श्रीगणेश भाग १ हस्तीच मस्तक प्राप्त झाल

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

श्रीगणेश भाग १

गणेश ही विद्येची देवता व संकटांचं निवारण करणारी देवता म्हणून प्रसिद्ध आहे. एखाद्या महत्कार्याच्या आरंभी ‘ श्री गणेशाय नम: ‘ म्हणून गणेशाची स्तुती व आराधना करण्याचा प्रघात आहे. त्याचप्रमाणे अध्ययनाच्या आरंभीही गणेशाचा नामोच्चार करतात. हा देव सकळ विघ्नांचा हर्ता व मंगलमूर्ती असा मानला जात असल्यामुळे या देवाचे पूजन सर्वांच्या घरी होते.
हिंदूंमध्ये जे अनेक उपासना पंथ निर्माण झाले त्यामध्ये ‘ गाणपत्य ‘ हा एक पंथ आहे. गाणपत्याचे दैवत आहे गणपती. पार्वतीच्या अंगाच्या मळापासून गणपती निर्माण झाला अशी एक दंतकथा आहे. त्याप्रमाणे व्यासांनी सांगितलेलं महाभारत गणपतीने लिहिले आहे . अंगाने स्थूल , किंचित पिवळट वर्णाचा , मोठ्या पोटाचा , चार हात असलेला व एकदंत , हत्तीचं डोकं असलेला , असं गणपतीचं रूप पुराणात वर्णिले आहे. त्याने आपल्या चारही हातात शंख , चक्र , गदा व पद्म ही आयुधं धारण केली आहेत. कधीकधी उंदराला आपलं वाहन करून त्यावर बसून चालला आहे , असंही गणपतीचं वर्णन आढळतं. गणपतीला हत्तीचं मस्तक का लागलं याबद्दल अनेक दंतकथा प्रचलित आहेत.


शनीच्या कटाक्षापासून होणाऱ्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करून पार्वतीने एकदा शनीला गणपतीकडे बघण्यास सांगितलं. कारण तिला आपल्या पुत्राचा फार अभिमान होता. शनीने गणपतीकडे दृष्टी फिरवताच गणपतींचं मस्तक जळून खाक झालं तेव्हा पार्वतीला अतिशय दु:ख होऊन तिने ब्रह्मादेवास ही हकीकत कथन केली. ब्रह्मादेवाने तिला सांगितलं की तुला पहिल्या प्रथम ज्या प्राण्याचं मस्तक मिळेल ते मस्तक धडाला लाव म्हणजे गणपती पूर्ववत होईल. ब्रह्मादेवाच्या सांगण्याप्रमाणे ती मस्तकाच्या शोधात निघते. प्रथम तिला हत्तीचं मस्तक मिळतं. याप्रमाणे गणपती ‘ गजवदन ‘ झाल्याची एक दंतकथा आहे.
दुसरी एक दंतकथा अशी आहे की पार्वती स्नानास बसली असता तिने गणपतीला दरवाजावर राखण करण्याची आज्ञा देते. त्याप्रमाणे गणपती दरवाजाजवळ बसून राहतो. तेवढ्यात शंकर तिथे येतात. परंतु त्यांना आत जाण्यास गणपतीने प्रतिबंध केल्यामुळे ते गणपतीचं शिर उडवतात. त्यामुळे पार्वतीला फार दु:ख होतं. तिचं सांत्वन करण्यासाठी शंकर त्याच्या धडावर हस्तीचं मस्तक बसवून गणपतीला सजीव करतात.


एकदा परशुराम शंकराची भेट घेण्यासाठी कैलास पर्वतावर जातात. त्यावेळी शंकर निद्रीस्त असतात. तेव्हा परशुरामाला अंतर्गृहात येण्यास गणपती मज्जाव करतो. त्या दोघांमध्ये बाचाबाची होऊन युद्ध जुंपतं. गणपती परशुरामाला आपल्या सोंडेत धरून गरगर फिरवताच त्याला मूर्च्छा येते. सावध झाल्यानंतर परशुराम आपला परशू गणपतीवर फेकतात. (शंकरानेच तो परशू परशुरामाला दिलेला असतो. त्यामुळे गणपतीने आदराने तो आपल्या एका दातावर धारण करतो. पण त्यामुळे त्याला तो दात गमावावा लागतो. म्हणूनच गणपतीला ‘ एकदंत ‘ किंवा ‘ एकदंष्ट ‘ असं म्हणतात.
इतर देवतांप्रमाणे गणपतींची उपासना करणारा एक संप्रदाय भारतात आहे. या संप्रदायाला ‘ गाणपत्य ‘ असं म्हणतात. हाच परमात्मा असून त्यानेच सर्व ब्रह्मांड निर्माण केलं असं या पंथाचे अनुयायी मानतात. या पंथाच्या आचार्यांनी निरनिराळे ग्रंथ लिहिले. हे सर्व ग्रंथ त्या पंथाच्या अनुयायांनी प्रमाण मानले आहेत. या संपादायाचे प्रमुख ग्रंथ वस्दतापलीय अगर गणपति तापनीय उपनिषद , गणेश पुराण , मुगदल पुराण व ब्रह्मावैवर्त पुराणाचा गणेश खंड असे आहेत. ‘ गणेश संहिते ‘ त अगर ‘ गणपत्यनिषदा ‘ त गणपती हा जगताचा आदीकारण होय असं सांगितलं आहे. गणेश खंडामध्येदेखील अशाच कथा आहेत.
ब्रह्मावैवर्त पुराणामध्ये एका अध्यायात राधा गणेशाची पूजा करत असे , असं सांगितलं आहे. हे ध्यानात ठेवण्यासारखं आहे. गणेश खंडामध्येदेखील अशाच कथा आहेत. गणेश खंडात शिवाने गणपतीला प्रसन्न करून घेण्यासाठी दहा वर्षं घोर तपश्चर्या केली व त्यापासून त्रिपुरासुराचा वधाचा वर प्राप्त करून घेतला असं वर्णन आलेलं आहे.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *