सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ९२६ ते ९५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

926-13
नभाचें शून्यत्व गिळून । गुणत्रयातें नुरऊन । तें शून्य तें महाशून्य । श्रुतिवचनसंम त ॥926॥
आकाशाचे शून्यत्व गिळून सत्वादि तिन्ही गुणांचा नाश करून जे शून्य असते तेच महाशून्य होय. अशा बद्दल वेदवचन प्रमाण आहे.
ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते ।
ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य धिष्ठितम् ॥13.17॥

भावार्थ त्यालाच तेजाचेही तेज व अंधाराच्या पलिकडील आहे असे (ज्ञाते म्हणतात). ज्ञान तरी तेच आहे, ज्ञेय तेच आहे, ज्ञानाच्या योगाने जाणले जाणारे तेही तेच आहे, सर्व भूतमात्रांचे हृदयामधे तेच स्थित आहे.
927-13
जें अग्नीचें दीपन । जें चंद्राचें जीवन । सूर्याचे नयन । देखती जेणें ॥927॥
परब्रह्माचे वर्णन पुढे चालू
जे ब्रह्म अग्नीला चेतवणारे आहे व चंद्राचे जीवन (चंद्राला अमृत देणारे) आहे व ज्या ब्रह्माच्या प्रकाशाने सूर्याचे डोळे पाहतात.
928-13
जयाचेनि उजियेडें । तारांगण उभडें । महातेज सुरवाडें । राहाटे जेणें ॥928॥
ज्याच्या उजेडाने तारे (तार्‍यांचे समुदाय) प्रकाशले जातात व ज्याच्या तेजाने सूर्य सुखाने वावरतो,
929-13
जें आदीची आदी । जें वृद्धीची वृद्धी । बुद्धीची जे बुद्धी । जीवाचा जीवु ॥929॥
जे ब्रह्म आरंभाचा आरंभ आहे, वाढीची वाढ आहे, बुद्धीची बुद्धी आहे व जे जीवाचा जीव आहे.
930-13
जें मनाचें मन । जें नेत्राचे नयन । कानाचे कान । वाचेची वाचा ॥930॥
जे मनाचे मन आहे, जे डोळ्याचा डोळा आहे, जे कानाचे कान आहे व वाचेची वाचा आहे.

931-13
जें प्राणाचा प्राण । जें गतीचे चरण । क्रियेचें कर्तेपण । जयाचेनि ॥931॥
जे प्राणाचा प्राण आहे, जे गतीचा पाय आहे व ज्याच्यामुळे कर्माचे घडणे होते.
932-13
आकारु जेणें आकारे । विस्तारु जेणें विस्तारे । संहारु जेणें संहारे । पंडुकुमरा ॥932॥
अर्जुना, ज्याच्या योगाने आकार आकाराला येतो, ज्याच्या योगाने विस्तार विस्तारतो व ज्याच्या योगाने संहार नाश करतो.
933-13
जें मेदिनीची मेदिनी । जें पाणी पिऊनि असे पाणी । तेजा दिवेलावणी । जेणें तेजें ॥933॥
जे पृथ्वीची पृथ्वी आहे, ज्या ब्रह्मरूपी पाण्याला पिऊन पाणी हे पाणीपणाने आहे, ज्या च्या तेजाने तेजास प्रकाश दिला जातो.
934-13
जें वायूचा श्वासोश्वासु । जें गगनाचा अवकाशु । हें असो आघवाची आभासु । आभासे जेणें ॥934॥
जे ब्रह्म वायूचा श्वासोच्छ्वास आहे व ज्या ब्रह्मरूपी पोकळीत आकाश राहिले आहे. हे राहू दे, हा सर्व जगद्रूपी भास ज्याच्या योगाने भासतो.
935-13
किंबहुना पांडवा । जें आघवेंचि असे आघवा । जेथ नाहीं रिगावा । द्वैतभावासी ॥935॥
फार काय सांगावे? अर्जुना, जे सर्वांच्या ठिकाणी सर्व आहे व जेथे द्वैतपणाचा प्रवेश होत नाही.

936-13
जें देखिलियाचिसवें । दृश्य द्रष्टा हें आघवें । एकवाट कालवे । सामरस्यें ॥936॥
ज्याचें दर्शन होण्याबरोबरच द्रष्टा, दृश्य व दर्शन ही त्रिपुटी ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ऐक्यभावाला येते.
937-13
मग तेंचि होय ज्ञान । ज्ञाता ज्ञेय हन । ज्ञानें गमिजे स्थान । तेंहि तेंची ॥937॥
मग ते ब्रह्माचे ज्ञान होते व ज्ञाता, ज्ञेय व ज्ञानाने जाणले जाणारे ठिकाणही तेच (ब्रह्म) आहे.
938-13
जैसें सरलियां लेख । आंख होती एक । तैसें साध्यसाधनादिक । ऐक्यासि ये ॥938॥
ज्याप्रमाणे हिशोब करण्याचे संपल्यावर हिशेबातील निरनिराळ्या रकमा एक होतात, त्याप्रमाणे साध्य साधनादिक हे ब्रह्माचे ठिकाणी ऐक्यास येतात.
939-13
अर्जुना जिये ठायीं । न सरे द्वैताची वही । हें असो जें हृदयीं । सर्वांच्या असे ॥939॥
अर्जुना, ज्या ठिकाणी द्वैताचा व्यवहार चालत नाही, हे असो, जे ब्रह्म सर्वांच्या अंत:करणात असते.
इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः ।
मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते ॥13.18॥

भावार्थ याप्रमाणे क्षेत्र तसेच ज्ञान आणि ज्ञेय ही संक्षेपाने तुला सांगितली, हे सर्व जाणून माझा भक्त मत्स्वरूप होतो.
आतापर्यंत क्षेत्र, ज्ञेय, ज्ञान व अज्ञान असे ब्रह्माचे चार प्रकार करून विचार सांगितला
940-13
एवं तुजपुढां ” । आदीं क्षेत्र सुहाडा । दाविलें फाडोवाडां । विवंचुनी ॥940॥
हे सुजाण अर्जुना, याप्रमाणे प्रथम हे क्षेत्र तुला स्पष्टपणाने व्यक्त करून दाखवले.

941-13
तैसेंचि क्षेत्रापाठीं । जैसेनि देखसी दिठी । तें ज्ञानही किरीटी । सांगितलें ॥941॥
त्याचप्रमाणे क्षेत्राचा प्रकार सांगितल्यानंतर आम्ही ज्या रीतीने तुला डोळ्याला दिसेल त्या रीतीने तुला ज्ञान सांगितले.
942-13
अज्ञानाही कौतुकें । रूप केलें निकें । जंव आयणी तुझी टेंके । पुरे म्हणे ॥942॥
तुझी बुद्धी ‘पुरे’ म्हणून तृप्त होईपर्यंत कौतुकाने आम्ही अज्ञानाचेही वर्णन केले.
943-13
आणि आतां हें रोकडें । उपपत्तीचेनि पवाडें । निरूपिलें उघडें । ज्ञेय पैं गा ॥943॥
आणि अर्जुना, आताच विचाराच्या विस्ताराने ज्ञेय मूर्तिमंत स्पष्ट करून सांगितले.
944-13
हे आघवीच विवंचना । बुद्धी भरोनि अर्जुना । मत्सिद्धिभावना । माझिया येती ॥944॥
अर्जुना, हा सर्व विचार बुद्धीत भरून जे माझ्या भावनेने माझ्या स्वरूपसिद्धीला येतात.
945-13
देहादि परिग्रहीं । संन्यासु करूनियां जिहीं । जीवु माझ्या ठाईं । वृत्तिकु केला ॥945॥
ज्यांनी देहादि परिग्रहाचा त्याग करून आपला जीव माझ्या ठिकाणी वतनदार केला.

946-13
ते मातें किरीटी । हेंचि जाणौनियां शेवटीं । आपणपयां साटोवाटीं । मीचि होती ॥946॥
अर्जुना, असे जे माझे भक्त ते शेवट हाच विचार जाणून व आपल्या मोबदला मला घेऊन, मद्रूपच होतात.
947-13
मीचि होती परी । हे मुख्य गा अवधारीं । सोहोपी सर्वांपरी । रचिलीं आम्हीं ॥947॥
अर्जुना, मीच होण्याचा मुख्य प्रकार हा आहे असे समज व इतर सर्व मद्रूप होण्याच्या प्रकारापेक्षा हा सोपा प्रकार आम्ही तयार केला आहे.
948-13
कडां पायरी कीजे । निराळीं माचु बांधिजे । अथावीं सुइजे । तरी जैसी ॥948॥
डोंगराच्या कड्याला वर जाण्याकरता जशा पायर्‍या कराव्यात व आकाशाच्या पोकळीत वर जाण्यास जशी माच बांधावी किंवा खोल पाण्यातून जाण्याकरता जशी त्या पाण्यात नाव (होडी) घालावी.
949-13
एऱ्हवीं अवघेंचि आत्मा । हें सांगों जरी वीरोत्तमा । परी तुझिया मनोधर्मा । मिळेल ना ॥949॥
सहज विचार करून पाहिले तर सर्वच आत्मा आहे, हा विचार जर तुला एकदम सांगितला असता तर हे वीरोत्तमा, तो विचार तुझ्या बुद्धीला गिळला गेला नसता. म्हणजे तुझ्या कल्पनेत आला नसता.
950-13
म्हणौनि एकचि संचलें । चतुर्धा आम्हीं केलें । जें अदळपण देखिलें । तुझिये प्रज्ञे ॥950॥
तुझ्या बुद्धीचा असमर्थपणा पाहिल्याकारणाने एकच सर्व ठिकाणी भरलेले जे परब्रह्म ते आम्ही चार प्रकारचे केले.

, , , , , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *