सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ११५१ ते ११७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

1151-18
तैसी क्रिया कीर न साहे । तऱ्ही अद्वैतीं भक्ति आहे । हें अनुभवाचिजोगें नव्हे । बोला{ऐ}सें ॥1151॥
त्याप्रमाणे, अद्वैतबोधांत क्रियेला काडीचा अवसर नसला तरी, भक्ति संभवते; पण बोलून दाखवितां येण्यासारखी हि गोष्ट नाही, ती स्वतःच्या अनुभवानेच पटणारी आहे 51
1152-18
तेव्हां पूर्वसंस्कार छंदें । जें कांहीं तो अनुवादे । तेणें आळविलेनि वो दें । बोलतां मीचि ॥1152॥
अशा पुरुषाच्या शारीरक्रिया पूर्वसंस्कारानुरूप सुरू असतां त्या भरात ज्या नांवाने मला हांक मारील ती माझीच भक्ति होय असे समजून मो त्याच्या हांकेला उभा रहातो; पण बोलणार तोही मजवांचून अन्य कोणी नसतो. 52
1153-18
बोलतया बोलताचि भेटे । तेथें बोलिलें हें न घटे । तें मौन तंव गोमटें । स्तवन माझें ॥1153॥
बोलणारा आपणच; व ज्याच्यापाशी बोलला तोही आपणच; ह्या व्यवहाराला ‘बोलणे झालें’ असे म्हणतां येत नाही; अशा प्रकारचे जें मौन हे माझे उत्तम स्तवन होय (अद्वैती भक्ति आहे). 53
1154-18
म्हणौनि तया बोलतां । बोली बोलतां मी भेटतां । मौन होय तेणें तत्वतां । स्तवितो मातें ॥1154॥
म्हणून तो बोलणारा व त्याच्या बोलांत त्याला बोलविणारा जो मी तोच त्याला भेटणारा, अशा स्थितीला तत्त्वदृष्टया मौनस्थितीच म्हणतात; त्या तात्त्विक मौनाने तो माझे स्तवन करितों 54
1155-18
तैसेंचि बुद्धी का दिठी । जें तो देखों जाय किरीटी । तें देखणें दृश्य लोटी । देखतेंचि दावी ॥1155॥
त्याचप्रमाणे अर्जुन, त्याची बुद्धि अगर दृष्टि ज्या ज्या दृश्याकडे जाईल, त्या त्या ठिकाणचा दृश्यत्वधर्म नाहीसा होऊन त्या रूपानें द्रष्टा जो आपण, त्याचेच दर्शन त्याला घडतं. (इतका त्याचा सर्वात्मभाव दृढ असतो.) 55

1156-18
आरिसया आधीं जैसें । देखतेंचि मुख दिसे । तयाचें देखणें तैसें । मेळवी द्रष्टें ॥1156॥
आरसा पुढे येण्यापूर्वी मुख दृष्टिरूपच असते, पण तेथवर त्याला द्रष्टेपणा नसतो; तो द्रष्टेपणा, आरसा ह्या उपाधीने आला म्हणजे त्याचेच त्याला जसे पुन्हा दर्शन होते, त्याप्रमाणे, दृश्याच्या मिषानें (वरील ओवीतील) द्रष्ट्याचेच द्रष्ट्याला दर्शन होतें. 56
1157-18
दृश्य जाउनियां द्रष्टें । द्रष्टयासीचि जैं भेटे । तैं एकलेपणें न घटे । द्रष्टेपणही ॥1157॥
दृश्यावरील दृश्यत्व कल्पनेचा निरास होऊन जेव्हां तद्वारा द्रष्टाच द्रष्टयाला भेटतो, तेव्हां तेथे द्वैतव्यवहाराचे अभावी तोच कायतो एकटा असतो व अशा स्थितींत तो पहाणारा नसून ‘ पहाणेरूप ” असतो. 57
1158-18
तेथ स्वप्नींचिया प्रिया । चेवोनि झोंबो गेलिया । ठायिजे दोन्ही न होनियां । आपणचि जैसें ॥1158॥
स्वप्नांतील स्त्रीला जागा होऊन आलिंगन देउ गेल्यास तेथे दोन व्यक्ति नसून आपणच एकटे एक असल्याचा जसा प्रत्यय येतो, 58
1159-18
का दोहीं काष्ठाचिये घृष्टी- । माजीं वन्हि एक उठी । तो दोन्ही हे भाष आटी । आपणचि होय ॥1159॥
किवा दोन काष्ठांच्या घर्षणानें उत्पन्न होणारा अग्नि त्यांचा दोन्हीपणा खाऊन आपणच जसा तद्रूप होतो 59
1160-18
नाना प्रतिबिंब हातीं । घेऊं गेलिया गभस्ती । बिंबताही असती । जाय जैसी ॥1160॥
अथवा सूर्य आपलें प्रतिबिंब ग्रहण करण्यासाठी खाली अवतरला तर प्रतिबिंबाबरोबर जशी त्याची बिंबताही उरणार नाहीं. 1160

1161-18
तैसा मी होऊनि देखतें । तो घेऊं जाय दृश्यातें । तेथ दृश्य ने थितें । द्रष्टृत्वेंसीं ॥1161॥
त्याप्रमाणे जो द्रष्टा मद्रूप होऊन दृश्य पाहू जातो, त्याला दृश्य म्हणून कांहीं वेगळे आढळत नाहीच, पण त्याचा द्रष्टेपणाही दृश्याबरोबर मावळतो. 61
1162-18
रवि आंधारु प्रकाशिता । नुरेचि जेवीं प्रकाश्यता । तेंवीं दृश्यीं नाही द्रष्टृता । मी जालिया ॥1162॥
सूर्योदयाबरोबर अंधारच प्रकाशरूप होत असल्याने मुळे जसा त्यांचा प्रकाश्य प्रकाशक भाव उरत नाही, तसें, दृश्य, द्रष्टा जो मी तद्रूप झाले असतां, त्याच्या ठिकाणचे दृश्यत्वही उरत नाही. (माझे द्रष्टेपणही न उरून केवल दृङमात्र मी असतों) 62
1163-18
मग देखिजे ना न देखिजे । ऐसी जे दशा निपजे । ते तें दर्शन माझें । साचोकारें ॥1163॥
यानंतर पाहणें न पाहणे इत्यादि व्यवहारापलीकडील जी सहजस्थिति, तेच माझे खरें दर्शन होय.63
1164-18
तें भलतयाही किरीटी । पदार्थाचिया भेटी । द्रष्टृदृश्यातीता दृष्टी । भोगितो सदा ॥1164॥
अर्जुना, कोणत्याही पदार्थाच्या भेटीनंतरही, द्रष्टा, दृश्य व दर्शन ह्या व्यवहारातीत असलेल्या अखंड दर्शनस्थि तिचा त्या क्रमयोग्याला आपल्या स्वरूपांत भोग घडत असतो. 64
1165-18
आणि आकाश हें आकाशें । दाटलें न ढळें जैसें । मियां आत्मेन आपणपें तैसें । जालें तया ॥1165॥
आणि आकाशने स्वस्वरूपानेच सर्व जगत् अंतर्बाह्य गच्च व्यापून टाकल्यामुळे जसे त्याचे चलनवलन संभवत नाही, तसा सर्वात्मक जो मी तद्रूप झालेला तो योगी कोणत्याही क्रियेनें लिप्त होणे शक्य नाही. 65

1166-18
कल्पांतीं उदक उदकें । रुंधिलिया वाहों ठाके । तैसा आत्मेनि मियां येकें । कोंदला तो ॥1166॥
सर्व जलमय ‘कल्पांतींच्या उदकाला वाहण्यास जसा कोठे वावच नसतो, तसा सर्वव्यापक, एक, शुद्ध परमात्मा जो मी, तद्रूपच तो झाला असल्यामुळे त्याच्यावांचूनही कोठे रिता ठाव नाहीं. 66
1167-18
पावो आपणपयां वोळघे? । केवीं वन्हि आपणपयां लागे? । आपणपां पाणी रिघे । स्नाना कैसें? ॥1167॥
पायानेंच पायावर चढणे, अग्नीनेच अग्नील पोळणें, किवा जलानेंच स्नानासाठीं जाणें ह्या गोष्टी घडणे शक्य आहे काय? 67
1168-18
म्हणौनि सर्व मी जालेपणें । ठेलें तया येणें जाणें । तेंचि गा यात्रा करणें । अद्वया मज ॥1168॥
म्हणून, बोध दृष्ट्या, जो सर्वथैव मद्रूप झाल्यामुळे ज्याचे येणे जाणे संपलें (कर्तव्यबुद्धीने ) व म्हणूनच, ती स्थिति हीच माझ्या अद्वयस्वरूपाची त्याला यात्रा घडली असे समज.68
1169-18
पैं जळावरील तरंगु । जरी धाविन्नला सवेगु । तरी नाहीं भूमिभागु । क्रमिला तेणें ॥1169॥
जलावरील लाट कितीही वेगाने आली तरी जलाश्रयावांचून स्वतंत्रतया तिने भूभाग आक्रमण केल्याचे दिसत नाही. 69
1170-18
जें सांडावें कां मांडावें । जें चालणें जेणें चालावें । तें तोयचि एक आघवें । म्हणौनियां ॥1170॥
कारण, तिची मोडतोड येणें जाणे हे सर्व एका पाण्याचेच खेळ असतात. 1170

1171-18
गेलियाही भलतेउता । उदकपणें पंडुसुता । तरंगाची एकात्मता । न मोडेचि जेवीं ॥1171॥
अर्जुना, ती (भिन्न दिसणारी) लाट वाटेल तेथवर जावो, उदक ह्या दृष्टीने तिचा असलेला एकात्मभाव कधींही भंग पावत नाही. 71
1172-18
तैसा मीपणें हा लोटला । तो आघवेंयाचि मजआंतु आला । या यात्रा होय भला । कापडी माझा ॥1172॥
तसा माझ्यावर सर्वस्वे येऊन पडला म्हणजे अनन्य झाला, असा जो हा, तो सर्व मरूपच झाला. ह्याच त्याच्या पुण्यरूप यात्रेनें तो माझा खरा यात्रेकरू होय 72.
1173-18
आणि शरीर स्वभाववशें । कांहीं येक करूं जरी बैसे । तरी मीचि तो तेणें मिषें । भेटे तया ॥1173॥
आणि शरीरस्वभावाप्रमाणे, तो कांहीही जरी करू लागला, तरी त्या त्या रूपाने (व त्या या स्थितीत) त्याला माझे सर्वात्मकाचेच दर्शन होत असते. 73
1174-18
तेथ कर्म आणि कर्ता । हें जाऊनि पंडुसुता । मियां आत्मेनि मज पाहतां । मीचि होय ॥1174॥
त्या त्याच्या कृतींत अर्जुना, हे कर्म आणि हा मी कर्ता, असे भाव जिवंत नसतात, (मृतवत् असतात) तर त्याचा आत्मा जो मी त्यानेच व तो मला ध्यात असतो व म्हणूनच तो मद्रूपच होतो 74
1175-18
पैं दर्पणातें दर्पणें । पाहिलिया होय न पाहणें । सोनें झांकिलिया सुवर्णें । ना झांकें जेवीं ॥1175॥
हे पहा, आरशानें आरशाला पाहणे म्हणजे कोणी कोणाला न पाहिल्यासारखेच आहे किंवा सुवर्णाच्याच पदार्थाने सुवर्ण झाकणें म्हणजे सुवर्ण उघढे ठेवणेच होय. 75

, ,

Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण

१८ अध्याय संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी

सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *