दत्त जन्माचे अभंग, पाळणा, आरतीसह

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

दत्त जन्माचे अभंग आरतीसह
श्री दत्त जन्माख्यान अध्याय
दत्त चरित्र, ओवीबद्ध सूची
दत्तात्रयाचे २४ गुरु संपूर्ण माहिती
दत्तात्रयांचे सोळा अवतार
दत्त संप्रदायातील सत्पुरुष संपूर्ण माहिती
गिरनार माहात्म्य

श्री दत्ताची आरती (Datta Aarti)


त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना ॥
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥१॥
जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥धृपद॥

सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।
अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत ।
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥॥२॥
दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥॥३॥

दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥॥४॥

धरी अवतार विश्व तारावया
दत्त जन्म अभंग 1

धरी अवतार विश्व तारावया ।
अत्रीची अनसूया गरोदर ॥१॥
ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ।
शुक्लपक्ष दिनी पूर्ण तिथि ॥२॥
तिथि पौर्णिमा मास मार्गशीर्ष ।
गुरु तो वासर उत्सव काळ ॥३॥
एका जनार्दनी पूर्ण अवतार ।
निर्गुण निराकार आकारलें ॥४॥

पैल मेरुच्या शिखरी
दत्त जन्म अभंग 2
पैल मेरुच्या शिखरी । एक योगी निराकारी ।
मुद्रा लावुनी खेचरी । ब्रह्मपदी बैसला ॥१॥
तेणे सांडियेली माया । त्यजियेली कंथा काया ।
मन गेलें विलया । ब्रह्मानंदा माझारी ॥२॥
अनुहत ध्वनि नाद । तो पावला परमपद ।
उन्मनी तुर्याविनोदें । छंदे छंदें डोलतुसे ॥३॥
ज्ञान गोदावरीच्या तीरीं । स्नान केले पांचाळेश्वरी ।
ज्ञानदेवाच्या अंतरीं । दत्तात्रय योगिया ॥४॥

अव्यक्त परब्रह्मा न्हाणी पायावरी
दत्त जन्म अभंग 3

अव्यक्त परब्रह्मा न्हाणी पायावरी ।
अभेद नरनारी मिळोनिया ॥१॥
पीतांबर पदरें पुशिला घननीळा ।
निजविला निर्मळ पालखांत ॥२॥
निंब कातबोळ त्रिगुण त्रिखुंडी ।
प्रेमाचे आवडी सेवी माय ॥३॥
एका जनार्दनी दत्त पाळण्यांत घातिला ।
हालविती त्याला अनुसुया ॥४॥

दत्त्ताचा पाळणा

जो जो जो जो रे निज आया
दत्त जन्म अभंग 4

जो जो जो जो रे निज आया । हालविती अनुसुया ॥धृ.॥
पालख पुरुषार्थ चौकोनी । भक्तिनाडी गुंफोनी ।
दोरी प्रेमाची लाउनी । शांती गाती गाणीं ॥१॥
करितां उप्तत्ति शिणलासी । विश्रांति आलासी ।
निज रे ब्रह्माया तपलासी । कमळोद्भव जालासी ॥२॥
लक्ष्मीपति निज हो घनःश्यामा । सांडोनि वकुंठधामा ।
प्रतिपाळ करी हो जीव नामा । दर्शन दिलें आम्हां ॥३॥
पार्वतीरमण शिवा निज आता । संहारक जीवजंता ।
निजरुप निगमा हो आदिनाथा । एका जनार्दनी दाता ॥४॥

दत्त वसे औदुंबरीं । त्रिशुळ
दत्त जन्म अभंग 5


दत्त वसे औदुंबरीं । त्रिशुळ डमरु जटाधारी ॥१॥
कामधेनु आणि श्वान । उभे शोभती समान ॥२॥
गोदातीरीं नित्य वस्ती । अंगीं चर्चिली तिभुती ॥३॥
काखेमाजीं शोभे झोळी । अर्धचंद्रं वसे भाळीं ॥४॥
एका जनार्दनी दत्त । रात्रंदिनीं आठवित ॥५॥

दत्त माझा दीनानाथ
दत्त जन्म अभंग 6

दत्त माझा दीनानाथ । भक्तालागीं उभा सतत ॥१॥
त्रिशुळ घेऊनिया करीं । उभा असे भक्ताद्वारी ॥२॥
भाळीं चर्चिली विभुती । रुद्राक्षाची माळ कंठी ॥३॥
जवळी असे कामधेनु । तिचा महिमा काय वानुं ॥४॥
एका जनार्दनी दत्त । रुप राहिले हृदयांत ॥५॥

हाती कमंडलु दंड
दत्त जन्म अभंग 7
हाती कमंडलु दंड । दत्तमुर्ति ती अखंड ॥१॥
ध्यान लागो माझे मना । विनवितो गुरुराणा ॥२॥
अंगीं चर्चिली विभुती । हृदयी वसे क्षमा शांती ॥३॥
तोचि चित्तांत आठव । गुरुराज दत्त देव ॥४॥
एका जनार्दनी दत्त । तद्रुप हे झाले चित्त ॥५॥

आयुष्य जाय माझे व्यर्थ
दत्त जन्म अभंग 8

आयुष्य जाय माझे व्यर्थ । दत्त समर्थ महाराज ॥१॥
धांव धांव लवकरी । करुणा करी गुरूराया ॥२॥
मी तंव अनाथ अपराधी । हीनबुद्धि स्वामीया ॥३॥
काळ घाला पडिलावरी । धांव श्रीहरी लवलाह्मा ॥४॥
दत्ता पतित पावना । शरण एका जनार्दना ॥५॥

धांवे पावे दत्तराजा । महाराजा
दत्त जन्म अभंग 9

धांवे पावे दत्तराजा । महाराजा गुरुराया ॥१॥
अनाथासी संभाळावें । ब्रीद पाळावें आपुलें ॥२॥
तुजविण सोडवितां । नाही त्राता दुसरा ॥३॥
महादोषी पतितालागीं । करा वेगी उद्धार ॥४॥
एका जनार्दनी दत्ता । अवधुता माया बापा ॥५॥

दत्त माझी माता दत्त माझा पिता
दत्त जन्म अभंग 10

दत्त माझी माता दत्त माझा पिता । बहिणी बंधु चुलता दत्त माझा ॥१॥
दत्त माझा गुरु दत्त माझा तारु । मजशीं आधारु दत्तराज ॥२॥
दत्त माझे जन दत्त माझे मन । सोइरा सज्जन दत्त माझा ॥३॥
एका जनार्दनी दत्त हा विसांवा । न विचारित गांवा जावे त्याच्या ॥४॥

वेधोनि गेलें माझे मन
दत्त जन्म अभंग 11

वेधोनि गेलें माझे मन । हारपलें दुजेपण ॥१॥
ऐसी ब्रह्मामूर्ति दत्त । वोतलीसे आनंदभरीत ॥२॥
तयाविण ठाव । रिता कोठे आहे वाव ॥३॥
एका जनार्दनी भरला । सबाह्म अभ्यंतर व्यापिला ॥४॥

ऐसी जगाची माऊली
दत्त जन्म अभंग 12
ऐसी जगाची माऊली । दत्तनामें व्यापुनि ठेली ॥१॥
जीवे जिकडें तिकडे दत्त । ऐशी जया मति होत ॥२॥
तया सांकडेंचि नाही । दत्त उभा सर्वा ठायीं ॥३॥
घात अघात निवारी । भक्तां बाहे धरी करीं ॥४॥
ऐशीं कृपाळु माऊली । एका जनार्दनी देखिली ॥५॥

लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा
दत्त जन्म अभंग 13

लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा । देखिलासे डोळा दत्तराव ॥१॥
चरणीं घातली मिठी प्रेम दुनावें पोटी । पाहता हारपली दृष्टी दुजेपणा ॥२॥
मन माझे वेधलें परिपुर्ण भरलें । एका जनार्दनी सांठविलें हृदयी दत्त ॥३॥

दत्त माझी माय । आम्हां
दत्त जन्म अभंग 15

दत्त माझी माय । आम्हां अनाथांची गाय ॥१॥
प्रेमपान्हा पाजी वेगीं । गुरुमाउली आम्हालांगी ॥२॥
आम्हां प्रीतीची साउली । श्रीगुरु दत्तराज माउली ॥३॥
आमची जीवींची जीवलगी । आम्हांलागीं घे वोसंगीं ॥४॥
एका जनार्दनी । दत्तराज मायबहिणी ॥५॥

दत्त माझी माय । आम्हां
दत्त जन्म अभंग 16
दत्त माझी माय । आम्हां सुखा उणें काय ॥१॥
नित्य प्रीति दत्तनामीं । दत्त वसे गृहरामीं ॥२॥
दत्ताविण नसे दुजे । दत्त मायबाप माझे ॥३॥
दत्तात्रय दत्तात्रय । नाही कळिकाळाचें भय ॥४॥
एका जनार्दनी दत्त । नित्य देख हृदयांत ॥५॥

आमुचें कुळींचे दैवत
दत्त जन्म अभंग 17
आमुचें कुळींचे दैवत । श्रीगुरुदत्तराज समर्थ ॥१॥
तोचि आमुचा मायबाप । नाशी सकळ संताप ॥२॥
हेचि आमुचें व्रत तप । मुखी दत्तनाम जप ॥३॥
तयाविण हे सुटिका । नाही नाही आम्हां देखा ॥४॥
एका शरण जनार्दनी । दत्त वसे तनमनीं ॥५॥

माझी माता दत्तगुरु
दत्त जन्म अभंग 18
माझी माता दत्तगुरु । मज तिचाचि आधारु ॥१॥
तियेविण मजलागीं । कोण रक्षील सर्वांगी ॥२॥
दत्त माझा आधार । त्यासी चिंतीं वारंवार ॥३॥
निर्विकार निरंजन । स्वामी माझा दत्त जाण ॥४॥
एका जनार्दनी दत्त । नित्य देखे ध्याना आंत ॥५॥

तीन शिरें सहा हात
दत्त जन्म अभंग 19
तीन शिरें सहा हात । तया माझे दंडवत ॥१॥
काखे झोळी पुढे श्वान । नित्य जान्हवीचें स्नान ॥२॥
माथां शोभे जटाभार । अंगीं विभूति सुंदर ॥३॥
शंख चक्र गदा हाती । पायी खडावा गर्जती ॥४॥
तुका म्हणे दिगंबर । तया माझा नमस्कार ॥५॥


॥ विठ्ठल-विठ्ठल ॥

भ. दत्तात्रयांची संपूर्ण माहिती पहा

दत्त जयंती संपूर्ण माहिती

देव जन्माचे अभंग

भजनी मलिक संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *