सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा ओवी ३०१ ते ३२५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

301-2
कां कूर्म जियापरी । उवाइला अवेव पसरी । ना इच्छावशें आवरी । आपुले आपण ॥301॥
किंवा ज्याप्रमाणे कासव आनंदात असताना आपले अवयव जसे पसरते, अथवा मनाला वाटेल तेव्हा आपले अवयव आपणच आवरून घेते,
302-2
तैसीं इंद्रिये आपैतीं होतीं । जयाचें म्हणितलें करिती । तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातलीं असे ॥302॥
त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये स्वाधीन (स्वतःच्या ताब्यात) असतात व ही इंद्रिये त्याच्या इच्छेनुसार (आज्ञा करीन तशी) वागतात, त्याची बुद्धी स्थिर झाली आहे, असे समजावे.
विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः ।
रसवर्ज्यं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते॥2.59॥
भावार्थ :- आहार न घेणाऱ्या पुरुषांचे (रसविषय सोडून) विषय नाहीसे होतात. त्यांच्या ठिकाणी फक्त प्रीती उरते. पण परब्रह्मचे ज्ञान झाल्यावर (निर्माण झालेला हा रसविषय) विषयांची गोडीदेखील नाहीशी होते.
303-2
आतां अर्जुना आणिकही एक । सांगेन ऐकें कवतिक । या विषयांते साधक । त्यजिती नियमें ॥303॥
अर्जुना !, आता आणखी एक कौतुकाची गोष्ट सांगतो, ऐक, जे साधक नित्य नियमाने निग्रहाने विषयांचा त्याग करतात,
304-2
श्रोत्रादि इंद्रिये आवरती । परि रसने नियमु न करिती । ते सहस्रधा कवळिजती । विषयीं इहीं ॥304॥
श्रोत्रादि विषयापासून इंद्रियांना आवरतात, परंतु जिभेला मात्र आळा घालीत नाहीत, त्यांना हर विषय हजारो प्रकारांनी गुंतवून टाकतात.
305-2
जैसी वरिवरि पालवी खुडिजे । आणि मुळीं उदक घालिजे । तरी कैसेनि नाशु निपजे । तया वृक्षा ॥305॥
ज्या प्रमाणे एखाद्या झाडाची फक्त वर वरची पाने, पालवी खुडून टाकली आणि त्या झाडाच्या मुळाला पाणी घातले; तर त्या झाडाचा संपूर्ण नाश कसा बरे होईल??


306-2
तो उदकाचेनि बळें अधिकें । जैसा आडवोनि आंगे फांके । तैसा मानसी विषो पोखे । रसनाद्वारें ॥306॥
ते झाड मुळामध्ये घातलेल्या पाण्यामुळे जसा आडव्या अंगाने अधिकच विस्तार पावू लागते त्या प्रमाणे ह्या (जिभेच्या) रसेंद्रियांच्या द्वाराने (हवा तसा अन्नरस घेतला असता) अंतःकरणात विषयवासना पोसल्या जाऊन अधिकच वाढत राहतात.
307-2
येरां इंद्रिया विषय तुटे । तैसा नियमूं न ये रस हटें । जे जीवन हें न घटे । येणेंविण ॥307॥
ज्याप्रमाणे इतर इंद्रियांचे विषय (निग्रहाने) प्रयत्नाने कमी करता येतात; पण त्याप्रमाणेच जिभेचा विषय प्रयत्नाने कमी करता येत नाही. कारण त्यावाचून (शरिराच्या क्रिया चालत नाहीत) जगणे शक्य नाही.
308-2
मग अर्जुना स्वभावे । ऐसियाही नियमातें पावे । जैं परब्रह्म अनुभवें । होऊनि जाईजे ॥308॥
पण अर्जुना ! (मग या रसनेद्रियाचा (जिभेचा)विषय तुटावा कसा? तर माऊली म्हणतात) जो साधक परब्रम्हाशी एकरूपतेचा (अनुभवाद्वारा) ब्रम्हरूप होईल, तेव्हाच रसनेद्रियाची लालसा शिथिल होईल. मग आशा वेळी रसनेचे नियमन होऊ शकते.
309-2
तैं शरीरभाव नासती । इंद्रिये विषय विसरती । सोहंभावप्रतीति । प्रकट होय ॥309॥
ज्या वेळी ते ब्रह्म मीच आहे, असा साक्षात्कारात्मक अनुभव येतो.त्यावेळी शरिराचे व्यवहार नाहिसे होतात आणि इंद्रिये ही आपआपल्या विषयांना विसरुन जातात.
यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः ।
इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः॥2.60॥
भावार्थ :- कारण हे अर्जुना ! (रसबुद्धि शिल्लक राहिल्यामुळे) बुद्धिमान पुरुष इंद्रियांचा विषयांशी संयोग न होऊ देण्याकरिता (बुद्धी स्थिर होण्याकरिता) कितीही प्रयत्न करीत असला, तरी अतिशय बलवान इंद्रिये त्याचे मन जबरदस्तीने (विषयांकडे ओढतात) मोहित करतात.
310-2
येर्‍हवीं तरी अर्जुना । हें आया नये साधना । जे रहाटताती जतना । निरंतर ॥310॥
एरव्ही अर्जुना ! (ही इंद्रिये साधनांना दाद देत नाहीत) यांना (इंद्रियांना) जिंकण्यासाठी जे सदैव प्रयत्न करतात (स्वाधीन ठेवण्याकरिता खटपट करतात), त्यांनादेखील ही इंद्रिये स्वाधीन करता येत नाहीत.


311-2
जयातें अभ्यासाची घरटी । यमनियमांची ताटी । जे मनाते सदा मुठी । धरूनि आहाती ॥311॥
जे साधक आपल्या भोवती (इंद्रियांना कोंडून ठेवण्यासाठी) साधनेची घरटी बांधतात, यमनियमाचे मनाला कुंपन घालतात आणि मनाला सदैव मुठीत धरून बसतात,
312-2
तेही किजती कासाविसी । या इंद्रियांची प्रौढी ऐसी । जैसी मंत्रज्ञातें विवसी । भुलवी कां ॥312॥
अशा साधकाला सुद्धा ही इंद्रियें विषय (भोगण्याकरीता)व्याकुळ करतात, एवढा या इंद्रियांचा प्रताप आहे. ज्याप्रमाणे मांत्रिकाला एखादी हडळदेखील फसवीत असते,
313-2
देखे विषय हे तैसे । पावती ऋद्धिसिद्धीचेनि मिषें । मग आकळती स्पर्शें । इंद्रियांचेनि ॥313॥
त्याप्रमाणे पाहा, हे विषय रिद्धिसिद्धीच्या रूपाने (साधनेच्या तपाच्या माध्यमातून) प्राप्त होतात. व इंद्रिया संबंधद्वारा योग्यांचीही मने गुरफटून टाकतात.
314-2
तिये संधी मन जाये । मग अभ्यासां ठोठावलें ठाये । ऐसें बळकटपण आहे । इंद्रियांचे ॥314॥
अशा कचाट्यात मग हे मन (इंद्रियांच्या)सापडले की, (अभ्यास जागच्या जागी राहतो) अभ्यासदेखील जागृत होत नाही, इंद्रियांचा जोर हा असा आहे.
तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः ।
वशे हि यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता॥2.61॥
भावार्थ :- कर्मयोगी साधकाने सर्व इंद्रियांना वश करून मन माझ्याकडे “(परमात्मा श्रीकृष्णा)” स्थिर करावे. ज्याने इंद्रियांवर विजय मिळविला आहे, त्याची बुद्धी स्थिर झाली, असे समजावे.
315-2
म्हणोनि आइकें पार्था । यांते निर्दळी जो सर्वथा । सर्व विषयीं आस्था । सांडूनिया ॥315॥
म्हणून अर्जुना, ऐक. (अगदी मनापासून) अंतःकरणापासून जो सर्व विषयांची आसक्ती सोडून (इच्छा सोडून या इंद्रियांना सर्वतोपरी दमन करून)इंद्रियावर विजय मिळवतो, (इंद्रिये आपल्या स्वाधीन ठेवतो),


316-2
तोचि तूं जाण । योगनिष्ठेसी कारण । जयाचे विषयसुखे । अंतःकरण झकवेना ॥316॥
ज्याचे अंतःकरण विषयाचे सुखाने भूलुन (फसले) जात नाही, तोच योगनिष्ठा प्राप्त होण्यास योग्य अधिकारी आहे.
317-2
जो आत्मबोधयुक्तु । होऊनि असे सततु । जो मातें हृदयाआंतु । विसंबेना ॥317॥
त्याचे अंतःकरण आत्मज्ञानाने परिपूर्ण भरलेले असते, तो (नेहमी आत्मज्ञानाने संपन्न होवून राहतो) अंतःकरणात मला कधीच विसरत नाही.
318-2
एर्‍हवीं बाह्य विषय तरी नाहीं । परी मानसीं होईल जरी कांही । तरी साद्यंतुचि हा पाहीं । संसारु असे ॥318॥
एर्‍हवीं जरी एखाद्या साधकाने (शब्दादि) बाह्य़ विषयाचा त्याग केला, पण मनात जर विषयाची थोडीशीही वासना (विषय उपभोगण्याची लालसा) असेल, तर त्याला संसाराची बंधने जखडून ठेवतात. (जन्म मरणाचा फेरा चुकत नाही. म्हणून विषयाची किंचित ही अभिलाषा नसावी)
319-2
जैसा कां विषाचा लेशु । घेतलिया होय बहुवसु । मग निभ्रांत करी नाशु । जीवितासी ॥319॥
ज्याप्रमाणे (मनात एखादा लालसा निर्माण करणारा विचार) विषाचा एक थेंब जरी घेतला, (फार होतो जीवन नष्ट करायला) तरी तो सर्व शरीरात पसरून जीवनाचा नाश करतो.
320-2
तैसी या विषयांची शंका । मनीं वसती देखा । घातु करी अशेखा । विवेकजाता ॥320॥
त्याप्रमाणे पाहा, या विषयांतून सुख मिळते काय, (मनात विषयांची सूक्ष्म संस्काररूप थोडी जरी इच्छा राहिली) अशी शंका जरी मनात निर्माण झाली, तरी अंतःकरणातील विवेकाचा ती घात करते.
ध्यायतो विषयान्पुंसः सङगस्तेषूपजायते ।
सङगात्संजायते कामः कामात्क्रोधोभिजायते॥2.62॥
क्रोधाद् भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः ।
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति॥2.63॥

भावार्थ :- विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्या विषयात आसक्ती निर्माण होते. आसक्ती मूळे काम, (इच्छा) उत्पन्न होते, (इच्छेच्या आड) कामामुळे क्रोध उत्पन्न होतो, क्रोधापासून अविवेकी, संमोह, समोहापासून स्मरणशक्ती भ्रष्ट होते, स्मरणशक्ती भ्रष्ट झाल्यामुळे बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाशामुळे मानवाचे पतन होऊन मानवाचा दानव बनतो. (त्या मानवाचा नाश होतो, दुष्ट विचार मनात उत्पन्न होतात)


321-2
जरी हृदयीं विषय स्मरती । तरी निसंगाही आपजे संगती । संगी प्रगटे मूर्ति । अभिलाषाची ॥321॥
अरे ! अंतःकरणात जर विषयांची नुसती आठवण जरी असेल (किंवा झाली) (भोग घ्यावा अस फक्त वाटल) तरी, विरक्तालाही (जो सगळ्या गोष्टी पासून विरक्त झाला आहे असा तो) पुनः त्या विषयाची ओढ उत्पन्न होते. त्या आसक्तीमुळे (विषयसक्तीनेच काम), विषयप्राप्तीची इच्छा उत्पन्न होते.
322-2
जेथ कामु उपजला । तेथ क्रोधु आधींचि आला । क्रोधीं असे ठेविला । संमोह जाणे ॥322॥
जेथे काम उत्पन्न झाला, तेथे क्रोध आधिच आलेला असतो : (क्रोधाचे बिऱ्हाड आगोदरच ठेवलेले असते) आणि या दोहोंच्या बरोबरच तेथे अविचाराचा भ्रम निर्माण होतो.
323-2
संमोहा जालिया व्यक्ति । तरी नाशु पावे स्मृति । चंडवातें ज्योति । आहत जैसी ॥323॥
ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वार्‍याने दिवा नाहिसा होतो, तसेच संमोह झाला की अविचाराने स्मृती नाश पावते,
324-2
कां अस्तमानीं निशी । जैसी सूर्यतेजातें ग्रासी । तैसी दशा स्मृतिभ्रंशीं । प्राणियांसी ॥324॥
सूर्य मावळण्यांची वेळ होताच रात्र जशी सूर्याच्या तेजाला गिळून टाकते, त्या प्रमाणे स्मृतिभ्रंश झाल्यावर मनुष्याची तशी दयनीय (दुर्देशा) दशा होते.
325-2
मग अज्ञानांध केवळ । तेणे आप्लविजे सकळ । तेथ बुद्धि होय व्याकुळ । हृदयामाजीं ॥325॥
मग सर्वत्र (ज्ञानाचा लोप होतो) अज्ञानाने केवळ अंधार होतो आणि तो शरीरातील सर्व गोष्टींना बुडविते. त्यामुळे बुद्धीला विचार स्फुरत नाहीत आणि अंतरातील बुद्धी ही व्याकुळ होऊन जाते.

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading