संत ज्ञानेश्वर महाराज समाधी अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

ज्ञानेश्वर म. समाधी अभंग 1
मंगळमूर्ति सुखधामा । भक्तांचिया

मंगळमूर्ति सुखधामा । भक्तांचिया कल्पद्रूमा ।
निवृत्तीचिया पुरुषोत्तमा । नमो तुज ॥१॥
विद्यासागरा वैरागरा । संकटीं माउली ज्ञानेश्वरा ।
भरित दाटले अंबरा । तो तूं योगेश्वरा मोक्षदायी ॥२॥
मति चालविली रसाळ । संत श्रोतियां केला सुकाळ ।
दिधलें पुरुषार्थाचे बळ । ते तूं केवळ संजीवन ॥३॥
अमृतानुभव आनंदलहरी । ग्रंथ सिध्द केला ज्ञानेश्वरी ।
संस्कृत प्राकृत वैखरी । वदविली माझी ॥४॥
आता मोक्षाचिया वाटा । पाहिला षड्चक्र चोहटा ।
आज्ञा द्यावी वैकुंठा । ज्ञानदेव म्हणे ॥५॥

ज्ञानेश्वर म. समाधी अभंग 2
अष्टोत्तरशे तीर्थे सारी । ओघे

अष्टोत्तरशे तीर्थे सारी । ओघे आली अलंकापुरीं ।
वाद्ये वाजताती गजरीं । कीर्तन लहरी अमृताची ॥१॥
जैसा कस्तुरीचा सुगंधु । अनुभवी न म्हणतीच बद्धु ।
तैसा औटपिटाचा नादु । आठवी गोविंदु आवडीने ॥२॥
बौद्ध अवतार चक्रपाणि । सत्रावी कळा माय रूक्मिणी ।
जाणत असे अंतःकरणी । भक्त इच्छा ॥३॥
भावे विठ्ठले केली गोष्टी । ज्ञानदेवे अपूर्व इच्छिले पोटी ।
जावे उठाउठीं । समुदायेसी ॥४॥

ज्ञानेश्वर म. समाधी अभंग 3
विठ्ठल रुक्मिणीसहित गरुड हनुमंत
विठ्ठल रुक्मिणीसहित गरुड हनुमंत । आणिक संतमहंत जमा झाले ॥१॥
परिसा भागवत नामा पुंडलिक । पताकासहित उठावले ॥२॥
गंधर्व आणि देव आले सुरगण । चालली विमानें अलंकापुरी ॥३॥
लहान थोर सारे आले ऋषीश्वर । उतरले भार वैष्णवांचे ॥४॥
नामा म्हणे देवा दिसती तातडी । जाती मज घडी युग ऐसी ॥५॥

ज्ञानेश्वर म. समाधी अभंग 4
पंढरीचा पोहा आला अलंकापुरी

पंढरीचा पोहा आला अलंकापुरी । पंच कोसावरी साधुजन ॥१॥
पांडुरंगा संगें वैष्णवांचे भार । दिंड्या ते बाहेर निघाल्यासे ॥२॥
पताकांचे भार निघाले बाहेर । भेटती ऋषीश्वर पांडुरंगा ॥३॥
अवघिया भेटी झाल्या त्या बाहेरी । मग अलंकापुरी येते झाले ॥ ४ ।
सोपानाने मग केला नमस्कार । उतरिले पार पांडुरंगा ॥५॥

ज्ञानेश्वर म. समाधी अभंग 5
हरिहर विधाता आले अलंकापूरी

हरिहर विधाता आले अलंकापूरी । इंद्रायणी तीरी एक थाटीं ॥१॥
योगियांचा सखा कोठे ज्ञानेश्वर । जाती ऋषीश्वर भेटावया ॥२॥
शून्याचिया पोटी निरंजन गुंफा । ज्ञानयज्ञ सोपा सिद्ध केला ॥ ३ ।
उन्मनी निद्रा लागलीसे फार । स्वरूपी ज्ञानेश्वर जागा झाला ॥४॥
नामा म्हणे देवा भली केली बुध्दि । लागली समाधि ज्ञानदेवा ॥५॥

ज्ञानेश्वर म. समाधी अभंग 6
धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार

धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार । धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी ॥१॥
धन्य भागिरथी मनकर्णिका वोघा । आणिक हो गंगा त्रिवेणी त्या ॥२॥
धन्य ऋषीश्वर धन्य पांडुरंग । मिळाले ते सांग अलंकापुरी ॥३॥
नामा म्हणे धन्य भाग्याचे हे संत । झाला पहा एकांत ज्ञानोबाचा ॥४॥

ज्ञानेश्वर म. समाधी अभंग 7
कैलासाचा वास अधिक सिद्धबेट

कैलासाचा वास अधिक सिद्धबेट । विष्णूचे वैकुंठ पुरातन ॥१॥
भूमिवरी पंढरी तैसी अलंकापुरी । पंचकोशावरी पुण्यभूमी ॥२॥
सुखाची हे मूर्ति निळकंठलिंग । चक्रतीर्थ सांग मोक्ष भेटे ॥३॥
परमार्थ सुअर्थ देखतांचि संत । सांगितली मात अनुभवाची ॥४॥
नामा म्हणे देवा हे स्थळ चांगले । चित्त मन रंगले ज्ञानोबाचें ॥५॥

ज्ञानेश्वर म. समाधी अभंग 8
पुसताती संत सांगा देवा माते

पुसताती संत सांगा देवा माते । पूर्वी येथे होते कोण क्षेत्र ॥१॥
देव म्हणे स्थळ सिध्द हे अनादी । येथेच समाधि ज्ञानदेवा ॥२॥
अष्टोत्तरशें वेळां साधिली समाधि । ऐसे हे अनादि ठाव असे ॥३॥
नामा म्हणे देवा सांगितले उत्तम । ज्ञान अंजन सुगम देखों डोळां ॥४॥

ज्ञानेश्वर म. समाधी अभंग 9
देव म्हणे नामया ब्रह्मक्षेत्र आदी

देव म्हणे नामया ब्रह्मक्षेत्र आदी । येथेचि समाधि ज्ञानदेवा ॥१॥
चौयुगां आदि स्थळ पुरातन । गेले ते नेमून मुनिजन ॥२॥
चालिले सकळ झाले ते विकळ । अनादि हे स्थळ ज्ञानदेवा ॥३॥
नामा म्हणे आम्हा सांगितले हरि । दीर्घ ध्वनि करी वोसंडोनि ॥४॥

ज्ञानेश्वर म. समाधी अभंग 10
खेद दुःख करी मनाचा कळवळा

खेद दुःख करी मनाचा कळवळा । प्रेमाश्रु डोळां दाटताती ॥१॥
नारा विठा गोंदा पाठविला महादा । साहित्य गोविंदा सांगितले ॥२॥
काय काय आणूं सांगा हे प्रमाण । नेमियेला नेम पांडुरंगें ॥३॥
तुळसी आणि बेल दर्भ आणि फुलें । उदक हे चांगले भागिरथीचे ॥४॥
नामा म्हणे देवा साहित्य करितां । आठविते चित्ता खेद दुःख ॥५॥

ज्ञानेश्वर म. समाधी अभंग 11
साडेतीन पाउले टाकिली निश्चळ

साडेतीन पाउले टाकिली निश्चळ । नेमियेलें स्थळ उत्तरायणीं ॥१॥ देव म्हणे ज्ञाना होई सावधान । मागे वरदान मज काही ॥२॥ ज्ञानदेव म्हणे शुध्द कार्तिक मासीं । व्रत एकादशी स्वामीकडे ॥३॥ कृष्णपक्षी व्रत हरिदिनी परिपूर्ण मागितले दान ज्ञानदेवे ॥४॥ नामा म्हणे देवा आवडीने देता ॥ जोडले हे संता पीयूष जे॥५॥

ज्ञानेश्वर म. समाधी अभंग 12
वोसंडोनि हरि आनंदला तेथे

वोसंडोनि हरि आनंदला तेथे । पुण्य हे अगणित सांगितले ॥१॥
सर्वांगालागी न्याहाळिलें परिपूर्ण । केले निंबलोण आवडीनें ॥२॥
अलंकापुरीं कोणी करील कीर्तन । तयालागीं येणे वैकुंठीचे ॥३॥
अस्थि नासती उदकी करील ब्रह्मरूप । कोटी कुळांसहित उध्दरीन ॥४॥
जेथे ज्ञानदेव तेथे मी निशिदिनीं । येथे सुखे ज्ञानी डुल्लताती ॥५॥
नामा म्हणे आता वोसंडले हरि । जडमूढावरी कृपा केली ॥६॥

ज्ञानेश्वर म. समाधी अभंग 13
निवृत्ति ज्ञानदेव उभे दोहींकडे

निवृत्ति ज्ञानदेव उभे दोहींकडे । सोपान तो पुढे मुक्ताबाई ॥१॥
देहुडे सुरगण थक्क पडिले लोकां । सुरू केला डंका वैकुंठीचा ॥२॥
चक्रतीर्थी उभे देव साधुजन । करविलें स्नान ज्ञानदेवा ॥३॥
देवाचे हे तीर्थ घेतले ज्ञानेश्वरें । केला नमस्कार पादपद्मी ॥४॥
विठ्ठल रुक्मिणी ऋषी सुरवर । पूजा ज्ञानेश्वर करीतसे ॥५॥
नामयाच्या हाती गंध अक्षता । पूजा महंता मान्य झाली ॥६॥

ज्ञानेश्वर म. समाधी अभंग 14
टाळ विणे मृदंग वाजती अपार

टाळ विणे मृदंग वाजती अपार । नारद तुंबर गीत गाती ॥१॥
शुक वामदेव अंबऋषी सादर । मध्ये ज्ञानेश्वर ब्रह्मरूप ॥२॥
पिपिलिकेसी मार्ग जावया न मिळे । जाती भार मेळे वैष्णवांचे ॥३॥
नामा म्हणे देवा दाविली नवाळी । पुरविली आळी ज्ञानोबाची ॥४॥

ज्ञानेश्वर म. समाधी अभंग 15
दशमीचे दिवशी केली प्रदक्षिणा

दशमीचे दिवशी केली प्रदक्षिणा । आणिक कीर्तना संत उभे ॥१॥
रात्रंदिवस त्यांहीं केला हरिजागर । हरिदिनी थोर कृष्णपक्षी ॥२॥
मग केले स्नान भागिरथीचे तीरीं । संत महंता भारी पूजियेलें ॥३॥
अवलोकिले डोळां अंतर बाहेरी । मग सिद्धेश्वरी येते झाले ॥४॥
सिध्देश्वरालागीं पूजिलें निवळ । मागितलें स्थळ समाधीसी ॥५॥
गंगा आणि गिरजा निळकंठ ईश्वर । केला नमस्कार नामा म्हणे ॥६॥

ज्ञानेश्वर म. समाधी अभंग 16
अष्टोत्तरशें वेळा समाधि निश्चळ

अष्टोत्तरशें वेळा समाधि निश्चळ । पूर्वीतुझे स्थळ वहनाखाली ॥१॥
उठविला नंदी शिवाचा ढवळा । उघडिली शिळा विवराची ॥२॥
आसन आणि धुनी मृगछालावर । पाहाती ऋषीश्वर वोसंडोनी ॥३॥
बा माझी समाधि पाहिली जुनाट । केवळ वैकुंठ गुह्यगौप्य ॥४॥
नामा म्हणे देवा पुरातन स्थान । ऐसे नारायणें दावियेले ॥५॥

ज्ञानेश्वर म. समाधी अभंग 17
नारा विठा गोंदा महादा पाठविला

नारा विठा गोंदा महादा पाठविला । झाडविली जागा समाधीची ॥१॥
हरिदिनी जागर केला निशीदिनी ॥ उदईक पारणी द्वादशीची ॥२॥
गंगा गिरजा राही रुक्माबाई भामा । उठिल्या रांधण्या पारण्याच्या ॥३॥
नाना प्रकारचे पाक ते अपार । मुनि ऋषीश्वर बोलाविलें ॥४॥
वैष्णव देव आणि आले सुरगण । करोनिया स्नान इंद्रायणी ॥५॥
पिंपळाचे पारी बसविल्या पंक्ती । पात्र ते श्रीपती वाढू लागे ॥६॥
नामा म्हणे देवा करणे साहित्यासी । येतो कासाविसी प्राण माझा ॥ ७ ॥

ज्ञानेश्वर म. समाधी अभंग 18
सोवळ्याने हरि वाढितो सकळा

सोवळ्याने हरि वाढितो सकळा । मनीचा कळवळा कोण जाणे ॥१॥
रुक्माईचे कानी सांगितली गोष्ट । विस्तारावें ताट ज्ञानदेवा ॥२॥
राही रुक्माबाई वाढिती आवडीनें । सोडितो पारणे ज्ञानदेव ॥३॥
नामा म्हणे देवा परब्रह्म अन्न । जातो बोलावण ज्ञानदेवा ॥४॥

ज्ञानेश्वर म. समाधी अभंग 19
जेऊनिया स्वस्थ उठिले परिपूर्ण

जेऊनिया स्वस्थ उठिले परिपूर्ण । केले आचमन वैष्णवांनी ॥१॥
वैकुंठीचा प्रसाद पावले निवाडे । गोंदा महादा विडे वांटिताती ॥२॥
दोन प्रहरपावेतों आटोपलें भोजन । तृतीय प्रहरी कीर्तन आरंभिलें ॥३॥
कीर्तनाच्या नादें मोहिला गोविंद । करावा उद्योग समाधीचा ॥४॥
नामा म्हणे देवा करितां उशीर । विकळ ज्ञानेश्वर जात असे ॥५॥

ज्ञानेश्वर म. समाधी अभंग 20
ब्रह्मादिक तेथे करिताती पूजा

ब्रह्मादिक तेथे करिताती पूजा । घालिताती सेजा समाधिसी ॥१॥ चिद्रत्न आसन उन्मनीची धुनी । समाधि सज्जनी पाहियेली ॥२॥ धुवट वस्त्राची घडी ते अमोल । तुळसी आणि बेल आंथरिलें ॥३॥ दुर्वा दर्भ वरी टाकिलें मोकळे । पुष्पें ती सकळ समर्पिली ॥४॥ नामा म्हणे येथे छाया निरंतर । सुखी ज्ञानेश्वर सुखावला ॥५॥

ज्ञानेश्वर म. समाधी अभंग 21
पुढे ज्ञानेश्वर जोडोनिया कर

पुढे ज्ञानेश्वर जोडोनिया कर । बोलतो उत्तर स्वामिसंगें ॥१॥ पाळिले पोसिले चालविला लळा । बा माझ्या कृपाळा निवृत्तिराजा ॥२॥ स्वामिचिया योगे झालो स्वरूपाकार । उतरलो पार मायानदी ॥३॥ निवृत्तीने हात उतरिला वदना । त्यागिले निधाना आम्हांलागीं ॥४॥ नामा म्हणे देवा देखवेना मज । ब्रह्मीं ज्ञानराज मेळविला ॥५॥

ज्ञानेश्वर म. समाधी अभंग 22
वोसंडोनि निवृत्ति आलिंगो लागला

वोसंडोनि निवृत्ति आलिंगो लागला । आणिकांच्या डोळां अश्रु येती ॥१॥ अमर्यादा कधी केली नाही येणे । शिष्य गुरुपण सिध्दि नेले ॥२॥ गीतार्थाचा अवघा घेतला सोहळा । गुह्यगौप्यमाळा लेवविल्या ॥३॥ फेडिली डोळ्यांची अत्यंत पारणी । आता ऐसे कोणी सखे नाही ॥४॥ काढोनिया गुह्य वेद केले फोल । आठविती बोल मनामाजी ॥५॥ नामा म्हणे संत कासावीस सारे । लाविती पदर डोळियांसी ॥६॥

ज्ञानेश्वर म. समाधी अभंग 23
निवृत्तिदेव म्हणे सांगतो या वाचे

निवृत्तिदेव म्हणे सांगतो या वाचे । राहाणे चौघांचे एकरूप ॥१॥ त्रिवेणीचा ओघ जैसा एके ठायीं । तैसी मुक्ताबाई आम्हांमध्ये ॥२॥ ब्रह्माविष्णुहर जैसें एकेठायीं । तैसी मुक्ताबाई आम्हांमध्ये ॥३॥ रज तम गुण सत्वगुणाठायीं । तैसी मुक्ताबाई आम्हामध्ये ॥४॥ भूचरी खेचरी चांचरी ते पाहीं । अगोचरी ठायीं मुक्त गंगा ॥५॥ प्रथम ज्ञानेश्वरें काढियेली वाट । धरियेलें वैकुंठ अलंकापुरी ॥६॥ इंद्रनीळ पर्वत नेमिला सोपाना । निवृत्तीसी जाणा त्र्यंबकेश्वर ॥ ७ ॥ चौथी मुक्ताबाई नेमियेली तापी । नामा म्हणे ख्याति केली त्यांनी ॥ ८ ॥

ज्ञानेश्वर म. समाधी अभंग 24
निवृत्तिदेव म्हणे करितां समाधान

निवृत्तिदेव म्हणे करितां समाधान । काही केल्या मन राहात नाही ॥१॥ बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट । ओघ बारा वाटा मुरडताती ॥२॥ बांधल्या पेंढीचा सुटलासे आळा । तृण रानोमाळा पांगलेसे ॥३॥ हरिणीवीण खोपी पडियेली वोस । दशदिशा पाडस भ्रमताती ॥४॥ मायबापें आम्हां त्यागियेले जेव्हां । ऐसे संकट तेव्हां झाले नाही ॥५॥ नामा म्हणे देवा पेटला हुताशन । करा समाधान निवृत्तीचे ॥६॥

ज्ञानेश्वर म. समाधी अभंग 25
मुंग्यांचिये विवरी लागलीसे आग

मुंग्यांचिये विवरी लागलीसे आग । पुढे आणि मागे झाले नाही ॥१॥ राही रखुमाई आणि सत्यभामा । ओवाळिती प्रेमा ज्ञानेश्वरा ॥२॥ उभारिल्या गुढीया आणि तोरणे । छाया सुदर्शन धरियेले ॥३॥ नारा विठा गोंदा भेटला महादा । उभे जागोजागा राहिलेती ॥४॥ विसोबा खेचर चांगा वटेश्वर । केला नमस्कार अवघियांनी ॥५॥ गोरा कुंभार सांवता माळी । नामा तळमळी वत्सा ऐसे ॥६॥

ज्ञानेश्वर म. समाधी अभंग 26
सर्व स्वस्ति क्षेम वैष्णव मंडळीं

सर्व स्वस्ति क्षेम वैष्णव मंडळीं । बैसलेति पाळी समाधीच्या ॥१॥ पताकांची छाया दुणावली फार । सिद्ध ज्ञानेश्वर तेव्हां झाले ॥२॥ अजानवृक्षदंड आरोग्य अपार । समाधिसमोर स्थापियेला ॥३॥ कोरड्या काष्टा फुटियेला पाला । तेव्हां अवघियाला नमस्कारी ॥४॥ नामा म्हणे देवा घार गेली उडोन । बाळे दानादान पडियेली ॥५॥

ज्ञानेश्वर म. समाधी अभंग 27
देव निवृत्ति यांनी धरिले दोन्ही कर

देव निवृत्ति यांनी धरिले दोन्ही कर । जातो ज्ञानेश्वर बैसावया ॥१॥ नदीचिया माशा घातले माजवण । तैसे जनवन कालवलें ॥२॥ दाही दिशा धुंद उदयास्तावीण । तैसेचि गगन कालवलें ॥३॥ जाऊनि ज्ञानेश्वर बैसले आसनावरी । पुढे ज्ञानेश्वरी ठेवियेली ॥४॥ ज्ञानदेव म्हणे सुखीं केले देवा । पादपद्मी ठेवा निरंतर ॥५॥ तीन वेळां तेव्हां जोडिले करकमळ । झांकियेलें डोळे ज्ञानदेवे ॥६॥ भीममुद्रा डोळा निरंजन मैदान । झाले ब्रह्म पूर्ण ज्ञानदेव ॥ ७ ॥ नामा म्हणे आता लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ॥ ८ ॥

ज्ञानेश्वर म. समाधी अभंग 28
निवृत्तीने बाहेर आणिलें गोपाळा

निवृत्तीने बाहेर आणिलें गोपाळा । घातियेली शिळा समाधीसी ॥१॥ सोपान मुक्ताई सांडिती शरीरा । म्हणती धरा धरा निवृत्तीसी ॥२॥ आणिकांची तेथे उद्विग्न ती मनें । घालिताती सुमनें समाधीसी ॥३॥ नामदेवे भावे केली असे पूजा । बापा ज्ञानराजा पुण्यपुरुषा ॥४॥

ज्ञानेश्वर म. समाधी अभंग 29
देवो म्हणती रुक्मिणी । हा एकचि

देवो म्हणती रुक्मिणी । हा एकचि योगी देखिला नयनीं । हेचि ज्ञानसंजीवनीं । जाण त्रैलोक्यासी ॥१॥ धन्य धन्य धरातळीं । जो याते दृष्टी न्याहाळी । तो वाहात येईल टाळी । वैकुंठ भुवनासी ॥२॥ जो करील याची यात्रा । तो तारील सकळ गोत्रां ॥ सकळहि कुळे पवित्रा । याचेनि दर्शनें होती ॥३॥ अलंकापुरीं हे शिवपीठ । पूर्वी येथे होते नीळकंठ । ब्रह्मादिकी तप वरिष्ठ । येथेचि पैं केले ॥४॥ इंद्र येऊनिया भूमीसी । याग संपादिलें अहर्निशीं । इंद्रायणी इंदोरिसी । पंचक्रोशी यापासूनी ॥५॥ येथे त्रिवेणी गुप्त असे । भैरवापासूनी भागिरथी वसे । पूर्ववटी जेमाया दिसे । ते प्रत्यक्ष जाणा पार्वती ॥६॥ भोवती वनवल्ली वृक्षी । येथे देव येऊनि होती पक्षी । हे असे नित्य साक्षी । अस्थी नासती उदकी ॥ ७ ॥ हे पंढरीहूनी सोपे । जनाची हरावया पापे । कळिकाळ कोपलिया कोपे । न चले अलंकापुरासी ॥ ८ ॥ ऐसे सांगता हरीसी । प्रेम ओसंडलें रुक्मिणीसी । म्हणे धन्य धन्य जयाचिये कुसी । ज्ञानदेव जन्मले ॥ ९ ॥ नामा म्हणे माझा स्वामी । वसे संतसमागमी । ऐसे सांगितलें ग्रामी । अलंकापुरीसी ॥ १० ॥

ज्ञानेश्वर म. समाधी अभंग 30
अलंकापुरीस पांडुरंग गेले

अलंकापुरीस पांडुरंग गेले। समाधीस्त केले ज्ञानदेवे ॥१॥ उरकोणी सोहळा संगे संत मेळा। विठोबा राहिला आळंदीस ॥२॥ पाहे चक्रपाणी नाम्या डोळा पाणी । कंठ तो दाटुनी उभा असे ॥३॥ पुसे रूख्मिनीकांत का रे तु निवांत । नाम्या शोकाक्रांत कोण्या दुखे ॥४॥

****॥ विठ्ठल-विठ्ठल ॥*****

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य एकाच ठिकाणी पाहा

वारकरी संत समाधी अभंग

वारकरी संत चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *