचि परम सेवा । मज सर्वात्मकाची ॥906॥
हे पांडवा, विहित कर्म हा आपल्या कल्याणाचा जिव्हाळा होय. त्याचं आचरण करणे हीच मज सर्वात्मक ईश्वराची परम सेवा होय. 906
907-18
पैं आघवाचि भोगेंसीं । पतिव्रता क्रीडे प्रियेंसीं । कीं तयाचीं नामें जैसीं । तपें तियां केलीं ॥907॥
संपूर्ण भोगे करून पतिव्रता स्त्री आपल्या प्रिय पतीबरोबर क्रीडा करते त्या तिच्या आचरणास ‘तप’ असे म्हणावे 907
908-18
कां बाळका एकी माये । वांचोनि जिणें काय आहे । म्हणौनि सेविजे कीं तो होये । पाटाचा धर्मु ॥908॥
किंवा बाळाला आई वाचून जगायला दुसरे साधन नाही, म्हणून तिची सेवा केली असता त्याचे कल्याण होते, त्याप्रमाणे स्वधर्माचे आचरण करणे हाच मुख्य धर्म होय. 908
909-18
नाना पाणी म्हणौनि मासा । गंगा न सांडितां जैसा । सर्व तीर्थ सहवासा । वरपडा जाला ॥909॥
अथवा केवळ पाणी समजून गंगेत राहिलेल्या माशाला तेथे राहिल्याने जसा सर्व तीर्थांचा सहज लाभ होतो, 909
910-18
तैसें आपुलिया विहिता । उपावो असे न विसंबितां । ऐसा कीजे कीं जगन्नाथा । आभारु पडे ॥910॥
तसे आपल्या विहित कर्मांचे आचरण केल्यावाचून दुसरा उपायच नाही व अशा निश्चयाने त्याचे आराधन केले असता जगन्नाथ जो ईश्वर त्यावर आपले ओझे पडते, 910

911-18
अगा जया जें विहित । तें ईश्वराचें मनोगत । म्हणौनि केलिया निभ्रांत । सांपडेचि तो ॥911॥
अरे ज्याचे जे विहित कर्म नेमलेले आहे, ते त्याने करणे हेच ईश्वराचे मनोगत आहे, म्हणूनच ते कर्म केले असता नि:संशय ईश्वर प्राप्त होतो. 911
912-18
पैं जीवाचे कसीं उतरली । ते दासी कीं गोसावीण जाली । सिसे वेंचि तया मविली । वही जेवीं ॥912॥
दासी असूनही जर राजाच्या कसोटीस उतरली, तर तीच सर्वांची स्वामिनी होते; किंवा स्वामी कार्यार्थ जो आपले डोके देणारा त्याला स्वामीं जसा इनामपत्र करून देऊन आपले दप्तरी दाखल ठेवतो, 912
913-18
तैसें स्वामीचिया मनोभावा । न चुकिजे हेचि परमसेवा । येर तें गा पांडवा । वाणिज्य करणें ॥913॥
तसे ईश्वराच्या मनोभावे प्रमाणे वागणे हीच त्याची परम सेवा होय व यावाचून हे दुसरे कृत्य करणे, ते अर्जुना, वाणिज्य कर्माप्रमाणे आहे. 913
यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततम् ।
स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः ॥18.46॥

914-18
म्हणौनि विहित क्रिया केली । नव्हे तयाची खूण पाळिली । जयापसूनि कां आलीं । आकारा भूतें ॥914॥
म्हणून विहित कर्म केले म्हणजे ते कर्म केले असे नव्हे, तर ज्या परमात्म्यापासून सर्व भूते उत्पन्न झाली आहेत, त्यांचे मनोगतच आपण पाळीले! 914
915-18
जो अविद्येचिया चिंधिया । गुंडूनि जीव बाहुलिया । खेळवीतसे तिगुणिया । अहंकाररज्जू ॥915॥
जो परमात्मा अज्ञानरूपी चिंध्या गुंडाळून जीवरुपी बाहुल्या तयार करतो, आणि सत्व-रज-तम अशा तीन पदरी अहंकाररूप सूत्राने त्यांना खेळवितो. 915

916-18
जेणें जग हें समस्त । आंत बाहेरी पूर्ण भरित । जालें आहे दीपजात । तेजें जैसें ॥916॥
दिवा जसा तेजाने अंतर्बाह्य भरलेला असतो तसे ज्या परमात्म्याने हे सर्व जग अंतर्बाह्य ओतप्रोत भरलेले आहे; 916
917-18
तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा । पूजा केली होय अपारा । तोषालागीं ॥917॥
वीरा अर्जुना, त्या सर्वात्मका ईश्वराची स्वकर्मरुपी पुष्पांनी पूजा केली असता, ती पूजा त्याला परमसंतोष कारक होते. 917
918-18
म्हणौनि तिये पूजे । रिझलेनि आत्मराजें । वैराग्यसिद्धि देईजे । पसाय तया ॥918॥
म्हणून त्या पूजेच्या योगाने आत्मराज प्रसन्न होऊन भक्ताला वैराग्य उत्पन्न करतो. हाच त्याच्या भक्तांवर खरोखर प्रसाद! 918
919-18
जिये वैराग्यदशें । ईश्वराचेनि वेधवशें । हें सर्वही नावडे जैसें । वांत होय ॥919॥
जी वैराग्य दशा प्राप्त झाली असता ईश्वराचा छंद लागून हा सर्व संसार वमनप्राय भासतो, 919
920-18
प्राणनाथाचिया आधी । विरहिणीतें जिणेंही बाधी । तैसें सुखजात त्रिशुद्धी । दुःखचि लागे ॥920॥
ज्याप्रमाणे आपल्या प्रिय पतीच्या वियोगाने विरहिणी स्त्रीस जिवंत राहणे देखील नकोसे होते, त्याप्रमाणे संसारातील सर्व सुखे त्याला खरोखर दु:खवत भासतात. 920

921-18
सम्यक्‌ज्ञान नुदैजतां । वेधेंचि तन्मयता । उपजे ऐसी योग्यता । बोधाची लाहे ॥921॥
ईश्वराचे अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होण्याचे पूर्वी त्याच्या ध्यासाने तन्मयता प्राप्त होते, अशी बोधाची योग्यता आहे. 921
922-18
म्हणौनि मोक्षलाभालागीं । जो व्रतें वाहातसें आंगीं । तेणें स्वधर्मु आस्था चांगी । अनुष्ठावा ॥922॥
यास्तव ज्याच्या मनात मोक्ष प्राप्त व्हावा, अशी इच्छा असेल, त्याने स्वधर्माचे परम आस्थेनेआचरण करावे. 922
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् ।
स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ॥18.47

923-18
अगा आपुला हा स्वधर्मु । आचरणीं जरी विषमु । तरी पाहावा तो परिणामु । फळेल जेणें ॥923॥
अरे, आपला धर्म जरी आचरण करण्यास कठीण असला तरी त्यापासून परिणामी चे फल प्राप्त होणार त्यावर लक्ष ठेविले पाहिजे. 923
924-18
जैं सुखालागीं आपणपयां । निंबचि आथी धनंजया । तैं कडुवटपणा तयाचिया । उबगिजेना ॥924॥
हे धनंजया, कडुलिंबाचे सेवन केले असता जर आपल्याला सुख होत असेल, तर त्याच्याकडून कडूपणास कंटाळू नये 924
925-18
फळणया ऐलीकडे । केळीतें पाहातां आस मोडे । ऐसी त्यजिली तरी जोडे । तैसें कें गोमटें ॥925॥
केळविण्याचे पूर्वी तिच्याकडे पाहून निराश होते; आणि तशा स्थितीतच जर ती तोडून टाकिली, तर तीच पासून उत्तम फळे कोठून प्राप्त होणार? 925

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *