526-18
परी विश्वींची आघवी मांदी । जेणें भेदलेनि गुणभेदीं । पडिली तें तंव आदी । ज्ञान सांगो ॥526॥
परंतु हे सर्व विश्व ज्याच्या योगाने या तीन गुणांच्या सपाट्यात सापडले ते ज्ञान तुला अगोदर सांगतो.526
527-18
जे दिठी जरी चोख कीजे । तरी भलतेंही चोख सुजे । तैसें ज्ञानें शुद्धें लाहिजे । सर्वही शुद्ध ॥527॥
कारण दृष्टी शुद्ध झाली म्हणजे पाहिजे त्या पदार्थाचे स्वरूप समजते; त्याप्रमाणे शुद्ध ज्ञान प्राप्त झाले असता सर्व पदार्थाचे शुद्ध स्वरूप कळते.527
528-18
म्हणौनि तें सात्विक ज्ञान । आतां सांगों दे अवधान । कैवल्यगुणनिधान । श्रीकृष्ण म्हणे ॥528॥
म्हणून सात्त्विक ज्ञान आता तुला सांगतो, लक्ष दे, असे कैवल्यगुणनिधान भगवान श्रीकृष्ण म्हणाले.528
सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते ।
अविभक्तं विभक्तेषु तज्ञानं विद्धि सात्त्विकम् ॥18.20॥
529-18
तरी अर्जुना गा तें फुडें । सात्विक ज्ञान चोखडें । जयाच्या उदयीं ज्ञेय बुडे । ज्ञातेनिसीं ॥529॥
तर अर्जुना, तेच खरोखर शुद्ध सात्विक ज्ञान होय की, ज्याचा उदय झाल्याबरोबर त्यामध्ये ज्ञेय हे ज्ञात्यासह लीन होते. 529
530-18
जैसा सूर्य न देखे अंधारें । सरिता नेणिजती सागरें । कां कवळिलिया न धरे । आत्मछाया ॥530॥
ज्याप्रमाणे सूर्य अंधाराला पाहू शकत नाही, समुद्राला नद्यांची ओळखही नसते, अथवा आपल्या पडछायेस धरू लागले असता सापडत नाही.530
531-18
तयापरी जया ज्ञाना । शिवादि तृणावसाना । इया भूतव्यक्ति भिन्ना । नाडळती ॥531॥
त्याप्रमाणे ज्या ज्ञानाला शिवापासून गवता पर्यंत सर्व व्यक्तीत भिन्नपणा दिसत नाही; 531
532-18
जैसें हातें चित्र पाहातां । होय पाणियें मीठ धुतां । कां चेवोनि स्वप्ना येतां । जैसें होय ॥532॥
भिंतीवरील चित्रे सावरून पाहिले असता, किंवा मीठ धुतले असता जसे होते अथवा जागृत झाल्यावर स्वप्नाची जशी स्थिती होते 532
533-18
तैसें ज्ञानें जेणें । करितां ज्ञातव्यातें पाहाणें । जाणता ना जाणणें । जाणावें उरे ॥533॥
तसेच ज्या ज्ञानाच्या प्रकाशाने ज्ञेय पाहू गेले असता ज्ञाता, व ज्ञेय ही त्रिपुटी नाहीशी होते; 533
534-18
पैं सोनें आटूनि लेणीं । न काढिती आपुलिया आयणी । कां तरंग न घेपती पाणी । गाळूनि जैसें ॥534॥
परंतु ज्ञात्यास जसे सोन्याची परीक्षा करण्याकरिता आपल्या बुद्धीने दागिने आटवून त्यातील सोने काढावे लागत नाही किंवा पाणी घ्यावयाचे असल्यास त्यावरील लाटा गाळून ते घेत नाहीत, 534
535-18
तैसी जया ज्ञानाचिया हाता । न लगेचि दृश्यपथा । तें ज्ञान जाण सर्वथा । सात्विक गा ॥535॥
तसा सर्व दृश्य वस्तूंच्या ठिकाणी ज्या ज्ञानाला भेद दिसत नाही,त्या ज्ञानाला सात्विक ज्ञान असे म्हणतात. 535
536-18
आरिसा पाहों जातां कोडें । जैसें पाहातेंचि कां रिगे पुढें । तैसें ज्ञेय लोटोनि पडे । ज्ञाताचि जें ॥536॥
आरसा पाहू गेले असता जसे पहाणाराचेच प्रतिबिंब त्यात दिसते, तसेच ज्ञेय लोटून प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी ज्ञाता आपले स्वरूपच पाहतो. 536
537-18
पुढती तेंचि सात्विक ज्ञान । जें मोक्षलक्ष्मीचें भुवन । हें असो ऐक चिन्ह । राजसाचें ॥537॥
हेच सातवी ज्ञान मोक्षलक्ष्मीचे मंदिर होय. हे असो; आता तुला ‘राजस’ ज्ञानाची लक्षणे सांगतो, ती ऐक. 537
पृथक्त्वेन तु यज्ञानं नानाभावान्पृथग्विधान् ।
वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ञानं विद्धि राजसम् ॥18.21॥
538-18
तरी पार्था परीयेस । तें ज्ञान गा राजस । जें भेदाची कांस । धरूनि चाले ॥538॥
तर पार्था, तेज ज्ञान राजस होय, की जे भूतमात्रांच्या भेदभाव मानून चालते, समजलास? 538
539-18
विचित्रता भूतांचिया । आपण आंतोनि ठिकरिया । बहु चकै ज्ञातया । आणिली जेणें ॥539॥
ज्या ज्ञानाने भूतमात्रांच्या ठिकाणी अनेकत्व मानून आपल्या ठीकर्या(वेगळेपणा) करून घेतल्या आहेत ज्ञात्याला चकवून सोडले आहे; 539
540-18
जैसें साचा रूपाआड । घालूनि विसराचें कवाड । मग स्वप्नाचें काबाड । ओपी निद्रा ॥540॥
ज्याप्रमाणे निद्रा ही स्वरूपाचे आड ज्ञानाचा पडदा घालून मग स्वप्नातील कष्टमय सिथ्ती आणते, 540
541-18
तैसें स्वज्ञानाचिये पौळी । बाहेरि मिथ्या महीं खळीं । तिहीं अवस्थांचिया वह्याळी । दावी जें जीवा ॥541॥
त्याप्रमाणे आत्मज्ञानाच्या मंदिराभोवतुन मायेचा पसारा घालून जागृती स्वप्न व सुषुप्ती या तीन अवस्थांच्या थापा मारून जे जीवास फसविते, 541
542-18
अलंकारपणें झांकलें । बाळा सोनें कां वायां गेलें । तैसें नामीं रूपीं दुरावलें । अद्वैत जया ॥542॥
लहान मुलाला दागिन्यांच्या रूपाने सोने दाखविले असता सोन्याची ओळख नसते, तसे नामरुपाच्या भेदामुळे ज्या ज्ञानाला अद्वैत दुरावते; 542
543-18
अवतरली गाडग्यां घडां । पृथ्वी अनोळख जाली मूढां । वन्हि जाला कानडा । दीपत्वासाठीं ॥543॥
अज्ञान मनुष्याला मातीपासून केलेली मडकी व घागरी ही दाखविली असता त्यास जशी मूळ मातीची ओळख नसते, 543
544-18
कां वस्त्रपणाचेनि आरोपें । मूर्खाप्रति तंतु हारपे । नाना मुग्धा पटु लोपे । दाऊनि चित्र ॥544॥
किंवा मूर्ख मनुष्याला वस्त्र दाखविले असता तंतूंची ओळख पटत नाही, अथवा त्यास पडद्यावरील चित्रे दाखविली असता पडद्याची ओळख नसते, 544
545-18
तैशी जया ज्ञाना । जाणोनि भूतव्यक्ती भिन्ना । ऐक्यबोधाची भावना । निमोनि गेली ॥545॥
तसे भूतमात्र भिन्नभिन्न आहे, या समजुतीने ज्या ज्ञानाची ऐक्य बोधाची भावना नाश पावली आहे. 545
546-18
मग इंधनीं भेदला अनळु । फुलांवरी परीमळु । कां जळभेदें शकलु । चंद्रु जैसा ॥546॥
मग लाकडे पेटल्यावर त्यांच्या आकाराप्रमाणे अग्नी निरनिराळा आहे, चंद्राचा प्रकाश पाण्यात पडल्यामुळे ते हालल्यावर चंद्राचे तुकडे झाले आहेत, 546
547-18
तैसें पदार्थभेद बहुवस । जाणोनि लहानथोर वेष । आंतलें तें राजस । ज्ञान येथ ॥547॥
तसा नाना प्रकारच्या पदार्थात पुष्कळ भिन्नपणा आहे, अथवा वेषा वरून लहान व मोठा हा भेद आहे या समजुतीने जे भरलेले ज्ञान, ते राजस ज्ञान होय. 547
548-18
आतां तामसाचेंही लिंग । सांगेन तें वोळख चांग । डावलावया मातंग- । सदन जैसें ॥548॥
आता, गावाबाहेर असणाऱ्या मांगाचे घर टाळण्याकरता जसे वाटसरास जसे बजावून सांगावे लागते, तशी तामस ज्ञानाची लक्षणे तुला सांगतो, ती पूर्ण ध्यानात ठेव. 548
यत्तु कृत्स्नवदेकस्मिन्कार्ये सक्तमहैतुकम् ।
अतत्त्वार्थवदल्पं च तत्तामसमुदाहृतम् ॥18.22॥
549-18
तरी किरीटी जें ज्ञान । हिंडे विधीचेनि वस्त्रेंहीन । श्रुति पाठमोरी नग्न । म्हणौनि तया ॥549॥
तर अर्जुना, जे ज्ञान विधी रुपी वस्त्र पांघरल्याशिवाय संचार करिते आणि म्हणूनच ते नग्न असल्यामुळे, सर्व शास्त्रांची ‘माता’ जी श्रुती तिला पाठमोरी असते; 549
550-18
येरींही शास्त्र बटिकरीं । जें निंदेचे विटाळवरी । बोळविलेंसे डोंगरीं । म्लेंच्छधर्माच्या ॥550॥
इतर शास्त्रांनीही त्या ज्ञानात बट्टा लावून त्याची निंदा केली असता आपल्यास विटाळ होईल, म्हणून लेनच्या धर्मरूपी डोंगराकडे ज्यांची बोलवण केली; 550
Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण