सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा ओवी २५१ ते २७५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

251-10
तयां वहिलियां गतिमंतां- । आंत पवनु तो मी पांडुसुता । शस्त्रधरां समस्तां- । माजीं श्रीराम तो मी ॥251॥
त्यात वायू तो मी आहे आणि शस्र धारण करणार्‍यांमध्ये प्रभू रामचंद्र मी आहे.
252-10
जेणें सांकडलिया धर्माचेन कैवारें । आपणपयां धनुष्य करूनि दुसरें । विजयलक्ष्मीये एक मोहरें । केलें त्रेतीं ॥252॥
ज्यांनी संकटांत पडलेल्या धर्माचा कैवार घेऊन व आपण आपल्याहून निराळे असे धनुष्य करून त्रेतायुगामध्ये एका विजयरूपी लक्ष्मीला आपल्याच समोर केले — म्हणजे संकटात सापडलेल्या धर्माला एकसारखा विजयच मिळवून दिला असा अर्थ.
253-10
पाठीं उभे ठाकूनि सुवेळीं । प्रतापलंकेश्वराचीं सिसाळीं । गगनीं उदो म्हणतया हस्तबळीं । दिधली भूतां ॥253॥
नंतर सुवेळ पर्वतावर उभे राहून, मूर्तिमंत प्रताप असा जो लंकेचा राजा रावण, त्याची मस्तके आकाशात उदोउदो करणारी भूतपिशाच्चे, यांच्या हातात त्यांना बळी म्हणून ज्याने अर्पण केली.
254-10
जेणें देवांचा मानु गिंवसिला । धर्मासि जीर्णोद्धारु केला । सूर्यवंशीं उदेला । सूर्य जो कां ॥254॥
ज्याने देवांचा मान पुनः त्यांना प्राप्त करून दिला व धर्माचा जीर्णोध्दार केला, जो सूर्यवंशामध्ये मूर्तिमंत उगवलेला सूर्यच होय.
255-10
तो हातियेरुपरजितया आंतु । रामचंद्र मी जानकीकांतु । मकर मी पुच्छवंतु । जळचरांमाजीं ॥255॥
हत्यार धारण करणार्‍यांमध्ये तो सीतापती रामचंद्र मी आहे. जलामध्ये राहणार्‍या पुच्छवंत प्राण्यांमध्ये मगर मी आहे.

256-10
पैं समस्तांही वोघां- । मध्यें जे भगीरथें आणितां गंगा । जन्हूनें गिळिली मग जंघा । फाडूनि दिधली ॥256॥
आणखी संपुर्ण प्रवाहांमध्ये जी गंगा, भगीरथ राजा पृथ्वीतलावर आणीत असता जह्नुराजाने गिळली व मग आपली मांडी घालुन फाडून परत सोडली.
257-10
ते त्रिभूवनैकसरिता । जान्हवी मी पांडुसुता । जळप्रवाहां समस्तां- । माझारीं जाणें ॥257॥
अशी त्रिभुवनात एकच वाहणारी, अर्जुना ! जाह्नवी नदी, ती सर्व जल प्रवाहांमध्ये माझे रूप होय, असे जाण.
258-10
ऐसेनि वेगळालां सृष्टीपैकीं । विभूती नाम सूतां एकेकीं । सगळेन जन्मसहस्रें अवलोकीं । अर्ध्या नव्हती ॥258॥
याप्रमाणे निरनिराळ्या भूतसृष्टीमधील एका एका विभूतीचे नाव सांगतांना हजारो जन्म खर्ची घातले, तरी अर्ध्यादेखील विभूती सांगणे होणार नाही, पहा!
सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन ।
अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम्॥10.32॥
अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च ।
अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतोमुखः॥10.33॥

259-10
जैसीं अवघींचि नक्षत्रें वेंचावीं । ऐसी चाड उपजेल जैं जीवीं । तैं गगनाची बांधावी । लोथ जेवीं ॥259॥
सर्व नक्षत्रे वेचून घ्यावी अशी जर आपल्याला मनात इच्छा झाली तर, ज्याप्रमाणे आकाशाची मोट बांधली पाहिजे.
260-10
कां पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा । तरि भूगोलुचि काखे सुवावा । तैसा विस्तारु माझा पहावा । तरि जाणावें मातें ॥260॥
किंवा पृथ्वीच्या संपूर्ण परमाणूंचा झाडा घ्यावा अशी इच्छा झाल्यास, ज्याप्रमाणे सबंध भूगोलच खाकेत उचलून घेतला पाहिजे, त्याप्रमाणे माझा संपूर्ण विस्तार पाहावयाचा असल्यास मलाच जाणले पाहिजे.

261-10
जैसें शाखांसी फूल फळ । एकिहेळां वेटाळूं म्हणिजेसकळ । तरी उपडूनियां मूळ । जेवीं हातीं घेपे ॥261॥
फांद्या, फुले व फळे ही सर्व एकदम घ्यावी, असे वाटल्यास ज्याप्रमाणे झाड मुळासकट उपटून घ्यावे लागते.
262-10
तेवीं माझें विभूतिविशेष । जरी जाणों पाहिजेती अशेष । तरी स्वरूप एक निर्दोष । जाणिजे माझें ॥262॥
त्याप्रमाणे माझ्या सर्व विभूती समजाव्यात, अशी इच्छा झाल्यास माझे निर्दोष उपाधिरहित असे स्वरूप जाणून घ्यावे.
263-10
एऱ्हवीं वेगळालिया विभूती । कायिएक परिससी किती । म्हणोनि एकिहेळां महामती । सर्व मी जाण ॥263॥
एरव्ही, अर्जुना! माझ्या वेगवेगळ्या विभूती किती ऐकशिल? म्हणून सर्व ठिकाणी मीच भरलेला आहे हे जाण,
264-10
मी आघवियेचि सृष्टी । आदिमध्यांतीं किरीटी । ओतप्रोत पटीं । तंतु जेवीं ॥264॥
हे किरीटी । मी सर्व सृष्टिचा आदि, मध्य आणि अंत आहे.ज्याप्रमाणे वस्ञांत तंतू उभे व आडवे भरलेले असतात.
265-10
ऐसिया व्यापका मातें जैं जाणावें । तैं विभूतिभेदें काय करावें । परि हे तुझी योग्यता नव्हे । म्हणोनि असो ॥265॥
त्याचप्रमाणे मी सर्वव्यापक आहे असे जाणल्या नंतर माझ्या विभूती जाणून काय करावयाच्या आहेत.? परंतु तसे करण्याची तुझी योग्यता नाही.म्हणून ते असू देत.

266-10
कां जे तुवां पुसिलिया विभूती । म्हणोनि तिया आईक सुभद्रापती । तरी आतां विद्यांमाजीं प्रस्तुतीं । अध्यात्मविद्या ते मी ॥266॥
हे अर्जुना ! त्वां मला माझ्या विभूती सांग असे म्हटलें, म्हणून त्याच ऐक. सर्व विद्येमध्ये अध्यात्मविद्या मी आहे.
267-10
अगा बोलतयांचिया ठायीं । वादु तो मी पाहीं । जो सकलशास्त्रसंमतें कहीं । सरेचिना ॥267॥
अर्जुना ! बोलणार्‍यांच्या ठिकाणी सर्व शास्रांचे आधारें होणारा व कधी न संपणारा जो वाद तो मी आहे.
268-10
जो निर्वचूं जातां वाढे । आइकतयां उत्प्रेक्षे सळु चढे । जयावरी बोलतयांचीं गोडें । बोलणीं होतीं ॥268॥
जो प्रतिपादन करूं जाता वाढतो, ऐकणार्‍यांच्या मनांत कोट्या करण्याच्या उर्मी उठतात आणि ज्यांत बोलणांर्‍यांनी गोड बोलणीं होतात.
269-10
ऐसा प्रतिपादनामाजीं वादु । तो मी म्हणे गोविंदु । अक्षरांमाजीं विशदु । अकारु तो मी ॥269॥
असा जो वाद, तो सर्व प्रकारच्या प्रतिपादनामध्ये मी आहे असे भगवान म्हणतात. अक्षरांमध्ये स्पष्ट जो ‘अ’ कार तो माझें स्वरूप होय.
270-10
पैं गा समासांमाझारीं । द्वंद्व तो मी अवधारीं । मशकालागोनि ब्रह्मावेरीं । ग्रासिता तो मी ॥270॥
आणि सर्व समासांमध्ये मी आहे असें जाण. मशकापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना ग्रासणारा (अक्षय जो काळ) तो मी आहे.

271-10
मेरुमंदरादिकीं सर्वीं । सहित पृथ्वीतें विरवी । जो एकार्णवातेंही जिरवी । जेथिंचा तेथें ॥271॥
सातही समुद्रांचा एक समुद्र करून मेरूमंदार इत्यादि सर्व पर्वतांसहित संपूर्ण पृथ्वीला त्या झालेल्या समुद्रात नाहीसे करतो व त्या एकरूप झालेल्या समुद्रालाहि (प्रलय तेजाने) जेथल्या तिथे शोषून टाकतो.
272-10
जो प्रळयतेजा देत मिठी । सगळिया पवनातें गिळी किरीटी । आकाश जयाचिया पोटीं । सामावलें ॥272॥
पुढे जो प्रलयकालच्या तेजालाही मिठी मारून सर्व वायुलाहि जो गिळतो आणि शेवटी आकाळहि ज्याच्या पोटात, अर्जुना ! सामावले जाते,
273-10
ऐसा अपार जो काळु । तो मी म्हणे लक्ष्मीलीळु । मग पुढती सृष्टीचा मेळु । सृजिता तो मी ॥273॥
असा अमर्याद जो काळ, तो मी होय, असे लक्ष्मीशी क्रिडा करणारा श्रीकृष्ण म्हणू लागला. मग पुनः सृष्टीचा समुदाय उत्पन्न करणारा तोही मीच आहे.
मृत्युः सर्वहरश्चाहमुद्‍भवश्च भविष्यताम् ।
कीर्तिः श्रीर्वाक् च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा॥10.34॥

274-10
आणि सृजिलिया भूतांतें मीचि धरीं । सकळां जीवनही मीचि अवधारीं । शेखीं सर्वांतें या संहारीं । तेव्हां मृत्युही मीचि ॥274॥
उत्पन्न झालेल्या सृष्टीला मीच धारण करतो. सर्व सृष्टीला मीच जीवन आहे — म्हणजे माझ्यामुळे त्यांचे पोषण व वृध्दी होते. शेवटी सर्वांचा संहार मीच करतो, म्हणून मृत्यूही मीच आहे.
275-10
आतां स्त्रीगणांचां पैकीं । माझिया विभूती सात आणिकी । तिया ऐक कवतिकीं । सांगिजतील ॥275॥
आता स्रीजातकांपैकी माझ्या आणखी सात विभूती आहेत. त्याहि कौतुकाने सांगतो ऐक.

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading