76-3
तूं मानसा नियमु करीं । निश्चळु होय अंतरी । मग कर्मेंद्रियें हीं व्यापारीं । वर्ततु सुखें ॥76॥
तू आपल्या मनाचा निग्रह कर आणि अंतःकरणात स्थिर हो; मग ही कर्मेंद्रिय आपापले व्यवहार करीत खुशाल राहूं देत.
77-3
नियतं कुरु कर्म त्वं ज्यायो ह्यकर्मणः ।
शरीरयात्रापि च ते न प्रसिध्येदकर्मणः॥3.8॥
भावार्थ :- तू शास्त्रविधीने नियत केलेले कर्तव्यकर्म कर (म्हणजेच आपले विहित असे जे कर्म आहेत तें तू करीत जा). कारण, कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ (अधिक चांगले) होय. तसेच, कर्मच जर केले नाहीस, तर तुझा शरीरनिर्वाहही (शरीराची जी कार्य आहेत, यात्रा आहे) उत्तम प्रकारे सिद्ध होऊ शकणार नाही.
म्हणशी नैष्कर्म्य होआवें । तरी एथ तें न संभवे । आणि निषिद्ध केवीं राहाटावें । विचारी पां ॥77॥
कर्माचा त्याग करून कर्मातीत व्हावे म्हणशील (विहित कर्म करणे टाकून), तर ते मानवास संभवत नाही, मग शास्त्रविरुद्ध आचरण का करावे, याचा तूच विचार कर.
78-3
म्हणोनि जें जें उचित । आणि अवसरेंकरून प्राप्त । तें कर्म हेतुरहित । आचर तूं ॥78॥
म्हणून जे जे कर्म उचित असेल आणि प्रसंगाने प्राप्त झाले असेल, ते ते तू फळाची इच्छा न ठेवता आचरणात आण. (ते कर्म करीत जा)
79-3
पार्था आणिकही एक । नेणसी तूं हे कवतिक । जें ऐसें कर्म मोचक । आपैसें असे ॥79॥
अर्जुना ! आणखी एक म्हणजे, या निष्काम कर्माचे कौतुक तू जाणत नाहीस. ते हे की, निष्काम कर्म हे प्राण्यांना (सहजपणे) कर्मबंधनापासून आपोआप मुक्त करते.
80-3
देखें अनुक्रमाधारें । स्वधर्मु जो आचरे । तो मोक्षु तेणें व्यापारें । निश्चित पावे ॥80॥
पाहा, जो वर्णाश्रमधर्माप्रमाणे जो आपणास योग्य असलेल्या धर्माचे आचरण करतो, त्यास त्या आचरणाने मोक्षाची निश्चित प्राप्ती होते.
81-3
यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबंधनः ।
तदर्थे कर्म कौंतेय मुक्तसङगः समाचरः॥3.9॥
भावार्थ :- ईश्वरार्पण बुद्धिवाचून फळाच्या इच्छेने केलेल्या कर्माने मनुष्य बांधला जातो. म्हणून हे अर्जुना ! तू कर्तेपणाचा अभिमान सोडून ईश्वरार्पण बुध्दीने कर्म कर.
स्वधर्मु जो बापा । तोचि नित्ययज्ञु जाण पां । म्हणोनि वर्ततां तेथ पापा । संचारु नाहीं ॥81॥
अरे बाबा, आपला जो धर्म आहे, तोच नित्य यज्ञ होय, असे समज. म्हणून त्याचे आचरण करीत असताना त्यात पाप प्रवेश करत नाही.
82-3
हा निजधर्मु जैं सांडे । कुकर्मी रति घडे । तैंचि बंधु पडे । संसारिकु ॥82॥
स्वधर्मचा त्याग केला, तर वाईट कर्म करण्याची इच्छा निर्माण होते आणि वाईट कर्म केले, की माणूस जन्म-मरणाच्या चक्रात सापडतो.
83-3
म्हणोनि स्वधर्मानुष्ठान । ते अखंड यज्ञयाजन । जो करी तया बंधन । कहींच नाहीं ॥83॥
म्हणून स्वधर्माचे आचरण करणे म्हणजे नित्य यज्ञ-याजन करण्यासारखे आहे. जो असे स्वधर्माचे आचरण करतो, त्याला काहीसुद्धा बंधन होत नाही.
84-3
हा लोकु कर्में बांधिला । जो परतंत्रा भुतला । तो नित्ययज्ञाते चुकला । म्हणोनियां ॥84॥
जो माणूस आपल्या नित्य यज्ञाला चुकला; तो कर्माने बध्द होऊन परतंत्र अशा देहाच्या अधीन होऊन पापकर्माने बांधला जातो.
85-3
आतां येचिविशीं पार्था । तुज सांगेन एकी मी कथा । जैं सृष्ट्यादि संस्था । ब्रह्मेनि केली ॥85॥
पार्था ! या विषयी मी तुला एक कथा सांगतो.ती अशी की, ब्रम्हदेवाने उत्पत्ती, स्थिती, लय असा सृष्टीचा आकार निर्माण केला.
86-3
सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः ।
अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक्॥3.10॥
भावार्थ :- प्रजापती ब्रम्हदेवाने कल्पाच्या आरंभी (यज्ञासह) प्रजा उत्पन्न करून त्या प्रजेला म्हटले की, तुम्ही स्वधर्मरूप यज्ञाचे आचरण करा, म्हणजे हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करील.
तें नित्ययागसहितें । सृजिलीं भूतें समस्तें । परी नेणतीचि तिये यज्ञातें । सूक्ष्म म्हणऊनी ॥86॥
त्यावेळी प्राणी आणि नित्य आचरणाचे धर्म ही दोन्ही गोष्टी त्यांनी बरोबर उत्पन्न केली. परंतु लोक या यज्ञाला जाणत नव्हते. कारण, स्वधर्मरूप यज्ञाचे स्वरूप आहे.
87-3
तें वेळीं प्रजीं विनविला ब्रह्मा । देवा आश्रयो काय एथ आम्हां । तंव म्हणे तो कमळजन्मा । भूतांप्रति ॥87॥
त्यावेळी सर्व प्राण्यांनी ब्रम्हदेवाला विनंती केली की, देवा, या लोकात आम्हाला आधार काय? त्यावेळी (कमळापासून ज्याची उत्पत्ती झाली) असा तो ब्रम्हदेव लोकांना म्हणाला,
88-3
तुम्हां वर्णविशेषवशें । आम्हीं हा स्वधर्मुचि विहिला असे । यातें उपासा मग आपैसे । काम पुरती ॥88॥
तुम्हाला वर्णानुसार असा हा स्वधर्म सांगितला आहे. त्याचे आचरण करावे, म्हणजे तुमच्या मनातील सर्व इच्छा सहजपणे पूर्ण होतील.
89-3
तुम्हीं व्रतें नियमु न करावे । शरीरातें न पीडावें । दुरी केंही न वचावे । तीर्थासी गा ॥89॥
याशिवाय तुम्हाला व्रत- नियम करण्याची कांही आवश्यकता नाही. अवघड साधना करून शरीराला पीडा देण्याची जरुरी नाही. तसेच, दूर कोठे तीर्थयात्रेस जाण्याची जरुरी नाही.
90-3
योगादिक साधनें । साकांक्ष आराधनें । मंत्रयंत्रविधानें । झणीं करा ॥90॥
योग वगैरे साधने, सकाम उपासना तसेच, मंत्रतंत्रादिक अनुष्ठाने करण्याची गरज नाही.
91-3
देवतांतरा न भजावें । हें सर्वथा कांहीं न करावे । तुम्हीं स्वधर्मयज्ञीं यजावें । अनायासें ॥91॥
स्वधर्म सोडून इतर देवतांची पूजा अर्चा करण्याचे कारण नाही. हे सर्व करण्याचे मुळीच कारण नाही; तुम्ही सहजपणे प्राप्त झालेल्या स्वधर्माचरणरूप यज्ञाचे आचरण करावे.
92-3
अहेतुकें चित्तें । अनुष्ठां पां ययातें । पतिव्रता पतीतें । जियापरी ॥92॥
ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री निष्काम बुद्धीने आपल्या पतीची सेवा करते, त्याप्रमाणे तुम्ही आपल्या स्वधर्माचे निष्काम बुद्धीने आचरण करा.
93-3
तैसा स्वधर्मरूप मखु । हाचि सेव्य तुम्हां एकु । ऐसें सत्यलोकनायकु । म्हणता जहाला ॥93॥
अशा प्रकारे तुम्हाला हाच एक स्वधर्मरूप यज्ञ आचरण्यास योग्य आहे, असे सत्य लोक अधिपती ब्रम्हदेव म्हणाले.
94-3
देखा स्वधर्मातें भजाल । तरी कामधेनु हा होईल । मग प्रजाहो न संडील । तुमतें सदा ॥94॥
जर, तुम्ही स्वधर्माचे आचरण कराल, तर हा धर्म कामधेनुप्रमाणे इच्छा पुरविणारा होईल. प्रजाजन हो, मग हा स्वधर्म (स्वधर्मरूपी कामधेनू) तुम्हाला कधीही सोडणार नाही.
95-3
देवान् भावयतानेन ते देवाः भावयंतु वः ।
परस्परं भावयंतः श्रेयः परमवाप्स्यच॥3.11॥
भावार्थ :- स्वधर्मरूप यज्ञाच्या आचरणाने तुम्ही देवांचे पूजन केले असता ते देव तुम्हाला प्रसन्न होतील, याप्रमाणे तुम्ही परस्परांना संतुष्ट करून आपले कल्याण करून घ्याल.
जें येणेचिकरूनि समस्तां । परितोषु होईल देवतां । मग ते तुम्हां ईप्सीता । अर्थांते देती ॥95॥
कारण या स्वधर्माच्या आचरणाने सर्व देवतांना संतोष होईल; आणि मग त्या देवता तुम्हाला इच्छित भोग देतील.
96-3
या स्वधर्मपूजा पूजितां । देवतागणां समस्तां । योगक्षेमु निश्चिता । करिती तुमचा ॥96॥
या स्वधर्मरूपी पूजेने सर्व देवतागणांची पूजा केली असता ते देव तुमचा योगक्षेम निश्चितपूर्वक चालवतील.
97-3
तुम्हीं देवतांते भजाल । देव तुम्हां तुष्टितील । ऐसी परस्परें घडेल । प्रीति तेथ ॥97॥
तुम्ही स्वधर्माद्वारा देवांची भक्ती कराल, तर देव तुमच्यावर संतुष्ट होतील. असे एकमेकांचे एकमेकांवर जेंव्हा प्रेम जडेल,
98-3
तेथ तुम्हीं जें करूं म्हणाल । ते आपैसे सिद्धी जाईल । वांछितही पुरेल । मानसींचे ॥98॥
तेंव्हा तुम्ही जे करू म्हणाल, ते सहजच सिद्धीस जाईल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.
99-3
वाचासिद्धी पावाल । आज्ञापक होआल । म्हणिये तुमतें मागतील । महाऋद्धि ॥99॥
तुम्हाला वाचासिद्धी प्राप्त होईल (तुम्ही बोलाल ते खरे होईल म्हणजेच वाचासिद्धी). आणि तुम्हीच आज्ञा करणारे व्हाल. तुम्ही महासिद्धीला (महाऋषी) काही मागून घेण्याएवजी, ही महासिद्धीचं तुम्हाला हवे ते मागतील.(महाऋषीच तुम्हाला तुमची इच्छा विचारतील)
100-3
जैसें ऋतुपतींचे द्वार । वनश्री निरंतर । वोळगे फळभार । लावण्येंसी ॥100॥
(ऋतूपती) वसंत ऋतूचे द्वारात ज्याप्रमाणे वनशोभा ही आपल्या फळपुष्पभाराच्या लावण्याने सदैव वास करीत असते,