सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी २२६ ते २५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , ,

226-6
तेथ नक्षत्र जैसें उलंडलें । कीं सुर्याचें आसन मोडलें । तेजाचे बीज विरुढलें । अंकुरेशीं ॥226॥
त्या वेळी नक्षत्र तुटून पडतेवेळी जसे तेजस्वी दिसते अथवा सूर्याने आपले आसन सोडून खाली यावे, अथवा तेजाचे बीज अंकुरासहित विकसित व्हावे,
227-6
तैशी वेढियातें सोडती । कवतिकें आंग मोडिती । कंदावरी शक्ती । उठली दिसे ॥227॥
त्याप्रमाणे ती कुंडलिनी शक्ती आपले वेटोळे सोडीत, लीलेने अंग मोडीत नाभिस्थानाजवळ स्वधिष्ठानचक्रावर उठलेली दिसते.
228-6
सहजें बहुतां दिवसांची भूक । वरी चेवविलीं तें होय मिष । मग आवेशें पसरी मुख । ऊर्ध्वा उजू ॥228॥
सहजच तिला अनेक दिवसांची; आणि तशातच वज्रसनाच्या उष्णतेने जागृत केलेली भूक हे एक कारण होते. त्यामुळे ती कुंडलिनी शक्ती सहजच आवेशाने सरळच वर तोंड पसरते.
229-6
तेथ हृदयकोशातळवटीं । जो पवनु भरे किरीटी । तया सगळेयाचि मिठी । देऊनि घाली ॥229॥
अर्जुना !! तेंव्हा हृद्यकमळाच्या खाली जो अपान वायू भरलेला असतो, त्या वायूंच्या सर्वांगाला मिठी मारून पोटात घालते.
230-6
मुखींच्या ज्वाळीं । तळीं वरी कवळी । मांसाची वडवाळी । आरोगुं लागे॥230॥
मुखातील ज्वालाने खालचा- वरचा भाग व्यापते आणि मासांचे घास खाऊ लागते.

231-6
जे जे ठाय समांस । तेथ आहाच जोडे घाउस । पाठी एकदोनी घांस । हियाही भरी ॥231॥
ज्या ज्या ठिकाणी मांसल भाग असेल, त्या त्या ठिकाणचा घास तिला वरवरच मिळतो आणि नंतर ती राहिलेल्या भागाचेही घास घेते.
232-6
मग तळवे तळहात शोधी । उर्ध्वीचे खंड भेदी । झाडा घे संधी । प्रत्यंगाचा ॥232॥
मग पायाचे तळवे आणि तळहात यांचा शोध घेत, तेथील मांसल भाग खाऊन प्रत्येक अंगाच्या सांध्याचा झाडा घेते.
233-6
आधार तरी न संडी । परि नखींचेंही सत्त्व काढी । त्वचा धुवूनि जडी । पांजरेशीं ॥233॥
ती शक्ती आपली मूळ जागा न सोडता तेथेच राहून नखांतले सत्वदेखील बाहेर काढते. त्वचा धुऊन हाडांच्या सापळ्याशी चिकटवून देते.
234-6
अस्थींचे नळे निरपे । शिरांचे हीर वोरपे । तंव बाहेरी विरुढी करपे । रोमबीजांची ॥234॥
हाडांचे नळे निरपून घेते. शिरांच्या कड्यांना ओरपुन काढते, तेंव्हा बाहेरच्या केसांच्या मुळांची वाढ करपून जाते.
235-6
मग सप्तधांतूच्या सागरीं । ताहानेली घोंट भरी । आणि सवेंचि उन्हाळा करी । खडखडीत ॥235॥
तहानेने व्याकुळ झालेली ती शक्ती रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा व शुक्र या सात धातूंच्या समुद्रात येऊन एका घोटाने पिऊन टाकते. त्यामुळे सर्व शरीर खडखडीत कोरडे होऊन जाते.


236-6
नासापुटौनि वारा । जो जातसे अंगुळे बारा । तो गचिये धरुनि माघारा । आंतु घाली॥236॥
दोन्ही नाकपुड्यातून बाहेर जो बारा बोटे लांब वारा वाहत असतो, त्याला गच्च धरून पुनः आत घालते. ( नासापुटौनि म्हणजे नाकपुड्यातून)
237-6
तेथ अध वरौतें आकुंचे । ऊर्ध्व तळौतें खांचे । तया खेंवामाजि चक्राचे । पदर उरती ॥237॥
त्यावेळी खालचा अपाणवायू वर आकुंचित होतो आणि वरचा प्राणवायू खाली जातो. त्या प्राण-अपानवायूच्या भेटीमध्ये शटचक्रांचे नुसते पदर तेवढे उरतात.
238-6
एऱ्हवीं तरी दोन्ही तेव्हांचि मिळती । परि कुंडलिनी नावेकु दुश्चित्त होती । ते तयांतें म्हणे परौती । तुम्हीचि कायसीं एथें ॥238॥
प्राण व अपान वायू हे दोन्ही त्याच वेळेस एके ठिकाणी मिळाले असते; परंतु कुंडलिनी शक्ती क्षणभर तेथे क्षोभलेली असते; म्हणून ती त्यांना म्हणते, तुम्ही माघारे जा, तुमचे काय काम आहे??
239-6
आइकें पार्थिव धातु आघवी । आरोगितां काहीं नुरवी । आणि आपातें तंव ठेवी । पुसोनियां॥239॥
अर्जुना, ऐक. पृथ्वीपासून निर्माण झालेले शरीरातील जे धातू आहेत, ते खाऊन ती शक्ती काहीही शिल्लक ठेवत नाही आणि पाण्याचा भाग तर चाटून पार पुसून टाकते.
240-6
ऐसी दोनी भुतें खाये । ते वेळी संपूर्ण धाये । मग सौम्य होऊनि राहे । सुषुम्नेपाशीं ॥240॥
याप्रमाणे शरीरातील पृथ्वी आणि जल ही दोन्ही भुते ज्यावेळी ती खाते, त्यावेळी ती पूर्णपणे तृप्त होते, मग सौम्य बनते आणि सुषुम्नेजवळ स्थिर होते.

241-6
तेथ तृप्तीचेनि संतोषें । गरळ जें वमी मुखें । तेणें तियेचेनि पीयूषे । प्राणु जिये ॥241॥
त्यावेळी तृप्त होऊन संतोषाने तोंडाने गरळ ओकते. ते गरळ अमृत होऊन त्यामुळेच प्राण जगत असतो.
242-6
तो अग्नि आंतूनि निघे । परि सबाह्य निववूंचि लागे । ते वेळी कसु बांधिती आंगे । सांडिला पुढती ॥242॥
शक्तीच्या तोंडातून तो गरळरूपी अग्नी बाहेर निघतो आणि शरीराला आतून – बाहेरून शांत करू लागतो, त्यावेळी शरीराच्या गात्रांची गेलेली शक्ती पुनः येऊ लागते.
243-6
मार्ग मोडिती नाडीचे । नवविधपण वायुचें । जाय म्हणऊनि शरीराचे । धर्मु नाहीं ॥243॥
नाडीची गती बंद पडते. शरीरातील (अपान, व्यान, उदान, समान, नाग, कूर्म, देवदत्त, कृकल आणि धनंजय) स्नानभेदाने असणारे नऊ प्रकारचे वायू नष्ट होतात, त्यामुळे तहान भूक वगैरे शरीराचे धर्म नाहीसे होतात.
244-6
इडा पिंगळा एकवटती । गांठी तिन्ही सुटती । साही पदर फुटती । चक्रांचे हे ॥244॥
इडा आणि पिंगळा या दोन नाड्या एक होतात. (हृदयस्थानाची ब्रम्हग्रंथी, कंठस्थानाची विष्णूग्रंथी आणि भृमध्यस्थानी असलेली रुद्रग्रंथी) या तीन गाठी सुटतात. व सहा चक्राचेहि पदर फुटतात.
245-6
मग शशी आणि भानु । ऐसा कल्पिजे जो अनुमानु । तो वातीवरी पवनु । गिवसितां न दिसे ॥245॥
डाव्या नाकपुडीतून वाहणाऱ्या वायूला चंद्र असे म्हणतात. आणि उजव्या नाकपुडीतून वाहणाऱ्या वायूला सूर्य असे म्हणतात. अशा अनुमाणिक कल्पनेने ठरवलेले दोन प्रकारचे वायू नाका पुढे कापसाची वात धरून पहिले, तरी ते सापडत नाहीत.

246-6
बुध्दीची पुळिका विरे । परिमळु घ्राणी उरे । तोही शक्तिसवें संचरे । मध्यमेमाजी ॥246॥
बुद्धीची ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती विरून जाते. नाकामध्ये गंध घेण्याची जी शक्ती असते, ती कुंडलिनी शक्तीबरोबर सुषुम्नेमध्ये प्रवेश करते.
247-6
तंव वरिलेकडोनि ढाळें । चंद्रामृताचें तळें । कानवडोनि मिळे । शक्तिमुखीं ॥247॥
त्यावेळी वरच्या बाजूस आलेले चांद्रमृताचे तळे हळूहळू कलते होते आणि ते चांद्रमृत कुंडलिनी शक्तीच्या मुखात पडते.
248-6
तेणें नातकें रस भरे । तो सर्वांगामाजीं संचरे । जेथिंचा तेथ मुरे । प्राणपवनु ॥248॥
त्यामुळे शक्तीरूपी नळीत अमृतसर भरून जातो आणि तो रस सर्वांगामध्ये पसरत राहतो. प्राणवायू जिथल्या तिथेच लय पावतो.
249-6
तातलिये मुसें । मेण निघोनि जाय जैसें । कोंदली राहे रसें । वोतलेनि ॥249॥
तापलेला रस मुशीमध्ये ओतला म्हणजे मुसदेखील तप्त होते आणि आतील मेण आपोआप निघून जाते; मग ती मुस ओतलेल्या रसानेच भरलेली राहते,
250-6
तैसे पिंडाचेनि आकारें । ते कळाचि कां अवतरे । वरी त्वचेचेनि पदरें । पांगुरली असे ॥250॥
त्याप्रमाणे ते शरीर एवढे तेजुयक्त दिसते की, जणू काही त्वचेचे पदर पांघरलेले तेजच प्रकट झालेले आहे.

, , , , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *