दृष्टांत 55 पूत कपूत तो दौलत किस कामकी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

पूत कपूत तो दौलत किस कामकी।

हिंदीमध्ये एक म्हण आहे, पूत कपूत तो दौलत किस कामकी। पूत सपूत तो दौलत किस कामकी। या म्हणीचा अर्थ समजून घ्यायचा असेल अमिताभ बच्चनच्या प्रसिद्ध शराबी या चित्रपटातील प्रसंग आठवावा लागेल.
या चित्रपटात अमिताभ त्याच्या वडिलांची भूमिका करणाऱ्या प्राणला म्हणतो, डँडी आप घरदार, रिश्ते नाते छोडकर सीर्फ दौलत कमाते रहे। अगर लडका अच्छा निकला तो वो खुद कमायेगा। अगर लडका बुरा निकला तो आपने कमाया हुआ सब लुटा देगा। तो आप किसलिए ये सब करते रहे।

आज हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान. एनसीबीने क्रुझवर टाकलेल्या धाडीत रेव्ह पार्टीत अंमली पदार्थाचे सेवन करताना किंबा अंमली पदार्थ बाळगताना त्याला अटक करण्यात आली. शाहरुखचा मुलगा पकडला गेला म्हणजे चित्रपट सृष्टीत तो एकटाच अंमली पदार्थाच्या आहारी गेला असे नाही. यापूर्वी सुनिल दत्तचा मुलगा संजय खान, फिरोज खानचा मुलगा फरदीनखान यांच्यावरही असे आरोप झाले. परंतु हा मुद्दा केवळ चित्रपट सृष्टीपुरता मर्यादित नाही. हा प्रश्न सामाजिक दृष्टीने विचार करायला लावणारा आहे. शाहरुखने चित्रपट सृष्टीत केवळ अमाप प्रसिद्धी, किर्ती मिळविली असे नाही तर अमाप पैसाही मिळविला. माणसाच्या गरजेपेक्षा कितीतरी अधिक पटीने त्याने पैसा कमावला. त्यामुळे त्याच्या घरात जन्माला आलेली बाळे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आली. घरात लक्ष्मी पाणी भरत असल्याने या मुलांना आपल्या भवितव्याची कोणतीही काळजी नाही. उलट शाहरुखने कमावलेली संपत्ती केवळ आपल्या नावेच न ठेवता ती पत्नी आणि मुलांच्या नावेही ठेवली. त्यामुळे वयाच्या अवघ्या वीस-बावीसाव्या वर्षी शाहरुखची मुले २००-३०० कोटीची मालक बनली.

सर्वसामान्य माणसांना दररोजच्या धकाधकीच्या जीवनात जो संघर्ष करावा लागतो, तो या मुलांना करावा लागला नाही. उदरनिर्वाहाचीही चिंता नाही. त्यामुळे श्रीमंताच्या लाडावलेल्या या बाळांना वाढदिवस, पार्टी असे चोचले सुचतात. त्यातून मग ही पिढी अंमली पदार्थाच्या सेवनाकडे वळते. हे चांगले किंवा वाईट हे सांगण्याची जबाबदारी कौटुंबिकदृष्ट्या आई-वडिलांची असते. परंतु सदैव पैशाची धुंदी चढलेल्या आई-वडिलांना ते सांगण्यासाठी, मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी सवडच नसते. खुद्द आर्यनने वडिलांना भेटण्यासाठी मँनेजर मार्फत अपाँईंटमेंट घ्यावी लागते असा जबाब एनसीबीला दिला त्यात सगळे आले. कोणताही माणूस कष्ट करतो तो आपल्या मुलांबाळासाठी करतो. शाहरुखही आता कमावित असलेला पैसा त्याच्या मुलांबाळांचाच असेल. पन्नाशी उलटल्यानंतरही शाहरुख खान आज चौवीस तास काम करुन ज्या मुलांसाठी पैसा कमावतो ती मुले जर क्रुझ पार्टीला जाऊन अंमली पदार्थाच्या आहारी गेली तर त्या पैशाचा काय उपयोग हा खरा प्रश्न आहे. आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्यावे, चांगले कपडेलत्ते द्यावे, चांगले खाऊ पिऊ घालावे हा सद््विचार झाला. परंतु आपली मुले दारु पितात, अंमली पदार्थाच्या आहारी गेली हे माहित असूनही जर आई-वडिल त्याला अडवत नसतील, त्याला प्रतिबंध घालत नसतील तर तो दोष मुलांचा नाही, आई-वडिलांचा आहे. संपतीचा माज आहे.

पूर्वी संपत्ती कमावताना लोक सामाजिक प्रतिष्ठाही जपायचे. तरुण मुले आई-वडिल सोडा आपल्या पेक्षा ज्येष्ठ असलेल्या व्यक्तीसमोर तंबाखू खात नसत, सिगारेट ओढत नसत. याचे कारण त्यांना मनाची भिती होती, जनाचीही भिती होती. सध्या संपत्ती कमावण्याच्या स्पर्धेत गुंतलेल्या लोकांना मनाचीही भिती राहिली आणि जनाचीही भिती राहिली नाही. ही परिस्थिती केवळ चित्रपट सृष्टीत नाहीत सर्वच क्षेत्रात झाली आहे. त्यात श्रीमंताच्या मुलांना कोणी बोलावे अशी विचारधारा सामान्य नागरिकात रुढ झाली. त्यामुळे घरातही अटकाव नाही आणि बाहेरही अटकाव नाही अशा स्वैराचारी वातावरणात आजची तरुणाई भटकत आहे. आई-वडिलांना कोणीतरी जाऊन सांगेल या भितीपोटी पूर्वी अनेक गोष्टीपासून तरुण मुले दूर राहत असत. काही आक्षेपार्ह करताना एखादा मुलगा दिसला तर त्याला बाहेरचे ज्येष्ठ नागरिक जाबही विचारत असत. आता सर्वसामान्य नागरिकांची भूमिका जाऊ द्या, आपल्याला काय करायचे, त्याचे ते पाहून घेतील. त्यातही एखाद्या मुलाची तक्रार त्याच्या वडिलांकडे करायला गेलो तर तुम्हाला काय करायचे, तुमचे पैसे घेतले का? अशी उत्तरे मिळतात. स्वातंत्र्याच्या नावाखाली आज जो स्वैराचार वाढला त्याचे खरे कारण हे आहे. संपत्तीच्या हव्यासापोटी आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाहरुख सारख्या लाखो लोकांना हे माहिती नाही की, या पृथ्वीतलावर कोणीही अजरामर नाही. वय वाढण्याची प्रक्रिया कोणाचीही थांबत नाही. त्यामुळे कमावलेली संपत्ती कोणीही सोबत घेऊन जाणार नाही. आपली इच्छा असो वा नसो दुसऱ्याला द्यावीच लागणार नाही. आणि आपल्या पश्चात संपत्ती सांभाळणारा उत्तराधिकारी जर योग्य नसेल, हुशार नसेल, निर्व्यसनी नसेल तर तो संपत्ती उधळणारच. मग आपल्या मरेपर्यत कष्ट करण्याचा काय उपयोग झाला? मुकेश अंबानी केवळ देशात सर्वात जास्त संपत्ती त्यांच्या जवळ आहेत म्हणून मोठे नाहीत.

धिरुभाई अंबानीच्या पश्चात त्यांनी त्यांचे उद्योग नुसतेच सांभाळले नाहीत तर ते वाढविले, त्याची भरभराट केली. त्यासाठी मुकेश अंबानी मोठे आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर आहे. तेवढा आदर आज अनिल अंबानी बाबत आहे का? दोघेही एकाच बापाची संतती आहेत. संतती चांगली नसेल तर माणूस कितीही मोठा असो, त्याच्या पश्चात त्याच्या नावलौकिकाचा रुतबा जनसामान्यावर राहत नाही. दुर्देवाने संपत्तीचा हव्यास असलेल्या लोकांच्या ही गोष्ट लक्षात येत नाही. शाहरुख खानच्या पूर्वी चित्रपटसृष्टीत नाही तर इतरत्रही अनेक मोठे लोक, श्रीमंत लोक होऊन गेले. परंतु ज्यांची संतती पुढे चांगली निघाली त्यांचाच नावलौकिक कायम राहिला. इतरांचे आज कोणाला नावही माहिती नाही. मनुष्याची ओळख ही कर्तृत्वाने निर्माण होत असते. ज्यांच्याकडे कर्तृत्व असते तेथेच लक्ष्मीचा सहवास असतो. सर्वात महत्वाचे म्हणजे लक्ष्मी ही चंचल असते. आज तुमच्याजवळ आहे याचा अर्थ कायम तुमच्याकडेच राहिल याची शाश्वती नसते. अनेक गर्भश्रीमंत माणसं आयुष्याच्या उतारवयात रस्त्यावर आलेली, अन्नपाण्यालाही महाग झालेली समाजाने पाहिली आहे. दुर्देवाने याचे भान कोणालाही राहिले नाही.

चंद्रपुरला लोकमत आणि ईटीव्ही प्रतिनिधी म्हणून मी १२ वर्षे वास्तव्य केले. या काळात आदरणीय बाबा आमटे यांच्याशी माझा निकटचा संबंध आला. सुटीच्या दिवशी अगदी बायको, मुलांसह आनंदवनात जाणे हा आमचा अव्याहत क्रम राहिला. आनंदवनात काहीही कार्यक्रम असला की आवर्जुन जाणे व्हायचेच. या काळात अनेक विषयावर बाबा आमटे यांच्याशी चर्चा व्हायची. एकदा अशाच चर्चेच्या ओघात मी बाबांना विचारले, बाबा तुम्हाला टेंपलटन, डाँ. आंबेडकर, पद््विभूषण या सारख्या पारितोषिकासह अनेक पारितोषिके मिळाली. देशातील नाही तर जगातील अनेक महनिय व्यक्तीशी तुमचा संपर्क आला.

महाराष्ट्रातील पु.ल. सारख्या व्यक्तिमत्वाशी तर तुमचे जीवाभावाचे नाते आहे. पण तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई कोणती वाटते? या माझ्या प्रश्नावर बाबांनी जे उत्तर दिले त्याचा बोध समाजाने घेण्याची गरज आहे. बाबा म्हणाले, कुष्ठरोग निर्मूलनाचे कार्य मी स्वीकारले. त्यासोबत इतरही समाजपयोगी कार्यात मी पडलो. आयुष्य समाजासाठी वाहायचे असा फकीर होण्याचा निर्णय घेतला. तो मी आजवर निष्ठेने जपला. परंतु माझ्या नंतर माझी मुले विकास आणि प्रकाश यांनीही तो वारसा त्याच निष्ठेने स्वीकारला. केवळ मुलेच नाही तर मोठ्या घरातून आलेल्या आणि उच्च विद्या विभूषित असलेल्या भारतीताई, मंदाताई या सुनांनीही हा वारसा स्वीकारला. आता माझी तिसरी पिढीही या मार्गाने वाटचाल करीत आहे. यापेक्षा आयुष्यात मोठे भाग्य ते काय असते. खुद्द राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या नशिबीही हे भाग्य आले नाही. बाबांचे हे उत्तर हिंदीमधील पूत कपूत तो दौलत किस कामकी। पूत सपूत तो दौलत किस कामकी। या म्हणीचा भावार्थ आहे.

हे भान जर समाजाने ठेवले तर मग खऱ्या अर्थाने रामराज्य येईल. त्या पाठोपाठ मग नैतिकता, प्रतिष्ठा आणि इतर गोष्टी आपोआप येतील. भरमसाठ संपत्ती कमावून संतती जर गुलछर्रे उडविणार असेल आर्यन सारखी तरुणाई क्रुझवरच सापडणार. काही जण त्याचे समर्थनही करणार. यातून समाजाचे काही भले होणार नाही. केवळ संपत्तीच्या हव्यासापोटी आज जी सर्वच क्षेत्रातील गणमान्य मंडळी अहोरात्र परिश्रम घेत आहेत त्यातून समाजाची उन्नती होणार नाही. चारित्र्य हा चांगल्या समाजाचा गुण आहे. तो आज रसातळाला गेला आहे हे मात्र निश्चित.

१५० दृष्टांत संग्रह पहा.

Page: 1 2 25

दृष्टांत सूची पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *