सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १७६ ते २०० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

176-18
म्हणौनि फळीं लागु । सांडोनि देहसंगु । कर्में करावीं हा चांगु । निरोपु माझा ॥176॥
म्हणून फलाविषयी आशा सोडून व मी कर्ता हा अभिमान सोडून कर्मे करावी, अशी उत्तम प्रकारची माझी आज्ञा आहे. ॥176॥
177-18
जो जीवबंधीं शिणला । सुटके जाचे आपला । तेणें पुढतपुढतीं या बोला । आन न कीजे ॥177॥
जो जन्ममृत्युचा येरझारा करिता करीता त्रासून गेला आहे व आपली त्यापासून सुटका कशी होईल, या काळजीत आहे त्याला वारंवार सांगणे आहे कि. त्याने या आज्ञेचे उल्लंघन करू नये. ॥177॥
नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते ।
मोहात्तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः ॥18.7॥

178-18
नातरी आंधाराचेनि रोखें । जैसीं डोळां रोंविजती नखें । तैसा कर्मद्वेषें अशेखें । कर्मेंचि सांडी ॥178॥
एखादा मनुष्य अंधारातून चालत असता धक्का बसल्यावर त्याबद्दलचा राग डोळ्यांवर काढून डोळ्यात नखे बोचतो, त्याप्रमाणे कर्मे जन्मबंधास कारण आहे, म्हणून त्यांच्यावर रागावून जो ती सर्व कून देतो, ॥178॥
179-18
तयाचें जें कर्म सांडणें । तें तामस पैं मी म्हणें । शिसाराचे रागें लोटणें । शिरचि जैसें ॥179॥
॥त्याच्या त्याच्या कर्मत्यागस मी तामस त्याग म्हणतो याप्रमाणे अर्धशिशी उठल्यावर रागाने आपले शिरच कापतो.॥179॥
180-18
हां गा मार्गु दुवाडु होये । तरी निस्तरितील पाये । कीं तेचि खांडणें आहे । मार्गापराधें ॥180॥
अरे, वाट जरी वाईट असली तरी पायांनीच चालून संपवली पाहिजे, पण त्या वाटेच्या वाईट पणाबद्दल पाय तोडावी की काय?॥180॥

181-18
भुकेलियापुढें अन्न । हो कां भलतैसें उन्ह । तरी बुद्धी न घेतां लंघन । भाणें पापरां हल्या ॥181॥
भूक लागलेल्या मनुष्यापुढे अति कढत अन्न ठेवले आणि त्याला ते सहन न होऊन त्याने त्याने ते लाथेने झुगारून दिले, तर त्याला लंगनच करावे लागणार!॥181॥
182-18
तैसा कर्माचा बाधु कर्में । निस्तरीजे करितेनि वर्में । हे तामसु नेणें भ्रमें । माजविला ॥182॥
त्याप्रमाणे कर्माचे युक्तीने आचरण केले असता कर्माचा दोष नाहीसा होतो. हे तो तामस मनुष्य भ्रमिष्ट झाला असल्यामुळे त्याला समजत नाही.॥182॥
183-18
कीं स्वभावें आलें विभागा । तें कर्मचि वोसंडी पैं गा । तरी झणें आतळा त्यागा । तामसा तया ॥183॥
तो आपल्या धर्माप्रमाणे आपल्यास करावयाची जे कर्म ते टाकून देतो, तेव्हा तु त्या तामस मनुष्याप्रमाणे कर्म त्यागाच्या स्वाधीन होऊ नको,॥83॥
दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात्त्यजेत् ।
स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत् ॥18.8॥
184-18
अथवा स्वाधिकारु बुझे । आपले विहितही सुजे । परी करितया उमजे । निबरपणा ॥184॥
अथवा, आपला अधिकार काय आहे हे जाणतो व आपली विहित कर्म कोणतेही त्यास माहीतच आहे परंतु ती कर्मे करण्याच्या क्लेशास भिऊन जो त्यांजविषयी कंटाळा करतो;॥184॥
185-18
जे कर्माची ऐलीकड । नावेक दिसे दुवाड । जे वाहतिये वेळे जड । शिदोरी जैसी ॥185॥
कर्माचा आरंभ क्षणभर कठीण दिसतो खरा जशी शिदोरी नेते वेळेस जड लागते.॥185॥

186-18
जैसा निंब जिभे कडवटु । हिरडा पहिलें तुरटु । तैसा कर्मा ऐल शेवटु । खणुवाळा होय ॥186॥
जसा लिंब खाताना जिभेला कडू लागतो व हिरडा तुरट लागतो, तसा कर्माच आरंभ कठीण वाटतो;॥186॥
187-18
कां धेनु दुवाड शिंग । शेवंतीये अडव आंग । भोजनसुख महाग । पाकु करितां ॥187॥
किंवा काय मारकट असली, शेवंतीच्या झाडाला काटे आहेत स्वयंपाक करतेवेळेस भोजनाचे सुख नसते॥187॥
188-18
तैसें पुढतपुढती कर्म । आरंभींच अति विषम । म्हणौनि तो तें श्रम । करितां मानी ॥188॥
तसे कर्म आरंभी तेवढेच अतिकठोर असते, म्हणून ते करण्याचे श्रम होतात; असे तो समजतो.॥188॥
189-18
येऱ्हवीं विहितत्वें मांडी । परी घालितां असुरवाडीं । तेथ पोळला ऐसा सांडी । आदरिलेंही ॥189॥
बाकी कर्माचा आरंभ यथाविधि करतो; पण कढत वस्तू हातात घेऊन हात भाजतात ती टाकून द्यावी, त्याप्रमाणे त्या कर्माचरणापासून श्रम होऊ लागल्यावर ती कर्मे मध्येच टाकतो;॥189॥
190-18
म्हणे वस्तु देहासारिखी । आली बहुतीं भाग्यविशेखीं । मा जाचूं कां कर्मादिकीं । पापिया जैसा? ॥190॥
आणि म्हणतो की, भाग्य म्हणून माझे महतभाग्य म्हणून देहासारखी उत्तम वस्तू लाभली असता, पाप्यायाप्रमाणे कर्माचे आचरण करू मी आपल्याच त्रास का करून घ्यावा?॥190॥

191-18
केलें कर्मीं जे द्यावें । तें झणें मज होआवें । आजि भोगूं ना कां बरवे । हातींचे भोग? ॥191॥
कर्माचे आचरण करून त्यापासून मिळणारे जे भोग त्यांची गरज नाही; तर आज जे आपल्यास ऐश्वर्य प्राप्त झाले आहे, त्याचा उपभोग का घेऊ नये?॥191॥
192-18
ऐसा शरीराचिया क्लेशा । भेणें कर्में वीरेशा । सांडी तो परीयेसा । राजसु त्यागु ॥192॥
अशाप्रकारे अर्जुना, शरीरास क्लेश होतील या भीतीने जो कर्मे टाकून देतो, त्याला राजस त्याग असे म्हणतात,॥192॥
193-18
येऱ्हवीं तेथही कर्म सांडे । परी तया त्यागफळ न जोडे । जैसें उतलें आगीं पडे । तें नलगेचि होमा ॥193॥
त्याठिकाणी ही कर्मत्याग होतो; परंतु त्याला कर्म त्यागाचे फळ मिळत नाही, ज्याप्रमाणे उतू आलेले तूप आगीत पडले, तरी त्याला होमाची योग्यता प्राप्त होत नाही.॥93॥
194-18
कां बुडोनि प्राण गेले । ते अर्धोदकीं निमाले । हें म्हणों नये जाहलें । दुर्मरणचि ॥194॥
किंवा एखाद्याचा पाण्यात बुडून प्राण गेला असता त्याने जलसमाधी घेतली असे म्हणता येत नाही, तर त्याचे ते अपघाताचे मरण असे म्हटले पाहिजे,॥194॥
195-18
तैसें देहाचेनि लोभें । जेणें कर्मा पाणी सुभे । तेणें साच न लभे । त्यागाचें फळ ॥195॥
त्याप्रमाणे देहावर प्रीती ठेवून ज्याने कर्मांवर पाणी सोडले, त्याला कर्म त्यागाचे फळ खास मिळत नाही.॥195॥

196-18
किंबहुना आपुलें । जैं ज्ञान होय उदया आलें । तैं नक्षत्रातें पाहलें । गिळी जैसें ॥196॥
किंबहुना ज्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे, त्याला सुर्योदय झाल्यावर ज्याप्रमाणे नक्षत्राचे तेच लोपते,॥196॥
197-18
तैशा सकारण क्रिया । हारपती धनंजया । तो कर्मत्यागु ये जया । मोक्षफळासी ॥197॥
त्याप्रमाणे अर्जुना, ज्या कर्मत्याग पासून ज्ञानासह क्रियांचा लोप होतो, त्यापासून मोक्षप्राप्ती होते॥197॥
198-18
तें मोक्षफळ अज्ञाना । त्यागिया नाहीं अर्जुना । म्हणौनि तो त्यागु न माना । राजसु जो ॥198॥
अर्जुना, ती मोक्षप्राप्ती अज्ञानाने कर्माचा त्याग केला असता होत नाही, म्हणून तो खरा कर्मत्याग नसून राजस त्याग होय.॥198॥
199-18
तरी कोणे पां एथ त्यागें । तें मोक्षफळ घर रिघे । हेंही आइक प्रसंगे । बोलिजेल ॥199॥
तर कोणत्या त्यागा पासून मोक्षप्राप्ती आपल्या घरी चालत येते, तेही प्रसंगानुरोधाने तुला सांगतो, ते ऐक.॥199॥
कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन ।
सङ्गं त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्त्विको मतः ॥18.9॥

200-18
तरी स्वाधिकाराचेनि नांवें । जें वांटिया आलें स्वभावें । तें आचरे विधिगौरवें । शृंगारोनि ॥200॥
तर आपल्या अधिकारानुरूप जे सहज आपल्या वाट्यास आलेली कर्म, ते साहित्यासह गौरवाने यथाविधि आचरण करितो;॥200॥

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading