सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १५०१ ते १५२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

1501-18
अंग गोरें आणि तरुणें । वरी लेईलें आहे लेणें । परी येकलेनि प्राणें । सांडिलें जेवीं ॥1501॥
शरीर गोरें आहे, तरुण आहे, अलंकारभूषित आहे, पण फक्त प्राण मात्र त्यांत जसा नसावा. 1
1502-18
सोनयाचें सुंदर । निर्वाळिलें होय घर । परी सर्पांगना द्वार । रुंधलें आहे ॥1502॥
किंवा सोन्याचे सुंदर बांधलेले घर आहे, पण नागिणीनें प्रवेशद्वार रोखून ठेविलें आहे.2
1503-18
निपजे दिव्यान्न चोखट । परी माजीं काळकूट । असो मैत्री कपट- । गर्भिणी जैसी ॥1503॥
किंवा उत्तम स्वच्छ अन्न तयार करून आंत जर जालीम विष असेल किंवा वरून मैत्री असून पोटांत कपट असेल तर ते जसे व्यर्थ. 3
1504-18
तैसी तपभक्तिमेधा । तयाची जाण प्रबुद्धा । जो माझयांची कां निंदा । माझीचि करी ॥1504॥

त्याप्रमाणे, जो माझी किंवा माझ्या भक्तांची निंदा करितो, त्याचे तप, भक्ति, बुद्धि हीं व्यर्थ होत असे ध्यानां असू दे. 4
1505-18
याकारणें धनंजया । तो भक्तु मेधावीं तपिया । तरी नको बापा इया । शास्त्रा आतळों देवों ॥1505॥
यास्तव, अर्जुना, तो जरी भक्त, बुद्धिमान व तपी असला तरी त्याला ह्या गीताशास्त्राचा स्पर्श होऊ देऊ नको. 5

1506-18
काय बहु बोलों निंदका । योग्य स्रष्टयाहीसारिखा । गीता हे कवतिका- । लागींही नेदीं ॥1506॥
फार काय सांगावें? त्याची ब्रह्मदेवासारखी योग्यता असूनही जर तो निंदक असेल, तर कौतुकाखातरही त्याला गीता सांगू नको. 6
1507-18
म्हणौनि तपाचा धनुर्धरा । तळीं दाटोनि गाडोरा । वरी गुरुभक्तीचा पुरा । प्रासादु जो जाला ॥1507॥
म्हणून अर्जुना, ज्यानें तपोरूप पाषाणांचा तळांत दृढपाया भरून, त्यावर जो स्वतः पूर्णं गुरुभक्तिरूप मंदिर बनला आहे. 7
1508-18
आणि श्रवणेच्छेचा पुढां । दारवंटा सदा उघडा । वरी कलशु चोखडा । अनिंदारत्नांचा ॥1508॥
आणि ज्याचे श्रवणेच्छारूप प्रवेशद्वार नित्य उघडे आहे व ज्या मंदिरावर अनिंदारूप रत्नांचा उत्तम कळस शोभतो आहे. 8
इदं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति ।
भक्तिं मयि परां कृत्वा मामेवैष्यत्यसंशयः ॥18.68॥
1509-18
ऐशा भक्तालयीं चोखटीं । गीतारत्नेश्वरु हा प्रतिष्ठीं । मग माझिया संवसाटी । तुकसी जगीं ॥1509॥
अश्या शुद्ध भक्तरुपी देवालयात ह्या गीतारत्नेश्वराची स्थापना कर. म्हणजे जगात तु योग्यतेला पावशील, 9
1510-18
कां जे एकाक्षरपणेंसीं । त्रिमात्रकेचिये कुशीं । प्रणवु होतां गर्भवासीं । सांकडला ॥1510॥
कारण, जो प्रणव म्हणजे ॐकार एक अक्षराच्या रूपानें त्रिमात्रा ज्या अ, उ, म ह्यांच्या पोटांत गर्भवासामध्ये होता-1510

1511-18
तो गीतेचिया बाहाळीं । वेदबीज गेलें पाहाळी.ण् । कीं गायत्री फुलींफळीं । श्लोकांच्या आली ॥1511॥
असा वेदाचे बीज जो ॐकार तो गीतारूप वृक्षाच्या फांद्यांनीं दूरवर विस्तारला; किंवा गायत्रीरूप (बीजत्व ने) असलेला हाच ॐकार, गीतेंतील लोकांच्या रूपाने जणू फुलांफळांस आला. 11
1512-18
ते हे मंत्ररहय गीता । मेळवी जो माझिया भक्ता । अनन्यजीवना माता । बाळका जैसी ॥1512॥
ती प्रणवमंत्राचे रहस्य असलेली ही गीता, अनन्यजीवन बाळकाला आई भेटावी, त्याप्रमाणे, जो माझ्या भक्तांस भेटवितो- (उपदेशितो) 12
1513-18
तैसी भक्तां गीतेसीं । भेटी करी जो आदरेंसीं । तो देहापाठीं मजसीं । येकचि होय ॥1513॥
त्याचप्रमाणे भक्तांची जो गीतेपाशीं आदराने ग्रंथि घालून देतो तो देहपातानंतर मलाच प्राप्त होतो. (मद्रूपच होतो). 13
न च तस्मान्मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः ।
भविता न च मे तस्मादन्यः प्रियतरो भुवि ॥18.69॥
1514-18
आणि देहाचेंही लेणें । लेऊनि वेगळेपणें । असे तंव जीवेंप्राणें । तोचि पढिये ॥1514॥
आणि असा भक्त देहरूपी अलंकाराच्या उपाधीच्या योगाने माझ्याहून वेगळेपणाने असला, तरी मला तो जीव की प्राण असा प्रिय आहे. 14
1515-18
ज्ञानियां कर्मठां तापसां । यया खुणेचिया माणुसां- । माजीं तो येकु गा जैसा । पढिये मज ॥1515॥
ज्ञानाभ्यासी, कर्मठ, तापसी अशी भिन्न भिन्न अधिकारची माणसें असली तरी, त्यामध्ये तो एक जसा मला आवडतो.15

1516-18
तैसा भूतळीं आघवा । आन न देखे पांडवा । जो गीता सांगें मेळावा । भक्तजनांचा ॥1516॥
तसा, सर्व जगांत, अर्जुना, मला अन्य कोणीही आवडत नाही; असा कोण म्हणून विचारशील तर, जो भक्तजनांच्या मेळाव्यामध्ये गीतेचे प्रवचन करितो तो होय. 16
1517-18
मज ईश्वराचेनि लोभें । हे गीता पढतां अक्षोभें । जो मंडन होय सभे । संतांचिये ॥1517॥
मज ईश्वराच्या प्रेमाखातर ज्याचा स्थिर चित्ताने गीतापाठ सुरू असतो, तो संतसभेला भूषणभूत होतो. 17
1518-18
नेत्रपल्लवीं रोमांचितु । मंदानिळें कांपवितु । आमोदजळें वोलवितु । फुलांचे डोळें ॥1518॥
नवपल्लवांप्रमाणे अंतःकरणें रोमांचित करणारा (प्रेमकथांनी), मंदवायूने वृक्ष डोलावे तसा श्रोत्समुदाय आनंदानें डोलविणारा, फुलें सुगंधित जलबिंदुयुक्त असावी त्याप्रमाणे श्रोत्यांचे नेत्र आनंदाश्रूंनी पाझरू लावणारा, 18
1519-18
कोकिळा कलरवाचेनि मिषें । सद्गद बोलवीत जैसें । वसंत का प्रवेशे । मद्भक्त आरामीं ॥1519॥
व कोकिलांप्रमाणे मधुर कंठाने श्रोत्यांच्या मुखांतून भगवन्नामगजर करविणारा असा हा गीताप्रवचनकार, म्हणजे मद्भक्तरूपीं उद्यानत प्रवेश करणारा जणू वसंत तसा शोभतो. 19
1520-18
कां जन्माचें फळ चकोरां । होत जैं चंद्र ये अंबरा । नाना नवघन मयूरां । वो देत पावे ॥1520॥
किंवा आकाशांत चंद्रोदय झाला म्हणजे चकोरांना जन्माचे सार्थक झालेसे वाटते,अथवा वर्षाकाळ मेघांनीं मयूरकेकेला (ध्वनि) जसे “ओ” देत प्रसन्न व्हावें 1520

1521-18
तैसा सज्जनांच्या मेळापीं । गीतापद्यरत्नीं उमपीं । वर्षे जो माझ्या रूपीं । हेतु ठेऊनि ॥1521॥
त्याप्रमाणे केवळ माझ्या उद्देशाने संतसमुदायांमध्ये जो गीताश्लोकरूपीं रत्नांचा व्याख्यानद्वारा उमाप (पुष्कळ) वर्षाव करितो. 21
1522-18
मग तयाचेनि पाडें । पढियंतें मज फुडें । नाहींचि गा मागेंपुढें । न्याहाळितां ॥1522॥
त्याच्या इतके मला प्रिय असणारे असे पूर्वीही कांहीं नव्हतें व विचार केला तर पुढेही कांहीं असणे शक्य नाही. 22
1523-18
अर्जुना हा ठायवरी । मी तयातें सूयें जिव्हारीं । जो गीतार्थाचें करी । परगुणें संतां ॥1523॥
अर्जुना, संतसज्जनांना गीतामृताची मेजबानी घालणाऱ्या ह्या माझ्या भक्ताला मी सर्वतोपरी माझ्या अंतःकरणांतच स्थान देतों. 23
अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः ।
ज्ञानयज्ञेन तेनाहमिष्टः स्यामिति मे मतिः ॥18.70॥
1524-18
पैं माझिया तुझिया मिळणीं । वाढिनली जे हे कहाणी । मोक्षधर्म का जिणीं । आलासे जेथें ॥1524॥
अरे, तुझ्या माझ्या भेटींत जी ही गीता कथा वाढली, व जिचा मोक्ष धर्मानेही जीवनार्थ (जिवंत रहावे म्हणून ) आश्रय केला 24
1525-18
तो हा सकळार्थप्रबोधु । आम्हां दोघांचा संवादु । न करितां पदभेदु । पाठेंचि जो पढे ॥1525॥
तो हा सकलार्थाचे ज्ञान करून देणारा आपला दोघांचा संवाद, जो अर्थासाठी पदच्छेद न करितां केवल पाठ म्हणून पठण करितो. 25

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *