सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ३५१ ते ३७५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

351-18
तें देववृंद बरवें । कर्मकारण पांचवें । अर्जुना एथ जाणावें । देवो म्हणे ॥351॥
तेच दैव म्हणजे देवांचा समुदाय हे या कर्माचे पाचवे कारण आहे. देव म्हणतात:- समजलास अर्जुना? 351
352-18
एवं माने तुझिये आयणी । तैसी कर्मजातांची हे खाणी । पंचविध आकर्णीं । निरूपिली ॥352॥
याप्रमाणे तुझ्या बुद्धीस कळेल अशा रीतीने कर्माची पाच प्रकारची कारणे तुला सांगितली ती ऐकलीस ना? 352
353-18
आतां हेचि खाणी वाढे । मग कर्माची सृष्टि घडे । जिहीं ते हेतुही उघडे । दाऊं पांचै ॥353॥
आता या हेतूंच्या योगे ही कर्म घडतात, ते पाच हेतू तुला उघड करून सांगतो. 353
शरीरवाण्‌मनोभिर्यत्कर्म प्रारभते नरः ।
न्याय्यं वा विपरीतं वा पञ्चैते तस्य हेतवः ॥18.15॥

354-18
तरी अवसांत आली माधवी । ते हेतु होय नवपल्लवीं । पल्लव पुष्पपुंज दावी । पुष्प फळातें ॥354॥
तर अकस्मात वसंत ऋतु प्राप्त झाला असता त्याच्या योगाने झाडांस नवी पालवी फुटते, पालवी फुटल्यावर फुलांचे घोस येतात आणि फुलांपासून फळी निर्माण होतात; 354
355-18
कां वार्षिये आणिजे मेघु । मेघें वृष्टिप्रसंगु । वृष्टीस्तव भोगु । सस्यसुखाचा ॥355॥
अथवा पावसाळ्यांत मेघ उत्पन्न होतात, मेघांपासून पर्जन्यवृष्टी होते आणि पर्जन्यवृष्टी पासून धान्य उत्पन्न होते; 355

356-18
नातरी प्राची अरुणातें विये । अरुणें सूर्योदयो होये । सूर्यें सगळा पाहे । दिवो जैसा ॥356॥
किंवा पूर्वेस अरुणोदय होतो, अरुणोदय झाल्यावर सूर्य उगवतो आणि सूर्याचा पूर्ण प्रकार झाला म्हणजे दिवस होतो, 356
357-18
तैसें मन हेतु पांडवा । होय कर्मसंकल्पभावा । तो संकल्पु लावी दिवा । वाचेचा गा ॥357॥
त्याप्रमाणे अर्जुना, मन हे कर्माचा संकल्प होण्याच कारण आहे आणि तोच संकल्प झाला म्हणजे वाचेने बाहेर पडतो, 357
358-18
मग वाचेचा तो दिवटा । दावी कृत्यजातांचिया वाटा । तेव्हां कर्ता रिगे कामठां । कर्तृत्वाच्या ॥358॥
मग वाणीच्या उजेडाने कर्माची वाट स्पष्ट दिसू लागते, तेव्हा कर्ता कर्म करण्यास लागतो, 358
359-18
तेथ शरीरादिक दळवाडें । शरीरादिकां हेतुचि घडे । लोहकाम लोखंडें । निर्वाळिजे जैसें ॥359॥
तेव्हा शरीरादिक सर्व इंद्रिये कर्माला कारण होतात. लोखंडाचा एखादा जिन्नस तयार करणे झाल्यास त्याप्रमाणे तो लोखंडाच्या हत्यारांनीच तयार करावा लागतो, 359
360-18
कां तांथुवाचा ताणा । तांथु घालितां वैरणा । तो तंतुचि विचक्षणा । होय पटु ॥360॥
अथवा तंतूंच्या मागांत (मार्गात) तंतू आडवे घातले म्हणजे त्या तंतूंचे वस्त्र होते; 360

361-18
तैसें मनवाचादेहाचें । कर्म मनादि हेतुचि रचे । रत्नीं घडे रत्नाचें । दळवाडें जेवीं ॥361॥
जसे हिऱ्याला पैलू पाडावयाचे ते हिर्‍यानेच पाडावे लागतात, तसे मन, वाचा व देह यांच्या कर्मास मनच कारण आहे. 361
362-18
एथ शरीरादिकें कारणें । तेंचि हेतु केवीं हें कोणें । अपेक्षिजे तरी तेणें । अवधारिजो ॥362॥
या ठिकाणी, कर्माची शरीरादिक कारणे, तीच त्यांना हेतू कशी होतील. अशी जर कोणी शंका घेईल, तर सांगतो, ऐक. 362
363-18
आइका सूर्याचिया प्रकाशा । हेतु कारण सूर्युचि जैसा । कां ऊंसाचें कांडें ऊंसा । वाढी हेतु ॥363॥
हे पहा, सूर्याच्या प्रकाशास जसा सूर्यच हेतू व कारण आहे, किंवा उसाचे कांडे हेच उसाच्या वाढीस हेतू आहे; 363
364-18
नाना वाग्देवता वानावी । तैं वाचाचि लागे कामवावी । कां वेदां वेदेंचि बोलावी । प्रतिष्ठा जेवीं ॥364॥
अथवा सरस्वतीची स्तुती करणे असल्यास जसे वाणीलाच श्रम करावे लागतात, किंवा वेदांची थोरवी वर्णन करावयाची असल्यास ती वेदांनीच करावी लागते, 364
365-18
तैसें कर्मा शरीरादिकें । कारण हें कीर ठाउकें । परी हेंचि हेतु न चुके । हेंही एथ ॥365॥
तसे कर्माला शारीरादि हीच कारणे होत. हे सर्वांस माहीत आहे; परंतु या ठिकाणी शारीरादिकच कर्मास हेतूही आहेत यात शंका नाही. 365

366-18
आणि देहादिकीं कारणीं । देहादि हेतु मिळणीं । होय जया उभारणी । कर्मजातां ॥366॥
आणि देहादिक अधिष्ठानाला देहादिकच हेतू आहेत व ज्यामुळे सर्व कर्मांची उभारणी होते, 366
367-18
तें शास्त्रार्थें मानिलेया । मार्गा अनुसरे धनंजया । तरी न्याय तो न्याया । हेतु होय ॥367॥
ते कर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे जर केले, तर हे धनंजया, ते पुण्यकर्म होय व त्यालाच न्यायकर्म म्हणतात; आणि त्याचा हेतूही न्यायच होय. 367
368-18
जैसा पर्जन्योदकाचा लोटु । विपायें धरी साळीचा पाटु । तो जिरे परी अचाटु । उपयोगु आथी ॥368॥
जसे पर्जन्याचे पाणी अवचित साळीला लावले, तर ते जमिनीत जिरते, परंतु त्यापासून पुष्कळ उपयोग होतो; 368
369-18
कां रोषें निघालें अवचटें । पडिलें द्वारकेचिया वाटे । तें शिणे परी सुनाटें । न वचिती पदें ॥369॥
अथवा कोणी एखादा मनुष्य रागावून घरातून निघाला व सहज द्वारकेच्या वाटेस लागला, तर त्याला चालण्याचे श्रम होतील खरे, परंतु त्याचे एक पाऊलही व्यर्थ जाणार नाही,369
370-18
तैसें हेतुकारण मेळें । उठी कर्म जें आंधळें । तें शास्त्राचें लाहे डोळे । तैं न्याय म्हणिपे ॥370॥
तशी हेतू व कारण यांच्या योगाने जे आंधळे कर्म घडते, तेच जर सशास्त्र होईल; तर त्यालाच पुण्यकर्म म्हणावे. 370

371-18
ना दूध वाढिता ठावो पावे । तंव उतोनि जाय स्वभावें । तोही वेंचु परी नव्हे । वेंचिलें तें ॥371॥
अथवा एका भांड्यात दूध ब्राह्मणास वाटून संपले णि दुसर्‍या पात्रातील दूध आपोआप उतू जाऊन संपले, तर त्या दोन्ही पात्रातील दूध खर्च झाले खरे, तथापि उतू गेले दूध खर्च झाले,(कारणी लागले) असे म्हणता येत नाही, 371
372-18
तैसें शास्त्रसाह्येंवीण । केलें नोहे जरी अकारण । तरी लागो कां नागवण । दानलेखीं ॥372॥
तसे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे कर्म केले तर ते जर व्यर्थ होणार नाही, तर दरवड्या गेलेले द्रव्य दान केले असे का समजू नये? 372
373-18
अगा बावन्ना वर्णांपरता । कोण मंत्रु आहे पंडुसुता । कां बावन्नही नुच्चारितां । जीवु आथी? ॥373॥
अर्जुना, बावन्न वर्णविरहित कोणता मंत्र आहे? अथवा बावन्न वर्णां पैकी एकाचा तरी उच्चार न करणारा असा कोण प्राणी सापडेल? 373
374-18
परी मंत्राची कडसणी । जंव नेणिजे कोदंडपाणी । तंव उच्चारफळ वाणी । न पवे जेवीं ॥374॥
परंतु अर्जुना, जो पर्यंत मंत्राची युक्ती समजली नाही, तोपर्यंत त्या बावन्न अक्षरांच्या उच्चारास मंत्रोचाराची फलप्राप्ती होणार नाही, 374
375-18
तेवीं कारणहेतुयोगें । जें बिसाट कर्म निगे । तें शास्त्राचिये न लगे । कांसे जंव ॥375॥
त्या प्रमाणे कारण व हेतू यांच्या योगाने जे सामान्य कर्म घडते, ते जेव्हा यथाशास्त्र घडत नाही, 375

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading