सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १ ला ओवी ७६ ते १०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

76-1
येर्‍हवीं तरी मी मुर्खु । जरी जाहला अविवेकु । तर्‍ही संतकृपादीपकु । सोज्वळु असे ॥1.76॥
एरव्ही तरी मी अज्ञानी आहे, माझ्याकडून भाष्य लिहिताना अविवेक होत आहे. तरीपण संतकृपेचा प्रकाशमान दीप प्रज्वलित आहे. ॥1-76॥
77-1
लोहाचें कनक होये । हें सामर्थ्य परिसींच आहे । कीं मृतही जीवित लाहे । अमृतसिद्धि ॥1.77॥
लोखंडाचे सोने करण्याचे सामर्थ्य परिसात आहे. किंवा अमृताची प्राप्ती झाली की, मृतसुद्धा जिवंत होतो. ॥1-77॥
78-1
जरी प्रकटे सिद्धसरस्वती । तरी मुकयाहि आथी भारती । एथ वस्तुसामर्थ्यशक्ति । नवल कयी ॥1-78॥
सरस्वती देवता प्रसन्न झाली, तर मुक्यालाही भावमधुर वाचा फुटते. असा बदल होण्याविषयी वस्तूचे सामर्थ्य किंवा शक्ती कारण आहे, यात आश्यर्य ते काय आहे? ॥1-78॥
79-1
जयातें कामधेनु माये । तयासी अप्राप्य कांहीं आहे । म्हणौनि मी प्रवर्तों लाहें । ग्रंथीं इये ॥1-79॥

ज्याची आई कामधेनू आहे, त्याला या जगात दुर्लभ असे काही नाही; म्हणून मी या गीता ग्रंथावर भाष्य करण्यास प्रवृत्त झालो. ॥1-79॥
80-1
तरी न्यून ते पुरतें । अधिक तें सरतें । करूनि घेयावें हें तुमतें । विनवितु असे ॥1-80॥
माझ्या या भाष्यामध्ये काही कमतरता असेल, तर ती पूर्ण करून घ्या आणि अधिक असेल, तर समजून घ्या, अशी तुम्हाला मी नम्र विनंती करत आहे. ॥1-80॥

81-1
आतां देईजो अवधान । तुम्हीं बोलविल्या मी बोलेन । जैसे चेष्टे सूत्राधीन । दारुयंत्र ॥1-81॥
आता आपण भाष्या कडे लक्ष द्या. तुम्ही जसे मला बोलवाल, त्या प्रमाणे मी बोलेन. सूत्रधार ज्या प्रमाणे दोरी हलवीत असतो, तशी दोरीच्या आधीन असलेली कळसूत्री बाहुली नाचत असते. ॥1-81॥
82-1
तैसा मी अनुग्रहीतु । साधूंचा निरूपितु । ते आपुलियापरी अलंकारितु । भलतयापरी ॥1-82॥
त्याप्रमाणे मी साधूंच्या अनुग्रहित असून साधूंचा निरोप सांगणार आहे. त्यामुळे त्यांनी मला भाष्य करताना हवे तेवढे अलंकृत करावे. ॥1-82॥
83-1
तंव श्रीगुरु म्हणती राहीं । हे तुज बोलावें नलगे कांहीं । आतां ग्रंथा चित्त देईं । झडकरी वेगां ॥1-83॥
तेंव्हा सद्गुरु निवृत्तीनाथ म्हणले, ज्ञानदेवा ! आता विनवणीचे बोलणे थांबवावे आणि गीतेवर भाष्य करण्यास प्रारंभ करावा. ॥1-83॥
84-1
या बोला निवृत्तिदासु । पावूनि परम उल्हासु । म्हणे परियसा मना अवकाशु । देऊनियां ॥1-84॥
सद्गुरूंची आज्ञा ऐकून निवृत्तीदास ज्ञानदेव यांना परम उल्हास झाला आणि ते म्हणाले, माझ्या मुखातून प्रकट होणारे शब्द आपण शांत मनाने श्रवण करावेत. ॥1-84॥
धृतराष्ट्र उवाच । 1.1
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः ।
मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय ॥1.1॥

संदर्भित अन्वयार्थ
धृतराष्ट्र
= धृतराष्ट्र, उवाच = म्हणाले, सञ्जय = हे संजया, धर्मक्षेत्रे = धर्मभूमी असणाऱ्या, कुरुक्षेत्रे = कुरुक्षेत्रावर, समवेताः = एकत्र जमलेल्या, युयुत्सवः = युद्धाची इच्छा करणाऱ्या, मामकाः = माझ्या मुलांनी, च= आणि, एव = तसेच, पाण्डवाः = पांडूच्या मुलांनी, किम्‌ = काय, अकुर्वत = केले ॥1-1॥
अर्थ
धृतराष्ट्र म्हणाले, हे संजया, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनीही काय केले? ॥1-1॥
85-1
तरी पुत्रस्नेहें मोहितु । धृतराष्ट्र असे पुसतु । म्हणे संजया सांगे मातु । कुरुक्षेत्रींची ॥1-85॥
पुत्रांच्या प्रेमाने मोहित झालेला धृतराष्ट्र राजा हा संजयास म्हणाला, ” हे संजय ! कुरुक्षेत्रांवर काय घडत आहे, ती हकीकत मला सांग. ॥1-85॥

86-1
जें धर्मालय म्हणिजे । तेथ पांडव आणि माझे । गेले असती व्याजें । जुंझाचेनि ॥1-86॥
ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे स्थान म्हणतात, तेथे पंडुचे पुत्र आणि माझे पुत्र युद्धाच्या निमित्ताने गेले आहेत. ॥1-86॥
87-1
तरी तेचि येतुला अवसरीं । काय किजत असे येरयेरीं । ते झडकरी कथन करी । मजप्रती ॥1-87॥
तरी ते परस्परांत एवढा वेळ काय करीत आहेत, हे मला लवकर सांग. ॥1-87॥
संजय उवाच ॥
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा ।
आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत ॥1.2॥
पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम ।
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥1.3॥

संदर्भित अन्वयार्थ
सञ्जय
= संजय, उवाच = म्हणाले, तदा = त्यावेळी, व्यूढम्‌ = व्यूहरचनेने युक्त, पाण्डवानीकम्‌ = पांडवांचे सैन्य, दृष्ट्वा = पाहून, तु = आणि, आचार्यम्‌ = द्रोणाचार्यांच्या, उपसङ्गम्य = जवळ जाऊन, राजा = राजा, दुर्योधनः = दुर्योधन, वचनम्‌ = असे वचन, अब्रवीत = बोलला ॥1-2॥
अर्थ
संजय म्हणाले, त्यावेळी व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचर्यांजवळ जाऊन असे म्हणाला ॥1-2॥
88-1
तिये वेळीं तो संजय बोले । म्हणे पांडव सैन्य उचललें । जैसें महाप्रळयीं पसरलें । कृतांतमुख ॥1-88॥
संजय म्हणाला तेव्हा संजय म्हणाला, ज्याप्रमाणे महाप्रलयाचे वेळी काळाने आपले विशाल तोंड उघडलेले असते, त्याप्रमाणे पांडवांचे सैन्य युद्धासाठी प्रक्षुब्ध झाले आहे. ॥1-88॥
89-1
तैसें तें घनदाट । उठावलें एकवाट । जैसें उसळलें काळकूट । धरी कवण ॥1-89॥
त्याप्रमाणे त्या घनदाट सैन्याने एकत्रितपणाने उठाव केला आहे. काळकूट नावाचे विष उचळले, तर त्याला कोण बरे शांत करू शकणार? ॥1-89॥
90-1
नातरी वडवानळु सादुकला । प्रळयवातें पोखला । सागरु शोषूनि उधवला । अंबरासी ॥1-90॥
किंवा वडवानल पेटून प्रज्वलित होऊन वाऱ्याच्या साहाय्याने वाढत चालला, तर तो जसा सागरालाही शोषून आकाशापर्यंत धडकतो, ॥1-90॥

91-1
तैसें दळ दुर्धर । नानाव्यूहीं परीकर । अवगमलें भयासुर । तिये काळीं ॥1-91॥
त्याप्रमाणे विविध प्रकारच्या व्युहांची रचना करून युद्धासाठी सज्ज झालेले सैन्य महाभयंकर दिसत आहे. ॥1-91॥
92-1
तें देखोनियां दुर्योधनें । अव्हेरिलें कवणें मानें । जैसे न गणिजे पंचाननें । गजघटांतें ॥1-92॥
ज्याप्रमाणे सिंह हत्तीच्या कळपाळा मोजत नाही, त्याप्रमाणे ते विशाल सैन्य पाहून दुर्योधनाने त्याची कांहीच पर्वा केली नाही. ॥1-92॥
93-1
मग द्रोणापासीं आला । तयांतें म्हणे हा देखिला । कैसा दळभारू उचलला । पांडवांचा ॥1-93॥
नंतर दुर्योधन द्रोणाचर्याजवळ जवळ येऊन त्यांना म्हणाला, पांडवांचे हे सैन्य युद्धासाठी कसे उसळले आहे, ते पहिले का? ॥1-93॥
94-1
गिरिदुर्ग जैसे चालते । तैसे विविध व्यूह सभंवते । रचिले आथी बुद्धिमंतें । द्रुपदकुमरें ॥1-94॥
बुद्धिवंत असा जो द्रुपदपुत्र धृष्टदुउम त्याने विविध प्रकारचे विशाल व्यूह सभोवार रचले आहेत. ते चालत्या डोंगरी किल्ल्याप्रमाणे दिसत आहेत. ॥1-94॥
95-1
जो हा तुम्हीं शिक्षापिला । विद्या देऊनि कुरुठा केला । तेणें हा सैन्यसिंहु पाखरिला । देख देख ॥1-95॥
ज्याला तुम्ही शिकविले, विद्या देऊन शहाणे केले, त्या धृष्टदुउमनाने हा सेनासागर सर्वत्र पसरविला आहे, तो आपण पाहा. ॥1-95॥

96-1
अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि ।
युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः॥1.4॥

भावार्थ :- तेथे युद्धात महाधनुर्धारी भीम व अर्जुन यासारखे अनेक शूरवीर आहेत, युयुधान आणि विराट, त्याप्रमाणे महापराक्रमी द्रुपद राजा आहे. ॥4॥
आणिकही असाधारण । जे शस्त्रास्त्रीं प्रवीण । क्षात्रधर्मीं निपुण । वीर आहाती ॥1-96॥
आणखी जे शस्त्रात्रांत अतिप्रवीन आणि शस्त्रधर्मामध्ये निपुण असे महान योद्धे आहेत, ॥1-96॥
97-1
जे बळें प्रौढी पौरुषें । भीमार्जुनांसारिखे । ते सांगेन कौतुकें । प्रसंगेची ॥1-97॥
हे शक्तीने, महाधैर्याने आणि पराक्रमाने भीम व अर्जुन यासारखे आहेत. त्यांची नावे प्रसंग आला म्हणून कौतुकाने म्हणून सांगतो. ॥1-97॥
98-1
एथ युयुधानु सुभटु । आला असे विराटु । महारथी श्रेष्ठु । द्रुपद वीरु ॥1-98॥
या रणांगणामध्ये महायोद्धा युयुधान, विराट राजा आणि महारथ्यांत श्रेष्ठ असा द्रुपद राजा आले आहेत. ॥1-98॥
99-1
धृष्टकेतुश्चेकितानः काशिराजश्च वीर्यवान ।
पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः॥1.5॥
युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् ।
सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः॥1.6॥

भावार्थ :- चेकितान, धृष्टकेतू, पराक्रमी असा काशीराज, पुरुजित, कुंतीभोज नरश्रेष्ठ, शैब्य, ॥5॥
पराक्रमी युधामन्यु, शक्तिशाली उत्तमौजा, सुभाद्रपुत्र अभिमन्यु आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्वच महारथी आहेत. ॥6॥

चेकितान धृष्टकेतु । काशिराज वीर विक्रांतु । उत्तमौजा नृपनाथु । शैब्य देख ॥1-99॥
चेकितान, धृष्टकेतू, पराक्रमी असा काशीराज, नृपश्रेष्ठ उत्तमौजा व शैब्य राजा पाहा. ॥1-99॥
100-1
हा कुंतिभोज पाहें । एथ युधामन्यु आला आहे । आणि पुरुजितादि राय हे । सकळ देख॥1-100॥
हा कुंतीभोज पाहा, येथे युधामन्यु आलेला आहे. आणखी हे पुरुजित वगैरे सर्वच राजे आलेले आहेत, ते पाहा. ॥1-100॥

, , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *