सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ९७६ ते १००० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

976-18
मुखाभासेंसी आरिसा । परौता नेलिया वीरेशा । पाहातेपणेंवीण जैसा । पाहाता ठाके ॥976॥
अर्जुना, प्रतिबिंबासहित आरसा दूर नेल्यावर ज्याप्रमाणे पहाणारा हा पहातेपणाशिवाय असतो, 76
977-18
तैसें नेणणें जें गेलें । तेणें जाणणेंही नेलें । मग निष्क्रिय उरलें । चिन्मात्रचि ॥977॥
त्याप्रमाणे अज्ञान जें जातें तें एकटे न जातां ज्ञानालाहि घेऊन जातें मग केवळ निष्क्रिय असें ज्ञान मात्र उरतें. 77
978-18
तेथ स्वभावें धनंजया । नाहीं कोणीचि क्रिया । म्हणौनि प्रवादु तया । नैष्कर्म्यु ऐसा ॥978॥
अर्जुना, या नैष्कर्म्यभूमिकेच्या ठिकाणी स्वभावतः कोणतीच क्रिया नाही, म्हणून त्या स्थितीला नैष्कर्म्यसिद्धि असे म्हणतात.78
979-18
तें आपुलें आपणपें । असे तेंचि होऊनि हारपे । तरंगु कां वायुलोपें । समुद्रु जैसा ॥979॥
ते आपले स्वरूप असून नसणेपणाच्या ज्ञानामुळे जो असणेपणा येतो तोहि जाऊन केवळ असणेपणा राहातो, तसा वायूच्या उपाधीमुळे उत्पन्न होणाऱ्या लाटा वायु नाहीसा झाला म्हणजे आपोआप पाण्याशी ऐक्य पावतात79
980-18
तैसें न होणें निफजे । ते नैष्कर्म्यसिद्धि जाणिजे । सर्वसिद्धींत सहजें । परम हेचि ॥980॥
तसे कोणतेहि कर्म न होणे अशी जी स्थिति तिला नैष्कर्यसिद्धि म्हणतात आणि हीच साहजिकतः सर्व सिद्धीत मुख्य होय. 980

981-18
देउळाचिया कामा कळसु । उपरम गंगेसी सिंधु प्रवेशु । कां सुवर्णशुद्धी कसु । सोळावा जैसा ॥981॥
कळस बसल्यावर देवळाच्या कामाचा शेवट होतो; अथवा गंगा समुद्रांत पावली म्हणजे जसें पुढे तिचे नांव रहात नाही; किंवा सोनें शुद्ध करीत असतां सोळा आणे कस लागला म्हणजे शुद्ध करण्याची क्रिया बंद होते, 81
982-18
तैसें आपुलें नेणणें । फेडिजे का जाणणें । तेंहि गिळूनि असणें । ऐसी जे दशा ॥982॥
त्याप्रमाणे आपलें अज्ञान ज्या ज्ञानानें नाहिसें केलें, तें ज्ञानहि जेव्हां नाहिसें होईल, अशी जी स्थिति, 82
983-18
तियेपरतें कांहीं । निपजणें आन नाहीं । म्हणौनि म्हणिपे पाहीं । परमसिद्धि ते ॥983॥
तिच्यापेक्षां दुसरें कांहीं प्राप्त होणे राहात नाही; म्हणूनतिला परमसिद्धि असे म्हणतात. 83
सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे ।
समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा ॥18.50॥

984-18
परी हेचि आत्मसिद्धि । जो कोणी भाग्यनिधि । श्रीगुरुकृपालब्धि- । काळीं पावे ॥984॥
पण जो कोणी एखादा मोठा भाग्यवान् असतो त्याला श्रीगुरूच्या कृपेची जेव्हां प्राप्ति होते तेंव्हा हीच आत्मसिद्धि प्राप्त होते. 84
985-18
उदयतांचि दिनकरु । प्रकाशुचि आते आंधारु । कां दीपसंगें कापुरु । दीपुचि होय ॥985॥
सूर्य उगवतांच जसा अंधकाराचाच प्रकाश होतो, किंवा दिव्याच्या ज्योतीस कापुर लागतांच तो दिवा होतो, 85

986-18
तया लवणाची कणिका । मिळतखेंवो उदका । उदकचि होऊनि देखा । ठाके जेवीं ॥986॥
अथवा मिठाचा खडा जसा पाण्यांत मिळवितांच जसा जलरूप होऊन राहतो; 86
987-18
कां निद्रितु चेवविलिया । स्वप्नेंसि नीद वायां । जाऊनि आपणपयां । मिळे जैसा ॥987॥
किंवा निजलेल्या मनुष्यास जागे केल्यावर मिथ्या स्वप्नासह झोंप नाहीशी होऊन तो आपल्या मूळस्वरूपाप्रत प्राप्त = होतो, 87
988-18
तैसें जया कोण्हासि दैवें । गुरुवाक्यश्रवणाचि सवें । द्वैत गिळोनि विसंवे । आपणया वृत्ती ॥988॥
तशी दैवयोगाने ज्या कोणीची वृत्ति गुरुवाक्यश्रवणाबरोबर भेदाचा नाश करून स्वस्वरूपाच्या ठिकाणीं स्थिर होते,88
989-18
तयासी मग कर्म करणें । हें बोलिजैलचि कवणें । आकाशा येणें जाणें । आहे काई? । ॥989॥
मग त्याला कांहीं एक कर्म करण्याचे उरते असें कोण म्हणेल? पहा की, आकाश सर्वत्र भरलेले असल्यामुळे त्याला इकडून तिकडे व तिकडून इकडे येणें जाणें घडते का? 89
990-18
म्हणौनि तयासि कांहीं । त्रिशुद्धि करणें नाहीं । परी ऐसें जरी हें कांहीं । नव्हे जया ॥990॥
म्हणून ज्यास आमसिद्धि प्राप्त झाली आहे, त्याला खरोखरच कांहीं एक कर्तव्य उरत नाही, 990

991-18
कानावचनाचिये भेटी- । सरिसाचि पैं किरीटी । वस्तु होऊनि उठी । कवणि एकु जो ॥991॥
परंतु ज्या कोणी एखाद्या भाग्यवानला गुरूचें वचन कानावर येतांक्षणीच आत्मसाक्षात्कार होते, 91
992-18
येऱ्हवीं स्वकर्माचेनि वन्ही । काम्यनिषिद्धाचिया इंधनीं । रजतमें कीर दोन्ही । जाळिलीं आधीं ॥992॥
अशा अधिकारी पुरुषाला सोडून एखाद्या मंदाधिकारी साधकांनीं स्वकर्मरूप अग्नीमध्ये काम्यकर्म व निषिद्धकर्म या इंधनाने रज व तम हे गुण अगोदर जाळून टाकले, –92
993-18
पुत्र वित्त परलोकु । यया तिहींचा अभिलाखु । घरीं होय पाइकु । हेंही जालें ॥993॥
नंतर पुत्र, वित्त ( द्रव्य,) स्वर्गादि लोक या तिहींचा काम (इच्छा ) हा ज्याच्या स्वाधीन देऊन घर सेवक झाला; 93
994-18
इंद्रियें सैरा पदार्थीं । रिगतां विटाळलीं होतीं । तिये प्रत्याहार तीर्थीं । न्हाणिलीं कीर ॥994॥
भिन्न भिन्न निषिद्ध विषयांचे ठायीं प्रवेश केल्यामुळे इंद्रियें जीं विटाळलीं होतीं, ती अष्टांगयोगांतील प्रत्याहाररूपी तीर्थात स्नान घालून पवित्र केलीं; 94
995-18
आणि स्वधर्माचें फळ । ईश्वरीं अर्पूनि सकळ । घेऊनि केलें अढळ । वैराग्यपद ॥995॥
आणखी स्वधर्माच्या आचरणानें प्राप्त होणारे फल ईश्वरास अर्पण करून त्याच्या प्रसादाने नाश न पावणारे वैराग्य प्राप्त करून घेतले. 95

996-18
ऐसी आत्मसाक्षात्कारीं । लाभे ज्ञानाची उजरी । ते सामुग्री कीर पुरी । मेळविली ॥996॥
अशाप्रकारे, आत्मसाक्षात्काररूप जें ज्ञान, ते होण्याला जी साधने पाहिजेत, ती सर्व सामुग्री मिळविली; 96
997-18
आणि तेचि समयीं । सद्गुरु भेटले पाहीं । तेवींचि तिहीं कांहीं । वंचिजेना ॥997॥
आणि तशात सद्गुरूंची गांठ पडली व त्यांनीहि प्रतारणा न करितां सम्यग्ज्ञानाचा उपदेश केला; 97
998-18
परी वोखद घेतखेंवो । काय लाभे आपला ठावो? । कां उदयजतांचि दिवो । मध्यान्ह होय? ॥998॥
परंतु औषध घेतांक्षणींच तत्काळ रोगाची निवृत्ति होऊन, आपले मूळचे प्रकृतीची स्थिति प्राप्त होते काय? अथवा प्रातःकाळीं सूर्य उगवतांच मध्यान्हकाळ होतो काय? 98
999-18
सुक्षेत्रीं आणि वोलटें । बीजही पेरिलें गोमटें । तरी आलोट फळ भेटे । परी वेळे कीं गा ॥999॥
उत्तम जमीन असून पर्जन्यवृष्टि झाली व त्यांत उत्तम बीजहि पेरले, म्हणजे त्यास पुष्कळ पीक येते; परंतु अर्जुना, त्याला वेळ लागतो कीं नाहीं? 99
1000-18
जोडला मार्गु प्रांजळु । मिनला सुसंगाचाही मेळु । तरी पाविजे वांचूनि वेळु । लागेचि कीं ॥1000॥
उत्तम मार्ग असून त्यांत सुसंगतीचाहि लाभ झाला, तरी सुद्धां ज्या ठिकाणी आपल्यास जावयाचे असेल त्या ठिकाणी जाण्यास वेळ हा लागावयाचाच, 1000

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *