सार्थ ज्ञानेश्वरी: ॥ॐ श्रीज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॐ॥
। अथ चतुर्थोऽध्यायः – अध्याय चवथा ॥ ज्ञाकर्मसंन्यासयोगः ।
अध्याय चवथा
1-4
आजि श्रवणेंद्रियां पाहलें । जें येणें गीतानिधान देखिलें । आतां स्वप्नचिहें तुकलें । साचा सरिसें ॥1-1॥
आज कानांना उजाडले, म्हणजे त्यांचा भाग्योदय झाला; कारण यथार्थ गीता श्रवण होणे बहुतेक स्वप्नवत आहे. असा गीतेचा ठेवा आज त्यांनी पाहिला, ऐकला. आणि प्रथमच स्वप्न खरे आहे असे म्हटले तर ते चूक नाहीच.
2-4
आधींचि विवेकाची गोठी । वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी । आणि भक्तराजु किरीटी । परिसत असे ॥2॥
आधीच ही आत्मविचाराची गोष्ठ आणि ती सांगणारे भगवान श्रीकृष्ण आणि ऐकायला भक्त शिरोमणी अर्जुनासारखा श्रोता. म्हणजे एक उत्तम पर्वणीच.
3-4
जैसा पंचमालापु सुगंधु । कीं परिमळु आणि सुस्वादु । तैसा भला जाहला विनोदु । कथेचा इये ॥3॥
पंचम स्वर, त्यातच उत्तम सुवास व गोडी या तिन्हींचा ऐक्यभाव असता जसा आनंद होईल तसा प्रकार या गीतारूपी कथामृताचा आहे. म्हणजे यात सर्व इंद्रियांनाआनंद होईल अशी गोडी आहे.
4-4
कैसी आगळिक दैवाची । जे गंगा जोडली अमृताची । हो कां जपतपें श्रोतयांची । फळा आली ॥4॥
दैवाची थोरवी काय वर्णावी की ज्यामुळे श्रोत्यांची जपतपे फळास येऊन अमृतरूपी गंगाच त्यांना प्राप्त झाली.
5-4
आतां इंद्रियजात आघवें । तिहीं श्रवणाचे घर रिघावें । मग संवादसुख भोगावें । गीताख्य हें ॥5॥
म्हणून आता सर्व इंद्रियांनी आपापली कामे सोडून श्रवणाचे ठिकाणी जाऊन रहावे आणि कृष्णार्जुन संवादरूपी गीतेचे सुख घ्यावे.
6-4
हा अतिसो अतिप्रसंगे । सांडूनि कथाचि ते सांगे । जे कृष्णार्जुन दोघे । बोलत होते ॥6॥
तेव्हा संतमंडळी ज्ञानेश्वरांस म्हणाली की, आता हे पाल्हाळिक बोलणे थांबवून श्रीकृष्णार्जुन जे बोलत होते ती कथा आम्हाला सांगावी.
7-4
ते वेळीं संजयो रायातें म्हणे । अर्जुनु अधिष्ठिला दैवगुणें । जे अतिप्रीति श्रीनारायणें । बोलतु असे ॥4-7॥
त्यावेळी संजय धृतराष्ट्राला सांगतो की, दैवीसंपत्तीने युक्त असलेल्या अर्जुनास श्रीकृष्ण अतीप्रेमाने म्हणाले,
8-4
जें न संगेचि पितया वसुदेवासी । जें न संगेचि माते देवकीसी । जें न संगेचि बंधु बळिभद्रासी । तें गुह्य अर्जुनेंशीं बोलत ॥4-8॥
जे गुह्य श्रीकृष्णांनी आपला पिता वसुदेव, माता देवकी व बंधु बलराम ह्यांसही सांगितले नाही, ते अर्जुनास सांगितले.
9-4
देवी लक्ष्मीयेवढी जवळिक । परी तेही न देखे या प्रेमाचें सुख । आजि कृष्णस्नेहाचें पीक । यातेंचि आथी॥4-9॥
लक्ष्मीदेवी इतकी नेहमी सन्निध राहणारी पण तिलाही ज्याप्रेमसुखाचा अनुभव लाभला नाही, त्याकृष्णप्रेमाचे पात्र आज अर्जुन झाला आहे.
10-4
सनकादिकांचिया आशा । वाढीनल्या होतिया कीर बहुवसा । परी त्याही येणें मानें यशा । येतीचिना ॥4-10॥
सनकादिक त्याची खूप दिवसापासून इच्छा करित होते, पण त्यांनाही इतक्या योग्यतेचे ते प्रेम प्राप्त झाले नाही.
11-4
या जगदीश्वराचें प्रेम । एथ दिसतसे निरुपम । कैसें पार्थें येणें सर्वोत्तम । पुण्य केलें ॥11॥
या जगदीश्वराचे प्रेम या अर्जुनावर अगदी निरुपम दिसत आहे. अर्जुनाने हे सर्वोत्तम पुण्य कसे प्राप्त केले बरे?
12-4
हो कां जयाचिया प्रीती । अमूर्त हा आला व्यक्ती । मज एकवंकी याची स्थिती । आवडतु असे ॥12॥
अर्जुनाच्या प्रेमामुळे श्रीकृष्ण हा निराकार असूनही साकार झाला. अर्जुनाची त्या देवाशी झालेली एकरूपता मला आवडली आहे.
13-4
एर्हवीं हा योगिया नाडळे । वेदार्थासी नाकळे । जेथ ध्यानाचेही डोळे । पावतीना ॥13॥
एरव्ही हा श्रीकृष्ण परमात्मा योग्यांनाही सापडत नाही, वेदांना याचे वर्णन करता आले नाही, ध्यानानेही याला जाणता येत नाही, (ध्यानाचीहि नजर जेथे पर्यंत पोचत नाही)
14-4
तें हा निजस्वरूप । अनादि निष्कंप । परी येणे मानें सकृप । जाहला असे ॥14॥
तो हा आत्मस्वरूप, उत्पत्तीरहित हा श्रीकृष्ण, मूळचाच अचल आहे; परंतु कोणत्या कारणामुळे अर्जुनावर कृपावंत झाला आहे, हे समजत नाही.
15-4
हा त्रैलोक्यपटाचि घडी । आकाराची पैलथडी । कैसा याचिये आवडी । आवरला असे ॥15॥
हा त्रैलोक्यरूपी वस्त्राची घडी आहे. हा सर्व प्रकारच्या आकाराच्या पलीकडचा आहे; पण अर्जुनाच्या निःस्वार्थ प्रेमाने या अनंताला आपल्या आटोक्यात आणले आहे.
श्रीभगनानुवाच:
इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् ।
विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत् ॥4.1॥
भावार्थ :- श्रीकृष्ण भगवान म्हणाले, मी हा अविनाशी योग सृष्टीच्या आरंभी सूर्याला सांगितला, सूर्याने तो मनूला सांगितला आणि मनूने आपला पुत्र राजा इक्ष्वाकूला सांगितला.
16-4
मग देव म्हणे अगा पंडुसुता । हाचि योगु आम्हीं विवस्वता । कथिला परी ते वार्ता । बहुवां दिवसांची ॥16॥
मग देव म्हणाले, अरे अर्जुना ! हाच योग आम्ही सूर्याला सांगितला, परंतु ती गोष्ट फार दिवसापूर्वीची आहे.
17-4
मग तेणें विवस्वतें रवी । हे योगस्थिति आघवी । निरूपिली बरवी । मनूप्रती ॥17॥
मग त्या विवस्वानं सूर्याने (रवीने) या योगाची संपूर्ण माहिती उत्तम प्रकारे मनूला सांगितली.
18-4
मनूनें आपण अनुष्ठिली । मग इक्ष्वाकुवा उपदेशिली । ऐसी परंपरा विस्तारिली । आद्य हे गा ॥18॥
मनूने स्वतः त्या योगाचे आचरण केले आणि मग आपला पुत्र इक्ष्वाकू यांस उपदेश केला. अशी ही परंपरा मुळापासून चालत आली आहे.
एवं परंपराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः ।
स कालेनेह महता योगो नष्टः परंतप॥4.2॥
भावार्थ :- या प्रकारे परंपरेने प्राप्त झालेला हा योग राजर्षीनी जाणला; परंतु हे अर्जुना ! दीर्घकालानंतर तो योग या लोकी लुप्त झाला.
19-4
मग आणिकही या योगाते । राजर्षि जाहले जाणते । परी तेथोनि आतां सांप्रतें । नेणिजे कोणी ॥19॥
इक्ष्वाकूनंतर आणखी कांही राजर्षी ह्या निष्काम कर्मयोगाला जाणणारे होऊन गेले; पण तेंव्हापासून आजपर्यंत या योगाला कोणी जाणत नाही.(कोणाला ठाऊक नाही)
20-4
जे प्राणियां कामी भरू । देहाचिवरी आदरु । म्हणोनि पडला विसरु । आत्मबोधाचा ॥20॥
याचे कारण म्हणजे प्राणिमात्राचा सगळा भर ” काम ” या विषयावर होता (पडला) आणि ते देहालाच सत्य मानत होते. देहावरच प्रेम करत असल्यामुळे त्यांना आत्मज्ञाना चा विसर पडला.
21-4
अव्हांटलिया आस्थाबुद्धि । विषयसुखचि परमावधि । जीवु तैसा उपाधि । आवडे लोकां ॥21॥
आत्मबोधाची बुद्धीच आडमार्गाकडे जाऊ लागल्यामुळे लोकांना विषयातच आत्त्यंतीक सुख वाटू लागले आणि देहाचेच विचार प्राणांप्रमाणे प्रिय झाले.
22-4
एर्हवीं तरी खवणेयांच्या गांवीं । पाटाऊवें काय करावीं । सांगे जात्यंधा रवी । काय आथी ॥22॥
ज्या गावात वस्त्रे घालीत नाहीत, त्या गावात उंची वस्त्रांचा काय उपयोग? किंवा जन्मापासून अंध असणाऱ्याला सूर्याचा काय उपयोग? सांग बरे.
23-4
कां बहिरयांचां आस्थानीं । कवणे गीतातें मानी । कीं कोल्हेया चांदणीं । आवडी उपजे ॥23॥
किंवा बहिऱ्याच्या सभेत गाण्याला कोण किंमत देईल काय? किंवा कोल्हयाच्या मनात चांदण्याची आवड कधी निर्माण होईल काय?
24-4
पैं चंद्रोदया आरौतें । जयांचे डोळे फुटती असते । ते काऊळे केवीं चंद्रातें । ओळखती ॥24॥
चंद्राचा उदय होण्यापूर्वी ज्यांचे डोळे मिटतात, ते कावळे चंद्राला कसे बरे ओळखतील??
25-4
तैसे वैराग्याची शिंव न देखती । जे विवेकाची भाषा नेणती । ते मूर्ख केंवीं पावती । मज ईश्वराते ॥25॥
त्याप्रमाणे ज्यांनी वैराग्याची सीमादेखील पाहिली नाही, विवेक कशाला म्हणतात हे ज्यांना माहित नाही, (सत्य व असत्य याची भाषा ज्यांना समजत नाही), ते अज्ञानी, महामुर्ख लोकांना माझी ईश्वराची प्राप्ती कशी बरें होईल?? (ते अज्ञानी ईश्वराला कसे बरे प्राप्त होतील.)