101-4
तेणें न पाहतां विश्व देखिलें । न करितां सर्व केले । न भोगितां भोगिलें । भोग्यजात॥101॥
त्याप्रमाणे चर्मचक्षुने विश्व पहिले नसले, तरी दिव्य चक्षुने तो सर्व काही पाहत असतो. तो काही न करताही सर्व कर्मे केल्याप्रमाणे आहे आणि भोग्य वस्तूंचा उपभोग न घेतासुद्धा त्याने भोगल्याप्रमाणेच आहेत.
102-4
एकेचि ठायीं बैसला । परि सर्वत्र तोचि गेला । हें असो विश्व जाहला । आंगेंचि तो॥102॥
तो एके ठिकाणी तो बसून असला, तरी आतून सर्वत्र संचार करीत असतो. त्याच्याबद्दल आणखीन काय सांगावे? तो सम्पूर्ण विश्वचैतन्याशी एकरूप झालेला असतो.
यस्य सर्वे समारम्भाः कामसंकल्पवर्जिताः ।
ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः॥4.19॥
भावार्थ :- ज्याची सर्व कर्मे कर्तृत्व अहंकार रहित आणि फलाच्या इच्छेरहित आहेत आणि ज्ञानरूपी अग्नीने ज्याची कर्मे भस्म झालेली आहेत, अशा पुरुषाला ज्ञानी लोक पंडित असे म्हणतात.
103-4
जया पुरुषाचां ठायीं । कर्माचा तरी खेदु नाहीं । परी फळापेक्षा कहीं । संचरेना ॥103॥
ज्या पुरुषाच्या मनामध्ये कर्म करण्यासंबधी कोणत्याही प्रकारचा खेद नसतो, अतिशय तत्परतेने तो कर्म करीत असतो; त्यांच्या मनामध्ये फलाची इच्छा चुकून केंव्हाही प्रवेश करीत नाही;
104-4
आणि हें कर्म मी करीन । अथवा आदरिले सिद्धी नेईन । येणें संकल्पेंही जयाचें मन । विटाळेना ॥104॥
आणि हे कर्म मी करीन, अथवा आरंभिलेले कर्म सिद्धीस नेईन, ह्या कल्पनेनेही ज्याचे मन विटाळले जात नाही,
105-4
ज्ञानाग्निचेनि मुखें । जेणें जाळिली कर्में अशेखें । तो ब्रह्मचि मनुष्यवेखें । वोळख तूं ॥105॥
ज्ञानरूपी अग्नीच्या द्वारां ज्याने सर्व कर्मे जाळून टाकली आहेत, तो मनुष्याचे रूप घेतलेले प्रत्येक्ष परब्रम्हच आहे, असे तू जाण.
त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः ।
कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः॥4.20॥
भावार्थ :- जो कर्माच्या फळाची इच्छा संपूर्णपणे सोडून देतो आणि ब्रह्मनंदामध्ये नित्य तृप्त असतो, जो कोणत्याही गोष्टीचा आश्रय (निराश्रय) करीत नाही, तो बाह्यतः सर्व कर्मे करीत असला, तरी वस्तुतः काहींचं करत नाही.
106-4
जो शरीरीं उदासु । फळभोगीं निरासु । नित्यता उल्हासु । होऊनि असे॥106॥
जो शरीराविषयी उदास असतो, (मनात शरीराबद्दल कसलाही अहंकार नसणे), फळाच्या (उपभोगा विषयी) प्राप्तीविषयी जो निरिच्छ असतो व सत्- चित् – आनंदरूप होऊन राहिलेला असतो,
107-4
जो संतोषाचां गाभारां । आत्मबोधाचिया वोगरा । पुरे न म्हणेचि धनुर्धरा । आरोगितां ॥107॥
अर्जुना, जो संतोषाच्या गाभाऱ्यात बसून ब्रम्हरसाचे भोजन करीत असताना ‘ पुरे ‘ असे कधीच म्हणत नाही,
निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रहः ।
शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिशम्॥4.21॥
भावार्थ :- ज्याने आपले शरीर व अंतःकरण वश केलेले आहे व ज्याने सर्व भोगांच्या सामग्रीचा त्याग केलेला आहे, असा तो आशारहित पुरुष केवळ देहस्थितील उपयोगी असे कर्म करीत असला, तरी तो पापाला प्राप्त होत नाही.
यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः ।
सम सिद्धावसिद्धौच कृत्वाऽपि न निबध्यते॥4.22॥
भावार्थ:- सहजपणे जे कांही प्राप्त होईल, त्यातच संतुष्ट असणारा, हर्ष, शोक इत्यादी द्वंद्वाच्या पलीकडे गेलेला, ईर्ष्यारहित सिद्धी व असिद्धीमध्ये समभाव ठेवणारा पुरुष कर्मे करूनदेखील बंधनात गुंतून राहत नाही.
108-4
कैसा अधिकाधिक आवडी । घेत महासुखाची गोडी । सांडोनियां आशा कुरोंडी । अहंभावेसीं ॥108॥
तो अहंकाराला सुद्धा आशेची ओवाळणी करतो आणि ब्रम्हानंदाची गोडी अधिक प्रमाणात चाखत असतो.
109-4
म्हणोनि अवसरें जें जें पावे । तेणेचि तो सुखावे । जया आपुले आणि परावें । दोन्ही नाहीं ॥109॥
म्हणून, ज्या वेळेस जे जे प्राप्त होईल, त्यातच तो सुख मानत असतो. त्याच्या मनात हा परका व हा आपला, अशा प्रकारचा कोणताही भेदभाव नसतो.
110-4
तो दिठी जें पाहे । ते आपणचि होऊनि जाये । आइकें तें आहे । तोचि जाहाला ॥110॥
तो डोळ्यांनी जे जे पाहतो, ते दृश्य आपण स्वतः होऊन जातो. आणि तो जे ऐकतो तेच तो झालेला असतो.
111-4
चरणीं हन चाले । मुखें जें जें बोले । ऐसें चेष्टाजात तेतुलें । आपणचि जो ॥111॥
तो पायांनी चालत असतो, तोंडाने बोलत असतो आणि शरीराने जे जे कर्म करीत असतो, ते सर्व आपणच बनतो.
112-4
हें असो विश्व पाहीं । जयासि आपणपेवांचूनि नाहीं । आता कवण तें कर्म कायी । बाधी तयातें ॥112॥
हे असो; संपूर्ण विश्व ज्याला आपल्या स्वरूपावाचून वेगळे दिसत नाही, (विश्व आपल्याहून वेगळे दिसत नाही) आता त्याला कर्म ते कसले व ते त्याला बाधा काय करणार??
113-4
हा मत्सरु जेथ उपजे । तेतुले नुरेचि जया दुजें । तो निर्मत्सरु काइ म्हणिजे । बोलवरी ॥113॥
मी आणि विश्व वेगळे मानले, तर द्वैत निर्माण होतो आणि मत्सर प्रकट होतो. ज्याच्या हृदयात द्वैतच नाही, तो पुरुष निर्मत्सर आहे, असे शब्दाने बोलून दाखवण्याची आवश्यकता आहे काय?? (अर्थातच नाही)
114-4
म्हणोनि सर्वांपरी मुक्तु । तो सकर्मुचि तो कर्मरहितु । सगुण परि गुणातीतु । एथ भ्रांति नाहीं ॥114॥
म्हणून तो सर्व प्रकारे मुक्त आहे; कर्म करीत असताहि कर्मरहित आहे व गुणयुक्त असूनहि गुणातीत आहे; ह्यात शँका (संशय) नाही.
{ बाह्यतः कर्म करीत असला, तरी आतून कर्मरहित असणे.
देहाने सगुण असला, तरी ब्रम्हरूपाने गुणातीत असणे,}
गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित्चेतसः ।
यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते॥4.23॥
भावार्थ :- ज्याची कर्मफलाविषयी आसक्ती पूर्णपणे नाहीशी झाली आहे, जो मुक्त झाला आहे, ज्याचे चित्त ब्रह्मज्ञानात स्थिर झाले आहे, जो यज्ञाकरिता कर्म करणारा आहे, त्याचे ते सर्व कर्म (त्याच्याच ठिकाणी फलासह) लय पावते.
115-4
तो देहसंगे तरी असे । परी चैतन्यासारिखा दिसे । पाहतां परब्रह्माचेनि कसें । चोखाळु भला ॥115॥
तो देहधारी असला, तरी (निर्गुण) चैतन्यरूप दिसतो. परब्रह्मच्या कसोटीने त्याला जाणून घेतले असता, तो अगदी शुद्ध दिसतो.(शुद्ध आहे असे आढळून येते.)
116-4
ऐसाही परी कौतुकें । जरी कर्मे करी यज्ञादिकें । तरी तियें लया जाती अशेखें । तयाचांचि ठायीं ॥116॥
असे असूनही त्याने जर कौतुकाने कर्मे केली, तिरीपण ती कर्म त्याच्या ब्रम्हस्वरूपामध्ये लीन होऊन जातात.
117-4
अकाळींची अभ्रें जैसी । उर्मीविण आकाशीं । हारपती आपैशीं । उदयलीं सांती ॥117॥
आकाशात अकाली आलेले मेघ ज्याप्रमाणे कांही जोर न करता (वृष्टी), आले, तसे आपोआप जागच्या जागी विरून जातात;
118-4
तैशीं विधीविधान विहितें जरी आचरे तो समस्तें । तरी तियें ऐक्यभावें ऐक्यातें । पावतीचि गा ॥118॥
त्याप्रमाणे वेदांनी सांगितलेल्या एकूण एक विधानांचे यथासांग जरी तो अनुष्ठान करतो, तरी त्याच्या ऐक्य भावनेमुळे ती शेवटी ऐक्यालाच मिळतात. (त्याच्या ठिकाणी दुजाभाव नसल्यामुळे त्याच्याच ठिकाणी लय पावतात.)
ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् ।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मस्माधिना॥4.24॥
भावार्थ :- होमाची सर्व प्रकारची साधना, होम द्रव्य, अग्नी आणि हवनक्रिया ही त्या ब्रम्ह जाणाऱ्या पुरुषाच्या दृष्टीने ब्रम्हच आहेत. सर्व कर्माच्या ठिकाणी ज्याची दृष्टी ब्रम्हस्वरूप झाली आहे, त्या ज्ञानाकडून प्राप्त करून घ्यावयाचे फलही ब्रम्हच आहे.
119-4
जें हें हवन मी होता । कां इये यज्ञीं हा भोक्ता । ऐसीया बुद्धीसि नाही भंगता । म्हणऊनियां ॥119॥
ही हवनक्रिया आहे, मी हवन करणारा आहे, तसेच या यज्ञामध्ये ईश्वर हा भोक्ता आहे, अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचा भेद ब्रम्हज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी नसतो. म्हणून
120-4
जे इष्टयज्ञ यजावे । तें हविर्मंत्रादि आघवें । तो देखतसे अविनाशभावें । आत्मबुद्धि ॥120॥
जे जे इष्ट यज्ञ तो करतो, त्यातील होमद्रवे व मंत्र इत्यादी सर्व ब्रम्हस्वरूप आहेत, असे जो समजतो.
121-4
म्हणऊनि ब्रह्म तेंचि कर्म । ऐसें बोधा आले जया सम । तया कर्तव्य तें नैष्कर्म्य । धनुर्धरा ॥121॥
म्हणून ब्रम्ह तेच कर्म, अशी समत्वबुद्धी ज्याच्या अंतःकरणात स्थिर झाली, त्याने कर्म केले, तरी नैष्कर्म्य होय.
122-4
आतां अविवेककुमारत्वा मुकले । जयां विरक्तीचे पाणिग्रहण जाहलें । मग उपासन जिहीं आणिलें । योगाग्नीचें ॥122॥
ज्याचे अविवेकरूपी बालपण संपून गेले आणि विवेकरूपी तारुण्याचे वैभव ज्याला प्राप्त झाले, ज्याचे विरक्तिरूपी वधुशी लग्न झाले आणि ज्याने योगरूप अग्नीची उपासना सुरु केली.
दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ।
ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति॥4.25॥
भावार्थ :- अन्य योगी लोक भगवत-अर्पणरूपी यज्ञानेच अनुष्ठान करतात आणि कित्येक योगी लोक ब्रह्मरूपी अग्नीच्या ठिकाणी यज्ञानेच यज्ञाची उपासना करतात.
संदर्भित अन्वयार्थ
अपरे = दुसरे, योगिनः = योगी लोक, दैवम् = देवतांचे पूजनरूपी, यज्ञम् एव = यज्ञाचेच, पर्युपासते = चांगल्याप्रकारे अनुष्ठान करीत राहतात, अपरे = दुसरे (योगी लोक), ब्रह्माग्नौ = परब्रह्म परमात्मरूप अग्नीमध्ये, यज्ञेन एव = (अभेद दर्शनरूपी) यज्ञाच्या द्वारेच, यज्ञम् = आत्मरूप यज्ञाचे, उपजुह्वति = हवन करतात ॥ ४-२५ ॥
दुसरे काही योगी देवपूजारूप यज्ञाचे उत्तम प्रकारे अनुष्ठान करतात. तर इतर योगी परब्रह्म परमात्मारूपी अग्नीत अभेददर्शनरूप यज्ञाच्या द्वारेच आत्मारूप यज्ञाचे हवन करतात. ॥ ४-२५ ॥
123-4
जे यजनशील अहर्निशीं । जिहीं अविद्या हविली मनेंसी । गुरुवाक्यहुताशीं । हवन केलें ॥123॥
ते रात्रंदिवस ज्ञानयज्ञ करणारे आत्मज्ञानी लोक आहेत आणि त्यांनी गुरुबोधरूपी अग्नीत मनासह अज्ञानाचे हवन केले आहे.
124-4
तिहीं योगाग्निकीं यजिजे । तो दैवयज्ञु म्हणिजे । जेणे आत्मसुख कामिजे । पंडुकुमरा ॥124॥
अशाप्रकारे योगरूप अग्निमध्ये जे हवन करतात, त्याला “दैवयज्ञ” असे म्हणतात. हे अर्जुना ! त्या दैवयज्ञाने आत्मसुख प्राप्त होते.
125-4
दैवास्तव देहाचे पाळण । ऐसा निश्चयो परिपूर्ण । जो चिंतीना देहभरण । तो महायोगी जाण दैवयोगें ॥125॥
देहाचे पालन हे प्रारब्धाप्रमाणे होत असते, असा ज्याचा दृढनिश्चय असतो, तो देहाच्या पोषणकरता मनात चिंता करत नाही. तो दैवयोगाने महायोगी आहे, असे तू जाण.
