सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४ था ओवी ७६ ते १०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

76-4
तैसा समस्तां यां भजनां । मी साक्षिभूतु पैं अर्जुना । एथ प्रतिफळे भावना । आपुलाली ॥76॥
त्याप्रमाणे अर्जुना, मी या सर्व उपसकांचा साक्षी आहे. येथे प्रत्येकाच्या भावनेप्रमाणे ज्याला-त्याला फळाची प्राप्ती होत असते.
चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।
तस्य कर्तारमपि मां विध्यकर्तारमव्यम्॥4.13॥

भावार्थ :- गुण आणि कर्म यांच्या भेदाप्रमाणे मी चार वर्ण निर्माण केले आहेत. या कर्माचा मी व्यवहारदृष्टीने मी जरी कर्ता असलो, तरी मी परमार्थतः अकर्ता व अव्यय (अविनाशी) आहे.
77-4
आतां याचिपरी जाण । चार्‍ही आहेती हे वर्ण । सृजिले म्यां गुण – । कर्मभागें ॥77॥
आता याप्रमाणे तू जाण की, जे चार वर्ण आहेत, ते गुण व कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केले आहेत.
78-4
जे प्रकृतीचेनि आधारें । गुणाचेनि व्यभिचारें । कर्में तदनुसारें । विवंचिली ॥78॥
त्या चारही वर्णाच्या कर्माची आपआपल्या प्रकृतिधर्माने आणि गुणांच्या तारतम्याने योजना केली आहे.
79-4
एथ एकचि हे धनुष्यपाणी । परीं जाहले गा चहूं वर्णीं । ऐसी गुणकर्मीं कडसणी । केली सहजें ॥79॥
अर्जुना ! हे सर्व लोक वस्तुतः एकच असून गुण आणि कर्म यांच्या योगाने चार वर्णाची व्यवस्था सहजच झाली आहे.
80-4
म्हणोनि आईकें पार्था । हे वर्णभेदसंस्था । मी कर्ता नव्हे सर्वथा । याचिलागीं ॥80॥
म्हणून हे अर्जुना ! ऐक. ही वर्णभेदाची व्यवस्था अशा प्रकारची असल्यामुळे मी त्याचा कर्ता मुळीच नाही.
न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा ।
इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते॥4.14॥

भावार्थ :- कर्माच्या फळामध्ये माझी आसक्ती नसते, म्हणून कर्मे मला लिप्त करू शकत नाहीत, असे जो मला तत्वतः जाणतो, तोसुद्धा कर्माने बध्द होत नाही.


81-4
हें मजचिस्तव जाहलें । परी म्यां नाहीं केलें । ऐसे जेणे जाणितलें । तो सुटला गा ॥81॥
हे सर्व व्यवस्थापन माझ्यापासून झाले आहे, परंतु हे मी केलेले नाही; अरे अर्जुना, हे ज्याने जाणले तत्वतः ओळखले, तो कर्मबंधनापासून मुक्त झाला.
एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वेरपि मुमुक्षुभिः ।
कुरु कर्मेव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम्॥4.15॥

भावार्थ :- मी कर्म करून देखील अकर्ता आहे, असे जाणून पूर्वीच्या मुमुक्षूनीं कर्म केले आहे. म्हणून तूदेखील पूर्वीच्या लोकांप्रमाणे कर्म कर.82-4
मागील मुमुक्षु जे होते । तिहीं ऐशियाचि जाणोनि मातें । कर्मे केलीं समस्तें । धर्नुधरा ॥82॥
हे अर्जुना ! पूर्वीच्या काळी जे मुमुक्षु होते, त्यांनी मी अकर्ता आहे, हे जाणले आणि त्यानुसारच सर्व कर्मे केली.
83-4
परी तें बीजें जैसीं दग्धलीं । नुगवतीचि पेरलीं । तैशीं कर्मेंचि परि तयां जाहली । मोक्षहेतु ॥83॥
परंतु भाजलेले बी जरी पेरले, तरी ते उगवत नाही; त्याप्रमाणे ती कर्मे खरी; परंतु त्याना कर्मबंधनातून सोडविण्याला तीच कारण झाली.
84-4
एथ आणिकही एक अर्जुना । हे कर्माकर्मविवंचना । आपुलिये चाडे सज्ञाना । योग्य नोहे॥84॥
या बाबतीत अर्जुना, आणखी एक गोष्ट महत्वाची आहे, हा कर्माकर्माचा विचार विद्वान मनुष्याने देखील आपल्या इच्छेप्रमाणे करणे योग्य नाही.(जाणत्या विद्वान पुरूषासदेखील आपल्या बुध्दीने करता येईल असा नाही.
किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः ।
तत् ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्॥4.16॥

भावार्थ :- कर्म कोणते आणि अकर्म कोणते, या विषयात विद्वान लोक देखील मोहित होतात. ते कर्मतत्व मी तुला उत्तम प्रकारे सांगेन. ते जाणून तू संसारातील दुखापासून मुक्त होशील.
85-4
मर्म म्हणिजे तें कवण । अथवा अकर्मा काय लक्षण । ऐसें विचारितां विचक्षण । गुंफोनि ठेले ॥85॥
कर्म ज्याला म्हणतात, ते कोणते? अथवा अकर्माचे लक्षण काय? असा विचार करीत असताना विद्वान लोकदेखील भ्रमामध्ये गुंतून गेले.


86-4
जैसें का कुडें नाणें । खर्‍याचेनि सारखेपणें । डोळ्यांचेहि देखणें । संशयी घाली ॥86॥
ज्याप्रमाणे खोटे नाणे हे खऱ्या नाण्यासारखे भासत असल्यामुळे संशय निर्माण होतो. वस्तुतः डोळ्याला होणारे ज्ञान प्रत्येक्ष यथार्थ असते, तरीपण ते संशय निर्माण करते.
87-4
तैसे नैष्कर्म्यतेचेनि भ्रमें । गिंवसिजत आहाति कर्में । जे दुजी सृष्टि मनोधर्में । करूं शकती ॥87॥
त्याप्रमाणे फक्त मनाच्या संकल्पाने प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य अंगी असलेले महापुरुषदेखील “आम्ही कर्मातीत झालो आहोत” अशा भ्रमाणे युक्त होऊन बरोबर कर्माच्या पाशामध्ये सापडले जातात.
88-4
वाचूनि मूर्खाची गोठी कायसी । एथ मोहले गा क्रांतदर्शी । म्हणोनि आतां तेचि परियेसीं । सांगेन तुज ॥88॥
कर्मा – अकर्मा विषयी चांगले चांगले विद्वान दूरदर्शी देखील मूढ बनतात. तर मग मूळचेच अज्ञानी आहे, त्या बिचाऱ्या मूर्खाची काय कथा? म्हणूनच मी तुला आता तोच विषय सांगतो, तरी त्याचे श्रवण कर.
कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः ।
अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः ॥4.17॥

भावार्थ :- कर्म, विकर्म, अकर्म (सामान्य, विशेष किंवा विहित, व निषिद्ध कर्म) म्हणजे काय, हे जाणले पाहिजे. कारण कर्माची गती गहन आहे.
89-4
तरी कर्म म्हणजे स्वभावें । जेथ विश्वाकारु संभवे । ते सम्यक आधीं जाणावें । लागे एथ ॥89॥
तर ज्याच्या योगाने स्वभावतः (आपोआप) या विश्वाला आकार निर्माण होतो, त्याला कर्म म्हणतात. या ठिकाणी त्याच कर्माचे प्रारंभी यथार्थ ज्ञान करन घेतले पाहिजे.
90-4
मग वर्णाश्रमासि उचित । जे विशेष कर्म विहित । तेंही वोळखावें निश्चित । उपयोगेंसीं ॥90॥
मग वर्ण व आश्रम यांना जे कर्मविशेष म्हणून सांगितले आहे, त्याची देखील उपयुक्ततेसह चांगली ओळख करून घेतली पाहिजे.


91-4
पाठीं जें निषिद्ध म्हणिपे । तेंही बुझावें स्वरूपें । येतुलेनि येथ कांही न गुंफे । आपैसेंचि ॥91॥
नंतर ज्याला निषिद्ध कर्म म्हणतात, त्याचेही यथार्थ स्वरूप समजून घ्यावे. याप्रमाणे कर्माचे स्वरूप जाणून घेतले, म्हणजे माणूस कर्माने बध्द होत नाही.
92-4
एर्‍हवीं जग हें कर्माधीन । ऐसी याची व्याप्ती गहन । परि तें असो आइकें चिन्ह । प्राप्ताचें गा ॥92॥
एरवी हे जग कर्माच्या अधीन आहे. असा कर्माचा विस्तार दुर्बोध आहे. पण अर्जुना, ते राहू दे, आता ब्रम्हज्ञानी (कृतकृत्य) पुरुषाची लक्षणे सांगतो, ती ऐक.
कर्मण्य कर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः ।
स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत्॥4.18॥

भावार्थ :- जो कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि जो अकर्मात कर्म पाहतो, तो मनुष्यामध्ये बुद्धिमान होय आणि तो योगी व सर्व कर्मे करणारा आहे.
93-4
जो सकळकर्मीं वर्ततां । देखे आपुली नैष्कर्म्यता । कर्मसंगे निराशता । फळाचिया ॥93॥
सर्व कर्मे करीत असताना आपण कर्मे करीत नाही, हे जो जाणतो आणि कर्माच्या फळाची अपेक्षा धरत नाही,
94-4
आणि कर्तव्यतेलागीं । जया दुसरें नाहीं जगीं । ऐसिया नैष्कर्मता तरी चांगी । बोधला असे ॥94॥
आपल्याखेरीज कर्तव्य करण्याला जगात दुसरे काहींचं नाही, अशा नैष्कम्यर्यतेचा खरा बोध ज्याला झालेला असतो,
95-4
परि क्रियाकलापु आघवा । आचरतु दिसे बरवा । तरी तो इहीं चिन्हीं जाणावा । ज्ञानिया गा ॥95॥
तरी तो उत्कृष्टपणे कर्माचे आचरण करीत असताना दिसतो, तोच या लक्षणांवरून ज्ञानी आहे, असे जाणावे.


96-4
जैसा कां जळापाशीं उभा ठाके । तो जरी आपणपें जळामाजिं देखे । तरी तो निभ्रांत वोळखे । म्हणे मी वेगळा आहे ॥96॥
जसे एखादा मनुष्य जलाशया जवळ उभा राहिलेला असतो, (पाण्यातील आपले स्वतः चे प्रतिबिंब) जरी आपण पाण्यात आहोत; असे पाहत असतो. तरी पण आपण त्या प्रतिबिंबापेक्षा वेगळा आहे (आपण पाण्यात नाही), असे तो निश्चितपणे जाणतो,
97-4
अथवा नावे हन जो रिगे । तो थडियेचे रुख जातां देखे वेगें । तेचि साचोकारें जों पाहों लागे । तंव रुख म्हणे अचळ ॥97॥
अथवा नावेत बसून मनुष्य जात असतो, त्याला किनाऱ्यावरील झाडे भरभर चालली आहेत,असे दिसते; पण खरी वस्तुस्थिती तो ज्या वेळी पाहतो, त्यावेळी झाडे स्थिर आहेत, असे तो म्हणतो.
98-4
तैसे सर्व कर्मीं असणें । तें फुडें मानूनि वायाणें । मग आपणपें जो जाणे । नैष्कर्म्यु ऐसा ॥98॥
त्याप्रमाणे आपले सर्व कर्मात असणे, हे निश्चितच मिथ्या आहे. (आपले आचरण उघड उघड केवळ आभासात्मक आहे, हे जाणुन), हे मानून मग आपण कर्मरहित आहोत हे तो जाणतो.
(ब्रम्हज्ञानी पुरुष)
99-4
आणि उदोअस्ताचेनि प्रमाणें । जैसे न चलतां सूर्याचें चालणें । तैसें नैष्कर्म्यत्व जाणे । कर्मीचि असतां ॥99॥
आणि सूर्य उदय व अस्त पावतो, या एका प्रमाणावरून तो चाललेला भासतो, पण वास्तविक तो स्थिर आहे, चालत / फिरत नाही.
त्याप्रमाणे कर्म करीत असताना ते (मी कर्म करीत आहे, ही भावना समूळ पणे नष्ट पावणे) कर्म आपण करीत नाही, असे जो जाणतो, तो आपले नैष्कम्यर्य जाणतो.
100-4
तो मनुष्यासारिखा तरी आवडे । परी मनुष्यत्व तया न घडे । जैसें जळीं जळामाजीं न बुडे । भानुबिंब ॥100॥
ज्याप्रमाणे सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडलेले दिसते, पण त्यावरून (सूर्य) बिंब पाण्यात बुडाले असे होत नाही. त्याप्रमाणे वरून तो मनुष्यासारखा दिसतो; परंतु आतून परब्रम्हाशी एकरूप झालेला असतो.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *